(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्या यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 26/09/2011)
1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दि.16.05.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :-
2. प्रस्तुत प्रकरणात तक्रारकर्त्यांचे म्हणण्यानुसार गैरअर्जदारांनी “My Dream Home – Mega Discount Festival”, ही जाहीरात प्रसिध्द केली होती. सदर जाहीरातीनुसार सदनिकेचे बुकींग मात्र रु.1,111/- , ताबा दिल्यानंतर 0% व्याज आणि पूर्ण किंमत एक रकमी भरल्यास 25% सुट व मार्जीन मनी भरल्यानंतर दागीने देण्याची जाहीरात केली होती.
3. सदर जाहीरातीला प्रतिसाद देऊन तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांशी त्यांच्या जामठा येथील प.ह.क्र.42, खसरा क्र.96 ए/96 बीए मौजा-जामठा, तहसिल व जिल्हा नागपूर, येथील योजनेतील बी-विंगमध्ये सदनिका क्र.102 (आराजी 950 चौ.फुट) एकूण किंमत रु.27,08,526/- एवढया किंमतीत खरेदी करण्याचा सौदा केला. दि.09.08.2010 रोजी तक्रारकर्त्याने गैरअर्जदार यांचे सदर योजनेतील सदनिका रु.1,111/- एवढी रक्कम देऊन बुक केल्यास रु.27,08,526/- एवढया किमतीत तक्रारकर्त्यास सदनिका पडेल असे सुचविल्यामुळे सदर दिवशी तक्रारकर्त्याने रु.1,111/- भरुन सदनिकेची बुकींग केली. सदनिकेच्या मोबदल्यापैकी 20% रक्कम प्राप्त झाल्यावर विक्रीचा करारनामा करुन देण्यांत येईल व सदर करारानुसार तक्रारकर्ता वागण्यांस जबाबदार राहील, असे सांगितले व तक्रारकर्त्यास एक कूपन दिले त्यात 45 दिवसात 20% रक्कम भरल्यास तनीष्क कंपनीचा हि-याचा हार विनामुल्य भेट म्हणून दिल्या जाईल, असे नमुद केले होते. तक्रारकर्त्याने सदर रकमेपैकी दि.14.08.2010 रोजी रु.1,00,000/- व दि.28.09.2010 रोजी रु.2,00,000/- धनादेशाव्दारे असे एकूण रु.3,01,111/- गैरअर्जदारांना दिले.
4. सदर सदनिका विकत घेण्यासाठी तक्रारकर्ता ज्या माध्यमातुन सदनिकेची किंमत अदा करणार होता, त्यात तो अपयशी ठरला म्हणून त्याने जानेवारी-फेब्रुवारी-2011 मधे गैरअर्जदारांशी त्यांचे कार्यालयात भेट घेऊन सदर सदनिकेचे बुकींग रद्द करुन गैरअर्जदारास दिलेली रक्कम परत करावी अशी विनंती केली असता गैरअर्जदारांनी सदर रक्कम परत करण्याचे आश्वासन देऊन सुध्दा वारंवार विनंती करुनही रक्कम परत केली नाही. त्यानंतर दि.06.03.2011 रोजी पत्राव्दारे रक्कम परत करण्याबाबत विनंती केली असता, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास रक्कम परत केली नाही. उलट दि.01.04.2011 चे पत्रान्वये तक्रारकर्त्याची सदर बुकींग रद्द करण्यांत येऊन त्यावर तक्रारकर्त्याचा उजर राहणार नाही असे कळविले. परंतु तक्रारकर्त्याचे रकमेचा उल्लेख केला नाही अथवा सदरची रक्कम तक्रारकर्त्यास परत केली नाही. ही गैरअर्जदारांची कृती सेवेतील कमतरता असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचात दाखल केली असुन ती व्दारे गैरअर्जदारांकडे सदनिकेचे बुकींग करीता जमा केलेले रु.3,01,111/- त्यांना प्राप्त झाल्याचे दिनांकापासुन प्रत्यक्षात अदा होईपर्यंत 18% व्याजासह मिळावे, मानसिक, शारीरिक व आर्थीक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.25,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत.
5. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली असता सदर नोटीस मिळूनही गैरअर्जदार हजर झाले नसुन पुकारा केला असता त्यांचेतर्फे कोणीही हजर नसल्यामुळे गैरअर्जदारांविरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.09.08.2011 रोजी पारित करण्यांत आला.
6. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात दस्तावेज क्र.1 ते 6 वर गैरअर्जदारांनी निर्गमीत केलेल्या पावत्या, कुपन, तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना दिलेले पत्र, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास दिलेले पत्र इत्यादींच्या छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत.
7. सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्तीवादाकरीता दि.14.09.2011 रोजी आली असता तक्रारकर्त्याचे वकील हजर मंचाने त्यांचा युक्तिवाद ऐकला, गैरअर्जदारां विरुध्द एकतर्फी आदेश पारित. तक्रारकर्त्याचा युक्तिवाद व तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्कर्षाप्रत पोहचले.
-// नि ष्क र्ष //-
8. तक्रारकर्त्याचे शपथेवरील कथनाचे अवलोकन करता या मंचाच्या असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांनी दिलेल्या जाहीरातीला प्रतिसाद देऊन गैरअर्जदारांशी त्यांच्या “My Dream Home – Mega Discount Festival”, या योजनेतील सदनिका रु.27,08,526/- एवढया मोबदल्यात खरेदी करण्याचा गैरअर्जदारांशी सौदा केला होता. दस्तावेज क्र.3 वर दाखल पावती व इतर दस्तावेजांवरुन दिसुन येते की, तक्रारकर्त्याने सदर किमती पैकी रु.3,01,111/- एवढी रक्कम गैरअर्जदारांना अदा केली होती.
9. तक्रारकर्त्याचे तक्रारीतील पॅरा 5 चे अवलोकन करता असेही दिसुन येते की, तक्रारकर्त्याने आर्थीक अडचणीमुळे सदर सदनिकेची बुकींग रद्द करुन तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना अदा केलेल्या रु.3,01,111/- ची मागणी केलेली होती. सदर तक्रारकर्त्याचे शपथेवरील कथनावरुन असे दिसुन येते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडे भुखंडाच्या मोबदल्याच्या रकमेपैकी 20% रक्कम भरल्यावर विक्रीचा करारनामा करुन देण्यांत येईल अशी सुचना गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास दिलेली होती. तक्रारीत दाखल पुराव्यावरुन असे निदर्शनांस येते की, सदर करारनामा होण्यापुर्वी तक्रारकर्त्याने सदर बुकींग रद्द करुन पैसे परत करण्याची विनंती गैरअर्जदारांना केली होती. दि.01.04.2011 च्या पत्राव्दारे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास सदर बुकींग रद्द झाल्याचे कळविले होते व नि.क्र.18 वरील पत्रात भविष्यात सदर सदनिकेवर तक्रारकर्त्याचा उजर राहणार नाही असेही नमुद केले होते. दाखल पुराव्यावरुन गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास त्याने दिलेली रक्कम परत केलेली दिसुन येत नाही. वास्तविक तक्रारकतर्याचे सदर भुखंडाचे बुकींग रद्द केल्यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास त्याची रक्कम परत करावयास हवी होती. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याचे म्हणणे नाकारले नाही अथवा मंचात उपस्थित होऊन आपले प्रतिउत्तर, पुरावा देखिल सादर केला नाही. त्यामुळे हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, तक्रारकर्त्याने वारंवार विनंती करुनही रक्कम परत न करणे ही गैरअर्जदारांची कृती निश्चितच सेवेतील कमतरता आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास रु.3,01,111/- एवढी रक्कम दि.01.04.2011 पासुन ते प्रत्यक्षात रक्कम मिळे पर्यंत द.सा.द.शे.9% दराने व्याजासह परत करावी.
3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- अदा करावे.
4. वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावे.