नि.19 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार क्रमांक :62/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि.08/12/2010. तक्रार निकाली झाल्याचा दि.24/03/2011. गणपूर्ती श्री.महेंद्र म.गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या 1. श्री.सतिश प्रभाकर जोशी रा.मु.पो.घराडी, ता.मंडणगड, जि.रत्नागिरी. 2. श्री.मुकुंद श्रीकांत मराठे रा.मु.पो.शेडवई, ता.मंडणगड, जि.रत्नागिरी. क्र.1 व 2 करीता मुखत्यार श्री.प्रभाकर विनायक जोशी रा.मु.पो.घराडी, ता.मंडणगड, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द ओशियन प्लॅस्टीक्स करीता प्रोप्रायटर रा.सर्व्हे नं.332, 333, 334, अंबरवेट, ता.मुळशी, जि.पुणे. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.एस.के.बेंडके सामनेवाले : एकतर्फा -: नि का ल प त्र :- द्वारा : मा.अध्यक्ष, श्री.महेंद्र म.गोस्वामी 1. विरुध्द पक्षाच्या ओशियन प्लॅस्टीक्सकडून तक्रारदारांनी त्यांच्या शेततळयासाठी खरेदी केलेली फिल्म निकृष्ठ दर्जाची असल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदरची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2. तक्रारदाराच्या तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार क्र.1 व 2 यांनी राष्ट्रीय फलोद्यान अभियान कार्यक्रम 2006-2007 प्रमाणे शासनाचे अनुदान घेवून शेततळे उभारण्याचा निर्णय घेवून मौजे घराडी येथील गट क्र.81 मध्ये शासनाचे परवानगीने शेततळे खोदण्यात आले. या शेततळयाच्या अस्तरीकरणासाठी वापरावयाची फिल्म ही आय.एस.7903-1984 या दर्जाची वापरणे बंधनकारक असल्यामुळे तक्रारदारांनी विरुध्द पक्षाच्या ओशियन प्लॅस्टीक्स, अंबरवेट, पुणे यांचेकडे या फिल्मची ऑर्डर दि.19/05/2006 रोजी दिली. त्यानुसार विरुध्द पक्षाने दि.04/06/2008 रोजी रक्कम रु.53,760/- ची फिल्म आय.एस.7903-1984 या दर्जाची आहे अशी ग्वाही देवून पाठविली व ही फिल्म जागेवर दि.08/06/2008 रोजी बसविली. या शेततळयासाठी रु.1,15,000/- खर्च करुन बागायती लागवड जून 2008 मध्ये करण्यात आली; परंतु सदरची फिल्म बसविलेनंतर एका महिन्याचे आत या फिल्मला भोके पडायला लागली व जॉईंट सुटायला लागले त्यामुळे तक्रारदारांनी ही बाब विरुध्द पक्षाला कळविली व विरुध्द पक्षाने त्यांचे कामगार पाठवून पॅच लावून भोके बुजविण्याचा व जॉईंट जोडण्याचा प्रयत्न केला; परंतु यश आले नाही. त्यामुळे पुन्हा रक्कम रु.5,880/- ची फिल्म दि.21/06/2008 रोजी विरुध्द पक्षाने पाठविली व त्यांचे कामगारांनी पॅच बुजवणेकरीता ही फिल्म वापरली. दरम्यान सन 2008-2009 चा पावसाळी हंगाम निघून गेला व फिल्मला भोके पडल्याने शेततळयात पाणी साठले नाही व फळबागेस पाणी देवू न शकल्याने संपूर्ण लागवड वाया गेली व तक्रारदारांचे नुकसान झाले. 3. सदरची फिल्म वारंवार खराब होत असल्यामुळे ही फिल्म आय.एस.7903-1984 या दर्जाची आहे किंवा कसे ? याबाबत तक्रारदारांना शंका आली व त्यामुळे त्यांनी दि.29/04/2008 रोजी विरुध्द पक्षास पत्र पाठवून या फिल्मचा नमुना मंडणगड तालुक्याचे शेती अधिकारी यांचे उपस्थितीत पंचनामा करुन ते महाराष्ट्र राज्य फलोद्यान व औषधी वनस्पती मंडळाचे अधिसूचनेनुसार इंडियन इन्स्टीटयुट ऑफ पॅकेजींग मुंबई यांचेकडे पाठवावयाचे असल्यामुळे पंचनामा करण्यासाठी हजर रहाण्याची सूचना केली; परंतु हे पत्र दि.26/08/2009 रोजी प्राप्त होवूनदेखील विरुध्द पक्षाने उत्तर दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराने पुन्हा वारंवार पत्र पाठवूनदेखील विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी यांनी दि.28/01/2010 रोजी शेततळयाला बसविलेल्या फिल्मचा पंचनामा केला व पश्चिमउत्तर