द्वारा श्री. आर.बी. सोमानी - मा.अध्यक्ष
(दिनांक 28/03/2012)
तक्रारकर्तीचे म्हणणे थोडक्यात खालीलप्रमाणेः
1. तक्रारीत दिलेल्या पत्त्यावर तक्रारकर्तीचे मालकीची पॅथॅलॉजीकल लॅबोरॅटरी असून त्या स्वतःचे उदरनिर्वाहाकरीता काम करतात. तक्रारकर्तीने Automated Hematology Analyzer PE-6000 दि. 26/6/2007 रोजी सामनेवालेचे मुंबई कार्यालयातून बिल क्र. APPL/1038/07-08 नुसार रु. 4,75,000/- करीता मॉडेल क्र. Y 6000701000006 खरेदी केले. सामनेवाले क्र. 1 व 2 या सिस्टर कन्सर्न आहेत.
2. सदर अॅनालाइझर तक्रारकर्तीकडे बसविण्यात आले. परंतु त्यात निर्मिती दोष होता व ते योग्य प्रकारे काम करीत नव्हते. तक्रारकर्तीने सामनेवालेकडे मशिनची तक्रार केल्यावर 15 दिवसांचे आंत सर्व्हीस इंजिनिअर दिलीप शिंदे यांचेमार्फत मशिन बदलून दिले आणि नविन मशिन मॉडेल क्र. Y 60007010000014 दिले. परंतु मार्च, 2008 मध्ये पुन्हा बिघाड निदर्शनास आला. तक्रारकर्तीने कर्ज काढून सदर मशिन घेतले. मशिनचा उपयोग झाला नाही. त्याकरीता सामनेवाले जबाबदार आहेत. सामनेवाले यांना अनेकवेळा तक्रारी दिल्या परंतु त्रास कमी झाला नाही. तक्रारदाराने वकीलामार्फत दि. 4/2/2009 रोजी नोटीस पाठविली. सामनेवाले यांनी उत्तर दिले नाही. तक्रारदारास दोषपूर्ण अॅनालायझरमुळे अतोनात मानसिक त्रास व आर्थिक नुकसान झाले. निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवून सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिलेली आहे. म्हणून तक्रारीतील प्रार्थनेनुसार नुकसान भरपाई रु. 10,65,000/- व अॅनालायझरची किंमत रु. 4,75,000/- व तक्रारदाराने चुकते केलेले व्याज हे सर्व मिळून रु. 15,40,000/- मिळावेत अशी मागणी केली व इतर दाद मिळावी अशी प्रार्थना केली.
3. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत प्रतिज्ञालेख दाखल केला व यादी निशाणी 3 सोबत 8 दस्तऐवज दाखल केले. त्यात प्रामुख्याने मशिन खरेदीबद्दलचे दस्तऐवज व तक्रार अॅटेंड केलेबद्दलचे दस्तऐवज व इतर दस्तऐवज दाखल आहेत.
4. सामनेवालेस नोटीस लागून ते हजर झाले. त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला व तक्रारकर्तीचे संपूर्ण कथन फेटाळलेले आहे व प्राथमिक आक्षेप घेतला की, प्रस्तुत तक्रार चालू शकत नाही. तक्रारदाराने महत्त्वाची माहिती मंचापासून लपविली आहे. पुरविलेले मशिन योग्य होते. सदर अॅनालायझर हे तांत्रिक व अद्यावत यंत्र असल्यानेक त्याला तज्ञ व प्रशिक्षित व्यक्तीने हाताळणे आवश्यक आहे ही सूचना दिली होती. त्यास एक वर्ष वॉरंटी होती. योग्य हाताळणी न झाल्याने बिघाड निर्माण झाला. तक्रारदाराचे तक्रारीवरुन दुरुस्ती करण्यात आली. प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. दुरुस्तीनंती ते काम करणेयोग्य आहे म्हणून तक्रारकर्तीने दस्तऐवजावर सही केलेली आहे. सामनेवालेचे प्रतिनिधी तक्रारदाराकडे गेले असता अनेक व्यक्ती यंत्र हाताळत आहेत असे दिसून आले व हाताळणी अनेक अप्रशिक्षित व्यक्तींकडून केल्यामुळे त्रास उदभवत होता. वेळोवेळी आलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. वॉरंटी पिरिएड संपलेला आहे व म्हणून प्रस्तुत खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने खोटी नोटीस दिली आहे. तक्रारकर्तीची कोणतीही मागणी मान्य करणे योग्य नाही. तक्रारकर्तीने आपली केस सिध्द केलेली नाही. कर्ज घेणे ही वैयक्तीक बाब आहे. तक्रारदारास कोणताही त्रास झालेला नाही. तक्रार मुदतीत नाही. खर्चासह तक्रार खारीज करावी असे सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी प्रतिज्ञालेखावर नमूद केले.
तक्रारदाराने प्रतीउत्तर दाखल करुन सामनेवालेंचे आक्षेप फेटाळले. एक वर्षाची वॉरंटी पूर्ण झाल्याचे आधीपासूनच त्रास सुरु होता. तक्रारकर्ती स्वतः स्वकमाईसाठी काम करीत होती व तिचेव्यतिरिक्त अन्य कुणीही मशिन हाताळत नाही. सदर मशिनमध्ये तांत्रिक अडचणी असल्यामुळे वारंवार बंद होत होती. तक्रारदारास इतर लोकांकडून त्याअनुषंगाने रिपोर्ट करुन घ्यावे लागले. म्हणून सामनेवालेंचे मशिन खराब आहे असा युक्तीवादसुध्दा दाखल केला व नुकसान भरपाईची रक्कम मिळावी अशी विनंती केली.
सामनेवाले यांचे लेखी कथन व प्रतिज्ञालेखातील त्यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन प्रकरण निकालाकरीता घेण्यात आले.
उभय पक्षांचे शपथेवरील लेखी कथन, दाखल कागदपत्रे यांचे सुक्ष्म वाचन केल्यानंतर तसेच तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचासमोर निर्णयाकरीता पुढील मुद्दे उपस्थित होतातः
मुद्देः
1. तक्रार मुदतीत आहे काय?
2. तक्रार फेटाळणे योग्य आहे काय?
3. तक्रारकर्तीने सामनेवाले यांनी दिलेली सेवा व यंत्र दोषपूर्ण असल्याचे
सिध्द केले आहे काय?
निष्कर्षः
मुद्दा क्र.1-
सामनेवाले यांनी आक्षेप घेतला की, तक्रार मुदतीत नाही. परंतु उपलब्ध कागदपत्रांवरुन मंचासमोर असे स्पष्ट होते की सदर वादीत अॅनालायझर 27/6/2007 ला खरेदी केली होती. ते लगेच थोडया दिवसांनी बदलून दिले व सदर वादीत अॅनालायझरबद्दल सतत तक्रार होती व म्हणून मंचाचेमते प्रस्तुत तक्रार मुदतीत आहे.
मुद्दा क्र. 2-
सामनेवाले यांनी आक्षेप घेतला की, तक्रार चालू शकत नाही. सामनेवाले यांनी फक्त नमूद केले की तक्रार चालू शकत नाही. परंतु कशाप्रकारे कायद्याची बाधा येते असे कुठेही नमूद केले नाही आणि म्हणून सामनेवालेंचा आक्षेप फेटाळण्यात येतो.
तक्रारकर्तीने मंचासमोर नमूद केले की सदर अॅनालायझर बदलून दिले आहे कारण मूळात त्यात दोष होता व आहे आणि हे सिध्द करणेसाठी तक्रारकर्तीने सामनेवालेकडे केलेल्या तक्रारीचे दस्तऐवज आणि सामनेवाले यांनी अँटेंड केलेबद्दलचे दस्तऐवज दाखल आहेत आणि अशा स्थितीत मंचाचेमते तक्रारदाराने सिध्द केले आहे की, तिला पुरविलेले अॅनालायझर हे उच्च प्रतीचे नव्हते आणि वॉरंटी पिरिएडमध्येसुध्दा अनेकवेळा तक्रारी कराव्या लागल्या आहेत आणि म्हणून उपलब्ध कागदपत्रांवरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाले यांनी तक्रारकर्तीस पुरविलेले अॅनालायझर हे दोषपूर्ण होते व म्हणून ते बदलून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तक्रारदाराने सदर अॅनालायझर बदलून मिळणेबाबत कोणतीही विनंती केली नाही आणि म्हणून पर्यायी मागणी जसे की सदर अॅनालायझरची किंमत परत करणेची विनंती मान्य करणे न्यायोचित राहील.
तक्रारकर्तीने नमूद केले की अॅनालायझर खरेदीसाठी कर्ज घेतले व व्याज भरले आहे व तेसुध्दा सामनेवालेकडून मिळावे. मंचाचेमते अॅनालायझरचा उपयोग होणे न होणे, ग्राहक होणे न होणे ही वेगळी बाब आणि घेतलेल्या साहित्याची किंमत चुकती करणे ही वेगळी बाब आहे आणि म्हणून ही विनंती मंजूर करता येत नाही.
तक्रारदाराने नमूद केले की तिने इतर लॅबोरॅटरींमधून अनेक प्रकारच्या टेस्ट करवून घेतल्या व त्याकरीता संबंधीत किंमत चुकती करावी लागत आहे, त्याबाबत कागदपत्र दाखल आहेत. परंत संबंधीत लॅबोरॅटरीचे प्रतिज्ञापत्र दाखल नाही व इतर सबळ पुरावा नाही म्हणून तक्रारदाराची मागणीसुध्दा ग्राहय धरता येत नाही.
तक्रारकर्तीने विनंती केली की, अॅनालायझर बंद असल्याने तिला मानसिक, शारिरीक त्रास झाला आहे म्हणून नुकसान भरपाई मिळावी आणि मंचाचेमते प्रतिज्ञालेखात नमूद केलेनुसार तक्रारकर्तीस नुकसान भरपाई मंजूर करणे योग्य नाही आणि कारण झालेला त्रास सिध्द झालेला नाही आणि तिला नांवाचे नुकसान व झालेली गैरसोय हेसुध्दा सिध्द झालेले नाही म्हणून ही मागणी मान्य करता येत नाही. परंतु मंचाचे असे स्पष्ट मत आहे की तक्रारकर्तीस या संपूर्ण प्रकरणात मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. तक्रारकर्तीने कोणताही तज्ञ अहवाल दाखल केलेला नाही. तसेच सामनेवाले यांनीदेखील सदर अॅनालायझरचे टेस्ट रिपोर्ट किंवा लिटरेचर अथवा इतर साहित्य जेणेकरुन हे सिध्द होईल की तक्रारकर्तीस पुरविलेले अॅनालायझर सक्षम, कार्यक्षम व योग्य आहे, असे कोणतेही दस्त दाखल केलेले नाही.
सामनेवाले यांनी त्यांचे लेखी जबाबात नमूद केले की, त्यांनी तक्रारदाराचे नोटीसला दि. 21/2/2009 ला उत्तर दिलेले आहे. परंतु अशी कोणतीही प्रत रेकॉर्डवर दाखल नाही आणि त्यामुळे तक्रारदाराचे कथनास दुजोरा मिळतो. मंचाचेमते प्राथमिक जबाबदारी तक्रारकर्तीची आहे की सदर अॅनालायझर निकृष्ट दर्जाचे व योग्य नव्हते. मंचाचेमते वॉरंटी पिरिएडमध्ये आलेल्या तक्रारी आणि तक्रारदाराने दाखल केलेले दस्तऐवज यावरुन मंचाचे स्पष्ट मत आहे की तक्रारदारास पुरविलेले अॅनालायझर योग्य व पूर्णतः दोषरहीत नव्हती म्हणून तिची रक्कम परत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.
वरील विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेः
आ दे श
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
- सामनेवाले यांनी तक्रारकर्तीस सदोष अॅनालायझर पुरवून दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
- सामनेवाले यांनी तक्रारकर्तीस सदर अॅनालायझरची किंमत रु. 4,75,000/-(अक्षरी रुपये चार लाख पंचाहत्तर हजार) तक्रारदारास देय करावे. तसेच तक्रारकर्तीने सदर अॅनालायझर सामनेवाले यांना परत करावे.
- तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी सामनेवाले यांनी तक्रारकर्तीस रु. 25,000/- (अक्षरी रुपये पंचविस हजार) व तक्रारीचे खर्चापोटी रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) देय करावे.
- उपरोक्त आदेशाचे पालन सामनेवाले यांनी या आदेशाची प्रत मिळाल्याचे 30 दिवसांचे आंत करावे अन्यथा आदेश देय रकमेवर आदेश तारखेपासून संपूर्ण रक्कम चुकती होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याज दराने देणेस जबाबदार राहतील याची सामनेवाले यांनी नोंद घ्यावी.
-