-निकालपत्र–
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस-मा.सदस्या.)
( पारित दिनांक-19 सप्टेंबर, 2016)
01. तक्रारकर्त्याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द फीश एक्वेरियम न पुरविल्याचे कारणा वरुन दाखल केली आहे.
02. तक्रारीचे स्वरुप थोडक्यात खालील प्रमाणे-
विरुध्दपक्षाचा फीश एक्वेरियम विक्री तसेच दुरुस्तीचा व्यवसाय आहे. तक्रारकर्त्याचा मुलगा रोहन राघव शर्मा याने विरुध्दपक्षा कडून फीश एक्वेरियम विकत घेण्याचे ठरविले होते, त्या अनुषंगाने त्याने तक्रारकर्त्याच्या क्रेडीट कॉर्डव्दारे दिनांक-17.10.2012 रोजी रुपये-18,000/- आणि दिनांक-28/10/2012 रोजी रुपये-9000/- विरुध्दपक्षास अदा केले परंतु संपूर्ण रक्कम विरुध्दपक्षास दिल्या नंतरही आज पावेतो तक्रारकर्त्याला फीश एक्वेरियम पुरविण्यात आले नाही. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने त्याचे घरी असलेले फीश एक्वेरियम त्या मधील 5 ते 6 फीशेस यासह स्वच्छ करण्या करीता विरुध्दपक्षाला दिले होते परंतु ते एक्वेरियम आणि त्यातील फीशेस विरुध्दपक्षाने परत केलेले नाहीत. या संदर्भात तक्रारकर्त्याने वेळोवळी प्रत्यक्ष्य आणि दुरध्वनीव्दारे विरुध्दपक्षाशी संपर्क साधून विकत घेतलेले फीश एक्वेरियम आणि स्वच्छ करण्यासाठी घरचे दिलेले फीश एक्वेरियम त्यातील माशांसह परत करण्याची विनंती केली परंतु विरुध्दपक्षाने आज पावेतो टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास नोंदणीकृत डाकेने दिनांक-30/01/2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून नोटीस मिळाल्याचे दिनांका पासून 15 दिवसाचे आत पुर्तता करण्याची मागणी केली परंतु विरुध्दपक्षाने प्रतिसाद दिलेला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने त्याला दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
म्हणून तक्रार दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द मागणी केली की, तक्रारकर्त्याच्या मुलाने नविन फीश एक्वेरियम विकत घेण्यासाठी विरुध्दपक्षाला दिलेले रुपये-27,000/- तसेच स्वच्छतेसाठी घरी असलेले फीश एक्वेरियम त्यातील 5 ते 6 माशांसह विरुध्दपक्षास दिले होते, ज्याची किंमत रुपये-25,000/- एवढी आहे त्याच बरोबर तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-1,50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-50,000/- असे मिळून एकूण रुपये-2,52,000/- द.सा.द.शे.24% दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे.
03. विरुध्दपक्षा तर्फे नि.क्रं 07 प्रमाणे लेखी उत्तर दाखल करण्यात आले. विरुध्दपक्षाने आपल्या उत्तरात तो असिम फॅन्सी फीश एक्वेरियम या नावाने शोभेचे मासे आणि इतर पाळीव प्राणी व पक्षी विकण्याचा व्यवसाय करीत असल्याची बाब मान्य केली. सदर दुकानाचा मालक विरुध्दपक्ष असिम वल्द निरंजन पॉल असून मागील अनेक वर्षा पासून तो दुकान चालवित आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे दुकानातून फीश एक्वेरियम (मासे ठेवण्याचा संच) विकत घेतला असल्याची बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्याने कथीत क्रेडीट कॉर्डव्दारे विरुध्दपक्षास दिलेल्या रकमांचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दिनांक-17.12.2012 रोजी तक्रारकर्त्याचा मुलगा त्याचे दुकानात शोभेचे मासे खरेदी करण्यासाठी आला व त्याने मासे विकत घेण्याची तयारी दर्शविली, त्यावेळी त्याचे मुलाने त्याचे घरी असलेल्या माश्यां सोबत नविन विकत घेतलेले मासे एकत्र ठेवण्याचे विरुध्दपक्षास सांगितले, त्यावर विरुध्दपक्षाने दोन्ही मासे हे वेगवेगळया प्रजातीचे असल्याने एकत्र राहू शकत नसून एकत्र ठेवल्यास ते एकमेकास शारिरीक क्षती पोहचवून त्यात त्यांचा मृत्यू होऊ शकतो असेही सांगितले. त्यावर तक्रारकर्त्याच्या मुलानी त्याचे घरी असलेले जुने 04 मासे विरुध्दपक्षाने विकत घेण्याची विनंती केली, त्यानुसार विरुध्दपक्षाने त्याचे कडून 04 मासे रुपये-2000/- मध्ये विकत घेतलेत, सदर व्यवहारा बाबत बिल मेमो क्रं-602, दिनांक-17/10/2012 रोजीचा तक्रारकर्ता श्री राघव शर्मा यांचे नावे बनविला. यामध्ये तक्रारकर्त्या कडून विरुध्दपक्षाने विकत घेतलेल्या मासोळयांचे आणि विरुध्दपक्षा कडून तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या शोभेच्या मासोळयांचे विस्तृत विवरण दिलेले आहे आणि सदर बिल मेमोवर तक्रारकर्त्याने सही केलेली आहे, ज्याची मूळ प्रत तक्रारकर्त्याला दिलेली आहे. सदर बिला प्रमाणे तक्रारकर्त्याने एकूण रुपये-20,000/- किंमतीचे मासे विकत घेतले होते, त्यामधून विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे घरी असलेले एकूण 04 मासे रुपये-2000/- ला विकत घेतले असल्याने तेवढी रक्कम बिला मधून वजा करुन एकूण रुपये-18,000/- विरुध्दपक्षास दिले असल्याची बाब मान्य केली. तक्रारकर्त्याने सदर बिल मेमोची रक्कम क्रेडीट कॉर्डव्दारे भरणा केल्या नंतर संपूर्ण मासे स्वतः सोबत घेऊन गेला, त्या बाबतचे सी.सी.टी.व्ही. कॅमे-या मधील फुटेज हे विरुध्दपक्षा जवळ होते, त्यामुळे तक्रारकर्त्याने संपूर्ण रक्कम दिल्यावर विरुध्दपक्षाने फीश एक्वेरियम दिले नाही ही बाब पूर्णपणे खोटी असल्याचे नमुद केले.
विरुध्दपक्षा तर्फे पुढे असे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्त्याने त्याचे कडील जुने फीश एक्वेरियम त्यातील 05 ते 06 शोभेच्या मासोळयांसह साफ करण्यास विरुध्दपक्षाला दिलेले नाही. तक्रारकर्त्याने त्याचे कडील 04 मासोळया हया विरुध्दपक्षास रुपये-2000/- मध्ये विकलेल्या आहेत, ज्याचा संपूर्ण उल्लेख बिल मेमो क्रमांक-602, दिनांक-17.10.2012 मध्ये आलेला असून त्यावर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी आहे.
विरुध्दपक्षा तर्फे पुढे असेही नमुद करण्यात आले की, या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने त्याच्या दुकानातून दिनांक-28/10/2012 रोजी विविध प्रजातीचे एकूण 06 नग शोभेच्या मासोळया एकूण रुपये-10,000/- मध्ये विकत घेतल्यात, ज्यावर विरुध्दपक्षाने रुपये-1000/- सवलत देऊन रुपये-9000/- चा बिल मेमो क्रं-645, दिनांक-28.10.2012 रोजीचा तक्रारकर्त्यास दिला, सदर्हू बिल मेमोवर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी आहे.
विरुध्दपक्षाने पुढे असेही कथन केले की, दिनांक-04/11/2012 रोजी तक्रारकर्त्याने त्यांच्या दुकानातून शोभेच्या मासोळयांना लागणारे विशीष्ट प्रकारचे अन्न बिल मेमो क्रं-672, दिनांक-04/11/2012, रुपये-4000/- उशारीवर विकत घेतले, सदर बिलावर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी आहे परंतु सदर बिलाचे भुगतान आज पर्यंत तक्रारकर्त्याने केलेले नाही व त्याचा उल्लेख कायेदशीर नोटीस व तक्रारीत त्याने केलेला नाही. अशाप्रकारे तिन्ही व्यवहारातील बिल मेमोंचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्याने कधीही विरुध्दपक्षा कडून फीश एक्वेरियम विकत घेतलेले नाही. तक्रारकर्त्याने त्याचे कडील जुने फीश एक्वेरियम त्यातील मासोळयांसह साफ करण्यास विरुध्दपक्षास कधीही दिलेले नाही. तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रार ही खोटी व बनावटी आहे. तक्रारकर्त्याच्या कायदेशीर नोटीसला विरुध्दपक्षाने दिनांक-15.02.2013 रोजी उत्तर पाठविलेले आहे, जे तक्रारकर्त्यास मिळल्याची पोच आहे. तक्रारकर्त्याला मासोळयांचे विकत घेतलेल्या अन्ना संबधी उधारिवर दिलेले रुपये-4500/- रकमेचे भुगतान विरुध्दपक्षाला करावयाचे नसल्याने त्याने खोटी तक्रार दाखल केलेली आहे.
विरुध्दपक्षाचे म्हणण्या प्रमाणे त्याने जर तक्रारकर्त्यास दोषपूर्ण सेवा दिली असती तसेच तक्रारकर्त्याच्या कथना नुसार त्याचा जुना एक्वेरियम व त्यातील मासे परत केले नसते तर त्याने पुन्हा विरुध्दपक्षाचे दुकानातून दिनांक-04/11/2012 रोजी मासोळयांना लागणारे अन्न उधारीवर खरेदी केले नसते, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास मासोळयांचे अन्न विक्री संदर्भात रुपये-4500/- परत करण्याचे आदेश मंचाने द्दावेत. तक्रारकर्त्याच्या मुलाने विरुध्दपक्षाशी व्यवहार केलेला असल्याने तक्रारकर्त्यास तक्रार मंचा समोर दाखल करण्याचा हक्क नाही. तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक होत नाही. तक्रारकर्त्याने केलेली संपूर्ण तक्रार ही खोटी व बनावटी असल्याने ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षा तर्फे करण्यात आली.
05. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे उत्तर, दाखल दस्तऐवजाच्या प्रती आणि उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो-
:: निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा सोबत एकूण 03 व्यवहार निरनिराळया तारखांना केल्याचे दाखल क्रेडीट मेमोच्या प्रतीवरुन दिसून येते, ज्याचे विवरण खालील प्रमाणे-
कॅश क्रेडीट मेमो नंबर | दिनांक | रक्कम | | एकूण बिलाची रक्कम | शेरा |
602 | 17.10.2012 | 20,000/- | 2000/- वजा तक्रारकर्त्या कडून विकत घेतलेल्या फीशची रककम | 18,000/- | क्रेडीट कॉर्डव्दारे भुगतान दिल्याचे नमुद असून व्यवहारावर दोन्ही पक्षकारांच्या स्वाक्ष-या आहेत. यामध्ये एक्वेरियम सुध्दा विविध प्रजातीच्या मासोळयांसह विकत घेतल्याचे नमुद आहे. |
645 | 28.10,2012 | 10,000/- | 1000/- वजा डिस्काऊंटची रककम | 9000/- | क्रेडीट कॉर्डव्दारे भुगतान दिल्याचे नमुद असून व्यवहारावर दोन्ही पक्षकारांच्या स्वाक्ष-या आहेत. यामध्ये विविध प्रजातीच्या मासोळया विकत घेतल्याचे नमुद आहे. |
672 | 04.11.2012 | 4950/- | 450/- डिस्काऊंटची रक्कम | 4500/- | उधारीचे व्यवहारावर दोन्ही पक्षकारांच्या स्वाक्ष-या आहेत. यामध्ये मासोळयांचे अन्न विकत घेतल्याचे नमुद असून उर्वरीत रक्कम रुपये-4500/- देणे असल्याचे नमुद आहे. |
उपरोक्त तिन्ही व्यवहार हे तक्रारकर्ता श्री राघव शर्मा यांचे नावे झाले असल्याचे दिसून येतात.
07. तक्रारकर्त्याने त्याचे कडील जुने एक्वेरियम विरुध्दपक्षास दिले होते या संबधाने कुठलाही पुरावा अभिलेखावर आलेला नाही, त्यामुळे जुन्या एक्वेरियमची तक्रारकर्त्याची मागणी मान्य करता येत नाही. मात्र तक्रारकर्त्याने त्याचे कडील जुन्या 04 मासोळया विरुध्दपक्षास रुपये-2000/- ला विकल्याचे कॅश क्रेडीट मेमो क्रं-602, दिनांक-17/10/2012 वरुन दिसून येते परंतु त्याची रक्कम विरुध्दपक्षाने बिला मधून समायोजित केल्याचेही दिसून येते. तक्रारकर्त्याने कॅश क्रेडीट क्रं-602, दिनांक-17.10.2012 अन्वये रुपये-18,000/- आणि कॅश क्रेडीट मेमो क्रं-645, दिनांक-28/10/2012 रोजी रुपये-9000/- विरुध्दपक्षास दिले असल्याची बाब सुध्दा विरुध्दपक्षास मान्य आहे. या व्यतिरिक्त तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून दिनांक-04/11/2012 रोजी कॅश क्रेडीट मेमो क्रं 672 अन्वये रुपये-4950/- चे मासोळयांचे अन्न विकत घेतले होते व ज्यामध्ये रुपये-450/- डिस्काऊंट दिला होता आणि उर्वरीत रक्कम रुपये-4500/- तक्रारकर्त्या कडे बाकी असल्याचे पुराव्यां वरुन दिसून येते.
08. तक्रारकर्त्याचा असा आरोप आहे की, त्याने नविन एक्वेरियम आणि विविध प्रजातीच्या मासोळया विकत घेण्यासाठी विरुध्दपक्षास एकूण रुपये-27,000/- क्रेडीट कॉर्डव्दारे देऊनही त्यास आज पर्यंत विरुध्दपक्षाने सदर माल पुरविलेला नाही.
09. याउलट विरुध्दपक्षाचे असे म्हणणे आहे की, त्याने सदरील मासोळया तक्रारकर्त्यास पुरविलेल्या आहेत. विरुध्दपक्षाचे असेही म्हणणे आहे की, त्याने नविन एक्वेरियम विकण्याचे कबुल केलेले नाही.
10. परंतु दाखल कॅश मेमोच्या प्रतीं वरुन नविन एक्वेरियम संख्या-01 आणि विविध प्रजातीच्या एकूण 17 मासोळया विकण्याचा व्यवहार दोघांमध्ये झालेला आहे आणि दोन नगदी व्यवहाराच्या कॅश क्रेडीट मेमोवर तसेच एका उधारीचे व्यवहारावर दोन्ही पक्षांच्या सहया असल्याचे दिसून येते.
11. तसेच दाखल पुराव्या वरुन असेही दिसून येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून दिनांक-04/11/2012 रोजी कॅश क्रेडीट मेमो क्रं 672 अन्वये रुपये-4950/- चे मासोळयांचे अन्न विकत घेतले होते व ज्यामध्ये रुपये-450/- डिस्काऊंट दिला होता आणि उर्वरीत रक्कम रुपये-4500/- तक्रारकर्त्या कडे बाकी असल्याचे दिसून येते.
12. अशापरिस्थितीत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास क्रेडीट कॉर्डव्दारे विविध प्रजातीच्या मासोळया विकत घेण्यासाठी एकूण रुपये-27,000/- अदा केल्याची बाब सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याने रुपये-4500/- चे उधारिवर मासोळयांचे अन्न विकत घेतले असल्याचे क्रेडीट मेमो वरुन सिध्द होते.
13. विरुध्दपक्षाचा मुख्य आक्षेप असा आहे की, दिनांक-04/11/2012 रोजी तक्रारकर्त्याने त्यांच्या दुकानातून शोभेच्या मासोळयांना लागणारे विशीष्ट प्रकारचे अन्न बिल मेमो क्रं-672, दिनांक-04/11/2012, रुपये-4500/- उधारीवर विकत घेतले, सदर बिलावर तक्रारकर्त्याची स्वाक्षरी आहे परंतु सदर बिलाचे भुगतान आज पर्यंत तक्रारकर्त्याने केलेले नाही व त्याचा उल्लेख कायेदशीर नोटीस व तक्रारीत त्याने केलेला नाही. तक्रारकर्त्याने विविध प्रजातीच्या मासोळया विकत घेण्याचा प्रथम व्यवहार हा दिनांक-17/10/2012 आणि दुसरा व्यवहार हा दिनांक-28/10/2012 रोजी विरुध्दपक्षाशी केला आणि दोन्ही व्यवहाराचे भुगतान अनुक्रमे रुपये-18,000/- व रुपये-9000/- प्रमाणे विरुध्दपक्षाला केलेले आहे आणि त्यानंतर तिसरा व्यवहार हा उधारीवर मासोळयांचे अन्न विकत घेण्याचा दिनांक-04/11/2012 रोजी कॅश क्रेडीट मेमो क्रं 672 अन्वये केला, ज्यामध्ये रुपये-450/- डिस्काऊंट दिला होता आणि उर्वरीत रक्कम रुपये-4500/- तक्रारकर्त्या कडे बाकी असल्याचे दिसून येते.
14. मंचाचे मता नुसार विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास कॅश क्रेडीट मेमो प्रमाणे विविध प्रजातीच्या मासोळया पुरविल्या बद्दल आणि सदर माल तक्रारकर्त्यास मिळाला असल्या बद्दल त्याची “लेखी पोच” घेतली नसल्याचे कॅश क्रेडीट मेमोंच्या प्रतीवरुन दिसून येते. सर्वसाधारण व्यवहारात असे दिसून येते की, कॅश क्रेडीट मेमो प्रमाणे माल संबधित ग्राहकास प्रत्यक्ष्य पुरविल्या नंतर कॅश क्रेडीट मेमो प्रमाणे प्रत्यक्ष्य माल मिळाला असे लिहून त्याखाली संबधित ग्राहकाची स्वाक्षरी घेण्यात येते परंतु माल मिळाल्या बद्दल तक्रारकर्त्याची कोणतीही पोच घेतल्याचे दिसून येत नाही वा तसा कोणताही पुरावा विरुध्दपक्षा तर्फे सादर करण्यात आलेला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला कॅश क्रेडीट मेमो व्दारे विविध प्रजातीच्या मासोळया विकत घेण्यासाठी दोन व्यवहारापोटी रुपये-27,000/- अदा केलेले आहेत आणि तिस-या उधारीच्या व्यवहाराव्दारे रुपये-4500/- रकमेचे मासोळयांचे अन्न विकत घेतलेले आहे, ज्याची रक्कम उधारीवर असल्याचे कॅश क्रेडीट मेमो वरुन सुध्दा दिसून येते, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षास अदा केलेली एकूण रक्कम रुपये-27,000/- (-) उधारी व्यवहारा पोटी तक्रारकर्त्याला देणे असलेली रक्कम रुपये-4500/- (=) रुपये-22,500/- विरुध्दपक्षा
कडून तक्रार दाखल दिनांक-20/09/2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% दराने व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-2000/- विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
15. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्षा विरुध्दची अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्षास आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्यास उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे रुपये-22,500/-(अक्षरी रुपये बावीस हजार पाचशे फक्त) तक्रार दाखल दिनांक-20/09/2013 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पोवेतो द.सा.द.शे. 9% दराने व्याजासह द्दावेत.
(03) विरुध्दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास द्दावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) प्रस्तुत निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.