जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक - २०४/२०११
तक्रार दाखल दिनांक - ०४-१०-२०११
तक्रार निकाली दिनांक - २६-०२-२०१४
हेमंत चंद्रराव मोरे ----- तक्रारदार.
उ.व.४० वर्षे, धंदा-वैद्यकिय व्यवसाय
रा.१२ ब,मयुर कॉलनी, देवपुर, धुळे
ता.जि.धुळे
विरुध्द
(१) एशियन ग्रानिटो इंडिया लि., ----- सामनेवाले.
२०२,देव आर्केड,
इस्कॉन मंदिराच्या समोर,
एस.जी.हायवे,अहमदाबाद ३८००१५
(गुजरात राज्य)
(२) सुनिल बंसाली,
प्रोपराईटर विराज सिरॅमीक्स,
पारोळा रोड,पांझरा पोळ जवळ,
धुळे,ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एस.ए.पंडीत)
(सामनेवाले क्र.१ तर्फे – वकील श्री.राहुल शिकारे)
(सामनेवाले क्र.२ तर्फे – वकील श्री.एस.वाय.शिंपी)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून टाईल्स बदलवून मिळाव्यात आणि नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी, सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केला आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदारांना राहण्यासाठी बंगला बांधावयाचा असल्याने त्याकामी त्यांनी सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेल्या टाईल्स सामनेवाले क्र.२ यांचेकडून, दि.२४-१२-२००८ रोजी एशिएन आरकोटचे २१ बॉक्स एवढया टाईल्स रक्कम रु.२८,८९६/- व मार्च २००९ मध्ये रॉक वस्सलचे ५१ बॉक्स टाईल्स रक्कम रु.१,३१,७८४/- एवढया किमतीस खरेदी केल्या. सदर टाईल्स या तक्रारदारांनी त्यांच्या बंगल्यामध्ये डिसेंबर २००९ मध्ये बसविल्या. त्यावेळेस सदर टाईल्स या दुय्यम दर्जाच्या, सदोष व कमी दर्जाच्या असल्याचे निदर्शनास आले. तसेच टाईल्स ची चमक कमी व रंग वेगळा असल्या सारखे वाटत होते. या दोषामुळे तक्रारदारांच्या बंगल्याचे शोभेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे सदर टाईल्स काढणे व त्या ठिकाणी नवीन टाईल्स बसविणे या कामी तक्रारदार यांना रु.३,००,०००/- एवढा खर्च येणार आहे. सदर दुय्यम दर्जाच्या टाईल्स तक्रारदारांनी दिल्या बद्दल तक्रारदारांनी सामनेवाले यांना दुरध्वनीद्वारे व प्रत्यक्ष भेटून टाईल्स बदलवून देण्याविषयी सांगितले. त्या ऐवजी उत्तम दर्जाच्या नवीन टाईल्स बसवून देणे किंवा झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. परंतु सामनेवाले यांनी उडवा उडवीची उत्तरे दिलीत. सामनेवालेंच्या सदरच्या कृत्यामुळे तक्रारदारांना मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांना दि.११-०५-२०१० रोजी नोटीस पाठविली. त्या नोटीसीस सामनेवाले यांनी खोटे उत्तर दिले. सामनेवालेंचे सदरचे कृत्य हे गंभीर असून सदोष सेवा स्पष्ट होत आहे. त्यामुळे सदरची तक्रार या मंचात दाखल केली आहे.
तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी सदोष सेवा दिली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे घोषीत होऊन मिळावे, दुय्यम प्रतिच्या टाईल्स परत घेऊन त्या ऐवजी नवीन टाईल्स स्वखर्चाने बसवून द्याव्यात किंवा रक्कम रु.६,००,०००/- द्यावेत. मानसिक, शारीरिक त्रासाकामी रु.५०,०००/-, अर्जाचा खर्च रु.१५,०००/- व्याजासह द्यावा.
तक्रारदार यांनी त्यांचे कथनाचे पुटयर्थ नि.नं.७ वर शपथपत्र दाखल केले असून नि.नं.१२ वरील यादीप्रमाणे एकूण ७ कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यात नोटसी,सर्व्हे रिपोर्ट,ईस्टेमेट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. तसेच नि.नं.४६ सोबत काही कागदपत्रे छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत.
(३) सामनेवाले क्र.१ यांनी त्यांचा खुलासा नि.नं.४० वर दाखल केला आहे. त्यात त्यांनी सदरचा अर्ज नाकारला असून त्यांचे असे कथन आहे की, तक्रारदारांनी सदरची तक्रार ही मुदतीत दाखल केलेली नाही. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या टाईल्स बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांनी नमूद टाईल्सबाबत केलेल्या सर्व्हे रिपोर्ट मधील नमूद टाईल्सचे प्रकार व साईज यामध्ये तफावत आढळते. तसेच सामनेवाले यांनी उत्पादीत केलेल्या सदर टाईल्स या उत्तम स्वरुपाच्या असून त्या तज्ज्ञांकडून तपासूनच पुढे विक्रीसाठी ते पाठवतात. त्यामुळे सदर टाईल्समध्ये कोणताही उत्पादीत दोष नाही. तक्रारदारांनी सदरच्या टाईल्स या चुकीच्या पध्दतीने हाताळल्याने व चुकीच्या पध्दतीने बसविल्याने तसेच त्या बसवितांना किंवा बसविल्यानंतर अॅसीडने धुतल्याने त्यावरील चमक किंवा रंग कमी होण्याची शक्यता आहे. त्यात सामनेवालेंची चुक नाही. सामनेवाले हे नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. त्यामुळे सदरची तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी अशी त्यांनी शेवटी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.१ यांनी त्यांचे कथनाचे पुटयर्थ नि.नं.४१ वर शपथपत्र दाखल केले आहे.
(४) सामनेवाले क्र.२ यांनी नि.नं.३८ वर खुलासा दाखल केला आहे. यात त्यांनी सदरचा अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे कथन आहे की, सामनेवाले क्र.२ यांच्यामार्फत कोणत्याही टाईल्सचे उत्पादन केले जात नाही. ते फक्त टाईल्स विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने उत्पादना संबंधीत बाबीशी सामनेवाले क्र.२ यांची कोणतीही जबाबदारी नाही. सामनेवाले क्र.२ यांनी कधीही दुय्यम प्रतीच्या टाईल्स तक्रारदारांना दिलेल्या नाहीत. त्यामुळे ते नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाहीत. सामनेवाले क्र.२ यांच्या सेवेत दोष नसून सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.२ यांनी त्यांचे कथनाचे पुटयर्थ शपथपत्र दाखल केले आहे.
(५) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांचा अर्ज, शपथपत्र व दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाले क्र.१ व २ यांचा खुलासा,शपथपत्र व दाखल कागदपत्रे पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकला असता, आमच्यासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तर आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दा : | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेत त्रुटी आहे काय ? | : नाही. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांचेकडून सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेल्या टाईल्स, दि.२४-१२-२००८ रोजी एशिएन आरकोटचे २ बाय २ चे २१ बॉक्स प्रती बॉक्स रु.१३.७६/- एवढया रक्कम रु.२८,८९६/- व मार्च २००९ मध्ये रॉक वस्सलचे ९२५ बाय ९२५ चे ५१ बॉक्स प्रती बॉक्स रु.२५८४/- असे एकूण किंमत रक्कम रु.१,३१,७८४/- एवढया किमतीस खरेदी केल्या आहेत. परंतु या बाबत तक्रारदारांनी खरेदीच्या पावत्या दाखल केलेल्या नाहीत. याकामी तक्रारदार यांनी सदर अर्ज दखल करण्यापुर्वी सामनेवाले क्र.१ यांना दि.११-०५-२०१० रोजी नोटीस पाठविली होती, त्या नोटीसीस सामनेवाले क्र.१ यांनी दि.१४-०६-२०१० रोजी नोटीस उत्तर दिले आहे. या नोटीसीचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदार यांनी सामनेवाले यांनी त्यांचेकडून सदर टाईल्स खरेदी केल्या ही बाब नाकारलेली नाही. एकंदरीत सामनेवालेंचा पत्रव्यवहार पाहता, तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडून सदर नमूद टाईल्स खरेदी केल्याआहेत हे स्पष्ट होत आहे. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदारांनी सामनेवाले क्र.२ यांचेकडून सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेल्या टाईल्स खरेदी केल्या आहेत व त्या टाईल्स योग्य दर्जाच्या नाहीत असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. याकामी सामनेवाले यांनी असा बचाव घेतला की, त्यांचे उत्पादनात दोष नाही. तक्रारदार यांनी सदर टाईल्स या चुकीच्या पध्दतीने हाताळल्या व बसविल्या आहेत व त्यानंतर त्या अॅसिडने धुतल्यामुळे त्यात दोष निर्माण झाला असावा असे नमूद केले आहे.
तक्रारदार यांच्या अर्जातील कथना प्रमाणे, तक्रारदारांनी दि.२४-१२-२००८ व मार्च २००९ मध्ये सदर टाईल्स खरेदी केल्या व त्यानंतर त्या टाईल्स या डिसेंबर २००९ मध्ये बसविण्यात आल्या आहेत. याचा अर्थ तक्रारदार यांनी टाईल्स खरेदी केल्यानंतर त्या लागलीच बसविलेल्या नाहीत. टाईल्स खरेदी केल्यानंतर एक वर्षापर्यंत त्यांची साठवणूक केलेली आहे. सदर कालावधीमध्ये टाईल्स या कशाप्रकारे जतन केल्या आहेत या बाबत तक्रारदार यांनी कुठेही उल्लेख केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी तक्रार अर्जातील कलम ४ मध्ये “सदर टाईल्स डिसेंबर २००९ मध्ये बसविण्यात आल्या, त्यावेळेस सदर टाईल्स या दुय्यम स्वरुपाच्या, सदोष व कमी दर्जाच्या असल्याने तक्रारदार यांच्या निदर्षनास आले.....” असे नमूद आहे. या कलमातील कथना प्रमाणे असे दिसते की, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या टाईल्स या २००९ मध्ये बसवितेवेळी त्या दुय्यम दर्जाच्या, कमी दर्जाच्या व आकाराच्या आहेत असे तक्रारदारांच्या लक्षात आलेले होते. याचा अर्थ टाईल्स बसवितांनाच त्या योग्य दर्जाच्या नव्हत्या असा होत आहे. अशा परिस्थितीत जर तक्रारदार यांना सदर टाईल्सच्या दर्जाबाबत ज्ञान झाले होते तर, तक्रारदार यांनी अशा कमी दर्जाच्या टाईल्स का बसविल्या ? या बाबत शंका निर्माण होत आहे.
जर तक्रारदारांना सदर टाईल्स या कमी दर्जाच्या असल्याचे लक्षात आले होते तर, त्या बसविण्याची आवश्यकता नव्हती. त्याच वेळी सामनेवाले यांना त्या बाबत लेखी कळविणे व त्या टाईल्स परत करणे आवश्यक होते. परंतु तक्रारदारांनी तसे केलेले दिसत नाही. तक्रारदार यांनी सदर टाईल्स या पुर्णपणे बसविलेल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की, त्या टाईल्स बसवितांना कमी दर्जाचा नव्हत्या असे स्पष्ट होते. त्यामुळे त्या टाईल्समध्ये उत्पादीत दोष होता असे म्हणणे योग्य होणार नाही.
(८) तक्रारदार यांनी सदर अर्ज दाखल करण्यापुर्वी नमूद टाईल्सचा सर्व्हे श्री.नितीन जोशी यांचेकडून दि.०५-०७-२०११ रोजी केलेला असून त्याचा रिपोर्ट, नि.नं. १३ वर दाखल केला आहे. तसेच सर्व्हेअर श्री.नितीन जोशी यांचे प्रतिज्ञापत्र नि.नं.४७ अ वर दाखल केलेले आहे. या दोन्ही कागदपत्रांचा विचार करता, यामध्ये सर्व्हेअर यांनी दि.०५-०७-२०११ रोजी तक्रारदारांचे फ्लोरींगचा सर्व्हे केला आहे. तसेच सदर परिक्षण टाईल्स बसविल्यानंतर केलेले असून, त्यामध्ये टाईल्सचा रंग हा वेगळा, टाईल्सवर धुळ लागल्या सारखे व ब-याच टाईल्सचा वरचा पापुद्रा हा उखल्याचे निदशर्नास आले आहे, असे नमूद केले आहे. परंतु सदर अहवालाचा व शपथपत्राचा विचार करता असे लक्षात येते की, सदर टाईल्स या सन २००८ मध्ये खरेदी केल्यानंतर त्याचे परिक्षण हे दि.०५-०७-२०११ रोजी करण्यात आलेले असून, ते समोर दिसत्या परिस्थितीप्रमाणे निरीक्षणावरुन केलेले आहे. सदरचा सर्व्हे करतांना सदर टाईल्स या शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून तपासणी करुन घेतलेल्या नाहीत व त्याप्रमाणे सदरचा अहवाल दिलेला नाही. त्यामुळे सदर टाईल्समध्ये उत्पादनात दोष आहे हे स्पष्ट होत नाही. तसेच सदरचा सर्व्हे करतांना सामनेवाले क्र.१ व २ यांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही. त्यामुळे सदरचा अहवाल हा एकतर्फी असल्याचे दिसत आहे. तक्रारदार यांनी सदर अहवाला सोबत फोटो सादर केलेले आहेत. परंतु फोटोवरुन त्या सदरहू टाईल्समध्ये उत्पादीत दोष होता हे सिध्द होत नाही.
याचा विचार होता सदर टाईल्स या बसविल्यानंतर तीन ते चार वर्षापर्यंत वापरलेल्या आहेत. त्यामुळे सदर नमूद टाईल्समध्ये उत्पादनात दोष आहे या तक्रारदारांचे म्हणण्यात तथ्य नसल्याचे आढळून येते. सबब सामनेवालेंच्या सेवेत दोष नाही. म्हणून मुद्दा क्र. “ब” चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) सामनेवाले क्र.२ यांनी सदर टाईल्स या उत्पादीत केलेल्या नाहीत. सदर टाईल्स सामनेवाले क्र.१ यांचेकडून जशा प्राप्त झाल्या त्याच परिस्थितीत त्या त्यांनी तक्रारदारास विकलेल्या आहेत. तसेच सामनेवाले क्र.२ यांनी त्यात काही फेरबदल केला अशी तक्रारदारांची तक्रार नाही. त्यामुळे सामनेवाले क्र.२ यांच्या सेवेत कोणतीही त्रुटी आढळून येत नाही, असेही आमचे मत आहे.
(१०) मुद्दा क्र. ‘‘क’’ –वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः २६-०२-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (सौ.व्ही.व्ही.दाणी)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.