(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्यक्ष यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक :08/07/2011) 1. प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 23.09.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. यातील तक्रारकर्त्यांची थोडक्यात तकार अशी आहे की, त्याचे पुर्वज श्री. दत्तात्रय बबनराव क्षिरसागर यांनी गैरअर्जदारांसोबत मौजा-चिचभवन, प.ह.नं.43, खसरा नं.68/1,68/2,72/1,72/3 यातील टेनामेंट क्र.139 रु.60,000/- मध्ये खरेदी करण्याचा करारनामा दि.18.08.1995 रोजी केलेला आहे, तसेच तक्रारकर्त्यांनी त्यांना मोबदल्याची पूर्ण रक्कम दिली होती. तो करारनामा गैरअर्जदार क्र.1 ते 14 च्या पूर्वजांनी करुन दिला व गैरअर्जदार क्र.15 हे त्यांचे आममुखत्यार होते. तक्रारकर्त्यांचे पूर्वज श्री. दत्तात्रय बबनराव क्षिरसागर हे दि.24.08.2004 रोजी मरण पावले व सदर मालमत्ता ही युको बँक, स्वावलंबीनगर शाखा, नागपूर यांचेकडे गहाण ठेवली होती व ताबा तक्रारकर्त्यांचे पुर्वजाकडे होता. पुढे दि.23.12.2008 रोजी कर्ज पूर्ण देऊन झाल्याबाबतचे पत्र बँकेकडून प्राप्त झाले, मात्र शेवट पर्यंत विक्रीपत्र होऊ शकले नाही. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांशी संपर्क केला मात्र विक्रीपत्र झाले नाही, त्यामुळे त्यांनी ही तक्रार मंचात दाखल करुन ती व्दारे गैरअर्जदारांनी वादातील मालमत्तेचे विक्रीपत्र करुन द्यावे, विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रु.1,00,000/- नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीच्या खर्चाचे रु.10,000/- मिळावे अश्या मागण्या केलेल्या आहेत. 3. गैरअर्जदारांना नोटीस देण्यांत आली असता गैरअर्जदार क्र.1 व 15 स्वतः हजर झाले, इतर गैरअर्जदारांना नोटीस पाठविण्यांत आली मात्र ते हजर झाले नाही, त्यामुळे त्यांचे विरुध्द मंचाने तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित केला. गैरअर्जदार क्र.1 व 15 यांनी तक्रारकर्त्यांचा करारनामा आणि इत्यादी बाबी मान्य केल्या, त्यांचे म्हणणे एवढेच आहे की, त्यांना तक्रारकर्ते कधीही भेटले नाही. गैरअर्जदार क्र.15 यांनी नमुद केले आहे की, त्यांना आममुखत्यारपत्र देणारे मरण पावल्यामुळे आता ते रद्द झाले आहे ते विक्रीपत्र करुन देण्यांस तयार होते पण तक्रारकर्त्यांनी कधीही त्यांचेसोबत संपर्क केला नाही व त्यामुळे त्यांचे सेवेमध्ये कोणतीही त्रुटी नाही. 4. तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्तावेजांची यादी जोडलेली असुन त्यात विक्रीचा करारनामा, अतिरिक्त करारनामा, ले आऊटचा नकाशा, टेनामेंटचा नकाशा, आममुखत्यार पत्र, 7/12, श्री. दत्तात्रय क्षिरसागर यांचे मृत्यू प्रमाणपत्र व युको बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र इत्यादींच्या छायांकीत प्रती जोडलेल्या आहेत. 5. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.28.06.2011 रोजी आली असता तक्रारकर्ते व गैरअर्जदार क्र.1 व 15 चे वकील हजर होते त्यांचा युक्तिवाद मंचाने ऐकूण घेतला असता सदर प्रकरण गुणवत्तेवरील निकालाकरीता ठेवण्यांत आले. तक्रारीसोबत दाखल दस्तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. सदर प्रकरणातील वस्तुस्थितीप्रमाणे तक्रारकर्त्यांचे पुर्वजांनी करारनामा केलेला आहे आणि पूर्ण रक्कम दिलेली असुन सदर मालमत्तेचा ताबा त्यांचेकडे आहे. यातील गैरअर्जदारांचे व तक्रारकर्त्यांचे पुर्वज हे मरण पावले असुन मालमत्ता युको बँकेकडे गहाण होती या कारणास्तव सदर मालमत्तेचे विक्रीपत्र होऊ शकले नाही. मात्र तक्रारकर्त्यांना सदर मालमत्तेचे विक्रीपत्र करुन मिळणे गरजेचे आहे, ही बाब महत्वाची आहे. यातील गैरअर्जदार क्र.2 ते 14 हे हजर झाले नाही व त्यांनी कोणत्याही प्रकारे बचाव केलेला नाही, तसेच हजर झालेल्या गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन देण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. या सर्व बाबींचा विचार करता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. सर्व गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना वादातील मालमत्तेचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे. 3. तक्रारकर्त्यांच्या इतर मागण्या ना-मंजूर करण्यांत येतात. 4. सर्व गैरअर्जदारांनी वरील आदेशाचे पालन आदेश पारित झाल्याचे दिनांकापासुन 3 (तीन) महिन्यांचे आंत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |