(पारीत दि. 12 फेब्रुवारी, 2020)
(पारित व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
- तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्षा विरुध्द गाय विक्रीचे व्यवहारातून झालेल्या फसवणूकी संबधात ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा कडून नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे.
02. तक्रारकर्त्याचे तक्रारीचा थोडक्यात आशय पुढील प्रमाणे-
तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष हे उपरोक्त नमुद पत्त्यावर राहतात. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा कडून मार्च-2018 मध्ये त्याचा मित्र श्री दुर्योधन शेंडे राहणार कांद्री याचे सोबत जाऊन एकूण रुपये-12,000/- एवढया किमतीत गर्भधारणा झालेली गाय खरेदी केली. गाय खरेदीचे वेळी विरुध्दपक्षाने ती तीन महिने गर्भवती असल्याचे त्याला सांगितले असल्याने त्याने सदर गाय खरेदी केली होती. गायीच्या खरेदी नंतर त्याने तिला एक महिन्या नंतर म्हणजे दिनांक-13 एप्रिल, 2018 रोजी सरकारी पशुवैद्दकीय चिकित्सालय कांद्री येथे वैद्दकीय तपासणीसाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन ती गाय गर्भवती नसल्याचे सांगितले आणि तिचे गर्भाशयावर सुज आली असल्याचे सुध्दा डॉक्टरांनी सांगितले व त्यासाठी औषधोपचार केला. सदर बाब त्याने विरुध्दपक्षाचे कानावर टाकली असता त्याने सदर गायीला यापूर्वी एक वासरु झाले असल्याचे सांगितले. तक्रारकर्त्याने परत पशुवैद्दकीय डॉक्टर श्री ढोरे यांचेकडून दिनांक-03.12.2018 रोजी सदर गायीची वैद्दकीय तपासणी करुन तिला गर्भ राहू शकेल या दृष्टीने औषधोपचार केले व पुढे दोन-तीन महिने औषधोपचार करावा लागेल असेही त्यांनी सांगितले. तक्रारकर्त्याने दिनांक-18.03.2019 रोजी पशुवैद्दकीय चिकित्सका कडून पुन्हा सदर गायीची तपासणी केली असता ती गर्भवती नसल्याचे सांगण्यात आले त्यावरुन त्याने पुन्हा विरुध्दपक्षाची भेट घेऊन गाय गर्भवती असल्याचे सांगून तिची विक्री केल्याने त्याची
फसवणूक झालेली असल्याने ती परत घेऊन गायीची किम्मत परत मागितली परंतु वि.प.ने प्रतिसाद दिला नाही.त्यानंतर पुन्हा त्याने विरुदपक्षाची दिनांक-13 एप्रिल, 2019 रोजी भेट घेऊन किम्मत परत देण्याची मागणी केली असता शिवीगाळ करुन मारण्याची धमकी त्याला दिली, त्यावरुन त्याने विरुध्दपक्षा विरुध्द पोलीस स्टेशन कांद्री येथे पोलीस तक्रार केली असता विरुध्दपक्षा विरुध्द पोलीसांनी गुन्हा नोंदविला. वस्तुतः आजारी गायीचे औषधोपचारासाठी त्याला आज पर्यंत रुपये-20,000/- एवढा खर्च आला तसेच सदर प्रकरणात त्याला शारिरीक व मानसिक त्रास सुध्दा सहन करावा लागला. म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला गायीचे खरेदी संबधात दिलेली रक्कम रुपये-12,000/- आणि आजारी गायीवर केलेल्या औषधोपचाराचे खर्चा बद्दल रुपये-20,000/- अशा रकमा विरुध्दपक्षाने व्याजासह त्याला परत करण्याचे आदेशित व्हावे.
(02) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50000/- आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
(03) या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. प्रस्तुत ग्राहक तक्रारी मध्ये विरुध्दपक्षाला ग्राहक मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली, सदर रजिस्टर पोस्टाची पावती पान क्रं 17 वर दाखल आहे तसेच पान क्रं 17 वर मुख्य पोस्ट ऑफीस भंडारा यांनी दिलेला नोटीस ट्रॅक
रिपोर्ट अभिलेखावर दाखल असून त्यानुसार विरुध्दपक्षाला रजिस्टर नोटीस दिनांक-07 ऑगस्ट, 2019 रोजी प्राप्त झाल्याचे दिसून येते. परंतु विरुध्दपक्षाला ग्राहक मंचाची नोटीस मिळून सुध्दा तो ग्राहक मंचा समोर उपस्थित झाला नाही वा त्याने आपले लेखी निवेदन सादर केले नाही म्हणून ग्राहक मंचाचे वतीने विरुध्दपक्षा विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश तक्रारीमध्ये दिनांक-11.12.2019 रोजी पारीत करण्यात आला.
04. तक्रारकर्त्याने पान क्रं 09 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण 01 ते 03 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये सरकारी पशुवैद्दकीय चिकित्सालय कांद्री येथे गायची वैद्दकीय तपासणी केल्याची प्रत, पोलीस स्टेशन आंधळगाव, उपविभाग तुमसर यांचेकडे दिनांक-13 एप्रिल, 2019 रोजी केलेल्या तक्रारीवरुन त्यांनी अदखलपात्र गुन्हा विरुध्दपक्षा विरुध्द नोंदविल्याचा दस्तऐवजाची प्रत, सरकारी पशुवैद्दकीय चिकित्सालय कांद्री यांनी सदर गाय Infertility असल्या बाबत दिनांक-02 मे, 2019 रोजी दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. त.क.ने पान क्रं 22 ते 24 वर स्वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 25 ते 27 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच पान क्रं 29 वरील दस्तऐवज यादी प्रमाणे अदखलपात्र गुन्हयाची प्रत, सरकारी पशुचिकित्सालय कांद्री येथील तपासणीची पावती व डॉक्टरांचे प्रमाणपत्र तसेच पान क्रं 33 वर औषध खरेदीचे दि.13 एप्रिल, 2018 रोजीचे बिल, सरकारी पशुवैद्दकीय चिकित्सालय कांद्री यांनी सदर गाय Infertility असल्या बाबत दिनांक-16 जानेवारी, 2020 रोजी दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत दाखल केली.
05. प्रस्तुत तक्रारी मध्ये त.क. तर्फे वकील श्री शैलेश डोंगरे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
06. त.क.ची तक्रार त्याने दाखल केलेले दस्तऐवजाच्या प्रती, शपथपत्र व लेखी युक्तीवादाचे अवलोकन ग्राहक मंचाव्दारे करण्यात आले. तसेच त.क.चे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन ग्राहक मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
-निष्कर्ष-
07. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत पुराव्या दाखल दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात तसेच पुराव्या दाखल स्वतःवे शपथपत्र आणि लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्दपक्षाला ग्राहक मंचाव्दारे रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळाल्या बाबत पोस्ट ट्रॅक रिपोर्ट अभिलेखावर दाखल आहे परंतु तो ग्राहक मंचा समोर उपस्थित झाला नाही वा त्याने कोणतेही लेखी निवेदन दाखल केले नाही. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने तक्रारीव्दारे तसेच शपथपत्र व लेखी, मौखीक युक्तीवादाव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द केलेले आरोप विरुध्दपक्षाने खोडून काढलेले नाहीत, त्यामुळे या तक्रारीमध्ये विरुध्दपक्षाव्दारे कोणताही बचाव करण्यात आलेला नाही.अशापरिस्थितीत तक्रारकर्त्याची तक्रार, त्याने दाखल केलेले पुरावे पाहता विरुध्दपक्षा विरुध्द गुणवत्तेवर निकाली काढणे क्रमप्राप्त ठरते असे ग्राहक मंचाचे मत आहे.
08. तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाने 03 महिने गर्भधारणा गायीला झालेले आहेत असे सांगून गायीची विक्री रुपये-12,000/- मध्ये मार्च, 2018 मध्ये केली. त्यानंतर त्या गायीची सरकारी पशुवैद्दकीय चिकित्सालय कांद्री येथील पशुवैद्दकीय अधिकारी यांचे कडून तपासणी केली असता तिला गर्भधारणा झालेली नसून गर्भाशयावर सुज असल्याचे सांगण्यात आले व तिचेवर औषधोपचार करण्यात आले, त्या बाबतचे पशुचिकित्सालय येथील कुपनची प्रत तसेच औषधी खरेदी बिलाची प्रत तक्रारकर्त्याने दाखल केली तसेच सरकारी पशुवैद्दकीय चिकित्सालय कांद्री यांनी सदर गाय Infertility असल्या बाबत दिनांक-02 मे, 2019 रोजी दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत आणि दिनांक-16 जानेवारी, 2020 रोजी दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत पुराव्या दाखल अभिलेखावर सादर केली. हे सर्व पुरावे पाहता विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला गाय विकत देताना ती तीन महिन्याची गर्भ असलेली गाय असल्याचे सांगून गायीची विक्री करुन फसवणूक केल्याची बाब सिध्द होते. तक्रारकर्त्याने त्याची फसवणूक झाल्या बाबत पोलीसमध्ये तक्रार केल्याने विरुध्दपक्षा विरुध्द अदखलपात्र गुन्हयाची नोंद झाल्याचा दस्तऐवज तक्रारकर्त्याने पुराव्या दाखल सादर केला. हे सर्व पुरावे विरुध्दपक्षाचे विरुध्द जात असल्याने व विरुध्दपक्षाने कोणताही बचाव घेतलेला नसल्याने तक्रारकर्त्याची विरुध्दपक्षा विरुध्दची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा गायीची किम्मत व्याजासह परत मिळण्यास तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.
09. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन प्रस्तुत तक्रारीमध्ये ग्राहक मंचाव्दारे खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतो-
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष श्री अशोक चंद्रभान मेश्राम याचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्षाला आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्याला आजारी गायीची विक्री करुन स्विकारलेली रक्कम रुपये-12,000/- (अक्षरी रुपये बारा हजार फक्त) अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-16 एप्रिल,2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-6 टक्के दराने व्याज दयावे. तक्रारकर्त्याला आदेशित रक्कम व्याजासह विरुध्दपक्षाकडून प्राप्त झाल्या नंतर सदरची गाय विरुध्दपक्षाचे ताब्यात दयावी व गाय ताब्यात दिल्या बाबत विरुध्दपक्षा कडून लेखी पोच घ्यावी.
- विरुध्दपक्षाच्या दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च रुपये-2000/-(अक्षरी रुपये दोन हजार फक्त)अशा रकमा विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला दयाव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने सदर आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारीचे संचाची ब व क प्रत तक्रारकर्त्याला परत करावी.