जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/117 प्रकरण दाखल तारीख - 15/05/2009 प्रकरण निकाल तारीख – 11/08/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य भिमराव पि.बळीराम आबादार, वय वर्षे 35, व्यवसाय शेती, अर्जदार. रा. सावरगांव ता.अर्धापुर जि.नांदेड. विरुध्द. 1. अर्या हायब्रीड सीडस, तापडीया टेर्रेस दुसरा मजला, गैरअर्जदार. अदालत रोड, औरंगाबाद. 2. मे.मुक्कावर कृषी सेवा केंद्र. नवामोंढा, नांदेड. 3. किशन विश्वनाथ आबादार, वय वर्षे 40, वर्ष धंदा रा.सावरगांव ता.अर्धापुर जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.शेख इकबाल अहमद. गैरअर्जदार क्र 1 व 2 तर्फे - अड.रमेश व्ही.पाटील. गैरअर्जदार क्र. 3 तर्फे - स्वतः निकालपञ (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, गैरअर्जदार क्र. 3 यांनी गैरअर्जदार क्र. 1 ने उत्पदित केलेली सोयाबीन बीयाणे गैरअर्जदार क्र.2 कडुन पावती क्र.150 दि.03/06/2008 प्रमाणे विकत घेऊन त्या पैकी एक पीशवी बियाणे किंमत रु.900/- सदरील शेतात पेरणी करण्यासाठी अर्जदारास दिले. गैरअर्जदार क्र. 3 कडुन सदरील बियाणे अर्जदार हे प्रेमापोटी व गैरअर्जदार क्र. 2 च्या सल्ल्याप्रमाणे विकत घेतले होते. अर्जदाराने सदरील बियाणेची पेरणी त्यांच्या शेतात पुर्व मशागती व आवश्यक त्या काळजी आणि गैरअर्जदारक क्र. 3 ची परवानगी व समंती नंतर दि.15/06/2008 रोजी एक एकर क्षेत्रात केली. पिकाची चांगली वाढ झाली, फुले लागली शेंगा पण लागले परंतु त्या शेंगामध्ये दाणे भरले नाही आणि लागलेले शेंगा वाळु लागले. गैरअर्जदार क्र.3 चे शेतात सुध्दा तेच घडले गावाच्या शीवारात अन्य दुस-या कंपनीचे पेरलेले सोयाबीनेचे बियाणे चांगले दाने भरलेले शेंगा लागल्या होत्या. यासंबंधी कृषी अधिकारी यांना वरील वस्तुस्थिती कळविल्यानंतर त्यांनी अर्जदाराचे शेताची दि.19/09/2008 रोजी पाहणी केली, त्यांचे अहवालाप्रमाणे अर्या बियाणे सदोष आहेत मात्र दुस-या कंपनीचे बियाणांची वाढ व उत्पादन चांगली आहे. याप्रमाणे सदोष बियाणेची विक्री करुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे व सेवेत त्रुटी केली आहे. गैरअर्जदार क्र. 2 च्या आश्वासनाप्रमाणे व इगल कंपनीचे बियाणे पेरणारे शेतक-याने उत्पादन घेतल्या प्रमाणे 10 क्विंटल उत्पादन अपेक्षीत होते. इतकेच उत्पन्न प्रती एकर गेले वर्षी अर्जदारास झाले होते. परंतु सदरील सदोष बियाणेची पेरणी केल्यामुळे अर्जदारास काहीच उत्पन्न मिळाले नाही. म्हणुन त्या वेळचे प्रचलीत भाव रु.2,000/- प्रती क्विंटल लक्षात घेता अर्जदाराचे रु.20,000/- चे नुकसान झाले आहे व त्यासाठी गैरअर्जदार क्र. 1 व 2 जबाबदार आहेत. गैरअर्जदार यांनी सदोष बियाणे विक्री करुन सेवेत कमतरता केल्यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई म्हणुन रु.20,000/- आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व अर्जाचा खर्च म्हणुन रु.2,000/- गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडुन मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस देण्यात आली त्यांनी हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदया अंतर्गत मोडत नसल्यामुळे या मंचा समोर चालु शकत नाही. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे ग्राहक नाही म्हणुन तक्ररअर्ज फेटाळण्यात यावी. अर्जदार यांना गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडुन गैरअर्जदार क्र. 1 चे उत्पादीत बियाणे घेण्याचा कसलाही अधिकार पोहचत नाही कारण गैरअर्जदार क्र. 2 यांनी कायदेशिररित्या वितरक व विक्रेता नेमलेले आहेत. गैरअर्जदार क्र. 3 हा गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा कायदेशिर वितरक किंवा विक्रेता नाही. कृषी अधिकारी यांनी तसेच अर्जदार यांनी सोयाबीनचे पिक उभे असे पर्यंत तसेच, पिकाच्या कालावधीमध्ये कधीही गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना जायमोक्यावर पिकाची पाहणी करण्या करीता बोलावले नाही. दि.19/09/2008 रोजी केलेली पिकाची पाहणी व अहवाल हा गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे पाठमागे तसेच गैरअर्जदार क्र. 3 व कृषी अधिकारी यांनी संगनमत करुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे विरुध्द खोटा पाहणी अहवाल तयार केलेला आहेत त्यामुळे अर्जदाराचा अर्ज फेटाळण्यात यावा. गैरअर्जदार यांनी कधीही सदोष बियाणे पुरवलेले नाही.महारष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे समीती गठीत करण्यात आले आहे. सदरील समीतीमध्ये कृषी विकास अधिकारी (जि.प) अध्यक्ष, तालुका कृषी अधिकारी, सदस्य, महाबीज यांचे प्रतिनीधी, सदस्य, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, सदस्य, कृषी विद्यापीठाचे प्रतिनीधी, जिल्हा परीषद सदस्य, कृषी विकास अधिकारी जि.प. यांचे कार्यालय मोहीम अधिकारी सदर चौकशी समीती या संदर्भात नमुद केल्याप्रमाणे आपले कामकाज करेल. सदरील स्थळ पाहणी अहवाल वरील समीती समोर केलेले नसल्यामुळे सदरील अहवाल हा बेकायदेशिर आहे. अर्जदार यांनी पिकाची मशागत कशा पध्दतीने केली त्यास सिंचनाचा वापर कशा पध्दतीने केला, केंव्हा, केंव्हा केला, रासायनीक खते व किटकनाशक औषधी कुठल्या कंपनीचे दिले, किती दिले, केंव्हा दिले व ते कोठुन घेतले या बाबत चौकशी अहवालमध्ये कुठेही उल्लेख नाही, या बाबत अर्जदाराने कोणतेही पुरावे दाखल केलेले नाही. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदार यांना कोणतेही सदोष बियाणे पुरविले नाही आणि कोणत्याही प्रकारची सेवेत कमतरता केलेली नाही. म्हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज रु.10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांना नोटीस पाठविण्यात आली. त्यांनी नोटीस तामील होऊन मंचात आपले म्हणणे दाखल न केल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरणांत नो से आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यत आले. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र याचा विचार होता, खालील प्रमाणे मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 अर्जदार हे सदरच्या न्यायमंचात त्यांनी स्वतःच्या शेतात पेरलेल्या सोयाबिनच्या बियाणा बाबत तक्रार घेऊन आलेले आहेत. अर्जदार यांचे अर्जातील कथनानुसार गैरअर्जदार क्र. 3 यांनी गैरअर्जदार क्र. 1 ने उत्पादीत केलेले सोयाबिन बियाणे गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडुन पावती क्र. 150 दि.03/06/2008 रोजी विकत घेऊन त्यापैकी एक पीशवी रु.900/- ही सदरील शेतात पेरणी करण्यासाठी अर्जदारास प्रेमा पोटी मोफत दिली, असे नमुद केले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी सदरचे बियाणे गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडुन घेऊन सदर बियाणाची पेरणी केलेचे त्यांचे अर्जामध्ये नमुद केले आहे. अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचे ग्राहक असल्याबाबत अगर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडुन बियाणे खरेदी केले बाबतची पावती, गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडुन अर्जदार यांनी बियाणे घेतले बाबत गैरअर्जदार क्र. 3 यांचे शपथपत्र अगर तसा कोणताही पूरावा या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन सोयाबीनचे (आर्या 33) या प्रकारचे बियाणे घेवुन पेरले होते, याबाबतचा कोणताही पुरावा अर्जदार यांनी या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी बियाणांची रिकामी पीशवी या मंचामध्ये या अर्जाचे कामी दाखल केले नाही. सदर बियाणाचे पीशवीवर लॉट नंबर दिनांक बियाणे प्रकार इत्यादी गोष्टी नमुद असतात. पण तसा कोणताही पुरावा अर्जदार यांनी गैरअर्जदार याचे ग्राहक असले बाबतचा या अर्जाचे कामी या मंचामध्ये दाखल केलेला नाही. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र व त्यांनी दाखल केलेले कागदपत्र याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचे ग्राहक नाहीत, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे, शपथपत्र व त्यांचे तर्फे वकीलांनी केलेला युक्तीवाद याचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळण्यात येतो. 2. तक्रारीचा खर्च संबंधीतांनी आपापला सोसावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघूलेखक. |