निकालपत्र :- (दि. 15/09/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की – तक्रारदार हे जयसिंगपूर येथील हॉटेल व्यावसायिक आहेत तर सामनेवाला हे ट्रॅव्हल एजन्सी चालवतात व त्याव्दारे मुस्लीम समाजातील लोकांना हाजच्या धार्मिक यात्रा घडवण्यासाठी सौदी अरेबिया येथे जाण्यासाठी विमान तिकीटे, व्हीसा इत्यादी कामे करतात. तक्रारदारांना आपल्या पत्नीसह हाज यात्रेला जाण्याची तीव्र इच्छा होती म्हणून सन-2007 साली त्यांनी सामनेवालाकडे चौकशी केली असता सामनेवालाने त्यांना दोघांच्या यात्रेसाठी विमानतिकीटे, व्हिसा जेवणखाण इत्यादी सर्व मिळून अंदाजे रु.2,20,000/-खर्च येईल असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि.22/06/2007 रोजी सामनेवालाकडे रु.20,000/-रक्कम भरुन त्याची पावती घेतली. त्यानंतर दि.21/09/2007रोजी परत रक्कम रु.1,00,000/-सामनेवालांना दिले. त्यानंतर परत तक्रारदाराने सामनेवाला यांच्या मुलाकरवी त्यांच्याकडे रक्कम रु.1,00,000/- आणखी भरले व त्या दोन्ही पेमेंटच्या पावत्या सामनेवालांकडून घेतल्या. अशा त-हेने तक्रारदाराने सन-2007 साली सामनेवालाकडे हाज यात्रेसाठी रक्कम रु.2,20,000/-अशी संपूर्ण रक्कम भरणा केली. परंतु त्यावर्षी व्हिसा न मिळाल्याने सामनेवालाने तक्रारदारांना हाज यात्रेसाठी नेले नाही. सन-2008 मध्येही व्हीसा न मिळाल्याने समनेवालाने तक्रारदारांना हाज यात्रेला नेले नाही व पुढील वर्षी नक्की नेण्याचा वायदा केला. मुस्लीम समाजात हाज यात्रेला अतोनात महत्व असल्यामुळे तक्रारदाराने हॉटेल व्यवसायातून सुट्टी घेतली, पै-पाहूण्यांचे जाणे-येणे, स्वागत संमारंभ, इत्यादीसाठी तक्रारदाराचा रक्कम रु.50,000/- पेक्षाही जास्त खर्च झाला. पै-पाहुण्यात यात्रेला न गेल्यामुळे मानहानीही झाली. परत सन-2009 मध्येही सामनेवालाने तक्रारदारांना सौदी अरेबियाचा व्हीसा मिळत नसल्याचे कारण दाखवले व तक्रारदारांना हाज यात्रेला नेले नाही. अखेर सन-2009 मध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारांना आपण त्यांना हाज यात्रेला नेण्यास असमर्थ असल्याचे कबूल केले व इतर कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीतर्फे यात्रा करुन यावी व त्यानंतर तुमची रक्कम व्याजासह परत करण्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने दुस-या ट्रॅव्हल कंपनीतर्फे अखेर दि.18/12/2009 ते 31/12/2009 या कालावधीत हाज यात्रा पूर्ण केली. यात्रेहून आल्यानंतर जानेवारी-2010 मध्ये तक्रारदाराने सामनेवालांकडे सन-2007 मध्ये भरलेली रक्कम रु.2,20,000/- परत देण्याची मागणी केली तेव्हा सामनेवालाने कानावर हात ठेवले. तेव्हा आपली रक्कम सामनेवालांकडून सरळपणे परत मिळणार नाही हे लक्षात घेऊन तक्रारदाराने दि.16/02/2010 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवली. परंतु त्या नोटीसीची दखलही सामनेवालाने घेतली नाही. म्हणून अखेर तक्रारदाराने सामनेवालाच्या या गंभीर त्रुटीबद्दल प्रस्तुत मंचाकडे धाव घेऊन आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात अशी विंनती केली आहे. सामनेवाला यांना दिलेली रक्कम रु.2,20,000/- त्यावर द.सा.द.शे.18 टक्के व्याज, सन-2009 मध्ये तक्रारदारांना महागाईमुळे हाज यात्रेला जादा झालेला खर्च रु.1,00,000/-, तक्रारदारांना हॉटेल व्यवसाय बंद करुन हाज यात्रेची पूर्व तयारीसाठी आलेला खर्च रु.50,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (2) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांना दिलेली रक्कम रु.20,000/- व रु.1,00,000/- ची पावती, तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीलामार्फत पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पोचपावती, सदर नोटीसला सामनेवाला यांनी दिलेले उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (3) सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या तक्रारीला उत्तर देताना आपल्या केलेले सर्व आरोप अमान्य केले आहेत. त्याबद्दल आपले म्हणणे मांडताना सामनेवाला म्हणतात, सामनेवाला यांनी हाज यात्रेकरुंची नोंदणी करुन एकूण 45 पासपोर्ट मुंबई येथील व्हिसाचे काम करणारे ट्रॅव्हल एजंट श्री बशीर रशीद खान यांचेकडे जमा केले होते. त्या प्रत्येक व्हिसा व विमान तिकीटासाठी तक्रारदार व इतरांनी दिलेली संपूर्ण रक्कमही जमा केलेली होती. सदर बशीर रशीद खान यांनी ठरल्याप्रमाणे मुदतीत सामनेवाला यांना व्हिसा व विमान तिकिेटे दिली नाहीत. सामनेवाला हे 20 ते 25 वेळा मुंबईस जाऊन बशीर रशीद खान यांच्याकडे पाठपुरावा करुन पासपोर्टप्रमाणे व्हिसा व विमान तिकीटे देण्याचा आग्रह धरला. परंतु वारंवार हेलपाटे मारुनदेखील सामनेवाला यांना व्हिसा व विमान तिकीट देण्याबाबत बशीर रशीद खान यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सामनेवाला यांना रक्तदाब वाढून त्यांना मिरज येथील डॉ. नईम शेख यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तीस दिवस तेथे उपचार करण्यात आले होते. सामनेवाला यांचा मुलगा अनिस याने जे.जे.हॉस्पिटल पोलीस स्टेशन मुंबई येथे बशीर रशीद खान व अन्य दोन यांचेविरुध्द तक्रार दिली होती. सामनेवाला यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी बशीर रशीद खान व अन्य दोन यांच्याविरुध्द भा.दं.वि.स.कलम 420 सह 34 नुसार रितसर फिर्याद दाखल केली आहे. याची तक्रारदार यांना पूर्ण माहिती आहे. सामनेवाला हे रुग्णालयात उपचार घेत असताना तक्रारदार हे रुग्णालयात येऊन सामनेवाला यांची विचारपूस करुन पासपोर्ट व रक्कम परत मागितली होती. परंतु सर्व रक्कम व पासपोर्ट मुंबई येथे व्हिसा व विमान तिकीटासाठी बशीर रशिद खान यांच्याकडे जमा केलेली आहे असे सामनेवाला यांनी सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी माझ्या समाधानासाठी चेक द्या असा हॉस्पिटलमध्ये आग्रह धरला. त्यामुळे सामनेवाला यांनी हॉस्पिटलमध्ये चेक बुक नसतानादेखील कुरुंदवाडहून चेक बुक मागवून घेऊन तक्रारदार यांना रक्कम रु.2,20,000/- चा अमन सहकारी बँक लि.शाखा कुरुंदवाड कडील चेक क्र.093797 चा चेक तक्रारदारा यांना दिला. सदरचा चेक हा सामनेवाला यांनी तक्रारदार यांना केवळ बशीर रशिद खान यांच्याकडून रक्कम वसूल करुन देण्याच्या सुरक्षिततेपोटी दिला होता. बशीर रशिद खान व अन्य दोन यांचेविरुध्द माझगांव येथील मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट यांचे कोर्टात भा.दं.वि.स.कलम 420 सह 34 प्रमाणे क्रिमिनल केस नंबर 736/पी.डब्ल्यु/2008 चालू आहे. सदरची केस आता चौकशीसाठी आली आहे. 4) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात,सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रक्कम रु.2,20,000/- कधीही उसनवार घेतले नव्हते व नाहीत. सदरची रक्कम तक्रारदाराने हाज यात्रेला जाण्यासाठी व्हिसा, विमान तिकीट व तेथील इतर खर्चासाठी दिले होते. सामनेवाला यांनी तक्रारदाराची संपूर्ण रक्कम मुंबई येथील हाज यात्रेची व्यवस्था करणारे श्री बशीर रशिद खान यांच्याकडे आपले नातेवाईक श्री मेहबुब मुतवल्ली यांच्यामार्फत दिली आहे. त्यांनी त्याप्रमाणे आपले शपथपत्रही घातले आहे. त्यामुळे तक्रारदाराने श्री बशीर रशिद खान यांनाही या कामात पार्टी करणे आवश्यक आहे. कारण वास्तविकपणे सेवात्रुटी श्री बशीर रशिद खान यांनी केली आहे. त्यांनी सामनेवाला यांना तसेच तक्रारदार यांना व इतर एकूण 45 लोकांना याप्रमाणे फसवले आहे. या प्रकरणात सामनेवालाची कुठलीच सेवात्रुटी नाही. तसेच सन 2007 मध्ये पैसे भरुनही तक्रारदार अजूनपर्यंत गप्प राहिले याचाच अर्थ सदरची तक्रार खोटी व फसवणूकीची आहे. तसेच ती मुदतबाहयही आहे. सबब सदर तक्रार खर्चासह काढून टाकावी अशी मागणी सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सामनेवाला यांनी बशीर रशिद खान व अन्य दोन यांचेविरुध्द मुंबई येथील जे.जे.हॉस्पिटल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीची प्रत, सामनेवाला यांच फसवणूक झाल्याबाबत व त्यांना न्याय मिळावा यासाठी दैनिक वृत्तपत्रामध्ये आलेले लेख, तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द मे.ज्युडिशयल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग जयसिंगपूर यांचे कोर्टात दाखल केलेली फिर्याद व नोटीसीची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (6) या मंचाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकले व कागदपत्रे तपासले. तक्रारदाराचे सन2007 साली हाज यात्रेला जाण्यासाठी आपल्याकडे एकूण रक्कम रु.2,20,000/-भरले हे सामनेवालाने मान्य केले आहे.त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक आहेत हे निर्विवाद आहे. सामनेवालाने श्री बशीर रशिद खान मुंबई येथील ट्रॅव्हल एजंट यांच्याकडे तक्रारदाराचे पासपोर्ट व त्यांनी भरलेले रु.2,20,000/-इतर 45 लोकांच्या पासपोर्ट व पैशासह भरले असल्याने त्यांना या कामात पक्षकार करुन घेण्याची आवश्यकता असलेचे आपल्या कथनात म्हटले आहे. परंतु तक्रारदाराने रु.2,20,000/-हाज यात्रेसाठी सामनेवाला यांचेकडे व त्यांच्यावरील विश्वासामुळे भरले होते.तक्रारदार व बशीर रशिद खान यांच्यामध्ये कुठेही ग्राहकत्वाचे नातेच निर्माण झाले नव्हते (No privity of contract) त्यामुळे श्री बशीर रशिद खान यांना या तक्रारीत पार्टी न केल्यामुळे तक्रारीला Non Joinder of necessary parties ची बाधा येत आहे हे सामनेवालाचे कथन हे मंच ग्राहय धरु शकत नाही. (7) तक्रारदाराने सामनेवालांकडे हाज यात्रेची संपूर्ण व्यवस्था करण्यासाठी एकूण रक्कम रु.2,20,000/- भरले. सामनेवाला हे हाज यात्रेचे आयोजन करणारे अनुभवी ट्रॅव्हल एजंट असल्यामुळे त्यांना सौदी अरेबियाचा व्हिसा हाज यात्रेच्या काळात मिळण्यात किती व कुठल्या अडचणी येतात हे माहित असने अपेक्षित होते. जेव्हा व्हिसा मिळणे शक्य नाही हे त्यांच्या सन 2007 मध्ये लक्षात आले तेव्हाच त्यांनी तक्रारदाराचे पैसे व पासपोर्ट त्यांना परत करणे आवश्यक होते. परंतु सन 2008 व 2009 असे दरवर्षी त्यांनी यावर्षी व्हिसा मिळेल व तुमची हाज यात्रा घडेल असे तक्रारदारांना सांगून त्यांना खोटया आशेवर झुलवत ठेवले. अखेर सन2010 साली तक्रारदाराने दुस-या एजंटकडून सोय करुन हाज यात्रा करुन येतो असे सांगून आपले पैसे परत मागितल्यावरील तुम्ही हाज यात्रा करुन या नंतर आल्यावर पैसे परत देतो असे सांगून तक्रारदारांना खोटे आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात पैसे परत दिलेच नाहीत. (8) सामनेवाला स्वत:ला हाज यात्रेसाठी व्हिसाची व्यवस्था करणे शक्य होईना तेंव्हा त्यांनी मुंबईच्या बशीर रशिद खान नामक तथाकथीत ट्रॅव्हल एजंटकडे तक्रारदाराचे पैसे रक्कम रु.2,20,000/- व पासपोट्र व अन्य 45 लोकांचे पैसे व पासपोर्ट सोपवले. श्री बशीर खान यांची पूर्ण चौकशी न करता त्यांनी वेळोवेळी दिलेल्या भूलथापांना बळी पडून आपल्याकडे विश्वासाने सोपवलेले तक्रारदार व अन्य लोकांचे पैसे देणे ही सामनेवालाची गंभीर चुक होती. त्याबद्दल ते स्वत:च जबाबदार आहेत तसेच ही सामनेवालांच्या सेवेतील अत्यंत गंभीर सेवात्रुटी आहे हे तक्रारदाराचे म्हणणे हे मंच ग्राहय धरत आहे. (9) इस्लाम धर्माप्रमाणे हाज यात्रा ही अतिशय पवित्र व आयुष्यात एकदाच घडणारी यात्रा असते. या पवित्र यात्रेला जाण्यासाठी प्रत्येक मुस्लीम धर्मीय आत्यंतिक श्रध्देने व पै-पै एकत्र करुन पैसे जमवत असतो. त्यामुळे सामनेवालाच्या गंभीर सेवात्रुटीमुळे पूर्ण पैसे भरुनही हाज यात्रा सारखी लांबणीवर पडत राहिली. त्यामुळे तक्रारदारांना अतोनात मानसिक व आर्थिक त्रास झाला तसेच आपल्या भाईबंदात त्यांचा अवमान झाला हे तक्रारदाराचे कथन हे मंच ग्राहय धरत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवालाने तक्रारदाराची रक्कम रु.2,20,000/-(रु.दोन लाख वीस हजार फक्त) दि.06/11/2007 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज अदा करावे. 3) सामनेवालाने तक्रारदारास मानसिक त्रासाबद्दल रु.10,000/-(रु.दहा हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.2,000/-(रु.दोन हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |