तक्रारदार : वकील श्री. कुरील हजर.
सामनेवाले 1 ते 3 : वकील श्री.वसंत पाटील हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्री.एस.एस.व्यवहारे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र. 1 हे अष्टसिध्दी कन्स्ट्रक्शन कंपनी या नांवाने बांधकाम विषयक व विकासाची कामे करणारी कंपनी असून सा.वाले क्र. 2 व 3 हे सा.वाले क्र. 1 यांचे भागीदार आहेत. सा.वाले क्र. 4 हे गृहनिर्माण संस्था असून तक्रारदार हे सदर गृहनिर्माण संस्थेचे सभासद आहेत व सा.वाले क्र. 4 गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत सदनिकाधारक म्हणून राहातात. सा.वाले क्र. 1 ते 4 यांची कार्यालये तक्रारीत नमुद केलेल्या ठिकाणी आहेत.
2. तक्रारदार हे मुलुंड येथे राहातात. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, ते राहात असलेली इमारत ही मोडकळीस आलेली होती. तक्रारदार हे पूर्वी सा.वाले क्र. 4 यांच्या कार्यकारणीचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी सदर इमारतीमध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याकामी तक्रारदार यांनी बरीच रक्कम देखील खर्च केली होती. परंतु तक्रारदार यांचा इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव न स्विकारता सा.वाले क्र. 4 यांनी सदर इमारतीची पुर्नबांधणी करण्याचे ठरवून पुर्नबांधणीच्या बांधकामाचा ठेका सा.वाले क्र. 1 ते 3 यांना देण्यात आला. त्या प्रमाणे ईमारतीच्या पुर्नबांधणी संबंधी तक्रारदार यांचे सभासद व सा.वाले क्र. 4 व सा.वाले क्र. 1 यांच्यामध्ये दिनांक 2.7.2003 रोजी करार करण्यात आला. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, तिच्या ताब्यात असलेल्या सदनिकेचे क्षेत्रफळ 479 चौरस फुट असे होते. त्या प्रमाणे दिनांक 2.7.2003 च्या करारनाम्यामध्ये परिशिष्ट अ मध्ये त्या बाबत स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, दिनांक 2.7.2003 च्या करारनाम्या प्रमाणे त्यांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ 479 चौरस फुट असल्यामुळे तेवढयाच क्षेत्रफळाची सदनिका त्यांना मिळणार यावर भरवसा ठेवून तक्रारदारांनी आपल्या जुन्या सदनिकेचा ताबा सा.वाले क्र. 1 ते 3 यांना दिला. दिनांक 30.7.2004 च्या करारा प्रमाणे तक्रारदार यांना द्यावयाचे सदनिकेचे क्षेत्रफळ हे 421 चौरसफुट असल्या बाबतचे तक्रारदारांना कळविण्यात आले. सा.वाले क्र. 4 यांनी तक्रारदार यांना पत्र पाठवून त्यांना मिळणा-या नव्या सदनिकेचे क्षेत्रफळ 432 चौरसफुट असेल असे सांगीतले. तक्रारदार यांच्या पूर्वीच्या सदनिकेचे क्षेत्रफळ हे 479 चौरसफुट असल्यामुळे व पुर्नबांधीत इमारतीत त्यांना तेवढयाच क्षेत्रफळाची सदनिका मिळणे क्रमप्राप्त असल्यामुळे सा.वाले क्र. 4 यांच्या पत्रावर त्वरीत आक्षेप घेऊन तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 1 ते 4 यांना नविन इमारतीत 479 क्षेत्रफळाची सदनिका द्यावयास सांगीतले.
3. तक्रारदार यांचे असे देखील म्हणणे आहे की, इमारतीच्या पुर्नबांधणी संबंधी करण्यात आलेल्या करारनाम्यामध्ये सा.वाले क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारांना 2+ 4 अशी वाहन तळाची जागा देण्याचे कबुल केले होते. तक्रारदार यांची पूर्वीच्या इमारतीत वाहनतळाची जागा असल्यामुळे त्यांना नविन इमारतीत वाहनतळाची जागा मिळणे आवश्यक होते व ती तक्रारदार यांना देणे सा.वाले यांचेवर बंधनकारक होते. असे असतानासुध्दा सा.वाले क्र. 1 ते 3 यांनी तक्रारदार यांना नविन इमारतीत कोणतीही वाहनतळाची जागा दिली नाही व सा.वाले क्र. 4 यांनी देखील पुर्नबांधणी केलेल्या इमारतीत तक्रारदार यांच्यासाठी वाहन तळाच्या जागेची सोय उपलब्ध करुन दिली नाही. तक्रारदार यांचे असे देखील म्हणणे आहे की, सा.वाले क्र. 4 यांनी तक्रारदार यांना इमारतीच्या पुर्नबांधणी काळात पर्यायी जागेचे भाडे द्यावयाचे कबुल केले होते. परंतु जानेवारी,2007 ते जुलै,2007 या काळातील रु.42,000/- असे पर्यायी जागेचे भाडे सा.वाले क्र. 4 यांनी तक्रारदारांना दिलेले नाही. त्यामुळे सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर अल्यामुळे तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 2 ते 4 यांचे बरोबर बराच पत्र व्यवहार केला. तसेच वकीलामार्फत कायदेशीर नोटीस देखील दिली. सा.वाले क्र. 1 ते 4 यांनी त्यास खोटी उत्तरे देऊन तक्रारदार यांना पुर्नबांधीत इमारतीत 479 चौरसफुट क्षेत्रफळाची सदनिका दिली नाही व त्यामुळे सा.वाले यांची वरील कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत येत असल्यामुळे तक्रारदारांनी सा.वाले क्र. 1 ते 4 यांचे विरुध्द पुर्नविकसीत इमारतीत कमी क्षेत्रफळाची जागा दिल्याबद्दल तसेच मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई व पर्यायी जागेच्या भाडयाची रक्कम असे एकूण रु.16,50,000/- याची मागगी केलेली आहे.
4. सा.वाले क्र. 1 ते 3 व 4 यांनी आपल्या स्वतंत्र कैफीयती दाखल करुन तक्रारदारांचे म्हणणे व मागणे व तक्रारीतील कथने नाकारली. सा.वाले क्र. 1 ते 4 यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने, म्हणणे व मागणे खोटे व लबाडपणाचे असून सा.वाले यांना त्रास देण्यासाठी व त्यांचेकडून पैसे मिळविणेसाठी खोटी विधाने केलेली आहेत. सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या बाबतची सारी विधारे सा.वाले यांनी नाकारलेली आहेत. सा.वाले यांच्या म्हणण्या प्रमाणे तक्रारीस मुदतीची व रेस्ट ज्युडीकेटा ( Res-judi-cata ) या कायदेशीर तत्वाची बाधा येते. तक्रारदार हे सा.वाले क्र. 4 यांचे सभासद असल्या बाबत व इमारतीच्या पुर्नविकासाआधी असलेल्या तक्रारदारांच्या असलेल्या सदनिके बाबत सा.वाले क्र. 1 ते 4 नाकारत नाहीत. तसेच सा.वाले क्र. 4 यांच्या मालकीच्या इमारतीच्या पुर्नविकासाचे काम सा.वाले क्र. 1 ते 3 यांना देण्यात आले होते ही बाब देाील सा.वाले नाकारत नाहीत. परंतु इमारतीच्या पुर्नविकसना बाबत असलेल्या इमारतीत तक्रारदार यांच्या असलेल्या सदनिकेचे क्षेत्रफळ 479 चौरसफुट होते ही बाब सा.वाले स्पष्टपणे नाकारतात. पुर्नविकसना बाबत दिनांक 2.3.2003 रोजीच्या करारा बाबत स्पष्टीकरण देताना सा.वाले असे म्हणतात की, सदरचा करार हा 20 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करण्यात आला असून त्याचे नोंदणी करण झालेले नाही. तसेच त्यावर कायदेशीर मुद्रांक शुल्क देखील लावलेले नाही. त्यामुळे सदर करारात जरी तक्रारदार यांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ 479 असे दाखविले असले तरी ते ग्राहय मानता येणार नाही. सा.वाले यांचे असे म्हण्ंणे आहे की, सदर क्षेत्रफळाचा आकडा हा तक्रारदार यांच्या सांगण्यावरुनप करारनाम्यात लिहीण्यात आला परंतु सदर सदनिकेचे क्षेत्रफळ तक्रारदार यांच्या समक्ष प्रत्यक्ष मोजण्यात आले असता सदरचे क्षेत्रपनफळ हे 432 चौरसफुट दिसून आल्यामुळे त्या बाबतची नोंद दिनांक 30.7.2004 च्या करारनाम्यात करण्यात आली. वास्तविक या बद्दल तक्रारदार यांना संपूर्ण कल्पना होती. त्यामुळे तक्रारदारांनी पुर्नविकसीत इमारतीत नविन सदनिकेचा ताबा 2007 साली घेतला. परंतु त्यानंतर कोणतीही तक्रार केली नाही. तसेच तक्रारदार वगळता अन्य सदनिकाधारकांनी या बाबत कोणताही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे तक्रारदार यांना पुर्नविकसीत इमारतीत कमी क्षेत्रफळाची सदनिका देण्यात आली या तक्रारदार यांच्या कथनास कोणताही आधार नाही.
5. सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदार यांनी यापूर्वी वादातीत सदनिकेच्या क्षेत्रफळा संबंधी सहकार न्यायालयात वाद उपस्थित केला होता. सदर सहकारी वादाचा क्रमांक 948/2005 असा हेाता. सदर सहकारी वादाचा निकाल सहकार न्यायालयाने दिनांक 4.10.2005 रेाजी देऊन तक्रारदार यांचा वाद खारीज केला. सदर आदेशा विरुध्द तक्रारदार यांनी सहकार अपील आयोगात 102/2005 हे अपील दाखल केले असता दिनांक 8.3.2006 रोजी सदर अपील फेटाळण्यात आले. त्यानंतर तक्रारदार यांनी लवादा समोर देखील प्रकरण दखल केले होते व सदर लवादात अंतरीम आदेश करण्यात आला होता. त्यामुळे तक्रारदारांचा प्रस्तुतच्या वादास ( Res-judi-cata ) या कायदेशीर तत्वाची बाधा येते. त्यामुळे देखील तक्रारदारांची तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
6. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, सा.वाले यांचे सोबत सदनिके संबंधी झालेल्या पत्र व्यवहारांच्या प्रती, तक्रारदार व सा.वाले क्र. 1 व 4 यांच्यात झालेल्या दिनांक 2.7.2003 च्या कराराची प्रत, तसेच सा.वाले क्रृ 4 गृहनिर्माण संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची प्रत, सा.वाले क्र. 1 आणि सा.वाले क्र. 4 यांच्यातील दिनांक 30.7.2004 रोजी झालेल्या कराराची प्रत, तक्रारदार यांना वादातीत सदनिकेच्या बाबत दिलेल्या वाटप पत्राची प्रत, तक्रारदारांनी वाहन तळा बाबत सा.वाले क्र. 4 यांच्या सचिवांना दिलेले पत्र दाखल केलेले आहे.
7. या उलट सा.वाले यांनी आपल्या कैफीयती सोबत पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद, दिनांक 30.7.2004 रेाजी सा.वाले क्र. 1 व सा.वाले क्र. 4 यांच्यात झालेल्या कराराची प्रत, सहकार न्यायालयाने व सहकार न्यायालयाच्या अॅपेलेट कोर्टाने तक्रारदार व सा.वाले यांच्यातील सदनिकेच्या वादा संबंधी दिलेल्या आदेशाच्या प्रती, तक्रारदारांनी सा.वाले क्र.4 यांचे विरुध्द दाखल केलेल्या लवाद प्रकरणात लवादाने दिलेल्या अंतरीम आदेशाची प्रत दाखल केली आहे.
8. प्रस्तुत मंचाने तक्रार , कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. उभय पक्षकारांचा तोंडी युक्तीवाद एैकण्यात आला. त्यानुसार तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना वादातीत सदनिकेचा पुर्नविकसीत इमारतीत कमी क्षेत्रफळाच्या सदनिकेचा ताबा देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिंध्द करतात काय ? | नाही. |
2 | तक्रारीस ( Res-judi-cata ) या कायदेशीर तत्वाची बाधा येते काय ? | होय |
3 | तक्रारदार तक्रारीत मागीतलेल्या मागण्या मिळण्यास पात्र आहेत काय | नाही. |
4 | अंतीम आदेश ? | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
मान्य मुद्देः तक्रारदार हे सा.वाले क्र. 4 गृहनिर्माण संस्थेचे सभासद असून सदर गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत एक सदनिकाधारक आहेत ही बाब उभय पक्षकार नाकारत नाहीत. तसेच गृहनिर्माण संस्थेची इमारत मोडकळीस आल्यामुळे तिची पुर्नबांधणी करण्याचे काम सा.वाले क्र. 1 ते 3 यांना देण्यात आले होते ही बाब सा.वाले नाकारत नाही. 2007 साली तक्रारदार यांनी वादातीत सदनिकेचा ताबा आपला आक्षेप राखून स्विकारला ही बाब तक्रारदार नाकारत नाहीत. वादातीत सदनिके बाबत त्यांना देण्यात आलेल्या कमी क्षेत्रफळाच्या सदनिकेच्या वादा बाबत तक्रारदार यांनी सा.वाले क्र. 1 ते 4 यांचे विरुध्द सहकार न्यायालयात व सहकार न्यालयाच्या अपील न्यायालयात प्रकरण दाखल केले होते व सदर दावे तक्रारदारांचे विरुध्द लागले ही बाब तक्रारदार नाकारत नाहीत.
9. सा.वाले यांनी पुर्नविकसीत इमारतीत वादातीत सदनिकेचा ताबा देताना 479 चौरस फुटाच्या सदनिकेपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या सदनिककेचा ताबा देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द करण्यासाठी तक्रारदार यांनी आपले पुरावा शपथपत्र, लेखी व तोंडी युक्तीवाद याव्दारे प्रामुख्याने तक्रारदार व सा.वाले यांच्यात झालेला दिनांक 3.7.2003 च्या करारावर भर देऊन सदर कराराच्या जोडपत्रामध्ये तक्रारदार यांचया सदनिकेचे क्षेत्रफळ 479 चौरस फुट दाखविले असून पुर्नविकसीत इमारतीत तक्रारदारांना तेवढयाच क्षेत्रफळाची जागा द्यावयाची सा.वाले क्र. 4 यांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरविले होते. त्या बाबत वार्षिक सर्वसाधारण सभेत ठरलेल्या ठरावाची प्रत दाखल करुन तक्रारदार यांनी असा युक्तीवाद केला की, सदर ठरावावर भरवसा ठेऊन तक्रारदार यांनी आपली सदनिका सा.वाले क्र. 1 ते 3 यांच्या ताब्यात दिली. सदनिकेचा ताबा देतेवेळी तक्रारदार यांना सा.वाले क्र. 4 यांनी पर्यायी जागेच्या भाडयाची रक्कम देण्याचे कबुल केले होते. तरी सा.वाले क्र. 4 यांनी तक्रारदार यांना पर्यायी जागेच्या भाडयाची कोणतीही रक्कम दिली नाही. या उलट दिनांक 3.7.2003 चा करार झाल्यानंतर सा.वाले क्र. 1 ते 3 व 4 यांनी आपसात संमनमत करुन तक्रारदार यांना त्यांच्या ताब्यातील असलेल्या सदनिकेच्या क्षेत्रफळापेक्षा कमी क्षेत्रफळाची जागा म्हणजे 432 चौरस फुट क्षेत्रफळाची जागा देण्याबाबत पत्र देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली. तसेच पुर्नविकसीत इमारतीतील सदनिका बांधण्यापूर्वी तक्रारदार यांचेकडे असलेल्या वाहन तळाची जागा सा.वाले क्र. 4 यांनी देण्याचे कबुल करुनसुध्दा पुर्नविकसीत जागेत तक्रारदारांना कोणतीही वाहन तळाची जागा दिली नाही. त्यामुळे सा.वाले यांची सदर कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर या कृतीत मोडते.
10. प्रति उत्तरा दाखल सा.वाले यांच्यातर्फे युक्तीवाद करताना असे सांगण्यात आले की, दिनांक 3.7.2004 रोजी करण्यात आलेला करार हा रु.20 येवढया रक्कमेच्या स्टॅम्प पेपरवर असून तो नोंदणीकृत नाही. त्यामुळे त्यास करार म्हणता येणार नाही. तसेच सदर करारा नंतर तक्रारदार यांचे समक्ष त्यांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ मोजले असता सदर क्षेत्रफळ 432 चौरस फुट निघाल्याने तक्रारदार यांना 432 येढया क्षेत्रफळाची सदनिका देण्यात आली. या बाबत तक्रारदारांना पूर्ण कल्पना असून तक्रारदार यांनी 2007 साली पुर्नविकसीत इमारतीत नविन सदनिकेचा ताबा घेतला. परंतु 2013 सालापर्यत कोणतीही तक्रार न केल्यामुळे तक्रारीस मुदतीची बाधा येते तसेच वादातीत सदनिकेच्या व्यवहारा बाबत तक्रारदारांनी सहकार न्यायालयात तक्रार दाखल करुन प्रस्तुत तक्रारीत मागतलेल्या दादी मागण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सहकार न्यायालयाने सदरचा वाद फेटळून लावल्यानंतर सहकार न्यायालयाचे आदेशा विरुध्द तक्रारदार यांनी सहकारी न्यायालयाच्या अपील विभागात सहकार अपील 102/2005 हे दाखल केले. परंतु सदर अपील दिनांक 8.3.2006 रोजी फेटाळण्यात आले. सहकार न्यायालयातील तक्रारदार यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील दाद व प्रस्तुतच्या मंचाच्या समोर प्रलंबत असलेल्या तक्रारीतील दाद ही एकच स्वरुपाची असल्यामुळे प्रस्तुतच्या तक्रारीत ( Res-judi-cata ) या कायदेशीर तत्वाची बाधा येते. तसेच तक्रारदार व सा.वाले क्र. 4 यांच्यात असलेला वाद हा सहकारी न्यायालया समोरील विस्तृत कार्यक्षेत्रासमोर निकाली निघाला असल्यामुळे तशाच प्रकारचा वाद ग्राहक तक्रार मंचा समोरील सिमित कार्यक्षेत्रात चालु शकत नाही. त्यामुळे तक्रार रद्द करण्यात यावी.
11. उभय पक्षकारांतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद, व अभिलेखातील कागदपत्र यांचे अवलोकन केल्यांनतर असे आढळून येते की, सा.वाले व तक्रारदार यांच्यातील दिनांक 3.7.2004 रोजी झालेल्या करारात तक्रारदार यांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ 479 चौरस फुट दाखविले असले तरी सदरचा करार हा नोंदणीकृत नाही पर्याप्त मुद्रांक शुल्क देखील त्यास लावण्यात आलेले नाहीत. तक्रारदार यांना 432 चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका देताना सा.वाले यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, तक्रारदार यांचे देखत वास्तशास्त्र तज्ञ यांनी तक्रारदार यांच्या सदनिकेची मोजणी केली असता तक्रारदार यांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ मोजले असता ते 432 चौरसफुट भरले. त्यामुळे तक्रारदार यांना 432 चौरसफुट क्षेत्रफळाची सदनिका देण्या बाबत पत्र देण्यात आले. तक्रारदार यांनी सदरची सदनिका पूर्वी कोणाकडून घेतली होती. तसेच त्यावेळी सदनिकेचे क्षेत्रफळ काय होते, या बाबत कोण्ंताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. दिनांक 3.7.2004 दोन्हीच्या करारात तक्रारदार यांनी आपल्या सदनिकेचे क्षेत्रफळ 470 चौरसफुट सांगताना ते कशाच्या आधारे सांगीतले या बाबत कोणताही पुरावा मंचासमोर नाही. वास्तविक तक्रारदार यांच्या ताब्यात असलेल्या सदनिेके संबंधी मालकी हक्काचे कागदपत्र त्यांच्या ताब्यात असणार ते तक्रारदारांनी दाखल न करयासाठी कोणताही खात्रीशिल पुरावा मंचासमोर दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे विरुध्द विरुध्द अन्वयी अर्थ काढून तक्रारदार हे त्यांच्या ताब्यात असलेल्या सदनिकेचे क्षेत्रफळ 479 चौरस फुट होते हे सिध्द करु शकत नाहीत.
12. अभिलेखातील कागदपत्रांचे अवलोकन केले असता असेही दिसून येते की, प्रस्तुत तक्रारीत मगीतलेल्या दादी संबंधात तक्रारदार व सा.वाले यांच्यात सहकार न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत देखील अशाच प्रकारचा दादी मागून तक्रारदारांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली होती. परंतु सदरहू दावा सहकार न्यायलयाने फेटाळून लावला. सहकार न्यायालयाच्या आदेशा विरुध्द सहकार अॅपीलेट कोर्टाने देखील सहकार अपील फेटाळून लावले. तक्रारदार यांनी प्रस्तुतच्या तक्रारीत त्याच प्रकारच्या दादी मागीतलेल्या असल्यामुळे प्रस्तुतच्या तक्रारीस सिव्हील प्रोसीजर कोडच्या कलम 11 प्रमाणे ( Res-judi-cata ) या कायदेशीर तत्वाची बाधा येते असे मंचाचे मत आहे. तसेच प्रस्तुत तक्रारीतील दादी या सहकार न्यायालया सारख्या विस्तृत अधिकार क्षेत्राच्या न्यायालयासमोर निकालात निघाल्यामुळे तशाच प्रकारच्या दादी ग्राहक तक्रार मंचा समतोर सिमीत कार्यक्षेत्र असलेलया मंचासमोर मागता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
13. सा.वाले यांनी जरी तक्रारीतस मुदतीची बाधा येते असे म्हटले असले तरी तक्रारदार व सा.वाले यांच्यातील असलेल्या वादास कारण कायम स्वरुपी असल्यामुळे तक्रारीस मुदतीची बाधा येत नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारदार यांना वाहन तळाची जागा करारत कबुल करुनसुध्दा न दिल्याने ते करारातील बाबींचे उल्लंघन आहे. त्यामुळे देखील तक्रारीस कारण कायम स्वरुपाचे आहे असे मंचाचे मत झाले आहे.
14. तक्रारदार यांनी वाहनतळाच्या मागणी बाबत केलेल्या दादीचा विचार करताना जरी तक्रारदार यांना पुर्वीच्या सदनिके संबंधी वाहनतळाची जागा उपलब्ध होती हे स्विकारले तरी विकास नियमावली प्रमाणे वाहन तळाची जागा ही सार्वजनिक असून वाहन तळाच्या जागेचे वाटप हे गृहनिर्माण संस्था लॉटरी पध्दतीने करत असते. अथवा गृहनिर्माण संस्थेच्या उपविधीमध्ये त्या प्रमाणे तरतुद केलेली असते. विकासक हा वाहनतळाची जागा सदनिकाधारकास विकू शकत नाही असा निर्णय मा.राष्ट्रीय आयोगाने यापूर्वी ब-याच प्रकरणांमध्ये दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार वाहन तळाची जागा आपल्या मालकी हक्काने मागू शकत नाही असे मंचाचे मत आहे.
15. वरील चर्चेवरुन तक्रारदार हे वादातीत सदनिके बाबत सा.वाले यांची कृती सेवा सुविधा पुरविण्यात कसुर हे सिध्द करु शकत नाही. तसेच तक्रारीस ( Res-judi-cata ) या कायदेशीर तत्वाची बाधा येते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 नकारार्थी ठरवून मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 65/2013 रद्द करण्यात येते.
2. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात
याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 20/10/2015