कोप-यातील कधीही पाण्याखाली न आलेला पूर्णतः संरक्षीत फिल्मचा तीन मिटर x तीन मिटरचा तुकडा पंचांचे समक्ष मोहोरबंद करुन इंडियन इन्स्टीटयुट ऑफ पॅकेजींग मुंबई यांचेकडे टेस्टींगसाठी दि.08/03/2010 रोजी पाठविण्यात आला. याबाबतचा अहवाल कृषी अधिकारी, मंडणगड यांना दि.11/05/2010 रोजी प्राप्त झाला असून या अहवालाप्रमाणे विरुध्द पक्षाने तक्रारदारांना पाठविलेली फिल्म ही हाय डेन्सीटीची नसून लो डेन्सीटीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आपली झालेली नुकसानभरपाई मिळावी यासाठी तक्रारदारांनी दि.16/06/2010 रोजी विरुध्द पक्षास पत्र पाठविले. विरुध्द पक्षाने फसवणूक करुन कमी दर्जाची फिल्म दिल्यामुळे सन 2008 ते 2010 चे तीन पावसाळी सिझनमध्ये शेततळयात पाणी न साठल्यामुळे फळबाग लागवड पूर्णतः वाया गेली व तक्रारदारांचे नुकसान झाले त्यामुळे आपणास नुकसानभरपाई रु.2,87,611/- व मानसिक त्रासासाठी रु.2,00,000/- मिळावेत यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे. 4. तक्रारदाराने त्याचे तक्रारीसोबत नि.2 वर तक्रारीच्या पृष्ठयर्थ स्वतंत्र शपथपत्र दाखल केले असून नि.4 वरील दस्तऐवजाचे यादीनुसार राष्ट्रीय फलोद्यान अभियान कार्यक्रमाअंतर्गत प्रपोजलसह कागदपत्र, ओशियन प्लॅस्टीक्सचे फिल्म खरेदीचे टॅक्स इनव्हॉईस, डिलीव्हरी चलन, दुसरे टॅक्स इनव्हॉईस, पोस्ट मास्तरकडे पाठविलेले पत्र व त्यांनी दिलेल्या पत्राची पोचपावती, कृषी अधिकारी व विरुध्द पक्ष यांना पाठविलेले पत्र व त्यांच्या पोच, कृषी अधिकारी यांनी तक्रारदार यांना पाठविलेले पत्र, पंचनामा, इंडियन इन्स्टीटयुट ऑफ पॅकेजींगकडे पाठविलेले पत्र व त्यांचा रिपोर्ट, आय.एस.स्पेशिफिकेशनची प्रत व तक्रारदारांनी विरुध्द पक्षास पाठविलेले पत्र व लखोटे इत्यादी कागदपत्रे दाखल केली. 5. सकृतदर्शनी तक्रारदारांची तक्रार दाखल होण्यास पात्र असल्याचे मंचाचे निदर्शनास आल्यामुळे मंचाने दि.14/12/2010 रोजी विरुध्द पक्षास नोटीस पाठविण्याचे आदेश पारीत केले. त्यानुसार नि.6 वरील नोटीसव्दारे तक्रारीची नोटीस मंचाचे रजिस्ट्री विभागाने विरुध्द पक्षास पाठविली व ही नोटीस विरुध्द पक्षास बजावणी झाल्याची पोचपावती मंचाला नि.8 वर प्राप्त झाली; परंतु नोटीस प्राप्त होवूनदेखील विरुध्द पक्ष हे मंचासमोर हजर झाले नाही व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे प्रकरणात दाखल केले नाही त्यामुळे मंचाने दि.18/02/2011 ला आदेश पारीत करुन विरुध्द पक्षाच्या लेखी म्हणण्याविना एकतर्फा प्रकरण चालविण्याचे आदेश पारीत केले व त्यानुसार प्रकरण तक्रारदाराचे पुराव्यासाठी ठेवण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने त्याचे पुराव्याचे शपथपत्र नि.12 वर दाखल केले व नि.14 वरील दस्तऐवजाचे यादीनुसार तालुका कृषी अधिका-याने दिलेले पत्र व जिल्हा कृषी अधिकारी, रत्नागिरी यांनी दिलेले पत्र व बँकेच्या खातेउता-याची प्रत दाखल केली. तसेच नि.15 वर पुरशिस दाखल करुन मुख्य अर्जानुसार युक्तिवाद समजावा असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे वकिलांनी विस्तृत स्वरुपात तोंडी युक्तिवाद केले व तक्रार विनाआव्हान राहिल्यामुळे पूर्णतः मंजूर करण्याची विनंती केली. त्यानुसार खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1. | ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत विरुध्द पक्षाने त्रुटी केली आहे काय ? | होय. | 2. | तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे काय ? | होय/अंशतः | 3. | विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा (Unfair Trade Practice ) अवलंब केला आहे काय ? | होय. | 4. | काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे. |
कारणमिमांसा 6. मुद्दा क्र.1 - तक्रारदारांनी राष्ट्रीय फलोद्यान अभियान कार्यक्रमाअंतर्गत शासनाचे अनुदान घेवून मौजे घराडी येथील गट क्र.81 मध्ये शेततळे मे 2008 मध्ये खोदले असून या शेततळयाच्या अस्तरीकरणासाठी लागणारी फिल्म तक्रारदाराने विरुध्द पक्षाच्या ओशियन प्लॅस्टीक्सकडून रु.53,760/- मध्ये खरेदी केली असून ही फिल्म तक्रारदारास दि.04/06/2008 रोजी प्राप्त झाली. त्याचे खरेदी बिल नि.4/2 वर असून त्याचे डिलीव्हरी चलन नि.4/3 वर आहे. ही फिल्म विरुध्द पक्षाचे कामगारांनी दि.08/06/2008 रोजी बसविली असून एक महिन्याच्या आत या फिल्मला भोके पडली व त्याचे जॉईंट सुटले त्यामुळे पुन्हा दि.21/06/2008 रोजी रु.5,880/- किंमतीची फिल्म खरेदी करावी लागली. तक्रारदारास पुरविण्यात आलेली फिल्म ही आय.एस.7903-1984 या दर्जाची पुरविण्यात आल्याचे विरुध्द पक्षाने बिलानुसार स्पष्ट केले; परंतु ही फिल्म हाय डेन्सीटीची न पाठविता लो डेन्सीटीची पाठविण्यात आली ही बाब इंडियन इन्स्टीटयुट ऑफ पॅकेजींग मुंबई यांनी दिलेल्या अहवालानुसार स्पष्ट होते. तक्रारदाराने त्यांना पुरविण्यात आलेली फिल्म ही सदोष व निकृष्ठ दर्जाची असल्याचे वारंवार कळवूनदेखील विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाले. ही ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेतील त्रुटी आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. 7. मुद्दा क्र.2 - विरुध्द पक्षाच्या ओशियन प्लॅस्टीक्सकडून खरेदी केलेली फिल्म ही एक महिन्याच्या आत खराब झाल्यामुळे व तिला भोके पडून जॉईंट सुटायला लागल्यामुळे तक्रारदाराने या फिल्मची तपासणी करण्यासाठी इंडियन इन्स्टीटयुट ऑफ पॅकेजींग मुंबई यांचेकडे पाठविण्याचे ठरविले. त्यासाठी तक्रारदाराने महाराष्ट्र राज्य फलोद्यान व औषधी वनस्पती मंडळाचे अधिसूचनेनुसार तपासणीला फिल्म पाठविण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत दि.28/01/2010 रोजी फिल्मचा पंचनामा केला व तीन मिटर x तीन मिटरचा तुकडा मोहोरबंद करुन तपासणीसाठी पाठविला. याचा अहवाल दि.08/03/2010 रोजी प्राप्त झाला असून सदरचा अहवाल तक्रारदाराने नि.4 वरील दस्तऐवजाचे यादीसोबत जोडलेला आहे. या अहवालात स्पष्टपणे Identification of Material या सदराखाली आय.एस.7903 हा Linear Low Density Polyethylene (LLDPE) असे नमूद केल्याचे दिसून येते. मूळात IS 7903:2005 या वस्तूच्या Specification मध्ये या मानांकनाची वस्तू ही High Density Polyethylene Woven Fabric असावी असे नमूद केले आहे. हे भारतीय मानकाचे वैशिष्टे या सदराखाली नि.4 वरील यादीसोबत जोडलेले आहे. त्यामुळे तक्रारदारास पुरविण्यात आलेली वस्तू ही सदोष व निकृष्ठ दर्जाची असल्यामुळेच ती अल्पकालावधीत फाटली व तक्रारदाराचे नुकसान झाले हे सिध्द होते. मात्र तक्रारदाराने त्याचे तक्रारीत मागणी करताना आपले रु.2,87,611/- चे आर्थिक नुकसान झाले त्यामुळे रु.2,87,611/- नुकसानभरपाई मिळावी व मानसिक त्रासाबद्दल व व्यावसायिक नुकसानीबद्दल रु.2,00,000/- मिळावेत अशी मागणी केल्याचे दिसून येते; परंतु तक्रारदाराचे आर्थिक नुकसान कसे झाले हे सिध्द करण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही. तक्रारदाराने शेततळयाची निर्मिती केल्यानंतर फळबागेची लागवड केली होती किंवा नाही व केली असल्यास ती किती वर्षे केली व त्यांचे दरवर्षी किती व कसे नुकसान झाले हे दर्शविण्यासाठी कृषी अधिका-यामार्फत कोणताही नुकसानीचा पंचनामा केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदाराचे किती व्यावसायिक व आर्थिक नुकसान झाले हे स्पष्ट होवू शकले नाही. तसेच फिल्म तपासणीच्या शुल्काची पावतीदेखील दाखल न केल्यामुळे नेमका किती खर्च आला हे स्पष्ट झाले नाही त्यामुळे तक्रारदार मागणी केल्यानुसार पूर्ण नुकसानभरपाई मिळण्यास पात्र नसून तक्रारदारास कमी दर्जाच्या फिल्म पुरवून त्यांना मानसिक व शारिरिक त्रास दिला व सेवेत त्रुटी दिल्यामुळे खरेदीच्या रकमेसह अंशतः नुकसानभरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. 8. मुद्दा क्र.3 - विरुध्द पक्षाच्या ओशियन प्लॅस्टीक्स यांनी तक्रारदारास आय.एस.7903-2005 High Density Polyethylene Woven Fabric या दर्जाची फिल्म न पाठविता Linear Low Density Polyethylene (LLDPE) ची फिल्म पाठविली. ही बाब इंडियन इन्स्टीटयुट ऑफ पॅकेजींग मुंबई यांनी दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट होते. भारतीय मानकानुसार IS 7903:2005 हे मानक High Density Polyethylene Woven Fabric साठी लागू होत असूनदेखील विरुध्द पक्षाने तक्रारदारांना Linear Low Density Polyethylene (LLDPE) ची फिल्म दिली. त्यामुळे विरुध्द पक्षाने आपल्या व्यापार वृध्दीसाठी अनुचित व्यापारी प्रथेचा (Unfair Trade Practice ) चा अवलंब केला व त्यामुळेच तक्रारदारास पुरविण्यात आलेली फिल्म ही कमी दर्जाची असल्यामुळे ती फाटली व तक्रारदाराचे नुकसान झाले त्यामुळे विरुध्द पक्ष हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 14(1)(डी) नुसार दंडात्मक नुकसानभरपाई (Punitive Damages) देण्यास पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. 9. मुद्दा क्र.4 - तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीची नोटीस विरुध्द पक्षास बजावणी होवूनदेखील विरुध्द पक्ष हे मंचासमोर हजर झाले नाहीत किंवा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व दाखल केलेले शपथपत्र हे विनाआव्हान राहिले असून विरुध्द पक्ष हे वस्तूंच्या विक्रीपश्चात ग्राहकाला सेवा देत नाहीत हे स्पष्ट होते. मंचाने या निकालपत्राच्या कारणमिमांसेतील मुद्दा क्र.1 ते 3 मध्ये केलेल्या विस्तृत विवेचनानुसार आम्ही तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करीत असून त्यादृष्टीकोनातून खालील अंतिम आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. विरुध्द पक्षाच्या ओशियन प्लॅस्टीक्सने तक्रारदारांस फिल्म खरेदीची किंमत रु.53,760/- (रु.त्रेपन्न हजार सातशे साठ मात्र) व रु.5,880/- (रु.पाच हजार आठशे ऐशी मात्र) असे एकूण रु.59,640/- (रु.एकोन्नसाठ हजार सहाशे चाळीस मात्र) 10% व्याजासह अदा करावेत व हे 10% व्याज फिल्म खरेदीच्या तारखेपासून अर्थात दि.04/06/2008 पासून ते रकमेची पूर्ण परतफेड होईपर्यंत देण्यात यावे. 3. तसेच ग्राहकाला देण्यात येणा-या सेवेत त्रुटी केल्याबद्दल व तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास देवून त्यांचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल एकत्रित नुकसानभरपाई रक्कम रु.10,000/- (रु.दहा हजार मात्र) विरुध्द पक्षाने अदा करावेत. 4. प्रकरण खर्चाबद्दल रु.1,000/- (रु.एक हजार मात्र) विरुध्द पक्षाने अदा करावेत. 5. विरुध्द पक्षाने अनुचित व्यापारी प्रथेचा (Unfair Trade Practice) अवलंब केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 14(1)(डी) अंतर्गत दंडात्मक नुकसानभरपाई (Punitive Damages) रु.10,000/- (रु.दहा हजार मात्र) मंचाचे लिगल एड फंडात जमा करण्याचे आदेश पारीत करण्यात येतात. 6. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करण्यात यावी. 7. तक्रारदाराच्या इतर मागण्या फेटाळण्यात येतात. रत्नागिरी दिनांक :24/03/2011 (महेंद्र म.गोस्वामी) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. M. M. Goswami] PRESIDENT | |