(मंचाचे निर्णयान्वये, श्री मनोहर गो. चिलबुले, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 3 ऑक्टोंबर 2013)
अर्जदार नितीन विजयराव कोत्तावार यांनी सदरचा अर्ज ग्राहक हक्क संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे.
अर्जदार नितीन विजयराव कोत्तावार यांची संक्षिप्त तक्रार अशी की,
1. अर्जदार हा व्यवसायाने ठेकेदार आहे. त्याला ट्रॅक्टर ट्रॉलीची गरज असल्याने त्याने दि.22.05.2012 गैरअर्जदाराचे धानोरा रोड, गडचिरोली येथील न्यू ताज ऑटोमोबाईल ट्रॅक्टर व ट्रॉली विक्रीचे दुकानातून रुपये 1,38,500/- मध्ये इन्शुरन्स व पासिंग खर्चासह ट्रॅक्टरची ट्रॉली विकत घेण्याचा सौदा केला. त्याच दिवशी सदर सौद्यापैकी रुपये 1,00,000/- अर्जदारास नगदी दिले. बाकी रुपये 38,500/- ट्रॉली आर.टी.ओ. कार्यालयातून पासिंग झाल्यावर देण्याचे कबूल केले होते. दि.23.5.2012 रोजी अर्जदार सदर ट्रॉली गडचिरोली येथील आपल्या घरी घेवून आला.
2. अर्जदाराने ट्रॉली घरी आणल्यावर ट्रायल घेतली असता ट्रॉलीच्या चाकात डग असल्याचे लक्षात आले. अर्जदाराने याबाबत गैरअर्जदारास कळविले असता त्याने 15 दिवसानंतर आपला मिस्ञी अतुल यांस पाठविले. अतुल सदर ट्रॉली रिपेअरींग व पासिंग करीता शोरुममध्ये घेवून गेला. तेंव्हापासून गैरअर्जदाराने सदर ट्राली दुरुस्त करुन अर्जदारास दिलेली नाही.
3. अर्जदाराने दि.28.9.2012 रोजी अधि.रामटेके यांचे मार्फत नोटीस पाठवून गैरअर्जदारास ट्रॉली 7 दिवसांचे आंत परत करण्याची सुचना दिली. परंतु, गैरअर्जदाराने नोटीसची पुर्तता केली नाही किंवा उत्तर दिले नाही. म्हणून गैरअर्जदाराने ट्रॉली दुरुस्त करुन परत करावी किंवा रुपये 1,00,000/- व त्यावर बँकेच्या दराने व्याज रुपात नुकसान भरपाई द्यावी. तसेच, अर्जदारास झालेल्या शारीरीक व मानसिक ञासाबाबत रुपये 50,000/- नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश होण्याची मागणी केली आहे.
4. गैरअर्जदाराने नि.क्र.9 प्रमाणे लेखी बयान दाखल करुन अर्जदाराची मागणी फेटाळली आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराने त्यांच्या न्यु ताज ऑटोमोबाईल्स मधून रुपये 5,00,000/- किंमतीचा न्यु हॉलंड कंपनीचा नविन ट्रॅक्टर विकत घेतला. सदर ट्रॅक्टर विकत घेतांना रुपये 1 लाख नगदी दिले, रुपये 2,38,000/- चे कर्ज घेतले आणि उर्वरीत रुपये 1,62,000/- देण्यासाठी दीड महिन्यांचा वेळ मागून घेतला व सदर रकमेच्या परतफेडीची हमी म्हणून चेक सुध्दा दिले. परंतु, सदर रक्कम कबूली प्रमाणे दिली नसल्यामुळे गैरअर्जदाराने ट्रॅक्टरच्या नोंदणीचे कागदपञ स्वतः जवळ ठेवून घेतले आहेत. व्यवसायीक संबंध लक्षात घेवून गैरअर्जदाराने सदर रक्कम वसुलीसाठी अद्याप कारवाई केली नाही. माञ, अर्जदाराने संधीचा गैरफायदा घेवून खोटी केस दाखल केली आहे.
5. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, तो फक्त ट्रॅक्टर विक्रीचा व्यवसाय करीत असून, ट्रॉली विक्रीचा व्यवसाय करीत नाही. त्याने अर्जदाराबरोबर ट्रॉली विक्रीचा कधीही सौदा केला नाही आणि त्यासंबंधाने रुपये 1 लाख घेतले नाही. गैरअर्जदारास घेणे असलेले पैसे वसुलीची कारवाई करु नये या दुष्ट हेतूने अर्जदाराने सदरची खोटी तक्रार दाखल असल्याने ती खारीज करण्याची विनंती केली आहे.
6. अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील, मंचाचे निष्कर्ष व त्याबाबतची कारण मिमांसा खालील प्रमाणे.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदाराने गैरअर्जदारास ट्रॉली खरेदीच्या सौद्यापोटी : होय.
रुपये 1 लाख दि.22.5.2011 रोजी दिले आहे काय ?
2) गैरअर्जदाराने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब : होय.
केला आहे काय ?
3) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
अर्ज अंशतः मंजूर.
- कारण मिमांसा -
7. अर्जदार नितीन कोत्तावार याने स्वतःची साक्ष शपथपञ नि.क्र.11 प्रमाणे दिली असून साक्षीदार विपीन राजेश बोटकावार ची साक्ष नि.क्र.15 आणि साक्षीदार उमाकांत मनोहर मलोडे यांची साक्ष नि.क्र.16 प्रमाणे शपथपञावर नोंदली आहे. अर्जदाराने आपले कथनाचे पृष्ठ्यर्थ दस्तऐवजाची यादी नि.क्र.4 सोबत खालील दस्तऐवज दाखल केले आहेत.
1) PMG ऑटोमोबाईलला पैसे दिल्याची पावती दि.22.5.2012.
2) गैरअर्जदारास पाठविलेली नोटीस दि.28.9.2012.
3) गैरअर्जदारास नोटीस मिळाल्याची पोचपावती दि.1.10.2012
4) पोष्टाची रजिष्टर पावती दि.28.9.2012.
यादी नि.क्र.19 सोबत खालील दस्तऐवज दाखल केले आहेत.
1) न्यु ताज ऑटोमोबाईलची ट्रॅक्टर बुकींग पावती दि.13.4.2012
2) PMG Automobile, Asti Road Chamorshi यांना दि.16.4.2012 रोजी
रुपये 40,000/- दिल्याची पावती.
3) PMG Automobile, Asti Road Chamorshi यांना दि.25.4.2012 रोजी
रुपये 12,000/- दिल्याची पावती.
यादी नि.क्र.23 सोबत मॅग्मा फायनान्स कार्पोरेशनला दिलेल्या ट्रॅक्टरच्या कर्ज हप्त्याच्या पावत्या 1 ते 3.
गैरअर्जदार असलम शेख यांनी त्यांची साक्ष शपथपञ नि.क्र.17 प्रमाणे दिली असून साक्षीच्या पृष्ठ्यर्थ दस्तऐवजाची यादी नि.क्र. 21 सोबत खालील दस्तऐवज दाखल केले आहेत.
1) अर्जदारास पाठविलेले नोटीसचे उत्तर दि.11.10.2012
2) व्यवसाय प्रमाणपञ.
3) अर्जदारास विकलेल्या ट्रॅक्टरचे नोंदणी प्रमाणपञ दि.2.5.2012 अर्जदारातर्फे युक्तिवाद नि.क्र.18 प्रमाणे आणि गैरअर्जदारातर्फे युक्तिवाद नि.क्र.20 प्रमाणे दाखल केला आहे.
