रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.6/2008. तक्रार दाखल दि.4-3-2008. तक्रार निकाली दि.26-6-2008. श्री.दशरथ तानाजी सोलकर, रा.शास्त्रीनगर, नागांव, ता.अलिबाग, जि.रायगड. ... तक्रारदार. विरुध्द 1. श्री.अशोक देवनारायण यादव, पंचकुटी, आय.आय.टी, पवई पंचकुटी, बसस्टॉपजवळ, मारुती सर्व्हीसस्टेशनचे बाजूला रमेश गॅरेज, मुंबई 76. 2. श्री.मन्सूर उमर अंतुले, रा.ब्लॉक नं.5, भाग्यश्री विला, गुप्ते चौक, कल्याण-पश्चिम, जि.ठाणे. 3. श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कं.लि. शाखा- अंधेरी-पूर्व, साकीनाका, मुंबई. ... विरुध्द पक्षकार. उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. मा.सौ.ज्योती अभय मांधळे,सदस्या. तक्रारदारातर्फे- अड. श्री.पी.एस.म्हात्रे. सामनेवालें क्र.1 तर्फे –.अड. श्री.एस.आर.वावेकर. सामनेवाले क्र.2 तर्फे- एकतर्फा आदेश. सामनेवाले क्र.4 तर्फे- एकतर्फा आदेश. -निकालपत्र - द्वारा- मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. 1. तक्रारदारांची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे असून ती खालीलप्रमाणे आहे- सामनेवाले क्र.1 चा एम-एच.04/सी.जी.3084 हा टाटा कंपनीचा डंपर होता व तो त्यांना विकावयाचा होता. तक्रारदार हे अलिबागचे रहिवासी असून सामनेवाले क्र.2 हे जुनी वाहने कमिशनवर विकण्याचा व्यवसाय करतात. तक्रारदारांनी सामनेवाले क्र.2 कडून डंपर विकत घेतला आहे. सामनेवाले क्र.3 ही डंपरला फायनान्स करणारी कंपनी असून त्यांचेविरुध्द त्यांना काहीही दाद मागायची नाही, परंतु त्यांची काही अडचण राहू नये म्हणून त्यांना या कामी पक्षकार म्हणून सामील केले आहे. 2. सामनेवाले क्र.1 व 2 यांची ओळख असल्याने व सामनेवाले क्र.2 हा जुनी वाहने विकण्याचा व्यवसाय करीत असल्याने सामनेवाले क्र.1 ने त्यांचा डंपर विकण्यासाठी कागदपत्रांसह सामनेवाले क्र.2 चे ताब्यात दिला होता. तक्रारदार हे जुन्या डंपरच्या शोधात होते, त्यास वरील डंपर सामनेवाले क्र.2 कडे सामनेवाले क्र.1 ने विकण्यासाठी दिला आहे, याची माहिती त्यांना मिळाल्यावर त्यांनी त्यांची भेट घेतली. डंपरबाबत माहिती घेऊन तो पाहिला व त्यानंतर ते सामनेवाले क्र.1 कडे गेले तेव्हा त्यांनी त्यांस असे सांगितले की त्यांनी डंपर विक्रीसाठी सर्व अधिकार क्र.2 ना दिले आहेत, तरी त्यांचेबरोबर त्यांनी व्यवहार करावा. त्याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाले क्र.2 यांच्यात बोलणी झाली, व डंपरची किंमत रु.4,74,000/-ठरली. या व्यवहारापोटी तक्रारदारांनी सामनेवाले क्र.2 ला आगाऊ म्हणून नागांव येथे रक्कम रु.5,000/- दिले. या डंपरवर रु.3,11,000/-चे कर्ज होते. त्या कर्जाची रक्कम वजा करुन राहिलेली रक्कम सामनेवाले क्र.1चे वतीने सामनेवाले क्र.2 यांना तक्रारदारांनी दयायची असे ठरले. या व्यवहाराची स्पष्ट कल्पना तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 ला दिली. त्यानी त्याप्रमाणे व्यवहार मान्य केला. सामनेवाले क्र.2 हे व्यवहार पूर्ण करुन डंपरचा ताबा देतील असे सामनेवालेनी तक्रारदारांस सांगितले. त्याप्रमाणे डंपर हा नागांव येथे आणून देण्याबाबत तक्रारदारांनी सांगितले. 3. ठरल्याप्रमाणे दि.28-3-07 रोजी सामनेवाले क्र.2 हे डंपर घेऊन तक्रारदारांच्या घरी नागांव, शास्त्रीनगर येथै आले. त्यावेळी तक्रारदारांनी त्यांस रु.1,58,000/-दिले. त्यानंतर सामनेवालेंनी प्रथम स्विकारलेल्या रु.5,000/-सह एकूण रक्कम रु.1,63,000/-ची पावती तक्रारदारांस लिहून दिली. त्यानंतर सामनेवाले क्र.2 यांनी डंपरचा प्रत्यक्ष ताबा तक्रारदारांस मूळ कागदपत्रासह दिला. ताबा मिळाल्यानंतर तक्रारदारांनी डंपरचा क्रँक तुटल्याने इंजिनदुरुस्ती तसेच टायरसाठी रु.24,000 अधिक रु.40,000/- व इतर कामासाठी रु.10,000/- खर्च केले व डंपर जुलै 07च्या अखेरीस सुस्थितीत करुन घेतला. याप्रमाणे परिस्थिती असताना दि.28-7-07 रोजी सामनेवाले क्र.2 हे इतर चार जणांसह तक्रारदारांचे घरी आले तेव्हा तक्रारदार घरी नव्हते. डंपर घराबाहेर उभा होता. तो डंपर सामनेवाले क्र.2 यांनी त्यांच्याबरोंबर आणलेल्या लोकांच्या मदतीने चालू करुन तक्रारदाराच्या परवानगीशिवाय त्यांना न विचारता बेकायदेशीरपणे घेऊन गेले. हा प्रकार त्यांस ते संध्याकाळी घरी आल्यावर कळला, त्यामुळे त्यांस सामनेवाले क्र.2चा संशय आल्याने दुस-या दिवशी तो कल्याण येथे सामनेवाले क्र.2कडे गेला व डंपरबाबत विचारले असता सामनेवाले 2 नी त्यांस वेडीवाकडी उत्तरे दिली, त्यामुळे त्याच दिवशी हा प्रकार सामनेवाले क्र.1 यांस त्याचे घरी पवई येथे जाऊन सांगितला त्यावर सामनेवालेनी त्यांस त्यांच्या घरी डंपर पाठवून देण्याबाबत आश्वासन दिले. त्यानंतर तक्रारदारांस सामनेवाले क्र.1च्या आश्वासनाप्रमाणे डंपर मिळाला नाही, म्हणून त्यांनी सामनेवाले क्र.1 व 2 यांना भेटून फोन करुन डंपर देण्याबाबत सांगितले असता दोघांनीही डंपर देण्याचे टाळले. यावरुन त्या दोघांनी संगनमत केल्याचे तक्रारदारांस कळून आले. 4. तक्रारदारानी दि.5-9-07 रोजी सामनेवाले क्र.1 व 2 यांना नोटीस दिली व डंपर देण्याबाबत सांगितले. नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी डंपर दिला नाही, सामनेवाले क्र.1 कडून उत्तर आले नाही. सामनेवाले क्र.2 ने खोटे उत्तर दिले. व सामनेवाले क्र.2ने हा डंपर मंचाच्या अधिकारक्षेत्रातून चोरुन नेल्यामुळे तसेच सामनेवाले क्र.2 हे ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार ग्राहक असल्याने सामनेवाले क्र.2कडून त्यांनी अर्जात दिलेल्या कारणास्तव डंपरचा कब्जा तक्रारदारांस मिळावा यासाठी तसेच डंपर नेल्यापासून ते प्रत्यक्ष डंपर ताब्यात मिळेपर्यंत प्रतिमाह रक्कम रु.30,000/- इतकी नुकसानी मिळण्याबाबत तसेच तक्रारदारांना सामनेवालेंच्या या कृत्याने जो शारिरीक मानसिक त्रास झाला त्यापोटी रु.20,000/- व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा या विनंतीसह त्यांनी तक्रार दाखल केली आहे. 5. तक्रारदारांनी तक्रारीसोबत नि.4 अन्वये एकूण 1 ते 16 कागद दाखल केले असून त्यात डंपरची पॉलिसी, डंपरचा टॅक्स भरल्याची पावती, डंपरचे फिटनेस सर्टिफिकेट, डंपरचे परमीट, आर.टी.ओ.ठाणे यांचेकडील आर.सी.बुकची झेरॉक्स प्रत, ताबा घेतेवेळी सामनेवाले क्र.2 यांचेत झालेल्या सामंजस्य कराराची प्रत व रकमेची पावती, वकीलांमार्फत पाठविलेल्या नोटीसा, त्याच्या पोचपावत्या, सामनेवाले क्र.1 ची पोच, क्र.2 ची नोटीस नाकारल्यामुळे परत आलेली नोटीस, क्र.2 ने तक्रारदारांस वकीलांमार्फत पाठवलेले उत्तर, तक्रारदारानी आर.टी.ओ.ला पाठवलेल्या हरकत अर्जाची प्रत, त्यास त्यांनी दिलेले उत्तर, डंपरसाठी केलेल्या खर्चाच्या पावत्या, सामनेवाले क्र.2 विरुध्द तक्रारदारानी दिलेल्या तक्रारअर्जाची प्रत व पुराव्याचे प्रतिज्ञापत्र इ.कागद दाखल केले आहेत. 6. तक्रार दाखल झाल्यावर नि.10 अन्वये सामनेवालेंना नोटीस पाठविण्यात आली. सामनेवाले क्र.1 ना नोटीस मिळाली, सामनेवाले क्र.2 व सामनेवाले क्र.3 वित्तिय कंपनी हे नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा चौकशीचा आदेश पारित करण्यात आला. 7. या कामी तक्रारदार व सामनेवाले क्र.1 यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. उभय पक्षांचे लेखी युक्तीवाद ऐकले. या कामी सामनेवाले क्र.1 यानी तक्रारदाराची तक्रार मान्य केली आहे. त्यामुळे तक्रारीचा निर्णय देण्यास काही हरकत नसल्याचे नमूद केले आहे. 8. या कामी सामनेवाले क्र.2 विरुध्दच ही तक्रार आहे. सामनेवाले क्र.3 ही फायनान्स कंपनी असून त्यांचेविरुध्द त्यांनी कोणतीही दाद मागितलेली नाही. सामनेवाले क्र.2 नी त्यांचे म्हणणे न दिल्याने तक्रारदाराचे म्हणणे आहे त्या पुराव्यावरुन निकाली करण्यास काही हरकत नसल्याचे मंचाचे मत आहे. तक्रारीचे एकूण स्वरुप पहाता या तक्रारीत खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दा क्र.1 – तक्रारदार हे सामनेवाले क्र.2 चे ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 2-1-ड ग्राहक नुसार होतात काय? उत्तर - होय. मुद्दा क्र.2 - तक्रारदारांस सामनेवाले क्र.2 कडून सदोष/त्रुटीची सेवा दिली गेली आहे काय? उत्तर - होय. मुद्दा क्र. 3 - तक्रारदारांचा अर्ज त्यांच्या मागणीप्रमाणे मंजूर करणे योग्य होईल काय उत्तर - अंतिम आदेशात नमूद केल्याप्रमाणे. विवेचन मुद्दा क्र.1 - 9. सामनेवाले क्र.2 चा व्यवसाय कमिशन एजंटचा आहे. तो जुन्या वाहनांच्या खरेदीविक्रीचा व्यवसाय करतो. या ठिकाणी सामनेवाले क्र.1 ने त्यांचे वाहन क्र.2 कडे तो अशा प्रकारचा व्यवसाय करतो व त्यांस त्याचा तक्रारीत नमूद केलेला जुना डंपर विकावयाचाच असल्याने त्याने तो क्र.2 कडे कागदपत्रासह देऊन त्यास विक्रीचे सर्व अधिकार दिले. सामनेवाले क्र.2 कडून तक्रारदाराने तो डंपर रु.1,58,000/- ला रोख रक्कम देऊन तसेच उर्वरित रक्कम चेकद्वारे देऊन खरेदी घेतला. या व्यवहारापोटी त्याने सामनेवाले क्र.2 ला रक्कम रु.5,000/- कमिशन म्हणून दिले आहेत. ही रक्कम त्यास तक्रारदाराने त्याचेकडून वाहन खरेदी केले त्यासंदर्भात मेहनताना म्हणून दिली आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 2-1-डी ii नुसार एखादया व्यक्तीची सेवा त्यांस मोबदला घेऊन देत असेल तर ती संबंधित व्यक्ती त्याची ग्राहक होते. या ठिकाणी तक्रारदाराने सामनेवाले क्र.2 ला वाहन खरेदीच्या व्यवहारासंबंधी त्यास मोबदला दिला आहे. अशा प्रकारे त्यांचे मध्ये ग्राहकाचे नाते निर्माण झाले असल्याचे मंचाचे मत आहे. याशिवाय तक्रारदार व सामनेवाले क्र.2 दरम्यान परस्पर सामंजास्याचा करार दि.28-3-07 रोजी झाला असून तो नि.4 लगत 6 येथे आहे. त्या करारातील अटी व शर्तीनुसार सुध्दा सामनेवाले क्र.2 यानी तक्रारदारांस काही सेवा उदा. डंपर आर.टी.ओ.कडे नोंदवून हस्तांतर करण्याबाबत योग्य ती मदत करणे, तसेच वित्तिय कंपनीचे म्हणजेच सामनेवाले क्र.3 चे कर्ज पुरे करण्यासाठी तक्रारदारांस योग्य ते सहकार्य व कागदपत्र पुरविण्याची जबाबदारी त्याने स्विकारली आहे. या करारावरुन असे दिसते की, तक्रारदार व सामनेवाले क्र.2चे मध्ये डंपर खरेदीविक्रीचा व्यवहार करण्याचा नसून त्या अनुषंगाने येणा-या सर्व गोष्टीबाबत मदत करण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.2 वर आहे. या ही कागदपत्रावरुन सामनेवाले क्र.2 हा तक्रारदाराचा ग्राहक असल्याचे दिसते असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.1चे उत्तर होय असे आहे. विवेचन मुद्दा क्र.2 व 3. 10. या मुद्दयांचा विचार करता तक्रारदार व सामनेवाले क्र.1 यानी दिलेली कागदपत्रे व सामनेवाले क्र.2 चे वर्तन विचारात घेणे आवश्यक असल्याचे मंचाचे मत आहे. सामनेवाले क्र.2 हा नोटीस मिळूनही गैरहजर असल्याने तक्रारदारानी जो पुरावा दिला आहे, तो अग्राहय मानता येईल काय मंचाचे मते तो अग्राहय मानता येणार नाही. याचे कारण असे की, तक्रारदाराची तक्रार ही सामनेवाले क्र.1 ने मान्य केली आहे. सामनेवाले क्र.1 हा तक्रारीत नमूद केलेल्या डंपरचा मालक आहे. त्यानेच सामनेवाले क्र.2 ला खरेदीविक्रीचे सर्व अधिकार दिले असून त्याला या व्यवहाराची पूर्ण माहिती असल्याचे आपल्या जबाबात म्हटले आहे. याउलट सामनेवाले क्र.2 या कामी हजर नाही व त्याने काही म्हणणेही मांडले नाही त्यामुळे त्याचेविरुध्द Adverse Inference काढता येईल असे मंचाचे मत आहे. या प्रकरणातील हकीगत अशी आहे की, तक्रारदाराने सामनेवाले क्र.1 चा डंपर सामनेवाले क्र.2 मार्फत खरेदी केला आहे. सामनेवाले क्र.2 यानी रक्कम मिळाल्याबाबत योग्य ती पावती रक्कम रु.1,63,000/-ची दि.28-3-07 रोजीच दिली आहे. ती या कामी नि.4 अन्वये 6 लगतच आहे. तसेच त्याच दिवशी सामंजस्याचा करार जो तक्रारदार व सामनेवालेदरम्यान झाला आहे, त्यात त्याने एकूण डंपरची किंमत रु.4,74,000/-ठरली त्यापैकी रु.5,000/- बयाणा रक्कम म्हणून मिळाले. रु.1,58,000/- डंपरपोटी मिळाले. असे एकूण रु.1,63,000/- मिळाले असून उर्वरित रक्कम रु.3,11,000/- ही तक्रारदाराने देण्याची असून त्यासाठी त्यास त्याने दोन महिन्याची मुदत दिली आहे व ही रक्कम देईपर्यंत अनामत म्हणून त्यानी रु.3,11,000/-चा बँक आफ इंडियाचा नागाव शाखेवरील चेक दिल्याचे त्यानी मान्य केले आहे व डंपरचा ताबा त्याने तक्रारदारास दिल्याचेही मान्य केले आहे. अशा प्रकारे व्यवहार झाल्याची कबूली त्याने दिली आहे. राहिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तक्रारदारांस दोन महिन्याची त्याने मुदत दिली असल्याचे त्यात स्पष्ट नमूद असतानाही त्याने जुलै महिन्यात तक्रारदाराच्या ताब्यातून त्यांस कल्पना न देता आपल्याबरोबर आणलेल्या इतर व्यक्तींच्या मदतीने तक्रारदाराच्या घरातील इतर व्यक्तींना दमदाटी करुन डंपर पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन नेऊन ठेवला. त्याची ही कृती निश्चितपणे सामंजस्य कराराविरुध्द आहे. मुळातच त्याचे असे वागणे म्हणजे फौजदारी स्वरुपाचा गुन्हाही आहे. कागदपत्रावरुन तक्रारदारानी त्याचेविरुध्द अलिबाग पोलिस स्टेशनकडे दि.6-9-07 रोजी तक्रार दिल्याचे कागद पत्रावरुन दिसते. ही तक्रार देण्यास त्यांस विलंब झाला असला तरी दरम्यानचे काळात तक्रारदार व सामनेवालेमध्ये काही बोलणी सामनेवाले क्र.1च्या मदतीने चालू होती असे दिसते. तक्रारदारानी सामनेवालेंस दि.5-9-07 रोजी नोटिस दिल्याचे दिसते व त्या नोटिसीस सामनेवालेनी उत्तरही 19-9-07 ला दिले आहे. तक्रारदाराचे मते सामनेवालेनी त्यांच्या उत्तरात हा व्यवहार झाल्याचे मान्य केले आहे व बाकीचे उत्तर खोटे दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर तक्रारीचा विचार करता मंचाचे मत असे की, एकदा व्यवहार झाल्यावर व डंपरचा ताबा कागदपत्रासह तक्रारदारांस दिल्यावर त्याचे घरी अनाधिकाराने जाणे व तो घरात नसताना त्याचे घरातील व्यक्तींना दमदाटी करुन वाहन जबरदस्तीने ओढून आणणे ही कृती योग्य आहे काय मंचाचे मते त्याचे हे वर्तन निश्चितपणे दोषपूर्ण सेवेचे निदर्शक असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. सामनेवाले क्र.2 सामंजस्य कराराप्रमाणे वागण्यास बांधील आहे. त्यांचा जर काही अन्य व्यवहार असेल तर तो अन्य कायदेशीर मार्गाने तो पार पाडू शकतो, परंतु एकदा ताब्यात दिलेली वस्तू अशा प्रकारे परत नेणे म्हणजे निश्चितपणे सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. सामनेवालेतर्फे काहीही पुरावा मंचाकडे आलेला नाही. याउलट तक्रारदारानी त्यांचे म्हणणे कागदपत्रासह दाखल केले असून सामनेवाले क्र.1 नेही त्याचे म्हणणे मान्य केल्याचे म्हटले आहे त्यामुळे तक्रारदाराची तक्रार किंवा त्याचा पुरावा नाकारण्याचे काही कारण नाही असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत त्यांस डंपर परत दयावा, तसेच डंपर परत देईपर्यंत त्याचे जे नुकसान होत आहे, त्यापोटी त्याने डंपरचा ताबा मिळेपर्यंत प्रतिमाह रु.30,000/- सामनेवालेकडून नुकसानी मिळण्याची मागणी केली आहे. तसेच त्याने शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.20,000/-ची मागणी केली आहे. तक्रारीचे स्वरुप व त्याची मागणी विचारात घेता त्यांचा अर्ज नामंजूर करण्याचे काही कारण नसल्याचे मंचाचे मत आहे. सबब तक्रारदाराचा अर्ज खर्चासह खालीलप्रमाणे मंजूर करण्याचा आदेश पारित करण्यात येत आहे. -ः आदेश ः- सामनेवाले क्र.2 यानी खालील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसांचे आत करावे. अ) तक्रारीतील डंपर क्र.एम-एच-04/सी.जी.-3084 तक्रारदारांस सामनेवाले क्र.2 ने वर नमूद केलेल्या मुदतीत तक्रारदारांना नेऊन दयावा. ब) डंपर वापरण्यास न मिळाल्याने तक्रारदाराचे जे नुकसान झाले आहे, त्यापोटी सामनेवालेनी तक्रारदारांस दि.28-7-07 पासून ते तो प्रत्यक्ष डंपरचा ताबा देईपर्यंत प्रतिदिन रु.1,000/-(रु.एक हजार मात्र) प्रमाणे नुकसानी दयावी. क) तक्रारदारांस सामनेवालेनी शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.20,000/-(रु.वीस हजार मात्र) दयावेत. ड) तक्रारदारांस सामनेवालेनी न्यायिक खर्चापोटी रु.2,000/-(रु.दोन हजार मात्र) दयावेत. इ) वर पोटकलम क मधील रक्कम सामनेवालेनी तक्रारदारांस न दिल्यास या रकमा द.सा.द.शे.6% व्याजदराने आदेश पारित तारखेपासून वसूल करण्याचा अधिकार तक्रारदारांस राहील. फ) सामनेवाले क्र.3 विरुध्द ही तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात येत आहे. ग) आदेशाच्या सत्यप्रती सर्व पक्षकारांना पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड- अलिबाग. दिनांक- 26-6-2008. (आर.डी.म्हेत्रस) (ज्योती अभय मांधळे) अध्यक्ष सदस्या रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग |