::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये,श्री. मिलींद बी. पवार(हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक: 17.07.2013)
1. सदर तक्रार त.क.ने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केले आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. त.क.हे पुलगांव, तह. देवळी, जि. वर्धा येथील कायमचे रहिवासी आहे. वि.प. ही विवाहा संबंधी माहिती पुरविणारी पंजीकृत विवाह संस्था आहे व त्यांचा नोंदणी क्रं. SSBE.M.No.23/39/21/00365, LS/1109/15 असा आहे. त.क.यांना आपल्या मुलाच्या विवाहासाठी योग्य अनुरुप वधू मिळावी म्हणून त्यांनी वि.प. यांच्या संस्थेशी दि. 19.06.2011 रोजी मोबाईलवरुन व ई-मेल आय.डी.वरुन संपर्क साधला. त्याप्रमाणे वि.प. यांनी आपल्या संस्थेबाबत माहिती पुरविली व त्याप्रमाणे त.क. यांनी आपल्या मुलाचा बायोडाटा पाठविला. त्यानंतर वि.प.यांनी .दि.21.6.2011 रोजी त.क. यांना संदेश पाठवून वि.प.यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया येथील खाते क्रं. 30968258312 शाखा कोड-08937 बाबत माहिती दिली. व त्यानंतर त.क.यांना रजि.फी 2500/- रुपये भरण्याबाबत सुचविले व वि.प.यांनी ते वैवाहिक माहिती पुरविणा-या संस्थेचे संस्थापक आहेत असे सांगितले. व त्यांच्याकडे प्रियंका दुबे या स्थळाची माहिती सांगितली. तसेच वि.प.यांच्याकडे 40 वधुचे बायोडाटा आहे व ते पुरविल्या जातील असे कळविले. त्यानंतर दि. 8.7.2011 रोजी त.क. यांनी वि.प. यांच्या संस्थेच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया येथील खात्यावर रु.2500/- रजि.फी म्हणून जमा केले. त्यानंतर वि.प.यांनी फक्त प्रियंका दुबे हिचीच माहिती कळविली. परंतु तिच्या वडिलांशी संपर्क करुन दिला नाही. तसेच सदर प्रियंका दुबे हिची माहिती ही खुप जुनी होती व ती त.क.च्या मुला पेक्षा 2-3 वर्षाने मोठी होती. तसेच त.क. च्या मुलाबद्दल माहिती वि.प.यांनी प्रियंका दुबे यांना पुरविली नव्हती हे प्रियंका दुबे यांच्या वडिलांशी फोनवरुन संपर्क साधल्यावर त.क. यांना माहिती झाले. वि.प.यांनी इतर कोणत्याही मुलीची माहिती त.क. यांना पुरविली नाही. म्हणून त.क. यांनी वि.प.यांच्याकडे रजि. भरलेली फी परत मागितली व वारंवांर फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी देखील वि.प. यांनी सदर रक्कम त.क. यांना परत केली नाही. म्हणून त.क. यांनी वि.प. यांना नोटीस पाठवून सदर रक्कम परत मागितली. तरीही वि.प. यांनी सदर रक्कम परत न केल्यामुळे नाईलाजास्तव त.क. यांनी सदरची तक्रार मंचात दाखल करणे भाग पडले आहे.
3 त.क. यांनी आपल्या प्रार्थने मागणी केली आहे की, वि.प.यांच्या न्यूनतम सेवेमुळे आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासासाठी रु.50,000/- व त.क. यांनी भरलेले रजि.फी. रु.2500/-, तसेच पत्रव्यवहार व फोन यांचा खर्च रु.500/- असे एकूण रु.53,000/- 18% व्याजासह मिळावे.
त.क. यांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत एकूण नि.क्रं. 3 वर कागदपत्रे दाखल केलेली आहे. त्यामध्ये वि.प. यांना बँके मार्फत दिलेले 2500/- रु.ची पावती बँकेची स्लीप , वि.प. यांनी दिलेली पावती. वि.प.यांना पाठविलेली नोटीस इत्यादी.
4 प्रस्तुतची तक्रार पंजीबध्द करुन वि.प. 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आल्या. सदरच्या नोटीसची अमंलबजावणी झालेली आहे व ती नि.क्रं. 5/1 व 5/2 वर दाखल आहे. अनेक वेळा संधी देऊन ही वि.प. 1 व 2 हे मंचात उपस्थित झाले नाहीत किंवा त्यांनी आपला लेखी जबाब प्रत्यक्ष किंवा पोस्टा मार्फत दाखल केलेला नाही. त्यामुळे वि.प. 1 व 2 यांच्या विरुध्द एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश नि.क्रं. 1 वर दि. 19/05/2012 रोजी पारित करण्यात आला.
5 वि.प. विरुध्द एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश पारित झाल्यामुळे वि.प. यांना तक्रारीतील मुद्दे मान्य आहेत असे समजून उपलब्ध कागदपत्रे, त.क.ची तक्रार, त.क. चे पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद यावरुन प्रकरण निकाली काढण्यात येत आहे.
त.क. ची तक्रार दाखल दस्ताऐवज व त.क. च्या वकिलांचा तोंडी व लेखी युक्तिवाद यावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
6 त.क. यांनी प्रस्तुतची तक्रार प्रतिज्ञापत्रावर दाखल केली आहे. तसेच नि.क्रं. 7 वर प्रतिज्ञापत्रावर पुरावा दिला आहे. वि.प.यांना त.क. यांचे तक्रारीत दिलेले मुद्दे मान्य असल्याचे समजण्यात येते.
7 त.क. हे आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचे विवाहासाठी स्थळ बघत होते. म्हणून त्यांनी आजच्या संगणक युगात ऑनलाईन वधूवर सूचक केंद्राचा आधार घेण्याचे ठरविले. हे तक्रारीमधील कथनावरुन दिसून येते. म्हणून त्यांनी वि.प. 1 व 2 यांचे संस्कार विवाह सर्व्हीस यांचे फोनवर आणि ई-मेल आय.डी.वर संपर्क साधला. त्यावेळी वि.प.यांनी सदर विवाह नोंदणीसाठी आवश्यक फी रु.2500/- त्यांचे खातेवर भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे त.क. यांच्या मुलानी वि.प.यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या खातेवर दि. 08.07.2011 रोजी रु.2500/- भरले, हे नि.क्रं. 3/1 वरील बँकेचे काऊन्टर स्लीपवरुन दिसून येते. सदर रजि. फी भरल्यानंतर वि.प.हे त.क. यांना मुलींचे बायोडाटा पुरवतील असे कबूल केले होते. त.क. यांचेकडून रजि. फी स्विकारल्यानंतर त्याची पावती वि.प.यांनी त.क. यांना कुरिअरने पाठविली हे दि. 3/3 वरील पावतीवरुन दिसून येते. त्यामुळे वि.प.यांनी त.क. यांचे मुलाच्या संबंधीची माहिती पुरविण्यासाठी त्यांचे संस्थेमार्फत रु.2500/- स्विकारले होते हे सिध्द होते. त्यामुळे त.क. हे वि.प.यांचे ग्राहक ठरतात. तसेच वि.प. यांचे कार्यालय मध्यप्रदेश येथील आहे. परंतु त.क. यांनी वि.प.यांना पाठविलेले रजि.फी रु.2500/- ही स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-पुलगांव जि. वर्धा येथून वि.प. यांच्या खात्यात जमा केलेली आहे. तसेच वि.प.यांच्याशी ई-मेल व फोन वरील संपर्क हे विद्यमान मंचाच्या अधिकारक्षेत्रा मधूनच केलेला असल्यामुळे वि.मंचास प्रस्तुत तक्रार चालविण्याचा अधिकार आहे. वि.प. यांनी स्विकारलेल्या फी पोटी योग्य सेवा देणे हे वि.प.यांचे कर्तव्य होते. परंतु वि.प.यांनी कबूल केल्याप्रमाणे 30/40 स्थळा संबंधीची माहिती त.क. यांना दयावयाची होती. परंतु वि.प.यांनी फक्त प्रियंका दुबे हिची माहिती पुरविली, जी माहिती सुध्दा जुनी होती व त.क. यांचे मुलासाठी योग्य नव्हती. तसेच वि.प.यांनी त.क. यांच्या मुला विषयी योग्य माहिती वधूच्या वडिलांना माहिती पुरविली नाही. त्यानंतर वि.प. हे त.क. यांच्याशी संपर्क साधण्याचे टाळत होते व इतर वधुच्या संबंधीची माहिती ही पुरविली नाही. म्हणून त.क. यांनी वि.प. यांना रजि.फी चे भरलेले पैसे परत मागितले. त्यावेळी वि.प.यांनी ते परत करण्याचे फक्त आश्वासन दिले पण प्रत्यक्षात रक्कम परत दिली नाही. म्हणून त.क. यांनी वि.प.यांना नोटीस पाठविली. ती नि.क्रं.3/4 वर दाखल आहे. सदर नोटीस वि.प.यांना मिळाल्याबाबतची पोच पावती नि.क्रं. 3/5 वर दाखल आहे. तरीही वि.प. यांनी सदर रक्कम परत केली नाही.
8 सर्वसाधारणपणे पालकांना आपली मुले विवाह योग्य झाल्यानंतर त्यांना सुयोग्य असा जोडीदार मिळावा याबाबत चिंता असते व त्यांच्यावर एक प्रकारचे मानसिक दडपण असते. विशेषतः आपली मुले जर शिक्षणाकडून परिपूर्ण असतील तर त्यांना आवश्यक असा सुयोग्य जोडीदार शोधावा लागतो. त्यावेळी वि.प. सारख्या वधूवर सूचक केंद्राचा पालक आधार घेतात. कारण वधू वर सूचक केंद्रात सर्व संबंधीची अचूक माहिती असेल यावर पालकांचा विश्वास असतो. कारण त्यामुळे पालकांची धावपळ होण्याचा त्रास वाचतो. परंतु वि.प. सारख्या व्यावसायिक वधू-वर सूचक केंद्रे त्यांचा फायदा घेतात. व त्रस्त पालकांची चक्क लुबाडणूक करतात. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे. प्रस्तुत प्रकरणातील त.क. हे जबाबदार व जागरुक पालक होते. म्हणून त्यांनी वि.प.यांचे अव्यवाहारीक वागणे वेळीच ओळखले व वि.प. नव्हेतर वि.प.सारख्या अनेक वधू-वर सूचक केंद्रावर वचक बसविण्यासाठी प्रस्तुत प्रकरण दाखल केले.
अशा त-हेने त.क. हे वि.प. यांचे कडून आपल्या मुलासाठी योग्य वधूचे स्थळ मिळावे म्हणून आशावादी होते. परंतु वि.प.यांनी त.क. यांचा पूर्ण भ्रमनिरास केला व त.क. यांना वधूची योग्यप्रकारे माहिती पुरविली नाही. त्यामुळे वि.प.यांनी त.क. यांना दोषपूर्ण व त्रृटीची सेवा देऊ केली आहे हे स्पष्ट पुराव्यानिशी सिध्द झाले आहे. सेवा पुरविण्यासाठी आवश्यक शुल्क घेणे व त्यानंतर ही योग्य ती सेवा न पुरविणे ही अनुचित व्यापार प्रथेत येते व त्याचा अवलंब वि.प.यांनी केला आहे हे सिध्द होते.
9 त.क. यांनी वि.प. यांच्याकडे भरलेली रजिस्ट्रेशन फी परत मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केला हे कागदपत्रावरुन दिसून येते. तरीही वि.प. यांनी त्यांना ती परत दिली नाही. एवढेच नव्हेतर वि.प. यांना मंचाची प्रस्तुत प्रकरणाची नोटीस मिळून ही वि.प. हे मंचात हजर झाले नाही यावरुन वि.प.यांची नकारात्मक मानसिकता दिसून येते.
वरील सर्व विवेचनावरुन वि.प.यांनी त.क. यांच्याकडून विवाह नोंदणीसाठी घेतलेली फी वेळीच परत केली असती तर ती त.क. यांना दुस-या ठिकाणी उपयोगी पडली असती. परंतु वि.प.यांनी ती वेळेत परत न केल्यामुळे व वधुची योग्य ती माहिती न पुरविल्यामुळे वि.प.यांनी दुषित व त्रृटीची सेवा दिली आहे. त्यामुळे वि.प.यांच्याकडे जमा असलेली रजि.फी रु.2500/- व त्यावर द.सा.द.शे.7% दराने व्याजासह परत मिळण्यास त.क. हे पात्र आहेत. तसेच वि.प.यांच्या गैरकृत्यामुळे व दोषपूर्ण त्रृटीच्या सेवेमुळे त.क. यांना जो मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून रु.5000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 1000/- मंजूर करणे योग्य ठरेल असे मंचास न्यायोचित वाटते.
एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन वि.प. 1 व 2 यांनी त.क. यांना सेवा देण्यात न्यूनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
// आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) वि.प. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिरित्या त.क. यांच्याकडून घेतलेली विवाह रजि. फी रु.2,500/- व त्यावर रजि.फी स्विकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.08.07.2011 पासून प्रत्यक्ष त.क.ला प्राप्त होईपर्यंत द.सा.द.शे. 7% दराने व्याजासह द्यावे.
(3) वि.प. 1 व 2 यांनी त.क. यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये5,000/- व
तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1000/- अदा करावे.
(4) वरील आदेशाची अंमलबजावणी वि.प. 1 व 2 यांनी आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाच्या आत करावी.
(5) आदेशाची प्रत संबंधितानां पाठविण्यात यावी.