ग्राहक तक्रार क्र. : 167/2014
दाखल तारीख : 06/08/2014
निकाल तारीख : 09/10/2015
कालावधी: 01 वर्षे 02 महिने 03 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. विनोद भागवत टिकले,
वय – 38 वर्ष, धंदा – व्यापार व शेती,
रा. खेड, ता. जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. अशोक लिलँड लि.,प ससयससव्यवस्थापक,
कार्पोरेट ऑफिस क्र.1, सरदार पटेल रोड,
गोईडी, चेन्नई-600032.
2. प्रोप्रा. सागर मोटार्स,
विवेकानंद चौकाशेजारी, लातूर. ता.जि. लातूर. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधिज्ञ : श्री.एस.व्हि. नन्नावरे
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधिज्ञ : श्री. एस.बी.तावरे.
विरुध्द पक्षकार क्र.2 विरुध्द एकतर्फो आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) विरुध्द पक्षकार (विप) क्र.1 निर्मीत विप क्र. 2 कडून विकत घेतलेले टिप्पर यामध्ये दोष असल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी व वाहन बदलून मिळावे म्हणून तक्रारकर्ता (तक) ने ही तक्रार दिलेली आहे.
2) तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
तक हा खेड ता.जि. उस्मानाबाद येथील व्यवसायिक व शेतकरी आहे. विप क्र.1 निर्मीत टिप्पर विप क्र.2 कडून तक ने दि.16/11/2012 रोजी विकत घेतले. त्याचा क्रमांक एमएचयु 755 आहे. त्याचे उत्पन्नातुन उदनिर्वाह करण्यासाठी तक ने ते घेतले. दोन वर्षाच्या कालावधीत टिप्पर मध्ये दोष निर्माण झाला, अगर मूळत: दोष असेल तर त्याची जबाबदारी ही विप वर राहणेची होती. टिप्परची सर्व्हिसिंग करुन घेतांना हे लक्षात आले की चेसी बेंड झालेली होती. त्यामुळे सतत हेलकावे बसत होते व व्यवस्थित चालत नव्हते. विप क्र. 2 ला हे सांगून सुध्दा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर चेसी जास्तच वाकडी झाली. त्यामुळे जानेवारी 2014 पासून तक चे घरासमोर टिप्पर विनाकामाचे पडून आहे. विप क्र. 2 ला सांगितले असता तु वाहनामध्ये जास्त लोड भरले त्यामुळे चेसी बेंड झाली असे दुरुत्तर केले.
3) तक ने विप क्र.1 ला फेब्रुवारी 2014 मध्ये इमेल पाठवून तक्रार नोंदवली. तक ने टिप्पर विप क्र.2 कडे नेले असता पुन्हा येऊ नकोस असे उलट भाषेत सुनावले. तक ने विप यांना दि.25/03/2014 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवली. विप क्र. 1 ने दि.21/04/2014 चे चुकीचे उत्तर पाठवले. विप क्र.2 ने सुध्दा चुकीचे उत्तर पाठवले. तक चे सुमारे रु.1,00,000/- चे नुकसान झालेले आहे. त्यामुळे विप ने टिप्पर बदलून द्यावे व नुकसान भरपाई द्यावी म्हणून तक ने ही तक्रार दि.06/08/2014 रोजी दाखल केलेली आहे.
4) तक ने तक्रारीसोबत आर सी बुक, जॉब कार्ड दि.07/01/2014 चे, दि.03/03/2014 ची नोटीस, दि.21/04/2014 चे नोटीस उत्तर, दि.16/04/2014 चे नोटीस उत्तर, इत्यादी कागदपत्राच्या प्रती हजर केल्या आहेत.
5) विप क्र. 1 ने दि.08/12/2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. टिप्परची चेसी बेंड झाली हे नाकबूल केलेले आहे. वारंटीचा कालावधी दिड वर्ष किंवा 3,000/- तास यापैकी जो लवकरचा असेल तो होता. तक ला कमी प्रमाणात लोड घेऊन वाहतूक करावी लागली हे नाकबूल आहे. तक ने चेसी बेंड झाल्याची तक्रार कधीच केली नाही. चेसी अधिकच बेंड झाल्यामुळे टिप्पर घरासमोर पडून आहे हे नाकबूल आहे. टिप्पर पुर्णत: चेकअप करुनच कंपनीच्या बाहेर पाठवला होता. दोन सर्व्हिसिंगमध्ये चेसीचा दोष आढळून आला नाही. चेसीचा दोष नमूद करण्याचे विप ने टाळले हे मान्य नाही. तक ने ही खोटी तक्रार दिली आहे. ती रद्द होण्यास पात्र आहे.
6) विप क्र. 2 नोटीस बजावूनही हजर राहीला नाही. तक्रार त्याचे विरुध्द एकतर्फा चालली आहे.
7) तक ची तक्रार त्यानी दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात. आम्ही त्यांची उत्तरे त्यांच्या समोर खाली दिलेल्या कारणांसाठी लिहिली आहेत.
मुद्दे उत्तरे
1) विप यांनी तक ला दोषयुक्त माल टिप्पर दिला काय ? नाही.
2) तक अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) आदेश कोणता ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2
8) असे दिसते की टिप्पर हा दि.04/12/012 रोजी रजिस्टर करण्यात आलेला होता. तक ने तो दि.16/11/2012 रोजी विकत घेतल्याचे म्हंटलेले आहे. तक चे म्हणणे आहे की दोन वर्षाची वॉरंटी होती. तक ने खरेदीचे इन्हाईस अगर वॉरंटीकार्ड हजर केलेले नाही. विप चे म्हणणेप्रमाणे वॉरंटी दिड वर्ष किंवा 3,000/- तास या पैकी जे लवकर असेल त्या कालावधीची होती. 3,000/- तास म्हणजे 125 दिवस होतात. कदाचित 3,000/- तास प्रवास अशी अट असावी. महिन्यात 15 दिवस व रोजचा 12 तास असा प्रवास धरला तर तो सुमारे एक वर्षाचा कालावधी होईल. त्याहीपेक्षा कमी वापर असेल तर दीड वर्षाची मुदत दिल्याचे दिसते.
9) जे जॉबकार्ड हजर करण्यात आलेले आहे. ते दि.07/01/2014 चे आहे. म्हणजेच विक्री झाल्यापासून सुमारे 14 महिन्यानंतर हे जॉब कार्ड बनलेले आहे. त्यामध्ये किलोमीटर 1984 एचआर असे नमूद आहे. कोणत्याही तक्रारीचा त्यामध्ये उल्लेख नाही. तक चे म्हणणेप्रमाणे सर्व्हिसिंगच्या काळामध्ये त्याने विप क्र. 2 ला चेसी बेड असल्याबद्दल तक्रार केली, त्यामुळे टिप्परला हेलकावे बसत होते व ते निट चालत नव्हते अशी तक ची तक्रार आहे. वास्तविक ही तक्रार गाडी घेतल्यापासून आठ - पंधरा दिवसातच करायला पाहिजे होती. किमान सर्व्हिसिंग झाल्यावर लेखी स्वरुपात ही तक्रार करायला पाहिजे होती. चेसी बेंड होणे ही लक्षात न येण्यासारखी बाब नाही. मात्र तक ने कोणत्याही प्रकारे लेखी तक्रार न केल्याचे दिसते.
10) लेखी तक्रार नोटीस स्वरुपात प्रथम दि.25/03/2014 रोजी केल्याचे दिसते. म्हणजे खरेदी पासून सतरा महिन्यानंतर तक ने प्रथम ही लेखी तक्रार केली. इतके दिवस लेखी तक्रार का केली नाही याचे समाधानकारक कारण देण्यात आलेले नाही. तक चे म्हणणे आहे की त्याने विप क्र.2 ला इमेल पाठवला. त्याबद्दल काहीही पुरावा नाही. असा इमेल आधीच का पाठवला नाही याचा खुलासा होत नाही. गाडीचा चेसी क्रमांक एमबी 1 जी 3 डी वाय सी 6 सि पी टी एफ 1958 असल्याचे दिसते. तक्रारीमध्ये एमएचआयजी 30 एनसी 6 सिपीटीएफ 1958 असा चुकीचा क्रमांक लिहिलेला आहे.
11) असे मानू की दिड वर्ष न झाल्यामुळे नोटीस देतांना वारंटी पिरेड चालू होता. तथापि हा उत्पादन दोष आहे असे तक चे म्हणणे आहे. चेसी बेंड होणे हा मोठा दोष आहे. तक ने तक्रारीमध्ये म्हंटले आहे की तज्ञ व्यक्तिमार्फत टिप्परचे निरीक्षण करण्यास होणारा खर्च भरण्यास तो तयार आहे. मात्र तक अगर त्याचे विधिज्ञ तोंडी युक्तिवाद करण्याला हजर राहिले नाहीत. तसेच तज्ञ व्यक्तिचा अहवाल दाखल केला नाही. अगर तज्ञ व्यक्ति मार्फत निरीक्षण करण्यास कोणतीही पाऊले उचलली नाहीत. तसेच दीर्घकाळ या दोषाबद्दल लेखी तक्रार केली नाही. त्यामुळे टिप्पर मध्ये उत्पादन दोष होता हे शाबीत करण्यास तक अपयशी ठरला त्यामुळे तो अनुतोषास पात्र नाही असे आमचे मत आहे म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1) तक ची तक्रार रद्द करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.