ग्राहक तक्रार क्र. 97/2013
अर्ज दाखल तारीख : 01/10/2013
अर्ज निकाल तारीख: 23/02/2015
कालावधी: 01 वर्षे 04 महिने 23 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) श्री. अरुण बळीराम बोराडे,
वय-32 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.मु.पो. गोटेगांव, ता.केज, जि. बीड, ह.मु.कळंब,
ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) श्री. अश्विनकुमार गवई,
व्यवस्थापक तथा शाखाधिकारी,
आय.सी.आय.सी. लोम्बार्ड जनरल इन्श्ुारन्स
कंपनी लि. मुंबई -400025.
व्दारा-विभागीय कार्यालय,
आय.सी.आय.सी. लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
दुसरा मजला, अॅडव्हेन्चर ऑवर, हॉटेल ओबराई समोर,
सहेदी रोड, अहमदनगर. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.एम.टेळे.
विरुध्द पक्षकारा तर्फे विधीज्ञ : श्री.एम.डी.गायकवाड
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री. मुकुंद बी.सस्ते यांचे व्दारा :
अ) 1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारकर्ता (तक) हा मौजे कळंब, ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथील रहिवाशी असून तो कळंब येथे सोने व चांदी खरेदी–विक्रीचा व्यवसाय करतो. सदर दुकानाचा नोंदणी क्र.दुकाने/कळंब/2936/2005 असा आहे. सदर दुकानाचा विरुध्द पक्षकार (विप) यांनी विमा पॉलीसी क्र.4082/72650338/00/000 दि.16/06/2012 ते 15/06/2013 पर्यंत उतरविलेला आहे. सदर विम्याचा अर्जदार हा वर्षाकाठी रु.4850/- विमाहप्ता विप यांचेकडे भरत आलेला आहे त्यामुळे अर्जदार हा विपचा ग्राहक आहे. दि.29/08/2012 रोजी रात्री 08.00 वा अर्जदार हा त्याचे मालकीचे दुकान शटर लावून त्यास कुलुप लावून करुन घरी गेला असता दि.30/08/2012 रोजी 02.15 वा. चे सुमारास एक टाटा सुमो जिपमध्ये 5 ते 6 लोक येवून कुलुप तोडून दुकानाच्या काचा फोडून रु.6,59,520/- ची चोरी केली. तसेच तसेच बाजूला असलेले चार दुकानात चोरी झाली. सदर घटनेची गु.र.नं.127/2012 कलम 395, 365, 341 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद केलेली आहे व सदर गुन्हयाची नोंद केल्यानंतर तक्रारदाराने सदर घटनेची माहीती विप यांना लेखी कळविली विमा कंपनीने त्यांच्या प्रतिनिधीमार्फत येवून पंचनामा करुन दुकानाची पाहणी करुन तेथील लोकांचे जवाब घेतले. अटींचे पालन न केल्याचे नमूद करुन सदर दावा नामंजूर करण्यात आला. म्हणून सदर तक्रार दाखल करण्यास भाग पडले. म्हणून तक्रारदारास सदर विमा रक्कम रु.6,59,520/- मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.20,000/- व अर्जाचा खर्च रु.20,480/- विप यांच्याकडून देण्याचे आदेश व्हावा अशी विनंती करण्यात आली आहे.
तक्रारदाराने तक्रारीसोबत दुकान नोंदणी दाखल, सर्व्हेअरचा रिपोर्ट, आय.सी.आय.सी. लिबॉर्डचे पत्र, पॉलीसी, क्लेम फॉर्म, फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, पाच पावत्या, अकाऊन्ट, चिंतामणी ज्वेलर्स सोळा पावत्या, टॅक्स अडव्हाईस, टॅक्स अॅडव्हाईस (एकूण 25), इत्यादी कागदपत्रांच्या प्रती मंचाच्या अभिलेखावर दाखल केली आहे.
ब) 1) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकारास नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.10/10/2013 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
2) तक्रारदाराचे वर नमूद नोंदणी असलेले दुकान आहे. त्याचा विमा तक्रारदाराने काढलेला आहे वगैरे बाबी पुराव्या आधारे साबीत करावेत. दुकानावर स्वतंत्र पहारेकरी नेमलेला नव्हता तसेच दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा, धोकयाचा इशारा देणारी स्वयंचलीत यंत्रणा इत्यादी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली यंत्रणा व व्यवस्था केली नाही, सदर दुकान बंद करतांना योग्य ती काळजी घेणे कुलूप लावून त्यावर स्वत:च्या सहीने सीलबंद करणे वगैरे केलेले नाही. यावरुन अर्जदाराचा हयगयीपणा व निष्काळजीपणा स्पष्ट दिसुन येतो. घटनेच्या वेळी सदर दुकानात किती माल विक्री झाला होता व किती व सोने- चांदीचा माल शिल्लक होता व तो कधी खरेदी केलेला होता, कोणाकडून व कोठुन खरेदी केलेला होता याचा उल्लेख अर्जदाराच्या तक्रार अर्जात स्पष्टपणे कोठेही नमुद केलेले दिसुन येत नाही. पो.स्टे. कळंब येथे दिलेल्या प्रथम खबरी अहवालात तसेच घटनास्थळ पंचनाम्यामध्ये रु.3,10,000/- ची चोरी झाल्याचे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. पण क्लेम करतांना रु.6,59,520/- ची चोरी झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. सदरच्या तफावतीवरुन तक्रारीची विश्वासार्हता दिसून येत नाही. दरोडेखोरांनी अवघ्या 30 मिनटांत सहा दुकाने फोडली कशी याबाबत अन्य कोणी सामिल होते काय असा दाट संशय निर्माण होतो. तक्रारदाराने सदर तक्रार सहा महीन्याने दाखल केली असल्याने तक्रार मुदतीत नाही. त्यामुळे म्हणून तक्रारदाराची तक्रार खारीज होणे योग्य आहे.
क) 1) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार नुकसान भरपाई रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय ? अंशत: होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
ड) 1) मुद्दा क्र.1 :
विप ने तक्रारदार हा ग्राहक असल्याचे अमान्य केले आहे. तथापि यासाठी दिलेले म्हणणे ज्यामध्ये पॉलिसीच्या कालावधीबाबत आक्षेप आहे तो तपासला असता दि.14/01/2013 चे पत्राचे अन्वये ज्यामध्ये तक्रारदाराचा दावा अमान्य करण्यात आला आहे त्यामध्ये तक ने विप ची पॉलिसी घेतलेली होती हे स्पष्टपणे विप कडूनच मान्य करण्यात आलेले आहे व ज्या कालावधीसाठी ही पॉलिसी घेतली होती त्याच कालावधीत सदरची घटना घडलेली आहे. त्यामुळे तक व विप चे ग्राहक व सेवा पुरवठादार हे नाते प्रस्तापीत होण्यास काहीच अडचण नाही.
2) मुद्दा क्र. 2 :
तक्रारदाराचे ‘ बोराडे ज्वेलर्स ’ हे सराफ दुकान कळंब येथे होते. व विप कडून त्यांनी याच नावाने पॉलिसी घेतलेली आहे व सदरची पॉलिसीचे संदर्भात तक ला विप ने उस्मानाबाद सहकारी बँक लि. ता. कळंब जि. उस्मानाबाद यांच्या मार्फतच पत्र व्यवहार केल्याचे दिसुन येते. तसेच घटना ही उस्मानाबाद या जिल्हयात घडल्याने कलम 11 अन्वये कार्यक्षेत्राचा मुद्दा होकारार्थी स्पष्ट होतो व या न्यायमंचास हा दावा चालविण्याचे कार्यक्षेत्र प्राप्त आहे. त्याचसोबत विप ने दावा नाकारतांना घेतलेला आक्षेप असा की, property whilst at premises shall be secured in locked burglar proof safe at night and all times outside business hours” तसेच “Loss or damage to property insured while in window display at night or whilst kept out of safe after business hours” या संदर्भात विचार करतांना सदरच्या चोरीचा विचार करण्यासाठी प्रथमखबरी अहवालाचे अवलोकन केले असता दि.30/08/2012 रोजी सकाळी 8.30 वाजता सदर चोरी बाबत बाबुराव टोणगे यांनी अज्ञात सहा आरोपी विरुध्द खबर दाखल केली व ती कलम 395, 365, 341 भा.द.वी. अन्वये नोंदविण्यात आली व त्यांनी नोंदविलेले जबाब यांचेही अवलोकन करण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने तसेच त्याच्या सोबत इतर चोरी गेलेल्या ज्वेलर्सने जी तक्रार दिलेली आहे त्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या दुकानातील चोरीचा तपशील दिलेला आहे. विप चे म्हणण्यानुसार जर तक्रारदाराने निष्काळजीपणा केलेला असता व दुकान व्यवस्थीत लावलेले नसते तर फक्त त्याचीच चोरी होणे अपेक्षीत होते परंतु तक्रारदाराच्या सोबत इतर व्यापा-यांच्या दुकानात चो-या झाल्या आहेत व त्याचीही नोंद पोलीस स्टेशनला आहे. त्यामुळे तक्रारदाराने दुकाना संदर्भात आवश्यक ती काळजी घेतली नव्हती असे म्हणता येणार नाही. तसेच चोरीची वेळ ही मध्य रात्रीच्या दरम्यानची असल्याने व्यवसायीक कामकाजाची वेळ याचा संदर्भ विप ला स्पष्ट करता आला नाही. तथापि तक्रारदाराने त्याच्या चोरी झालेल्या ऐवजाच्या रकमाच्या पुष्ठयर्थ दाखल केलेले स्टॉक स्टेटमेंटस हे बँकेने अकनॉलेज केलेले नसल्याने पुरावा म्हणून विश्वासार्ह वाटत नाहीत. तसेच विप ने दि.14/01/2014 चे पत्राअन्वये सर्व्हेरअरचा अहवाल संदर्भ क्रमांक 212 MIS. ICI 162 चा अहवाल ज्याच्या आधारे सदरचा क्लेम नामंजूर करण्यात आला तो अहवाल मंचात तक ने किंवा विप ने कोणीही दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करता येणे या मंचास शक्य नाही. त्यामुळे तक ने पोलीस स्टेशनला तसेच पोलीस अथॅारटीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कडे दाखल केलेला अहवाल यावर विसंबुन राहून रक्कम रु.3,10,000/- एवढी रक्कम विप ने तक्रारदारास देण्याचे दायित्व निश्चीतपणे निघते. मात्र तक ने दाखल केलेले त्याच्या मागणी रकमेच्या पुष्ठयार्थ इतर कागदपत्रेही पुराव्याच्या दृष्टीकोणातुन विश्वासार्ह नाहीत. त्यामुळे त्याची मागणीची रक्कम संपूर्ण मान्य करता येणार नाही. त्याच बरोबर तक ने चार्जशीटची कॉपी दाखल केली असल्याने घटनेबाबत संशय घेता येणार नाही तथापि सदरच्या कॉपी दाखल करतानाच विपचा से घेतला असता त्यानेही ही गोष्ट मान्य केली आहे की संपूर्ण मालमत्ता रिकव्हर झालेली नाही व झालेली रिकव्हरी ही तक ची आहे. त्यामुळे एफ. आय. आर. मधील नोंद रक्कम व तपास अधिका-यांनी घेतलेला जबाब यांच्या आधारे आम्ही चोरीची रक्कम व चोरी निश्चीत करत असून याचसाठी विप ने तक चा विमा काढला आहे व ते देण्याचे दायीत्व टाळून विप ने सेवेत त्रुटी केली आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्रे विप ने दाखल केलेले कागदपत्रे तक्रारदाराची तक्रार विप चे म्हणणे दोन्ही विधीज्ञांचा युक्तिवाद यांचा एकत्रितपणे विचार करता आम्ही वरील निष्कर्ष काढून खालील आदेश पारीत करीत आहोत
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकाराने तक्रारदाराचा रु.3,10,000/- (रुपये तीन लाख दहा हजार फक्त) रकमेच्या हददीपर्यंत विमा मंजूर करुन रक्कम अदा करावी.
3) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) दयावा.
4) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.