जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक 280/2015 तक्रार दाखल करणेत आलेची तारीखः- 18/06/2015.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः-22/03/2016.
रंजना सुकलाल चौधरी,
उ.व.सज्ञान, धंदाः घरकाम,
रा.व्दारा जालंदर विठठल चौधरी,
216, प्रताप नगर, जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. असोदा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतपेढी लि,असोदा,
ता.जि.जळगांव तर्फे प्रशासक, श्री.आर के मोरे ऑडीटर,
दुसरे उपलेखा परीक्षक,सहकार विभाग, डी डी आर ऑफीसचे
वर, जळगांव.
2. श्री हरीष दुर्गादास भोळे,चेअरमन,
रा.प्लॉट नं.283 दुसरा मजला, साने गुरुजी वाचनालयाजवळ,
सिव्हील हॉस्पीटलचे मागे, जिल्हापेठ,जळगांव.
3. श्री प्रमोद पुंडलीक कोल्हे,संचालक, रा.मु.पो.असोदा,ता.जि.जळगांव.
4. श्री दिलीप उखा चिरमाडे,संचालक,रा.ह मु लक्ष्मी नगर,
एम जे कॉलेजमागे,जळगांव.
5. डिगंबर अमृत पाटील,संचालक,रा.मु.पो.ता.आसोदा,जि.जळगांव.
6. खेमचंद रामकृष्ण महाजन,संचालक, रा.मु.पो.ता.आसोदा,जि.जळगांव.
7. उध्दव मुरलीधर पाटील,संचालक, रा.मु.पो.ता.आसोदा,जि.जळगांव.
8. सौ तुळसाबाई चिंधु नारखेडे,संचालीका, रा.मु.पो.ता.आसोदा,जि.जळगांव.
9. सौ.सविता कमलाकर सावदेकर,संचालीका, रा.मु.पो.ता.आसोदा,जि.जळगांव.
10. उमेश देविदास वाणी,संचालक, रा.मु.पो.ता.आसोदा,जि.जळगांव.
11. धिरज अविनाश जोशी,संचालक, रा.मु.पो.ता.आसोदा,जि.जळगांव.
12. जितेंद्र वसंत कोल्हे,व्यवस्थापक,
रा.पंचमुखी हनुमान मंदीराचे पुर्वेस, नानाभाई हॉस्पीटलचे
पश्चिमेस लागुन, जळगांव. ......... सामनेवाला.
कोरम-
श्री.विनायक रावजी लोंढे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदारातर्फे श्री.दत्तात्रय वि.भोकरीकर वकील.
सामनेवाला क्र.2 ते 5,7 ते 12 तर्फे श्री.एन एस पाटील वकील.
निकालपत्र
व्दारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्षः
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी मुदत ठेव पावतीच्या व बचत खात्यातील रक्कमा न देऊन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवलेली आहे म्हणुन मुदत ठेव पावत्यांची रक्कम व नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणेप्रमाणेः-
2. तक्रारदार हे जळगांव येथील रहीवाशी आहेत. सामनेवाला क्र. 1 ही असोदा ग्रामीण बिगरशेती सह.पतपेढी लि असोदा पतपेढी असुन नोंदणीकृत संस्था आहे. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सामनेवाला क्र. 1 हे प्रशासक, सामनेवाला क्र. 2 हे चेअरमन तसेच सामनेवाला क्र. 3 ते 11 हे संचालक व सामनेवाला क्र. 12 हे व्यवस्थापक आहेत. तक्रारदाराचे लग्नानंतरचे नांव सौ रंजना मोहन राणे असे असुन तक्रारदाराने सदरचा अर्ज लग्नापुर्वीचे नावाने केलेला आहे. सामनेवाला क्र. 1 संस्थेच्या संपुर्ण कारभारावर सामनेवाला क्र. 2 ते 12 यांचे नियंत्रण असुन संस्थेच्या सर्व व्यवहारास ते जबाबदार आहेत. सामनेवाला हे सभासदांना कर्ज देणे, ठेवी स्विकारणे व इतर बँकींग व्यवसाय करणे इत्यादी कामे करतात. तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे मुदत ठेव व बचत खात्यात रक्कम गुंतविलेली असुन त्याचा तपशिल खालीलप्रमाणेः-
अ.क्र. | पावती नंबर | ठेव तारीख | ठेव रक्कम | परत तारीख | देय रक्कम |
1 | 18645 | 3/3/11 | 20,000/- | 3/3/12 | 22,150/- |
2 | बचत खाते क्र. 1220 | 11/3/03 | 3,885/- | | 3,885/- |
3. तक्रारदाराने मुदत संपल्यानंतर सामनेवाला यांचेकडे मुदत ठेव पावतीची मुदतीनंतर देय होणारी रक्कम तसेच बचत खात्यात शिल्लक असलेल्या रक्कमेची मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मुदत ठेव व बचत खात्यात शिल्लक असलेली रक्कम अदा केली नाही व उडवाउडवीची उत्तरे दिली. नित्य खर्चासाठी तक्रारदारास सदर रक्कमेची अत्यंत आवश्यकता असुन रक्कम परत न मिळाल्याने तक्रारदाराचे अतोनात नुकसान होत आहे. सबब मुदत ठेव पावतीची मुदतीनंतर देय होणारी एकुण रक्कम व बचत खात्यात शिल्लक असलेली रक्कम व्याजासह देण्याचे सामनेवाला यांना आदेश व्हावेत, संपुर्ण रक्कमेवर व्याज देववावे तसेच तक्रारदारास झालेल्या नुकसानीपोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च देववावा अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र. 6 यांनी नोटीस घेण्यास नकार दिला नोटीस बजावणी झाली सबब त्यांचेविरुध्द दि.30/9/2015 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले.
5. सामनेवाला क्र. 2 ते 5,7 ते 12 यांनी तक्रारदाराचे प्रस्तुत तक्रारीस खुलासा सादर केला असुन तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सदरहु सामनेवाला हे दि.10/9/2012 पासुन संचालक नाहीत. तदनंतर महाराष्ट्र शासनाचे वतीने उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी वेळोवेळी प्रशासकाची नियुक्त पतपेढीवर केलेली आहे. तक्रार अर्जात नमुद ठेवीच्या व खात्यातील रक्कमा देण्यास सामनेवाला यांनी त्यांचे कार्यकाळात कधीही नकार दिलेला नव्हता तथापी सदर खाती ही संशयास्पद असल्याने गोठवण्यात आली होती. तसेच सद्यस्थितीत प्रशासक नियुक्त असल्याने सदर खात्याबाबत कशी व काय कार्यवाही झाली याची सामनेवाला यांना काहीएक माहिती नाही. खातेदाराने मुळ पावत्या वटवण्यासाठी मागणी करुनही संस्थेत जमा केल्या नाहीत. सामनेवाला यांनी कोणत्याही प्रकारे पदाचा गैरवापर केलेला नाही. तक्रारदाराने संपुर्ण प्रशासक मंडळास याकामी सामील केलेले नाही. तक्रार अर्ज दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही सबब सामनेवाला क्र. 2 ते 5 व 7 ते 12 यांचेविरुध्द केलेल्या मागण्या फेटाळण्यात याव्यात व मंचापासुन सत्य परिस्थिती लपवुन सदरचा अर्ज दाखल केला असल्याने तक्रारदाराकडुन नुकसानी दाखल रक्कम देववावी अशी विनंती सामनेवाला क्र.2 ते 5,7 ते 12 यांनी केलेली आहे.
6. तक्रारदाराने पुराव्याकामी शपथपत्र दाखल केलेले आहे तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेली ठेव पावती व बचत खात्याची छायाप्रत दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी त्यांचे म्हणण्यासोबत प्रशासक नियुक्तीचे आदेश, मुखत्यार पत्र इत्यादी हजर केलेले आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत मुखत्यारपत्र हजर केलेले आहे. तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांचा सविस्तर युक्तीवाद ऐकला. न्याय-निर्णयासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात.
मुद्ये उत्तर
1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांची मुदत ठेव रक्कम
व बचत खात्यात शिल्लक असलेली रक्कम
न देऊन द्यावयाचे सेवेत त्रृटी ठेवली आहे ही बाब
तक्रारदाराने शाबीत केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीत केलेली मागणी मिळण्यास
पात्र आहेत काय ? होय, अंशतः.
3) कोणता आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसाः
मुद्या क्र. 1 ते 3 ः
7. तक्रारदार यांचे वकील श्री.भोकरीकर यांनी त्यांचे युक्तीवादामध्ये असे नमुद केलेले आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेवर विश्वास ठेवुन त्यांचे पतपेढीमध्ये बचत खाते व मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतवली तथापी मुदत संपल्यानंतर मुदत ठेवीची मुदतीनंतर देय रक्कम व बचत खात्यात शिल्लक असलेली रक्कम अदा न करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष व त्रृटीयुक्त सेवा प्रदान केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांची फसवणुक केली आहे त्यामुळे सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे या कारणास्तव मुदत ठेव पावतीची मुदतीनंतर देय रक्कम व्याजासह मिळावी व बचत खात्यात शिल्लक असलेली रक्कम व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
8. सामनेवाला क्र. 2 ते 5,7 ते 12 तर्फे श्री.पाटील यांनी या मंचासमोर युक्तीवाद करतांना असा मुद्या मांडला की, सामनेवाला हे दि.10/9/2012 पासुन संचालक नाहीत. तदनंतर महाराष्ट्र शासनाचे वतीने उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी वेळोवेळी प्रशासकाची नियुक्त पतपेढीवर केलेली आहे. सद्यस्थितीत सामनेवाला क्र. 2 ते 5,7 ते 12 हे पतपेढीवर संचालक म्हणुन कार्यरत नाही. तसेच ते कार्यरत असतांना त्यांनी तक्रारदारास रक्कम देण्यास कधीही नकार दिलेला नव्हता याउलट तक्रारदाराने मुळ ठेव पावती संस्थेकडे जमा केलेली नाही. अशा परिस्थितीत सामनेवाला हे सद्यस्थितीत पतपेढीवर संचालक म्हणुन कार्यरत नसल्याने व पतपेढीवर प्रशासक नियुक्त असल्याने तक्रारदाराची सामनेवाला यांचेविरुध्द दाखल प्रस्तुत तक्रार फेटाळण्यात यावी.
9. संपुर्ण दस्तऐवजांचे अवलोकन केले असता, तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेली मुदत ठेव पावती व बचत खात्याअंतर्गत सामनेवाला पतपेढीमध्ये रक्कम गुंतवल्याची बाब स्पष्ट होते. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेले दस्तऐवजाचे अवलोकन करता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,1960 चे कलम 78(1) अन्वये प्रशासकाचे नियुक्तीचे आदेश जा.क्र.पणन/पतसंस्था/असोदा ग्रा/क.78(1)/प्रनि/सन 2013, दि.18/3/2013 अन्वये पारीत झाले असल्याचे निर्दशनास येते. मुदतीनंतर ठेव पावतीत जमा असलेली रक्कम मुदतीनंतर अदा न करुन तसेच बचत खात्यात शिल्लक असलेली रक्कम व्याजासह अदा न केल्याने तक्रारदारास प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली असल्याची बाब स्वयंस्पष्ट आहे. सामनेवाला यांचा प्रस्तुत तक्रार अर्जास दिलेला खुलासा पाहता तसेच सद्यस्थितीत सदर पतपेढीवर प्रशासकाची झालेली नियुक्ती इत्यादीचा विचार करता तक्रारदाराची पतपेढीत असलेली रक्कम व्याजासह अदा करण्यास सद्यस्थितीत पतपेढीचे कार्यरत असलेले व्यवस्थापक, प्रशासक, चेअरमन व व्हाईस चेअरमन हे जबाबदार आहेत. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर होकारार्थी व मुद्या क्र. 2 चे उत्तर अंशतः होकारार्थी देऊन मुद्या क्र. 3 चे निष्कर्षास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
1) तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाला क्र. 1 पतपेढीचे सद्यस्थितीत कार्यरत असलेले व्यवस्थापक, प्रशासक, चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे निर्देशीत करण्यात येते की, तक्रारदाराची मुदत ठेव पावती व बचत खात्याअंतर्गत मुदतीनंतर देय होणारी एकुण रक्कम रु.26,035/-(अक्षरी रु.सव्वीस हजार पस्तीस मात्र ) प्रस्तुत आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 30 दिवसांचे आंत तक्रारदारांना अदा करावी, सदर मुदतीत रक्कम अदा न केल्यास सदर रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासुन ते प्रत्यक्ष रक्कम अदा होईपावेतोचे तारखेपर्यंत द सा द शे 9 टक्के प्रमाणे व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र राहतील.
3) सामनेवाला क्र. 1 पतपेढीचे सद्यस्थितीत कार्यरत असलेले व्यवस्थापक, प्रशासक, चेअरमन व व्हाईस चेअरमन यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असेही निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार मात्र ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/-(अक्षरी रु.एक हजार मात्र ) अदा करावेत.
4) निकाल पत्राची प्रत उभयपक्षांना विनामुल्य देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 22/03/2016. ( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विनायक रा.लोंढे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.