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
8. अर्जदार नितीन कोत्तावारचे म्हणणे असे की, गैरअर्जदार असल्लम शेख यांचेशी त्याने दि.22.5.2012 रोजी ट्रॅक्टरची ट्रॉली रुपये 1,38,500/- ला खरेदीचा सौदा केला व त्यापोटी रुपये 1,00,000/- गैरअर्जदारास दिले. त्याबाबत, गैरअर्जदाराने दिलेली पावती दस्तऐवजाची यादी नि.क्र.5 सोबत दस्त क्र.अ-1 वर दाखल केली आहे. सदर ट्रॉली त्याने गैरअर्जदाराच्या न्यु ताज ऑटोमोबाईल्स या गडचिरोली येथील ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या शोरुम मधून दि.23.5.2012 रोजी गडचिरोली येथील आपल्या घरी नेली. उर्वरीत रुपये 38,500/- ट्रॉलीच्या आर.टी.ओ. पासिंग नंतर द्यावयाचे ठरले होते. ट्रॉली घरी नेल्यानंतर ट्रायल घेतली असता चाकात डग असल्याचे आढळून आल्याने त्याबाबत गैरअर्जदारास कळविले. 15 दिवसांनी गैरअर्जदाराने अतुल नावाचा मेकॅनिक अर्जदाराचे घरी आला व ट्रॉली दुरुस्तीसाठी शोरुममध्ये घेवून गेला. परंतु, त्यानंतर गैरअर्जदाराने ट्रॉली दुरुस्त करुन परत केली नाही व आर.टी.ओ. कडे नोंदून दिली नाही.
9. अर्जदाराचे साक्षीदार विपीन बोटकावार आणि उमाकांत मलोडे यांनीही अर्जदाराच्या वरील म्हणण्यास पुष्टी दिली आहे व गैरअर्जदाराशी अर्जदाराने रुपये 1,38,500/- मध्ये विमा व रजिष्टर खर्चासह ट्रॉली खरेदीचा सौदा केल्यावर ट्राली घरी आणल्यानंतर चाकात डग असल्याचे दिसून आल्यानंतर गैरअर्जदाराने त्याचा मेकॅनिक अतुल यास पाठविले आणि त्याने ट्रॉली शोरुममध्ये दुरुस्तीसाठी नेली. परंतु दुरुस्त करुन परत केली नाही असे सांगितले आहे.
10. गैरअर्जदार शेख असल्लम यांनी माञ त्याचा ट्रॉली विक्रीचा व्यवसाय नसल्याने त्याने अर्जदाराशी ट्रॉली विक्रीचा करार केला व रुपये 1,00,000/- घेवून ट्रॉली अर्जदाराचे सुपूर्द केली, परंतु डग असल्याने त्याचा मेकॅनिक अतुल यास पाठवून शोरुम मध्ये आणली आणि ती दुरुस्त करुन अर्जदारास परत केली नाही, हे नाकबूल केले आहे. त्याचे म्हणणे असे की, अर्जदाराने त्याचेकडून रुपये 5,00,000/- किंमतीचा ट्रॅक्टर खरेदी केला. सदर ट्रॅक्टरच्या किंमतीपोटी रुपये 1,00,000/- नगदी दिले, रुपये 2,38,000/- कर्ज घेतले आणि रुपये 1,62,000/- दीड महिन्यांनी देण्याचे कबूल केले व त्याची हमी म्हणून चेक दिले, परंतु सदर रक्कम दिली नाही. गैरअर्जदाराने सदर रक्कम वसुलीची कारवाई करु नये म्हणून सदर खोटी केस दाखल केली आहे.
11. अर्जदाराचे अधिवक्ता श्री रामटेके यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, गैरअर्जदाराचे गडचिरोली येथे न्यु ताज ऑटोमोबाईल्स हे ट्रॅक्टर व ट्रॉली विक्रीचे दुकान आहे. तसेच PMG Automobile या नावाने आष्टी रोड चामोर्शी येथेही दुकान आहे. गैरअर्जदार हा दोन्ही दुकानांचा कारभार पाहतो व दोन्ही दुकानांच्या नावाने व्यवहार करतो. अर्जदाराने गैरअर्जदाराच्या न्यु ताज ऑटोमोबाईल्स, गडचिरोली येथून एप्रिल 2012 मध्ये ट्रॅक्टर खरेदी केला व त्यासाठी वेळोवेळी अॅडव्हान्स रकमा गैरअर्जदाराकडे जमा केल्या त्याच्या पावत्या अर्जदाराने यादी नि.क्र.19 सोबत दाखल केल्या आहेत.
12. सदर यादीतील दस्त क्र.अ-1 ही पावती दि.13.4.2012 रोजी रुपये 10,000/- बुकींग अॅडव्हॉन्स जमा केल्याची आहे. त्याच पावतीवर रुपये 50,000/- दि.14.4.2012 रोजी जमा केल्याची नोंद आहे. ट्रॅक्टरच्या रकमेपैकी रुपये 40,000/- दि.16.4.2012 रोजी मिळाल्याची पावती सदर यादी सोबत दस्त क्र.अ-2 वर दाखल आहे. दस्त क्र.अ-1 व अ-2 वरील सह्या एकाच व्यक्तीच्या आहेत. दस्त क्र.अ-1 ही पावती न्यु ताज ऑटोमोबाईल्स गडचिरोलीचा रबर स्टॅम्प लावून दिली आहे तर अ-2 ही पावती त्याच व्यक्तीने PMG. Automobile, Asti Road, Chamorshi चा रबर स्टॅम्प लावून दिली आहे. यावरुन दोन्ही दुकान एकाच व्यक्तीचे असून पैसे स्विकारल्या बाबतच्या पावत्या गैरअर्जदार कधी या नावाने तर कधी त्या नावाने देत असतो हेच दिसून येते.
13. ट्रॉलीचे पैसे मिळाल्याची पावती जी दस्तऐवजाची यादी नि.क्र.5 सोबत दस्त क्र.अ-1 वर दाखल आहे. त्यावर ‘Trali’ असे नमुद केले असून PMG. Automobile, Asti Road, Chamorshi चा रबर स्टॅम्प आहे ही गोष्ट खरी असली तरी सदर पावतीवर रुपये 1,00,000/- मिळाल्याबाबतची सही आणि अर्जदाराने गैरअर्जदार असलम शेख यांस न्यु ताज ऑटोमोबाईल्स धानोरा रोड, गडचिरोली या पत्त्यावर दि.28.9.2012 रोजी यादी नि.क्र.5 सोबत दस्त क्र.अ-2 अन्वये पाठविलेली रजिष्टर पोष्ट अे.डी.नोटीस प्राप्त झाल्याबद्दल पोहोच दस्त क्र.अ-3 वर असलेली सही एकाच व्यक्तीची आहे. याचाच अर्थ न्यु ताज ऑटोमोबाईल्स गडचिरोली च्या नावाने नोटीस स्विकारणा-या असलम शेख या व्यक्तिनेच PMG. Automobile, Asti Road, Chamorshi असा रबर स्टॅम्प लावून दि.22.5.2012 रोजी रुपये 1,00,000/- ट्रॉली बाबत मिळाल्याची पावती दस्त क्र.अ-1 दिली आहे हे स्पष्ट होते. या लेखी दस्तऐवजांची पुष्टी करणारा तोंडी पुरावा साक्षीदार विपीन राजेश बोटकावार आणि उमाकांत मनोहर मलोडे या सदर व्यवहाराचे वेळी व ट्रॉली अर्जदाराचे घरी नेतांना, तसेच अर्जदाराचे घरुन गैरअर्जदाराचा मेकॅनिक अतुल याने दुरुस्तीसाठी ट्रॉली परत नेतांना प्रत्यक्ष हजर असलेल्या व्यक्तिनी दिला आहे.
14. त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले की, अर्जदाराने गैरअर्जदारास पाठविलेल्या नोटीसात गैरअर्जदाराचे पी.एम.जी. ऑटोमोबाईल्स, आष्टी रोड, चामोर्शी, जि. गडचिरोली येथे एक व ताज ऑटोमोबाईल्स गडचिरोली येथे एक असे दोन ट्रॉली व ट्रॅक्टर विक्रीचे दुकान आहे असे स्पष्ट नमुद केले आहे. त्यामुळे गडचिरोली येथील दुकानातून घेतलेल्या ट्रॉलीसाठी जरी त्याने PMG. Automobile, Asti Road, Chamorshi या नावाचा रबर स्टॅम्प लावून पावती दिली असली तरी दोन्ही दुकानांचा मालक एकच असल्याने गैरअर्जदार हा सदर कराराप्रमाणे वागण्यास जबाबदार असतांना त्याप्रमाणे वागला नसल्याने, ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे सदरच्या कारवाईस पाञ आहे.
15. याउलट, गैरअर्जदाराचे अधिवक्ता श्री नंदनपवार यांनी असा युक्तिवाद केला की, गैरअर्जदार न्यु ताज ऑटोमोबाईल्स, धानोरा रोड, गडचिरोली या नावाने न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर विक्रीचा व्यवसाय करतो, त्याच्याकडे ट्रॉली विक्रीची एजन्सी नाही व तो ट्रॉली विक्री देखील करीत नाही. गैरअर्जदाराने यासाठी Trade Certificate दस्तऐवजांची यादी नि.क्र.21 दि.20.4.2013 सोबत दस्त क्र.ब-2 वर दाखल केले आहे, त्यात केवळ ट्रॅक्टर विक्री हाच व्यवसाय दर्शविला आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून रुपये 5,00,000/- किंमतीचा न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर विकत घेतला त्यापोटी रुपये 1 लाख नगदी दिले, रुपये 2,38,000/- चे मॅग्मा फायनान्सकडून कर्ज घेतले आणि रुपये 1,62,000/- देण्यासाठी दीड महिन्याचा वेळ मागून घेतला व हमी दाखल चेक दिले. परंतु, अर्जदाराने रुपये 1,62,000/- दिली नाही म्हणून आजही सदर ट्रॅक्टरचे मुळ नोंदणी पुस्तक गैरअर्जदाराकडे ठेवले आहे. गैरअर्जदाराने सदर रकमेची मागणी केली असता, अर्जदाराने ती दिली नाही आणि सदर रकमेच्या वसुलीची कारवाई होऊ नये म्हणून खोटी तक्रार दाखल केली आहे. ट्रॅक्टरच्या नोंदणी पुस्तकाची प्रत गैरअर्जदाराने दस्तऐवजांची यादी नि.क्र.21 सोबत दस्त क्र.ब-3 वर दाखल केली आहे.
16. अर्जदाराने जी तथाकथीत पावती दस्त क्र.अ-1 वर दाखल केले आहे ती PMG. Automobile, Asti Road, Chamorshi ची आहे. तक्रार अर्जात गैरअर्जदार वरील दुकानाचा मालक असल्याचे कुठेही नमुद नाही. प्रत्यक्षात PMG. Automobile शी गैरअर्जदाराचा काहीही संबंध नाही. त्यामुळे सदर पावतीच्या आधारे गैरअर्जदाराविरुध्द दाखल केलेली तक्रार खोटी असल्याने खारीज होण्यास पाञ आहे.
17. दोन्ही पक्षातर्फे दाखल दस्तऐवज व सादर युक्तिवाद यांचा विचार केला असता असे दिसून येते की, गैरअर्जदाराचे गडचिरोली येथे न्यु ताज ऑटोमोबाईल्स नावाने ट्रॅक्टर विक्रीचे दुकान आहे व सदर दुकानातून अर्जदाराने एप्रिल 2012 मध्ये न्यु हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला आहे. सदर ट्रॅक्टर खरेदी व्यवहार हा या तक्रार अर्जाचा भाग नसल्याने त्यावर अधिक चर्चा करण्याचे कारण नाही.
18. सदर ट्रॅक्टर खरेदी नंतर ट्रॉलीची गरज असल्याने अर्जदाराने दि.22.5.2013 रोजी गैरअर्जदाराचे दुकानातून रुपये 1,38,500/- मध्ये (ज्यांत इन्शुरन्स व नोंदणी खर्च समाविष्ठ होता) ट्रॉली खरेदीचा सौदा केला व त्यापोटी गैरअर्जदारास नगदी रुपये 1,00,000/- दिले व त्याबाबत गैरअर्जदाराने यादी नि.क्र.4 सोबत दाखल दस्त क्र.अ-1 ही पावती दिली असे अर्जदाराचे म्हणणे आहे. सदर पावतीवर दुकानाचे नांव PMG. Automobile, Asti Road, Chamorshi असा रबर स्टॅम्प आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, सदर पावती त्याने दिली नाही व PMG. Automobile शी त्याचा संबंध नाही. अर्जदाराने दस्त क्र.ब-2 ही नोटीस रजिस्टर पोष्ट अे.डी. ने गैरअर्जदारास असल्लम शेख, न्यु ताज ऑटोमोबाईल्स, धानोरा रोड, गडचिरोली या पत्त्यावर पाठविली होती. सदर नोटीस गैरअर्जदारास मिळाली आणि त्या नोटीसचे गैरअर्जदाराने उत्तरही पाठविले आहे. सदर नोटीस मिळाल्याबाबत पोहोच पावती दस्त क्र.ब-3 वर आहे. त्यावर असलेली गैरअर्जदाराची सही त्याने नाकारलेली नाही. सदर पोहोच पावतीवरील सही आणि रुपये 1,00,000/- मिळाल्याबाबत गैरअर्जदाराने दिलेली म्हणून जी पावती अर्जदाराने दस्त क्र.अ-1 वर दाखल केली आहे त्यांतील सही सारखीच आहे. म्हणजेच ज्या गैरअर्जदाराने पोहोच पावतीवर सही केली आहे त्यानेच रुपये 1,00,000/- ट्रॉलीसाठी मिळालेल्या पावतीवर देखील सही केली आहे. याशिवाय अर्जदाराने गैरअर्जदाराशी ट्रॉली खरेदीचा व्यवहार केला व दि.22.5.2012 रोजी रुपये 1,00,000/- देवून दि.23.5.2012 रोजी खरेदी केलेली ट्रॉली घरी आणली होती, अशी साक्षीदार विपीन बोटकावार आणि उमाकांत मलोडे यांची साक्ष अर्जदाराच्या म्हणण्यास दुजोरा देणारी आहे.
19. अर्जदाराने एप्रिल 2012 मध्ये गैरअर्जदारास रुपये 1,00,000/- देवून ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासाठी दि.13.4.2012 रोजी रुपये 10,000/- आणि दि.14.4.2012 रोजी रुपये 50,000/- जमा केल्याबाबत पावती यादी नि.क्र.19 सोबत दस्त क्र.अ-1 वर दाखल केली आहे त्यावर न्यु ताज ऑटोमोबाईल्स, गडचिरोलीचा रबर स्टॅम्प आहे. दि.16.4.2012 रुपये 40,000/- जमा केल्याबाबतची पावती वरील यादीसोबत दस्त क्र.अ-2 वर आहे. सदर पावतीवर PMG. Automobile, Asti Road, Chamorshi असा रबर स्टॅम्प आहे, माञ दोन्ही पावत्यांवर असलेली सही एकाच व्यक्तिची असल्याचे दिसून येते. याचाच अर्थ PMG. Automobile, Asti Road, Chamorshi या दुकानाच्या नावाचा रबरी शिक्का वापरुन देखील गैरअर्जदार पैसे स्विकारल्याच्या पावत्या देत होते असे दिसून येते. अर्जदाराने यादी नि.क्र.5 सोबतच्या दस्त क्र.अ-2 या नोटीस मध्ये गैरअर्जदार असलम शेख यांचे पी.एम.जी.ऑटोमोबाईल्स, आष्टी रोड, चामोर्शी आणि ताज ऑटोमोबाईल्स, गडचिरोली असे दोन ट्रॉली व ट्रॅक्टर विक्रीचे दुकान आहे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.
20. गैरअर्जदाराचा ट्रॉली विक्रीचा व्यवसाय नाही असे जरी गैरअर्जदाराने लेखी जबाबात म्हटले असले तरी शपथपञावरील साक्ष नि.क्र.17 मध्ये वेळ प्रसंगी ग्राहकाने विनंती केल्यास कंपनीच्या अधिकृत डिलरकडून ट्रॉली विकत घेण्यासाठी आम्ही मदत करु शकतो असे म्हटले आहे.
21. वरील सर्व बाबींचा विचार करता गैरअर्जदाराने दि.22.5.2012 रोजी अर्जदार रुपये 1,38,500/- मध्ये ट्रॅक्टर ट्रॉली विक्रीचा सौदा केला व त्यापोटी रुपये 1,00,000/- स्विकारुन PMG. Automobile, Asti Road, Chamorshi असा रबर स्टॅम्प असलेली पावती (दस्त क्र.अ-1) दिली आणि दि.23.5.2012 रोजी सदर ट्रॉली अर्जदाराचे ताब्यात दिली होती हे उपलब्ध दस्तऐवज व दोन साक्षीदारांच्या पुराव्याने सिध्द होते म्हणून मुद्दाक्र.1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
22. अर्जदार मुद्दा क्र.1 वरील विवेचनाप्रमाणे गैरअर्जदाराने दि.22.5.2012 रोजी अर्जदारास रुपये 1,38,500/- मध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली विकण्याचा करार केला हे सिध्द झाले आहे. सदर ट्रॉली दि.23.5.2012 रोजी अर्जदारास दिल्यावर त्यांत चाकात डग असल्याचा दोष दिसून आल्यावर गैरअर्जदारास कळविल्याने त्याने आपला मेकॅनिक अतुल यास पाठविले व तो सदर ट्रॉली दुरुस्तीसाठी घेवून गेला. परंतु त्यानंतर ती ट्रॉली अर्जदारास परत केली नाही व बाकी राहीलेली रक्कम रुपये 38,500/- घेवून नोंदणी व इन्शुरन्स करुन दिले नाही हे अर्जदार तसेच अन्य दोन साक्षिदार विपीन बोटकावार व उमाकांत मलोडे यांच्या साक्षीतून सिध्द झाले आहे. अर्जदाराकडून ट्रॉलीच्या किंमती पोटी रुपये 1,00,000/- घेतल्यानंतर त्यास कराराप्रमाणे ट्रॉली दुरुस्त करुन परत न करणे ही गैरअर्जदाराची कृती सेवेतील न्युनता व अनुचित व्यापार पध्दतीची द्योतक आहे.
23. गैरअर्जदारास जर ट्रॅक्टरच्या किंमती पैकी अर्जदाराकडून कांही रक्कम घेणे असेल तर त्यासाठी तो स्वतंञ कारवाई करु शकतो. परंतु सदर घेणे रकमेसाठी अर्जदाराची दुरुस्तीस नेलेली ट्रॉली अडवून ठेवण्याचा त्यास कायदेशीर अधिकार नाही. म्हणून मुद्दा क्र.2 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
24. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून ट्रॉलीच्या किंमतीपोटी रुपये 1,00,000/- घेतले असून उर्वरीत रुपये 38,500/- घेवून ट्रॉलीची आर.टी.ओ. कडे नोंदणी व विमा करुन द्यावयाचा होता परंतु गैरअर्जदाराने दुरुस्तीसाठी नेलेली ट्रॉली अर्जदारास परत केली नाही. म्हणून अर्जदाराकडून ट्रॉलीच्या किंमतीपोटी घेतलेली रक्कम रुपये 1,00,000/- दि.22.5.2012 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह परत करावी असा आदेश देणे इष्ट होईल. तसेच, सदर प्रकरणी अर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबाबत रुपये 5,000/- आणि सदर तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- मंजूर करणे न्यायोचित होईल म्हणून मुद्दा क्र.3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविला आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे अंशतः मंजूर.
(1) गैरअर्जदाराने अर्जदाराकडून घेतलेली ट्रॉलीची रक्कम रुपये 1,00,000/- दि.22.5.2012 पासून रक्कम अर्जदाराचे हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह परत करावी.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या मानसिक ञासाबाबत नुकसान भरपाई रुपये 5,000/- आणि या तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- अर्जदारास द्यावा.
(3) आदेशाची पुर्तता आदेशाचे तारखेपासून 1 महिन्याचे आंत करावी.
(4) सदर आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पाठवावी.
गडचिरोली.
दिनांक :- 3/10/2013