तक्रारदार :गैर हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1.सा.वाले क्र.1 ही कुरीयर सेवा देणारी कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 चे मालक आहेत. यापुढे दोन्ही सा.वाले यांना केवळ एकत्रितपणे सा.वाले असे संबोधिले जाईल. तक्रारदारांनी सा.वाले यांचे मार्फत दिनांक 16.6.2010 रोजी काही हिरे दिल्ली येथील श्री.शशी कपुर यांचेकडे पाठविले होते. सा.वाले यांनी दिनांक 19.6.2010 रोजी कुरीयरचे पाकीट श्री.शशी कपुर , दिल्ली यांना सुपुर्द केले. परंतु त्यामध्ये हिरे नव्हते. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचेशी संपर्क स्थापन करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रस्तापित होऊ शकला नाही. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 23.6.2010 रोजी जुहू पोलीस स्टेशन येथे सा.वाले यांचे विरुध्द तक्रार नोंदविली. जुहू पोलीस स्टेशन यांनी सा.वाले यांना पोलीस स्टेशनला बोलाविले परंतु त्यातुन काही निष्पन्न होऊ शकले नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना कायदेशीर नोटीस दिली व हि-यांची किंमत नुकसान भरपाईसह परत मागीतली. त्यास सा.वाले यांनी काहीच प्रतिसाद दिला नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दिनांक 11.1.2012 रोजी दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असा आरोप केला व नुकसान भरपाई रु.1 लाखाची मागणी केली.
2. सा.वाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल करावी अशी नोटीस मंचामार्फत सा.वाले यांचेवर बजावण्यात आली. पोच पावती प्राप्त आहे. तरी देखील सा.वाले हजर झाले नाहीत. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना नोटीस बजावल्या बाबतचे शपथपत्र दाखल केले व त्यावरुन सा.वाले यांचे विरुध्द प्रकरण एकतर्फा करण्यात आले.
3. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद दाखल केला.
4. प्रस्तुत मंचाने तक्रार, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, व कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले यांनी तक्रारदारांना कुरीयर सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रार दार सिध्द करतात काय ? |
होय. |
2 |
तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? |
होय. |
3. |
अंतीम आदेश ? |
तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
5. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सा.वाले यांचे मार्फत वस्तु पाठविल्या बद्दलची पावती हजर केलेली आहे. तसेच पृष्ट क्र.8 वर श्री.शशी कपुर यांनी तक्रारदारांना पाठविलेल्या ई-मेलची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये असे स्पष्ट नमुद आहे की, त्यांना कुरीयरतर्फे पाकीट प्राप्त झाले परंतु त्यामध्ये रत्ने, मोती ( Gemstones ) नव्हते व केवळ काही कागद होते. तक्रारदारांनी त्यानंतर आंतरराष्ट्रीय ग्राहक संरक्षण संस्था यांचेकडे दाद मागीतली व संस्थेने सा.वाले यांना दिनांक 6.8.2010 रोजी एक नोटीस दिली त्याची प्रत तक्रारदारांनी पृष्ट क्र.9 वर दाखल केलेली आहे. सा.वाले यांनी वरील पत्रास दाद दिली नसल्याने तक्रारदारांनी दिनांक 11.8.2010 रोजी जुहू पोलीस्ट ठाणे येथे सा.वाले यांचे विरुध्द फीर्याद दिली. त्याची प्रत पृष्ट क्र.10 वर दाखल केलेली आहे. तक्रारदारांनी जुहू पोलीस ठाणे येथील त्या तक्रारीचा पाठपुरावा केला, परंतु त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही.
6. तक्रारदारांनी सा.वाले यांना दिलेली नोटीस, जुहू पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार, व आंतरराष्ट्रीय ग्राहक संरक्षण संस्था यांन सा.वाले यांना पाठविलेली नोटीस यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, तक्रारदारांनी सा.वाले यांचे मार्फत श्री.शशी कपुर, राहणार दिल्ली यांचेकडे रु.39,200/- येवढया किंमतीची काही रत्ने पाठविली होती, परंतु ती रत्ने श्री.शशी कपुर यांना मिळालेली नाहीत व कुरीयरचे पाकीट रिकामे होते. तक्रारदारांनी आपल्या पुराव्याचे शपथपत्रात तसेच लेखी युक्तीवादामध्ये असे स्पष्ट कथन केले आहे की, त्यांनी रत्ने घालून पाकीट व्यवस्थित बंद केले होते व ते सा.वाले यांचेकडे सुपुर्द केले व सा.वाले यांचे मार्फत जेव्हा ते पाकीट श्री.शशी कपुर दिल्ली यांना पोहचविण्यात आले त्यावेळी त्यामध्ये रत्ने नव्हती व ते रिकामे होते. या सर्व बाबी वरुन एक बाब स्पष्ट होते की, सा.वाले यांनी अथवा त्यांचे कर्मचा-यांनी प्रवासाचे दरम्यान कुरीयरचे पाकीट हाताळले व त्यामधील रत्ने काढून घेतली व रिकामे पाकीट श्री.शशी कपुर यांना सुपुर्द केले. सा.वाले यांनी तक्रारदारांकडून कुरीयर सेवा देण्याबद्दल रु.80/- स्विकारल्या नंतर कुरीयरव्दारे ती वस्तु श्री.शशी कपुर यांना पोहोचती करणे ही सा.वाले यांची जबाबदारी होती. परंतु सा.वाले यांनी ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली नाही. व दरम्यान पाकीटामधील रत्ने गहाळ झाली. या वरुन सा.वाले यांचा निष्काळजीपणा सिध्द होतो व सा.वाले यांनी तक्रारदारांना कुरीयर सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब सिध्द होते.
7. सा.वाले यांना प्रस्तुत मंचाकडून नोटीसीची बजावणी केल्यानंतर सा.वाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत अथवा आक्षेपाचे म्हणणे दाखल केलेले नाही. या प्रकारे तक्रारदारांच्या तक्रारीतील तसेच शपथपत्रातील कथन अबाधीत रहाते. सा.वाले यांनी कैफीयत दाखल केलेली नसल्याने तक्रारदारांच्या तक्रारीतील कथन व शपथपत्रातील कथन स्विकारणे योग्य व न्याय्य ठरते.
8. तक्रारदारांनी रत्नांची किंमत रु.39,200/- होती असे तक्रारीत नमुद केलेले आहे. तक्रारदारांना ती किंमत परत मिळणे योग्य व न्याय्य होणार आहे. दरम्यान जवळपास दोन वर्षाचा कालावधी गेल्याने रत्नांच्या किंमतीमध्ये बरीच वाढ झाली असेल. त्यातही तक्रारदारांनी पाठविलेल्या वस्तु श्री.शशी कपुर यांना प्राप्त न झाल्याने तक्रारदारांना निच्छितच मानसिक त्रास झाला असेल, त्या बद्दल तक्रारदारांनी जुहू पोलीस ठाणे येथे तक्रार केली व त्याचा पाठपुरवा देखील केला. त्यानंतर तक्रारदारांना प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली. या प्रकारे तक्रारदारांनी पाठविलेल्या रत्नांची किंमत रु.39,200/- + नुकसान भरपाई + तक्रारीचा खर्च असे एकंदर रु.50,000/- सा.वाले यांनी तक्रारदारांना अदा करावेत असा आदेश देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
9. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 23/2012 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना कुरीयर सेवेच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना रत्नांच्या किंमती बद्दल रु.39,200/- + नुकसान भरपाई + तक्रारीचा खर्च असे एकत्रित रु.50,000/- आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत अदा करावेत असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात.
4. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत करावी. अन्यथा मुदत संपल्यापासून सदरहू रक्कमेवर 9 टक्के दराने व्याज अदा करावे असाही आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.