तक्रारदारासाठी वकील श्रीमती गिता हांडा गैर अर्जदार क्र.1 साठी वकील श्री.गोन्सालवीस आणि योगेश राउळ. गैर अर्जदार क्र.2 एकतर्फा. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. 1. तक्रारदार हे इमारती बांधण्याचे काम करतात. त्यांनी सा.वाले क्र.1 यांनी तंयार केलेला रंग त्यांचे विक्रेते सा.वाले क्र.2 यांचेकडून विकत घेतला होता. तो भेसळयुक्त निघाल्याने त्यांचे जे नुकसान झाले त्याच्या नुकसान भरपाईसाठी सदरची तक्रार केली आहे. 2. सदरील तक्रारीत खालील वस्तुस्थिती तक्रारदार व सा.वाले क्र1 यांना मान्य आहे. अ) दि.08/07/2001 रोजी तक्रारदाराने सा.वाले क्र.2 कडून Acrylic Emulsion ( Batch No.00014/P) हा रंग 4 लिटर रु.630/- ला विकत घेतला. त्याचे बिल तक्रारीबरोबर निशाणी "अ" ला दाखल आहे. ब) सा.वाले क्र.1 त्या रंगाचे उत्पादक असून सा.वाले क्र.2 हे विक्रेते आहेत. क) तो रंग भिंतींना लावल्यानंतर तक्रारदाराला तो भेसळयुक्त वाटला म्हणून त्याने संपूर्ण रंग सा.वाले क्र.2 कडे लगेच परत केला. ड) तक्रारदाराने सा.वाले यांच्या मार्केटिंग मॅनेजरला दि.10/07/01 रोजीचे पत्र लिहून त्याबद्दल कळविले. (त्या पत्राची कॉपी तक्रारी बरोबर निशाणी "ब" ला दाखल आहे. इ) सा.वाले क्र.1 एरीया मॅनेजरने दि.24/09/2001 रोजी तक्रारदाला पत्र लिहिले त्यात त्यांनी कबुल केले की, तो रंग अपेक्षित नॉर्मप्रमाणे नाही. तो पाहिजे तसा घट्ट व चिकट नाही. ( The sampal varied considerably from the norms for both viscosity and hiding ),सदरचे पत्र तक्रारीच्या निशाणी "क" ला आहे.त्यांनी त्या रंगाची किंमत तक्रारदाराला देण्याचे कबुल केले. फ) परंतु तक्रादाराने ती रंकम स्विकारली नाही. त्यांनी सा.वाले यांचेशी पुन्हा पत्र व्यवहार करुन त्याला आलेल्या पोष्टाचा खर्च व लेबर चार्जेस असे एकूण 900/- रुपयाचीही मागणी केली. ती सा.वाले यांनी नाकारली. 3. तकारदाराचे म्हणणे की, त्यानंतर त्यांनी सा.वाले यांचेशी बराच पत्र व्यवहार केला परंतु काही उपयोग झाला नाही. म्हणून त्याने सदरची तक्रार दाखल केली. तक्रारदाराने या तक्रारीव्दारे खालील मागण्या केल्या आहेत. अ) सा.वाले यांचा बॅच क्र.00014/पी चा Acrylic Emulsion ( Batch No.00014/P) चा रंग सदोष असल्याने मार्केटमधून काढुन घेण्याचा सा.वाले यांना आदेश व्हावा. ब) सा.वाले यांनी तक्रारदाराला रु.1लाख नुकसान भरपाई व त्यावर दिनांक 10/07/2001 पासून द.सा.द.शे.18 दराने व्याज द्यावे. क) सा.वाले यांनी रु.25,000/- मानसिक त्रासापोटी व खर्चापोटी नुकसान भरपाई द्यावी आणि या तक्रारीचा खर्च द्यावा. 4. सा.वाले क्र.1 चे म्हणणे की, तकारीला तथाकथीत कारण दिनांक 10/07/2001 रोजी घडले. त्यानंतर दोन वर्षात म्हणजे दिनांक 11/07/2003 पर्यत मंचात तक्रार दाखल करावयास पाहिजे होती. ती दिनांक 24/05/2005 रोजी केली आहे. तक्रार दाखल करायला 1 वर्षे 9 महिन्याचा उशिर झालेला आहे. तक्रारदाराने सदर विलंब क्षमापित करण्याचा अर्ज दिलेला आहे. परंतु उशिर माफ करुन मिळण्यासाठी काही कारण दिलेले नाही. सा.वाले क्र.1 चे असेही म्हणणे आहे की, तक्रारदार हा 18 वर्षापासुन कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्या या व्यवसायासाठी त्याने रंग घेतला होता. रंग लावण्यासाठी दोन मजूर कामावर ठेवले होते. तो सदरचा व्यवसाय केवळ उदर निर्वाहासाठी करत होता असे त्याचे म्हणणे नाही. त्यामुळे तो ग्राहक होत नाही. 5. सा.वाले क्र.1 चे म्हणणे की, तक्रारदाराने लेबर चार्जेसची मागणी केली आहे. परंतु तक्रारदाराने संपूर्ण रंग परत केला होता. म्हणजेच मजुरांनी भिंतींना रंग लावण्याचे काम केलेले दिसत नाही. तसेच तक्रारदाराचे म्हणणे आहे की, रंगाचे पैसे परत मिळण्याची वाट न पहाता दिनांक 5/07/2001 ते 13/07/2009 पर्यत रंग देण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे मजुरांच्या कामाचे पैसे तक्रारदाराला मागता येत नाहीत. तसेच रंगात उत्पादन दोष होता हे तकारदाराने सिध्द केलेले नाही. रंगाच्या दर्जात थोडा फरक होता. तो स्टोरेजच्या (साठविण्याच्या) प्रॉब्लेममुळे निर्माण होऊ शकतो. रंग भेसळयुक्त होता त्याबद्दल काही पुरावा नाही. म्हणून त्यांच्या सेवेत न्यूनता नाही. म्हणून तक्रार रद्द करण्यात यावी. 6. सा.वाला क्र.2 यांना तक्रारीची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फाचा आदेश करण्यात आला. 7. आम्ही तक्रारदारालातर्फे वकील श्रीमती गिता हांडा यांचा युक्तीवाद ऐकला. तोंडी युक्तिवादाचे वेळी सा.वाले गैरहजर होते. आम्ही कागदपत्रं वाचली. या तक्रारीत प्राथमिक मुद्दा उपस्थित होतो की, तक्रार दाखल करण्यास उशिर झालेला आहे कां ? उत्तर- होय. असल्यास तो क्षमापित करण्यासाठी तक्रारदाराने पुरेसे कारण दिलेले आहे का ? उत्तर- नाही. 8. तक्रारदाराने तक्रारीतच म्हटले आहे की, त्यांनी दि.10/07/2001 रोजी रंगाच्या दर्जाबद्दल सा.वालेकडे तक्रार केली होती. म्हणजे रंगाचा दर्जा नॉर्म प्रमाणे नव्हता हे तक्रारदाराला दि.10/07/2001 रोजी कळाले. मंचाच्या मते त्याच दिवशी तक्रारीला कारण घडले. तक्रारदाराने सा.वाले यांना लेबर चार्जेस व पोस्टल चार्जेस एकूण रु.900/- ची मागणी त्यांच्या दि.19/10/2001 च्या पत्राने केली. सा.वाले यांनी त्यांच्या दि.23/05/2002 च्या पत्राने तकारदाराकडून त्या रंकमेचे विवरण मागीतले. तक्रारदाराने दि.28/05/2002 च्या पत्राने विवरण पाठविले. सा.वाले क्र.1 यांनी त्यांच्या दि.7/6/2002 च्या पत्राने तक्रारदाराचा पोस्टल चार्जेसचा व लेबर चार्जेसचा क्लेम नाकारला. व तक्रारदाराला 1 लिटर जास्तीचा रंग देण्याची तंयारी दाखविली. मात्र तक्रारदाराने सदरची तक्रार दि.24/05/2005 रोजी केलेली आहे. ती दिनांक 10/07/2001 नंतर 3 वर्षे 10 महिने 14 दिवसांनी केलेली आहे. तक्रार दोन वर्षाच्या कालावधीत करावयास हवी होती. ती दाखल करावयास 1 वर्षे 10 महिने 14 चा उशिर झालेला आहे. तकारदाराने दिनांक 14/03/2006 रोजी तक्रार दाखल करण्यास झालेला उशिर माफ करण्यासाठी अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदाराने त्या अर्जात तक्रारीस झालेला उशिर माफ करुन मिळण्यासाठी पुरेसे कारण दिलेले नाही येवढेच नव्हेतर कोणतेच कारण दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार दाखल करण्यास झालेला उशिर माफ करुन मिळण्याचा अर्ज नाकारण्यात येतो. परीणामतः तक्रारदाराची तक्रार रद्द होणेस पात्र आहे. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 198/2005 रद्द बातल करण्यात येतो. 2. उभय पक्षकारांनी या प्रकरणी आपापला खर्च सोसावा. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |