तक्रार अर्ज क्र. 60/2013
तक्रार दाखल तारीख- 30/04/2013
तक्रार निकाल तारीख-30/12/2016
निकालाचा कालावधी- 3 वर्षे 9 महिने
श्री.श्रीपाद महादेव खळदकर
रा. ‘आनंदी’ बंगला, 8 क्रांती सोसायटी,
शाहुपुरी, सातारा. ......तक्रारदार
विरुध्द
1. अरविंद अनंत पावसकर
रा.सोमदत्त अपार्टमेंट, बी बिल्डिंग,
सि.स.नं.321/1, मंगळवार पेठ,
कोल्हटकर आळी, सातारा
2. सौ. वर्षा अरविंद पावसकर,
3. श्री. विपुल अरविंद पावसकर,
4. श्री. विशाल अरविंद पावसकर,
जाबदार क्र. 1 ते 4 रा.सोमदत्त अपार्टमेंट,
बी बिल्डिंग, सि.स.नं.321/1, मंगळवार पेठ,
कोल्हटकर आळी, सातारा
5. मे. निर्मल बिल्डर्स प्राप्रायटरी फर्म तर्फे
श्री. विजय दत्तात्रय फडणिस,
रा. 1731/38, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर, ता.जि.कोल्हापूर .....जाबदार
तक्रारदारतर्फे – अँड. मिलींद ओक
जाबदार क्र. 1 स्वतः
जाबदार क्र. 2 ते 4 एकतर्फा
जाबदार क्र. 5 तर्फे- अँड.सुधाकर देशमुख
न्यायनिर्णय
(सदरचा न्यायनिर्णय मा. श्रीकांत कुंभार, सदस्य यांनी पारीत केला.)
प्रस्तुत तक्रारदार यांनी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे मंचात दाखल केलेली आहे.
तक्रारदाराचे तक्रारीचा थोडक्यात गोषवारा खालीलप्रमाणे-
प्रस्तुत तक्रारदार हे शाहुपूरी, सातारा ता.जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. यातील जाबदार क्र. 1 ते 4 हे पावसकर कुटूंबीय असून जाबदार क्र. 2,3,4 ही जाबदार क्र. 1 यांची अनुक्रमे पत्नी व मुले आहेत. यातील जाबदार क्र. 5 हे व्यवसायाने बिल्डर असून सातारा व कोल्हापूर येथील जागा विकसीत करण्यासाठी घेऊन त्यावर गृहप्रकल्प उभा करुन त्यातील सदनिका गरजूंना विकणे व त्यासंबंधी विक्रीपश्चात सर्व सेवा देणे अशा प्रकारचा जाबदार क्र. 5 यांचा व्यवसाय आहे. यातील सातारा ता.जि.सातारा नगरपरषिद हद्दीतील मंगळवार पेठ, कोल्हटकर आळीतील सि.स.नं. 321 क्षेत्र 776 चौ.मिटर व सि.स.नं. 321/1 क्षेत्र 1420 चौ.मिटर असे एकूण क्षेत्र 810.2 चौ. मिटर क्षेत्र सि.स.नं.321 ला नोंद असून त्यामधील बांधीव पत्र्याची दुमजली इमारत व खुली जागा यातील जाबदार क्र.1 ते 4 यांचे मालकीची होती व यामध्ये नमूद दुमजली पत्र्याचे इमारतीमध्ये प्रस्तुत तक्रारदार हे त्यांचे कुटूंबियांसह मासिक भाडेकरु हक्काने रहात होते. तक्रारदार याच्या ताब्यात जुन्या इमारतीमधील तळमजल्यावरील एकंदरीत तीन जुन्या खोल्या ब-याच वर्षांपासून भाडेकरु हक्काने ताब्यात होत्या. यातील जाबदार क्र. 1 यांनी जाबदार क्र. 5 यांचे माध्यमातून विषयांकित मिळकत विकसीत करण्याचे ठरविले व त्यास अनुसरुन दि.16/5/1989 रोजी उभयतांमध्ये रजिस्टर विकसन करारनामा जाबदार क्र. 1 व 5 यांचेमध्ये झाला. त्याचप्रमाणे जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र. 5 यांना वटमुखत्यार म्हणून त्यांची नेमणूक करुन कायमस्वरुपी वटमुखत्यारपत्र जाबदार क्र.5 यांचे लाभात करुन दिले. तक्रारदार श्री.खळदकर हे या विषयांकित जागेवरील सुरक्षीत भाडेकरु असलेने व मिळकतीमधील इमल्यातील तीन खोल्या त्यांचे ताब्यात असलेने, यातील जाबदार क्र. 5 यास जुनी इमारत पाडून त्याठिकाणी नवीन निवासी बहुमजली इमारत (अपार्टमेंट) बांधणे त्यास अशक्य होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार व त्यांचे कुटूंबीय यांचेकडून जागा खाली करुन घेवून मगच त्यावर इमारत उभी करता येथील हे जाणून या जाबदार क्र. 5 यांनी प्रस्तुत तक्रारदार व यातील जाबदार क्र. 1 ते 4 यांच्याशी चर्चा करुन दि.23/10/1997 रोजी यातील तक्रारदार व जाबदार क्र. 1 व 5 यांचेमध्ये त्रिपक्षीय करार झाला. त्या करारानुसार तक्रारदार यांचेकडे भाडेकरु हक्काने वर्षानुवर्षे ताब्यात असलेली जागा खाली/मोकळी करुन जाबदार क्र. 5 यांचे ताब्यात द्यावयाची व त्यानंतर त्याठिकाणी जाबदार क्र. 5 यांनी तक्रारदारांचे “सोमदत्त अपार्टमेंट” ‘अ’ व ‘ब’ इमारत पैकी ‘अ’ इमारतीमधील तळमजल्यावरील एकंदरीत तीन खोल्या असलेली निवासी सदनिका एकूण किंमत रक्कम रु.1,70,000/- (रुपये एक लाख सत्तर हजार मात्र) द्यावयाचे असे ठरले. यातील जाबदार क्र. 1 व 5 व प्रस्तुत तक्रारदार यांचेमध्ये त्रिपक्षीय करारनामेस अनुसरुन यातील तक्रारदार यांनी दि.1/11/1997 रोजी जुन्या इमारतीमधील भाडेकरु हक्क सोडून सदर खोल्यांचा कब्जा जाबदार क्र. 1 यांचे लाभात दिला व त्यांनी तो जाबदार क्र. 5 यांना दिला त्यानंतर दि.8/5/1998 रोजी यातील जाबदार क्र. 1 व 5 यांनी प्रस्तुत तक्रारदार यांना मे.दु.निबंधक सातारा यांचेकडे नोंदणीकृत करारनामा (साठेखत) करुन दिले. त्या करारनामे नोंदणीवेळी प्रस्तुत तक्रारदार यांनी या जाबदार यांना रक्कम रु. 60,000/- (रुपये साठ हजार मात्र) विषयांकित सदनिकेच्या देय रकमेपोटी अॅडव्हान्स अदा केले होते. या करारनामेतील अटी व शर्तीनुसार यातील जाबदार क्र. 5 यांनी ‘सोमदत्त अपार्टमेंट’ मधील बिल्डिंग ‘अ’ मधील तळमजल्यावरील 47.39 चौ.मिटरची क्षेत्राची सदनिका सर्व मिळून एकूण किंमत रक्कम रु.1,70,000/- देणेचे मान्य केले व ती सदनिका करार नोंदणी तारखेपासून दोन वर्षात उपलब्ध करुन ताबा देणेचे मान्य केले. त्याप्रमाणे साधारणतः दि.8/5/2000 अखेर हा सदनिकेचा कब्जा प्रस्तुत तक्रारदार यांना मिळणे आवश्यक होते. तथापी या वर्षातच काय दि.8/5/1998 ते दि.10/10/2003 व तेथून पुढे सन 2010 पर्यंत या जाबदार क्र.5 यांनी ‘सोमदत्त अपार्टमेंट’ मधील ‘अ’ इमारतीचे कामच चालू केलेले नव्हते. दि.10/10/2003 रोजीसुध्दा या जाबदार क्र. 5 यांनी ‘अ’ इमारतीचे बांधकाम चालू केले नव्हते व तरीसुध्दा. दि.14/2/2004 रोजी खोटया मजकुराचे स्मरणपत्र जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदार यांना पाठवून दोन नंबरचे हप्त्यांची रक्कम रु.4,000/- व रक्कम रु.25,000/- ची मागणी 2003 व 2004 साली केली होती. परंतु या मागणीसाठी विषयांकित जमिनीवर या जाबदार यांनी ‘ब’ इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. परंतु ‘अ’ इमारतीचे बांधकाम केलेलेच नव्हते. त्या इमारतीचे कामच सुरु नसलेने करारात ठरलेल्या पायरीप्रमाणे या तक्रारदाराने जाबदार क्र. 5 यांना पैसे देण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. त्यामुळे जाबदार क्र.5 यांनीच या तक्रारदार यांचेशी केले कराराचा उघडपणे भंग केला. वास्तविक दि.8/5/1998 पासून दोन वर्षात म्हणजे दि.8/5/2000 पर्यंत विषयांकित सदनिकेचा कब्जा तक्रारदाराला न दिलेस प्रतिमहा रक्कम रु.1,000/- प्रमाणे घरभाडे रक्कम तक्रारदार यास देणेचे जाबदार क्र. 5 यांनी कबूल केले असून त्यामध्ये या तक्रारदार यांना रक्कम रु.41,000/- जाबदारांकडून येणे बाकी आहे. त्यावेळी सध्या “जाबदार क्र. 5 अडचणीत आहे त्यामुळे रक्कम देता येत नाही. नंतर पाहता येतील” अशी अडचण या जाबदार क्र.5 यांनी सांगितली होती व आर्थिक अडचणीमुळेच जाबदार क्र. 5 यांनी ‘अ’ इमारतीचे काम चालू केलेले नव्हते. तरीसुध्दा जाबदार क्र. 5 यानी या तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.10,000/- उसनवार घेतले होते. प्रतिमहा प्रमाणे होणारी एकूण देय रक्कम रु.41,000/- व या तक्रारदार यांचेकडून उसने घेतलेले रक्कम रु.10,000/- असे एकूण रक्कम रु.51,000/- यातील जाबदार क्र. 5 यांनी देय हप्त्यापोटी जमा करुन घेतली होती. त्यानंतर दि.9/6/2010 पर्यंत या जाबदार क्र. 5 यानी ‘सोमदत्त अपार्टमेंट’ ‘अ’ इमारतीचे कोणतेही बांधकाम सुरु केलेले नव्हते. त्यानंतर यातील जाबदार क्र. 5 यांनी दि.9/6/2010 रोजी पुन्हा ‘सोमदत्त अपार्टमेंट’ मधील ‘अ’ इमारतीचा सुधारित इमारत आराखडा सातारा नगरपालीकेकडून मंजूर करुन घेतला व त्यास महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अँक्टच्या तरतूदीनुसार दि.31/05/2012 रोजी नोंदणीकृत घोषणापत्र दिले. प्रस्तुत तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान झालेल्या नोंदणीकृत करारनामा (साठेखत) नुसार दोन वर्षात जाबदार यांनी या तक्रारदाराला यांना देवू केले निवासी सदनिकेचा ताबा दिला नसलेने दि.9/7/2000 नंतर 2013 पर्यंत व त्यानंतर आजअखेर घरभाडे रक्कम जाबदार क्र. 5 हे माने यांचे देणे लागतात. सन 2010 साली जाबदार क्र. 5 यांनी प्रत्यक्ष ‘अ’ इमारतीचे बांधकाम सुरु केलेवर “आमचेकडून राहीलेली रक्कम घ्या व सदनिकेचा ताबा द्यावा अशी या तक्रारदाराने मागणी केली असता ” सध्या इमारतीचे बांधकाम चालू केले आहे. वास्तविक तीच तुम्हाला कराराने पैसे देणे आहे त्यामुळे तुम्ही रक्कम देवू नका, इमारत पूर्ततेनंतर तुम्हास कराराप्रमाणे नमूद सदनिकेचा ताबा तुम्हास देतो व नंतर हिशोब पाहू असे जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदार यांना सांगितले होत. यातील जाबदार क्र. 5 यांनी ‘सोमदत्त अपार्टमेंट’ ‘अ’ इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला दि.15/10/2011 रोजी घेतला होता. त्यावेळी सदनिकेच्या ताब्याबाबत या तक्रारदार यांनी जाबदार क्र.5 कडे चौकशी केली असता “पूर्णत्वाचा दाखला जरी घेतला असला तरी अजून किरकोळ बांधकाम बाकी आहे. किरकोळ सोयी करणेच्या आहेत. तेवढे झाल्यावर ताबा देतो” असे सांगितले त्यामुळे या तक्रारदार यांनी जाबदार क्र. 5 यांना दि.23/3/2013 रोजी सदनिकेच्या देय रकमेचा हिशेाब करुन सदनिकेचा ताबा देण्यास सांगितले असता या जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदार यांनी “ तक्रारदारांनी रक्कम रु.10,00,000/- (रुपये दहा लाख मात्र) दिले तर त्यांना विषयांकित सदनिकेचा ताबा देवू अन्यथा तुम्हाला सदनिका मिळणार नाही व त्या सदनिकेची विक्री दुस-यास करेन असे सांगितले”. त्यामुळे यातील तक्रारदार यांना जाबदार क्र. 5 यांचे उत्तर ऐकूण धक्का बसला त्यांची जाबदार क्र. 5 यांनी केलेली फसवणूक केलेला करारभंग लक्षात घेवून यातील कै.किसन माने यांना तिव्र धक्का बसला व विषयांकित घरकुलाबाबत झालेला अपेक्षाभंग, जाबदारांकडून झालेली फसवणूक तक्रारदार यांना सहन झाली नाही. व त्यांनी यातील जाबदार क्र. 5 विरुध्द मे. मंचात तक्रार दाखल करुन यातील जाबदारांकडून सोमदत्त अपार्टमेंट पैकी इमारत ‘अ’ मधील तळमजल्यावरील सर्व सोयीसुविधांसह तळमजल्यावरील निवासी सदनिका क्षेत्र 47.39 चौ.मि. ची सदनिका द्यावी व त्याचा कब्जा व खुषखरेदीपत्र या तक्रारदारांना जाबदार क्र. 5 यांनी करुन द्यावे व करारनामेप्रमाणे देय असलेली रक्कम रु.1,55,000/- व तक्रार दाखल तारखेपासून प्रत्यक्ष सदनिकेचा ताबा देईपर्यंत प्रतिमहा घरभाडे रक्कम रु.1000/-अशी होणारी संपूर्ण रक्कम या तक्रारदार यांना द्यावेत, व विषयांकित सदनिका इतर कोणास हस्तांतर करु नये असी जाबदार क्र.5 यांना ताकीद द्यावी तक्रारदार यांना झालेल्या मानसिक,शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- अर्ज खर्चापोटी रु.25,000/- जाबदारांकडून मिळावेत अशी विनंती या मंचास तक्रारदारांनी केली आहे.
3. प्रस्तुत तक्रारदारानी त्यांची तक्रार नि. 1 कडे त्याचे पृष्ठयर्थ नि.2 कडे तक्रारदाराचे शपथपत्र, नि.4 कडे तक्रारदार तर्फे विधिज्ञ अँड. मिलींद ओक यांचे वकिलपत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे तक्रारदारांचे वडील व जाबदार यांच्यात झालेला दि.23/10/97 चा त्रिपक्षीय करारनामा मुळ, नि.5/2 कडे तक्रारदार यांनी दिलेली दि.1/11/97 ची ताबा पावती, नि.5/3 कडे तक्रारदार यांना जाबदार क्र.5 यांनी करुन दिलेले फ्लॅटचे दि.8/5/98 चे रजिस्टर साठेखत, नि.5/4 कडे तक्रारदारांनी जाबदारांना दिलेल्या रोख रकमेची दि.30/4/98 ची रोखीची पावती, नि.5/5 कडे दि.11/10/2003 व 14/2/2004 कडील जाबदार क्र. 5 यांनी तक्रारदारांना दिलेले पैसे देणेबाबतची स्मरणपत्रे, नि.5/6 कडे तक्रारदार यांनी जाबदार क्र. 5 यांना दिलेले पत्र, , नि.5/7 कडे तक्रारदार यांनी जाबदार क्र. 5 यांना पाठछवलेले पत्र, नि.5/8 कडे या तक्रारदाराने यातील जाबदार क्र.5 यांना पाठविलेले दि.25/8/1998 चे पत्र, नि.5/9 कडे जाबदार क्र. 5 यांनी तक्रारदार यांना दिलेली नोटीस व नि.5/10 कडे जाबदार क्र. 5 यांनी पाठविलेल्या नोटीसीचा लखोटा, नि.5/11 कडे ‘सोमदत्त अपार्टमेंट यांचा माहितीपत्रक, नि.5/12 कडे तक्रारदार यांना माहिती अधिकारखाली मिळालेली कागदपत्रे, नि. 7 कडे तुर्तातूर्त मनाई अर्ज व त्यापृष्ठयर्थ नि.8 कडे अॅफीडेव्हीट, नि. 13 कडे जाबदार क्र 5 तर्फे सदर तक्रार चालवण्यास अधिकारक्षेत्र या मंचास नसल्याबाबत प्राथमिक मुद्दा काढणेसाठीचा अर्जावर तक्रारदाराचे म्हणणे, नि. 16 व 17 कडे पुराव्याचे शपथपत्रे, नि.27 कडे लेखी युक्तीवाद इत्यादी कागदपत्रे या तक्रारदारांनी प्रकरणी दाखल केली आहेत.
4. यातील जाबदारांना प्रस्तुत प्रकरणाच्या नोटीसा रजिस्टर पोष्टाने मंचामार्फत पाठविण्यात आल्या. सदर नोटीस जाबदारांना मिळाल्या. त्याप्रमाणे यातील नि.8 कडे जाबदार क्र. 1 यांनी कैफियत/म्हणणे दाखल केले. जाबदार क्र. 2 ते 5 यांना नोटीस मिळाल्यानंतर हजर होवूनही त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले नसलेने त्यांचेविरुध्द नि. 1 वर “म्हणणे नाही” असे आदेश दि. 3/11/2014 रोजी पारीत करणेत आले आहेत. त्यानंतर दि.2/12/13 रोजी यातील जाबदार क्र. 5 तर्फे त्याचे विधिज्ञ अँड.सुधाकर देशमुख हे नि.10 कडे वकीलपत्र दाखल करुन प्रकरणी हजर झाले व नि.12 कडे या मे. कोर्टाला सदर तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र नसल्याबाबत प्राथमिक मुद्दा काढणेसाठीचा अर्ज व नि.19 कडे मुळ तक्रार व तुर्तातूर्त मनाई अर्जावर कैफीयत/म्हणणे दाखल केले परंतु मंचाने या जाबदार क्र. 5 विरुध्द “No-Say” आदेश पारीत झालेने तो दाखल करुन घेता येणार नाही असा आदेश करुन दप्तरी फाईल केला. नि. 25 सोबत मा राज्य आयोग मुंबई यांचेकडील रिव्हीजनमधील आदेशाची प्रत, नि.27 कडे पुराव्याचे अँफीडेव्हीट व कागदपत्रे व नि.28 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला. नि.29 कडे इंग्रजी भाषेत लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे या जाबदार क्र. 5 यांनी प्रकरणी दाखल केली आहेत.
तक्रारदाराचे अर्जास जाबदार क्र. 5 यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये खालीलप्रमाणे आक्षेप घेतलेले आहेत. -
प्रस्तुत जाबदारांचे कथनानुसार तक्रारदारांच्या तक्रारीतील संपूर्ण कथने, मागण्या मान्य व कबूल नाहीत. या तक्रारदार यांस अर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नव्हते व नाही त्यामुळे सदरची तक्रार निर्गत करण्याचे अधिकार या कोर्टास नाही. प्रस्तुत तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते आहे हे तक्रारदाराने शाबीत केलेले नाही, मुळ करार व त्यामधील पक्षकार व प्रस्तुत तक्रारीमधील पक्षकार हे वेगवेगळे आहेत. तक्रारदारांचा अर्ज मुदतीत नाही, नुसत्या शपथपत्रांवर विसंबून समरी पॉवरमध्ये वरील बाबी निकालात काढता येणार नाहीत त्यास दिवाणी न्यायालयाचे अधिकारक्षेत्र आहे. यातील मयत किसनराव माने यांना 10/2003 पर्यंत सदनिकेचा कब्जा देणेचा होता. यावरुन उभयपक्षकारांमध्ये कोणताही करार झालेला नाही. उभयतांमधील तथाकथीत करार यास अधिन राहून पाहू गेलेस पाहिल्यास वादास कारण तीन वर्षात म्हणजे 2005 सालापर्यंत घडलेले नव्हते व नाही. सन 2005 सालापर्यंत मध्ये मयत किसनराव माने यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करणे आवश्यक होते परंतु ती त्यांनी दाखल केलेली नाही. ती 2013 मध्ये दाखल केली आहे त्यामुळे ती मुदतीत नाही. यातील जाबदार क्र. 1 व जाबदार क्र. 5 यांचेमध्ये रे.क.नु. 329/12 हा सातारा सिव्हील कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्याचाही बाधा या तक्रारीस येतो. सन 2003 सालापर्यंत तक्रारदारांनी विषयांकित सदनिकेचा ताबा मिळावा अशी मागणी या जाबदार क्र. 5 कडे कधीही केलेली नव्हती. त्यामुळे प्रस्तुत तक्रार ही या ग्राहक संरक्षण कायद्याच्या मुदतीच्या तरतुदीच्या बाहेर जाऊन दाखल केली असल्याने ती या जाबदारांना मान्य नाही. तक्रारदार यांनी या जाबदारांना विषयांकित सदनिकेपोटी कोणतेही पैसे दिलेले नाहीत. प्रस्तुत तक्रारदार व या जाबदार यांचेमध्ये कोणताही करारच नसल्याने सुविधांसह अपार्टमेंट देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. वरील सर्व कारणांसाठी तक्रारदारांचा अर्ज त्वरीत फेटाळण्यात यावा असे आक्षेप या तक्रारदारांनी प्रकरणी नोंदवलेले आहेत.
5. यातील तक्रारदाराची तक्रार त्याचा आशय व यातील जाबदार क्र. 1 व 5 यांनी दाखल केलेले म्हणणे/कैफियत व त्यातील मतितार्थ लक्षात घेता प्रस्तुत प्रकरण न्यायनिर्गत करणेसाठी खालील मुद्दयांचा विचार करण्यात आला.
अ.नं. मुद्दे निष्कर्ष
1. प्रस्तुत तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. यातील जाबदार क्र. 5 यांनी त्यांचे व्यवसायात अनुचित
व्यापारी प्रथेचा अवलंब करुन या तक्रारदारांना त्यांच्या
कराराप्रमाणे देय असलेली सदनिका करार मुदतीत न देवून
या जाबदारांनी या तक्रारदारांना सदेाष सेवा दिली आहे काय? होय.
3. प्रस्तुत तक्रार या मंचाचे न्यायक्षेत्रात चालणेस पात्र आहे काय? होय.
4. तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय? होय.
5. अंतिम निर्णय तक्रार अंशतः मंजूर
6. कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 ते 6
मुद्दा क्र. 1
6(1) प्रस्तुत कामातील तक्रारदार हे पूर्वी सातारा शहर नगरपरिषद हद्दीतील मंगळवार पेठ येथील कोल्हटकर आळीतील सि.स.नं.321 क्षेत्र 796 चौ.मि. व सि.स.नं.321/1 क्षेत्र 14.2 चौ.मिटर असे एकूण 810.02 चौ. या मिळकतीमध्ये यातील जाबदार क्र. 1 ते 4 यांचे मालकीचे हक्काचे असलेल्या दुमजली घरामध्ये तळमजल्यावर भाडेकरु म्हणून रहात होते. या तक्रारदार यांच्या ताब्यात तीन खोल्या भाडयाने होत्या. प्रस्तुत तक्रारदार हे यातील जाबदार क्र 1 यांचे वर्षानुवर्षाचे भाडेकरु होते व त्यायोगे विषयांकित इमारतीमध्ये प्रस्तुत तक्रारदार भाडेकरु म्हणून वास्तव्यास होते. यातील जाबदार क्र. 1 यांनी विषयांकित मिळकती स्वतः पूर्वी खरेदी केलेल्या होत्या. यातील जाबदार क्र. 5 हे व्यवसायाने बिल्डर असून ते “मे. निर्मल बिल्डर्स ” या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. यातील जाबदार क्र. 1 ते 4 यांनी त्यांची जागा विकसीत करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे वरील मिळकती यातील जाबदार क्र. 5 यांना विकसीत करण्यासाठी देण्याचे ठरले व त्याप्रमाणे जाबदार क्र.1 ते 4 व जाबदार क्र. 5 यांचेमध्ये रजिस्टर दस्त क्र.1929 ने दि.11/5/1989 रोजी विकसन करारनामा अस्तित्वात आला त्यास अनुसरुन विषयांकित मिळकतीवरील भाडेकरु यांना हटवून त्या बांधकामासाठी मोकळ्या करुन जाबदार क्र.1 यांनी जाबदार क्र.5 यांना देणेचे होते. तक्रारदार हे मुळ भाडेकरु असलेने त्यांना विषयांकित मिळकतीवर तयार होणा-या सदनिकांमध्ये सदनिका मिळणेचा हक्क व अधिकार होता तो हक्क व अधिकार जाबदार क्र. 1 व 5 यांनी मान्य करुन त्यांना योग्य किंमत ठरवून त्या ठरलेल्या किंमतीमध्येच सदनिका देण्याचे कबूल केले व त्याप्रमाणे यातील जाबदार क्र. 1 व जाबदार क्र. 5 व मयत किसनराव माने यांचेमध्ये त्रिपक्षीय नोटराईज्ड करारनामा दि.23/10/1997 रोजी झाला तो प्रकरणी नि. 5/1 कडे मूळ स्वरुपात दाखल आहे. त्याप्रमाणे पार्टी क्र. 2 यांनी विषयांकीत मिळकत विकसीत करुन त्यावर इमारती बांधून त्याची विक्री करण्याचे अधिकार पार्टी क्र.2 (जाबदार क्र.5) यांना असलेचे यातील जाबदार क्र.1 करारातील (पार्टी क्र.1) यांनी पार्टी क्र.2 यांना कुलमुखत्यार नेमून अधिकार दिलेचा करार दि.16/5/89 रोजी केलेचे मान्य केले असून यातील तक्रारदार पार्टी क्र.3 हे तयार होणा-या सदनिकामध्ये घरकुल घेण्यास तयार असून ते या मिळकतीमध्ये वर्षानुवर्षे भाडेकरु म्हणून रहात असलेने त्यांना तयार होणा-या “सोमदत्त अपार्टमेंट” इमारतीमध्ये सदनिका मिळणे हा त्याचा अग्रहक्क असून तो हक्क उभय जाबदारांनी मान्य करुन सोमद्त्त अपार्टमेंट अ (ए) बिल्डिंग या ओनरशिप बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर 550.00 चौ.फूट (चटई क्षेत्र) ची सदनिका देणेचे ठरले व त्यापोटी सदनिकेची पूर्णतः होणारी अंतिम किंमत म्हणून रक्कम रु.1,70,000/- (एक लाख सत्तर हजार मात्र) इतकी ठरली व या किंमतीमध्येच यातील जाबदार क्र. 5 यांनी प्रस्तुत तक्रारदार यांना विषयांकित सदनिका देण्याचे ठरले. या त्रिपक्षीय कराराला अनुसरुन यातील जाबदार क्र. 5 यांनी प्रकरणी नि. 5/3 कडे दाखल असलेले साठेखत आर्टीकल ऑफ अँग्रीमेंट दि.8/5/1998 रोजी मे. दुय्यम निबंधकसो, सातारा यांचे कार्यालयात रजिस्टर्ड दस्त क्र. 2929 दि. 27/4/1998 रोजी यातील जाबदार क्र. 5 यांनी यातील तक्रारदार यांना जाबदार क्र. 1 ते 4 या थर्ड पार्टी म्हणून उपस्थित असलेल्या जाबदारांच्या समोर रजिस्टर साठेखत करुन दिले. त्यामध्ये विषयांकित सदनिका ही अपार्टमेंट नं. 1 ए बिल्डिंग मध्ये तळमजल्यावरील सदनिका (बिल्डींग नं. ‘ए’ मधील) क्षेत्र 47.39 चौ. मि. याची सर्व मिळून किंमत रु.1,70,000/- कायम करण्यात आली. या व्यवहारापोटी या साठेखतावेळी सदनिकेच्या एकूण किंमतीपोटी रक्कम रु.60,000/- अॅडव्हान्स म्हणून जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदाराकडून यांचेकडून रोख स्विकारले. या रकमेची रोखीची पावती यातील जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदाराचे नावे 1 रुपयाचे पावती तिकीट लावून त्यावरती स्वतःची सही करुन जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदार यांना दिलेली आहे. सदरच्या प्रत प्रकरणी नि. 5/4 कडे दाखल आहे. या व्यवहारावरुन प्रस्तुत तक्रारदार व प्रस्तुत जाबदार क्र. 5 यांच्यामध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते असलेचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार हे जाबदार क्र.5 यांचे कायद्याने ग्राहक आहेत हे निर्विवादरित्या स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार हे या जाबदारांचे ग्राहक आहेत ही गेाष्ट या तक्रारदारांनी निर्विवादरित्या पुराव्याने शाबीत केली आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6(2) मुद्दा क्र. 2 -
प्रस्तुत तक्रारदाराची तक्रार व त्या अनुषंगाने या तक्रारदाराने प्रकरणी दाखल केलेली पुराव्याची कागदपत्रे पाहिली असता हे स्पष्ट होते कि, प्रस्तुत तक्रारदार हे यातील जाबदार क्र. 1 ते 4 यांच्या विषेशतः जाबदार क्र.1 यांच्या मालकीच्या सातारा शहर नगरपरिषद हद्दीतील मंगळवार पेठ, कोल्हटकर आळी येथील सि.स.नं. 321 क्षेत्र 796 चौ. मि. व सि.स.नं. 321/1 क्षेत्र 14.2 चौ. मि. असे एकूण क्षेत्र 10.02 चौ.मि. या क्षेत्रातील उभ्या असलेल्या जुन्या इमारतीमध्ये जुने भाडेकरु होते व वरील विषयांकित जागा यातील जाबदार क्र.1 यांनी यातील जाबदार क्र.5 यांना विकसीत करण्यासाठी दिली. त्याप्रमाणे वर नमूद मिळकतीवरती यातील जाबदार क्र. 5 यांनी “सोमदत्त अपार्टमेंट” या नावे बिल्डिंग क्र. ‘अ’ व क्र. ‘ब’ या नावे दोन अपार्टमेंटस बांधण्याचा निर्णय घेतला. तत्पुर्वी यातील तक्रारदार यांनी सर्व जाबदारांचे विनंतीवरुन प्रकरणी नि. 5/1 कडे तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्तऐवजाने काही अटी व शर्तीने या जाबदारांना भाडे तत्वावर ताब्यात असलेली जागा खाली करुन दिली त्याचा ताबा सोडला. या गोष्टी उभयपक्षकारांना मान्य व कबूल आहेत. प्रकरणी नि. 5/1 कडे दाखल असलेले ट्रायपार्टी अँग्रीमेंट अभ्यासले असता असे दिसते कि, सदर तृतीयपक्ष करार हा जाबदार क्र. 1, जाबदार क्र. 5 व प्रस्तुत तक्रारदार यांचेमध्ये दि.23/10/1997 रोजी झालेचे दिसते. त्यामधील प्रमुख अटी पाहील्या तर,-
1. पार्टी क्र.1,2 यांनी पार्टी क्र. 3 प्रस्तुत तक्रारदार यांना विषयांकीत मिळकतीवर सुधारीत मंजूर आराखडयातील ‘सोमदत्त अपार्टमेंट’ मधील ‘ए’ बिल्डिंग मधील तळ किंवा पहिल्या मजल्यावरील सदनिका अंदाजे 550 चौ.फू.क्षेत्राची व वरील वर्णनाची सदनिका एकूण सर्व मिळून किंमत रु.1,70,000/- (रुपये एक लाख सत्तर हजार मात्र) या किंमतीस देणेची आहे.
2. पार्टी क्र. 1 व 2 यांनी पार्टी क्र. 3 यांना आतापासून (म्हणजे ट्रायपार्टी करार दिनांकापासून) दोन वर्षांत (24 महिने) प्रत्यक्ष कब्जा देणे व बांधकाम वरील मुदतीत पूर्ण न झालेस पार्टी क्र.1,2 यांनी भाडयापोटी पार्टी क्र. 3 यांना दरमहा रक्कम रु.1,000/- प्रमाणे भाडयापोटी सदनिकेचा ताबा देईपर्यंतचे कालावधीचे भाडे देणेचे आहे.
3. पार्टी क्र.2 यांनी पार्टी क्र.3 यांना ओनरशिपने देणार असलेल्या सदनिकेचे स्वतंत्र रजि. अॅग्रीमेंट या कराराशिवाय करुन देणेचे आहे.
4. इमारतीचा सुधारीत नकाशा सातारा नगरपरिषदेकडून मंजूर करुन घेवून प्लॅन मंजूरीनंतर त्याची नक्कल पार्टी क्र. 3 यांना देवून कोणत्या व किती हप्त्यांमध्ये पैसे द्यावयाचे ते पार्टी क्र. 2 बरोबर करार करतेवेळी एकमेकांचे विचाराने ठरविण्यात येतील.
वरील प्रमुख अटी शर्तींना अधिन राहून यातील जाबदार क्र. 5 यांनी यातील तक्रारदार यांना दि.8/5/1998 रोजी रजि. दस्त क्र.1929 ने विषयांकित सदनिकेचे रजिस्टर करारपत्र करुन दिले ते प्रकरणी नि.5/3 कडे मुळ स्वरुपात दाखल आहे. त्याप्रमाणे यातील जाबदार क्र. 5 यांनी ‘सोमदत्त अपार्टमेंट’ क्र. 1 बिल्डींग ‘ए’ मधील तळमजल्यावरील 47.39 चौ. मि. क्षेत्राची सदनिका याची संपूर्ण अंतीम किंमत रक्कम रु.1,70,000/- असून तीच या विषयांकित सदनिकेची किंमत ठरली व त्यापोटी त्यापैकी रक्कम रु.60,000/- (रुपये साठ हजार मात्र) रोख जाबदार क्र. 5 यांना या तक्रारदार यांनी रजिस्टर साठेखतावेळी दिली. सदर विषयांकित सदनिकेचा ताबा यातील जाबदार क्र. 5 यांनी यातील तक्रारदार यांना 24 महिन्यात देणेचा होता. ऊर्वरीत पैसे देण्याच्या स्टेजीस त्यात नमूद करण्यात आलेल्या होत्या. या सर्व दोन्ही नि.5/1 व नि.5/3 चे करार व त्यातील वर नमूद तरतूदी पाहिल्या तर यातील जाबदार क्र. 5 ने त्यातील कोणत्याही बाबींची पूर्तता आजअखेर केलेली नाही उलट त्याचे उल्लंघन केले हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट दिसून येते. पहिल्या तृतीयपक्ष कराराने त्यातील तरतूदीप्रमाणे दि.27/10/1997 पासून दोन वर्षात म्हणजे दि.24/10/1999 अखेर विषयांकित सदनिकेचा ताबा तक्रारदारांना कायद्याने विषयांकित सदनिकेचा ताबा देणे आवश्यक असतानाही विषयांकित सदनिकेचा कब्जा प्रस्तुत तक्रारदार यांना या जाबदार क्र. 5 ने दिला नाही. त्या दरम्यानचे 2 वर्षात विषयांकित इमारत ‘अ’ ‘A’ चे बांधकाम प्रगती त्याबाबतचे तक्रारदाराने जाबदार क्र. 5 यांना द्यावयाचे पैसे याबाबत या जाबदार क्र.5 यांनी काहीही माहिती या तक्रारदार यांना दिलेली नव्हती व प्रस्तुत तक्रारदार यांनी या जाबदार क्र.5 यांना विषयांकित सदनिकेचे कब्जेबाबत वारंवार विचारले असता त्यांनी बांधकाम चालू आहे, लवकरच कब्जा देतो अशी उत्तरे देवून वेळ मारुन नेली. परंतु त्यांना नेमकी बांधकामाचे प्रगतीची वस्तुस्थिती सांगितली नाही. त्यानंतर नि.5/3 प्रमाणे रजि. साठेखत अँग्रीमेंट दि.8/5/1998 रोजी जाबदार क्र. 5 ने या तक्रारदार यांना करुन दिलेवर त्यामध्ये ठरलेप्रमाणे दोन वर्षात म्हणजे दि.9/5/2000 अखेर विषयांकित सदनिकेचा द्यावयाचा कब्जा वेळेत दिलेला नाही व आजअखेर तो दिलेला नाही. प्रस्तुत तक्रारदार यांनी वारंवार मागणी करुनही त्यांना तो दिला नाही. त्यामुळे या जाबदार क्र. 5 यांने त्यांचे व्यवसायात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन प्रथम ‘सोमदत्त अपार्टमेंट’ ‘बी’ बिल्डींग बांधून त्यातील सर्व घरकुलांची जाबदार क्र. 5 यांनी परस्पर विक्री केली. परंतु ज्या बिल्डींग क्र. अ (A) ही बिल्डिंग मात्र त्यांनी लवकर बांधली नाही. या तक्रारदारांनी बिल्डींग अ च्या बाबतीत वस्तुस्थिती जाणून घेणेसाठी माहितीचे अधिकाराखाली प्रकरणी दाखल असलेल्या नि. 5/9 प्रमाणे शासकीय माहिती अधिकारी सातारा नगरपरिषद सातारा यांचेकडून मागणी केली व संबंधीत अधिका-यांनी ते कागदपत्र या तक्रारदार यांना दिले. ते कागद प्रकरणी नि. 5/12 ते 5/17 कडे दाखल असून त्यातील नोंदीप्रमाणे बिल्डींग ‘अ’ (A) चे बांधकाम नि.5/12 प्रमाणे हे दि.7/9/2011 रोजी बांधून पूर्ण झाले व त्याचा पूर्णत्वाचा दाखला सातारा नगरपरिषद सातारा यांनी दि. 15/10/2011 रोजी यातील जाबदार क्र. 5 यांना दिला आहे. त्या दाखल्याच्या वरुन असे दिसते की, विषयांकित ‘अ’ बिल्डींगमधील बेसमेंट अधिक तळमजला अधिक स्टिल्ट अधिक दोन मजले रहिवास वापरासाठी दि.15/10/2011 पासून वापरण्यास परवानगी दिलेली आहे. असे असताना प्रस्तुत जाबदार क्र.5 यांचे कर्तव्य होते की, त्यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या ‘ए’ बिल्डींगचे बांधकाम केव्हा सुरु झाले ते तक्रारदारांना कळवून त्यांच्याकडून रजिस्टर कराराप्रमाणे पैशाची मागणी करणे योग्य होते. परंतु सन 9/6/2010 पासून ‘ए’ बिल्डींगचा सुधारीत परवाना घेतलेपासून 7/9/2011 पर्यंत या जाबदार क्र. 5 ने यातील तक्रारदारांना या बांधकामाची किंवा ‘ए’ बिल्डींग बांधून पूर्ण झाल्याची व त्याप्रमाणे पैसे भरणेची कोणतीही सूचना या तक्रारदारांना दिलेली नव्हती व नाही व या तक्रारदारांनी यातील जाबदार क्र.5 यांना दि.23/3/2013 रोजी निवासी सदनिकेचा कब्जा कधी देणार! असे विचारले असता जाबदार यांनी “ तुम्ही रक्कम रु. 10,00,000/- (रुपये दहा लाख मात्र) देत असाल तर तुम्हास निवासी सदनिकेचा कब्जा देवू अन्यथा तुम्हाला काही मिळणार नाही!” असे स्पष्ट बजावले. इतकेच नाही तर या जाबदार क्र. 5 यांने तक्रारदारांना द्यावयाच्या विषयांकित सोमदत्त अपार्टमेंट ‘ए’ बिल्डींग मधील संपूर्ण सदनिका परस्पर दुस-यास विकून टाकल्या ही बाब प्रस्तुत तक्रारदार यांची चौकशी अंती समजून आलेवर हीच बाब प्रस्तुत तक्रारीच्या मध्ये युक्तीवादाच्यावेळी जाबदार क्र. 5 यांनी मान्य केली आहे. परंतु सदर माहीती यातील प्रस्तुत तक्रारदारांना 2013 पर्यंत नव्हती. म्हणजेच प्रस्तुत जाबदार क्र. 5 यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या ‘ए’ बल्डींगमधील तळमजल्यावरील विषयांकित सदनिकेची परस्पर विक्री करुन त्यांच्या व्यवसायामध्ये अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन त्यांची फसवणूक करुन या तक्रारदार यांना अत्यंत गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिली आहे हे तक्रारदारांनी प्रकरणी दाखल केलेल्या उपलब्ध पुराव्याच्या कागदपत्रावरुन सिध्द होते. युक्तीवादाच्यावेळी जाबदार क्र. 5 यांचे वकीलांनी असंख्या इकडच्या-तिकडच्या अनावश्यक गोष्टी सांगून शेवटच्या क्षणी विषयांकित सोमदत्त अपार्टमेंटच्या दोन्ही ‘ए’ व ‘बी’ इमारती तयार होवून त्यांची विक्री होवून खरेदीदारांच्या कब्जात सदनिका दिलेल्या आहेत. त्यामुळे आजरोजी कोणतीही सदनिका रिक्त स्वरुपात उपलब्ध नाही. त्यामुळे तक्रारदारांना ती द्यावयाची म्हटल्यास सदनिका देणेसाठी बिल्डींग ‘ए’ किंवा ‘बी’ मध्ये ती उपलब्ध नाही. यावरुन प्रस्तुत जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदारांप्रती किती गंभीर स्वरुपाची सेवा त्रुटी करुन त्यांची फसवणूक केलेली आहे व त्यांनी या तक्रारदारांना करुन दिलेल्या नि.5/1 व 5/3 कडील उपलब्ध तृतीयपक्ष करार व रजिस्टर साठेखत यातील तरतूदींचा स्वतःच भंग केला आहे व विषयांकित सदनिकेपोटी दि.23/3/2013 रोजी रक्कम रु.10,00,000/- (रुपये दहा लाख मात्र) ची मागणी करारात नमूद नसताना मागणी केली व ते न दिलेस व करारात नमूद केलेली सदनिका देणेचे तक्रारदारांना नाकारलेले आहे हे स्पष्ट होते व त्यामुळे या जाबदार क्र. 5 यांनी वरील सर्व नमूद सेवात्रुटी करुन या तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी करुन गंभीर स्वरुपाची सदोष सेवा दिलेली आहे हे तक्रारदारांनी पूर्णपणे शाबीत केले आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो. B) मेंट ै
6(3) प्रस्तुत तक्रारदार यांना यातील जाबदारांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या कबूल केलेल्या सदनिकेविषयी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी माहिती अधिकाराखाली अर्ज करुन माहिती मागितली त्यावेळी या तक्रारदारांना सातारा नगरपरिषद यांनी असे कळविले की, सोमदत्त अपार्टमेंटमधील ए बिल्डींगच्या बांधकाम हे 7/9/2011 रोजी पूर्ण झाले असून तसा पूर्णत्वाचा दाखला व सदर बिल्डींगमधील सदनिकांचा रहिवासी वापर करणेसाठी दि. 15/10/2011 रोजी भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. त्यास अनुसरुन या जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदारांना दरम्यानच्या काळात कळवून त्यांच्याकडून ठरले स्लॅबप्रमाणे पैसे घेवून किंवा प्रस्तुत तक्रारदारांनी या जाबदारांकडे वारंवार सदनिकेबाबत बिल्डिंग ‘ए’ च्या बांधकामाबाबत प्रगती विचारुनही व त्यांना ते विषयांकित सदनिकेचे पैसे भरण्यास ते तयार असूनही या जाबदार क्र. 5 यांनी त्यांना प्रस्तुत तक्रारदार यांना विषयांकित बांधकामाची प्रगती सांगितली नाही किंवा 2011 साली भोगवटयास तयार झालेल्या सदनिकेचा रजिस्टर कराराप्रमाणे ऊर्वरीत पैसे घेऊन तक्रारदाराना सदनिका खरेदी दिली नाही ताबा दिला नाही. त्यामुळे जोपर्यंत उभयतांमधील झाले कराराप्रमाणे या तक्रारदारांना प्रस्तुत जाबदार क्र.5 हे विषयांकित सदनिकेचा कब्जा खरेदीपत्र करुन देत नाही तोपर्यंत सदर तक्रारीस निरंतर कारण चालू राहते. वरील कारणामुळे ते आजही चालू आहे. सन 15/10/2011 नंतर दोन वर्षांचे आत ग्राहक कायद्याअंतर्गत तरतूदीनुसार या तक्रारदारांनी मुदतीत मंचात या जाबदारांविरुध्द तक्रार दाखल केलेली आहे हे स्पष्ट होते. त्यामुळेच प्रस्तुत तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे, त्यास मुदतीचा बाध येत नाही हे निर्विवादरित्या या तक्रारदाराने शाबीत केले आहे. याच्या शाबीतीसाठी प्रस्तुत तक्रारदाराने लिमिटेशन अॅक्ट 1963 सेक्शन 22 चा आधार घेतला आहे. “Sec.22 – Continuing breaches and torts. In the case of a continuing breach of contract of in the case of a continuing tort, a fresh period of limitation begins to run at every moment of the time during which the breach or the tort, as the case be continues” त्यामुळे जाबदारांच्या ‘प्रस्तुत तक्रार ही मुदतीत नाही तक्रारीस कारण घडले नाही’ हा आक्षेप हा मंच फेटाळून लावत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 4 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6(4) मुद्दा क्र.3
1. यातील जाबदार क्र.5 नि.19 कडील प्रकरणी दाखल केलेल्या कैफियतीमधील दाखल केलेल्या इतर आक्षेपांचा विचार करावयाचा झाल्यास त्याचे खंडन याकामी या मंचाचस करणे आवश्यक वाटते. ते आक्षेप म्हणजे नुसत्या शपथपत्रावर विसंबून समरी पॉवरमध्ये या तक्रारीचा निकाल करता येणार नाही. त्यास दिवाणी न्यायालयाचे अधिकारक्षेत्र आहे.
2. जाबदार क्र.5 यांचे मते यातील तक्रारदाराने त्यांची तक्रार जास्तीत जास्त 2005 साली दाखल करणे आवश्यक होते परंतु ती 2013 साली दाखल केली असल्याने ती चालण्यास पात्र नाही. यातील जाबदार क्र. 5 व जाबदार क्र. 1 यांचेमध्ये रे.क.नं. 329/12 हा सातारा सिव्हील कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे त्याचाही बाध या कोर्टास येतो. यासाठी या तक्रारदारांनी “Hon’ble National Consumer Dispute Redressal Commission, New Delhi यांचेकडील रिव्हीजन पिटीशन क्र. 2321/2012 यामधील Arun Khanna V/s. Shashi Sharma & Other या केसमधील निकालाचा आधार घेतला आहे. त्यामध्ये मे. ना. राष्ट्रीय आयोगांनी खालील तथ्य प्रतिपादन केले आहे. “Consumer Protection Act 1986 Section 3,12,15,21 (b) Pendency to Civil Suit-Compliant Maintainability- Act was enacted to Provide for Protection of interest of Consumer’s - Remedy available under Act is in addition to Normal remedy or other remedy that may be available to complainant- where builder committees breach of his obligations, owner has the right to enforce specific performance and/or clam damages approaching civil court.
He can also approach Forum under Act 1986 for relief as consumer, against builder as service provider – Complaint maintainable.” याचा विचार करता सदरची तक्रार मंचाने फेटाळाव्यात अशी विनंती मंचास केली आहे. या आक्षेपांच्या अनुषंगाने पाहील्यास प्रस्तुत जाबदार क्र. 5 व प्रस्तुत तक्रारदार यांचेमध्ये ट्रायपार्टी अँग्रीमेंट व नि. 5/3 कडील रजिस्टर साठेखत करारनामा पाहता त्यामधील नमूद केलेल्या अटी व शर्तीप्रमाणे प्रस्तुत जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदारांला कबूल केल्याप्रमाणे करारात लिहील्याप्रमाणे सन 1999 अखेर किंवा त्यानंतर रजिस्टर साठेखताच्या नोंदीप्रमाणे सन 2000 अखेर विषयांकित सदनिकेचा कब्जा दिला नाही व तो दिले मुदतीत न देवून या जाबदारांनी या तक्रारदार यांना सदोष सेवा दिली. प्रस्तुत प्रकरणी प्रस्तुत तक्रारदार हे जाबदार क्र. 5 चे ग्राहक असून त्यांनी या तक्रारदार यांना जाबदार क्र. 5 यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारांना द्यावयाची सदनिका दिले मुदतीत न देवून सदोष सेवा दिली व प्रस्तुत तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत या बाबी या तक्रारदाराने पुराव्यानिशी मंचामध्ये शाबीत केले असल्याने प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार या मंचात चालण्यास पात्र आहे व ग्रा.सं.कायद्याच्या तरतूदी पाहील्या असता मंचासमोरील सर्व तक्रारी या समरी प्रोसिजरखालीच चालतात व त्या उभयपक्षकारांच्या शपथपत्रावर व उभयतांनी सादर केलेल्या आवश्यक त्या पुराव्याच्या दस्तऐवजांवरती चालविल्या जातात. अशाच तरतूदी ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये असल्याने वरीलप्रमाणेच मंचाने उभयतांची पुराव्याची कागदपत्रे पाहून व उभयतांच्या शपथपत्रांवरती सदरची तक्रार निर्गत केली आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या बाहेर जावून कोणतीही कृती या मंचास करता येत नाही व ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांच्यासाठी स्वतंत्र कायदा असून तो इतर कायद्यांना पुरक असा कायदा आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीस दिवाणी कोर्टाचे कार्यक्षेत्र येत नाही. त्यामुळे जाबदार क्र. 5 यांचा याबाबतचा आक्षेप फेटाळण्यात येतो याबाबत या तक्रारदारांनी वरिष्ठ कोर्टाचे निकालाचा आधार घेतला आहे. .
त्याचप्रमाणे या जाबदार क्र. 5 चे असेही म्हणणे आहे की, प्रस्तुत जाबदार क्र. 1 यांनी दिवाणी न्यायालय, सातारा यांचेकडे केलेल्या दिवाणी दाव्याची बाध या तक्रारीस येते असे त्यांचे कथन आहे. याचा विचार करता व यातील जाबदारांनी प्रकरणी दाखल केलेली दिवाणी दाव्याची नि. 1 ची झेरॉक्स कॉपी पाहीली असता या दाव्यामध्ये प्रस्तुत तक्रारदार हे सामील पक्षकार असल्याचे कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे त्या दाव्याचे नॉलेज या तक्रारदारास नाही. त्यामुळे विषयांकित तथाकथीत दिवाणी दाव्याचा प्रभाव या तक्रारीवर पडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. भले ते दावे विषयांकित सदनिकांच्या मिळकतीबाबत जरी असले तरी त्यामध्ये जोपर्यंत संबंधीत पक्षकार सामील पक्षकार नसतात तोपर्यंत त्याचा विचार करण्याचे कोणतेही कारण इतर सदनिकाधारकांना पाडत नाही. त्याचप्रमाणे या जाबदारांनी तक्रारदाराप्रती दिलेल्या सदोष सेवेमुळे प्रस्तुत ग्राहक तक्रारदार हा ग्राहक संरक्षण काद्याखाली मे. मंचात तक्रार दाखल करु शकतो व प्रस्तुत तक्रार या ग्राहक मंचात चालणेस पात्र आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे हा जाबदार क्र.5 चा आक्षेप मे. मंच फेटाळून लावत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6(5) मुद्दा क्र. 4 व 5
यातील जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने वारंवार खोटी विधाने करुन व असत्य कथन करुन मंचास घोटाळयात पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे कथनाप्रमाणे या तक्रारदारांना तक्रार दाखल करण्यास सन 2005 सालापर्यंतच त्यांना ती दाखल करता येत होती ती 2013 साली दाखल केली आहे त्यामुळे ती मुदतीत नाही याचा विचार करता नि. 5/15 कडे प्रस्तुत तक्रारदारांनी सातारा नगरपरिषद सातारा यांचेकडून माहिती अधिकाराखाली भोगवटा प्रमाणपत्राची प्रत दाखल केलेली आहे. तिचे अवलोकन करता विषयाकित ‘सोमदत्त अपार्टमेंट’ बिल्डींग ए चे भोगवटा प्रमाणपत्र दि.07/09/2011 दिलेले असून त्याप्रमाणे या विषयांकित बिल्डिंगचे बेसमेंट +तळमजला+स्टील्ट+दोन मजले रहिवास वापरासाठी आजपासून परवानगी दिली. हे पाहता या जाबदार क्र.5 यांनी या तक्रारदार यांना द्यावयाच्या ‘ए’ बिल्डिंग बांधकामासाठी दि. 9/6/2010 रोजी बांधकाम परवाना दिलेला होता. म्हणजेच जून 2010 पर्यंत यातील जाबदार क्र. 5 यांनी बिल्डींग ‘ए’ बांधण्यास सुरुवातच केली नव्हती हे स्पष्ट दिसते. मग ज्या विषयांकित बिल्डींगची बाधकामाची सुरुवातच या जाबदार क्र. 5 यांनी जुलै 2010 पासून सुरु केली त्यामधील तयार सदनिका या तक्रारदारांनी 2005 पर्यंतच मागणे आवश्यक होते त्यासाठी दावा करणे आवश्यक होते. हा आक्षेप अत्यंत चुकीचा व जाबदार क्र. 5 च्या फसव्या धोरणांचा परिपाक असलेचे मंचासमोर स्पष्ट झालेले आहे. सन 2011 सालानंतरही भोगवटा प्रमाणपत्र जाबदार क्र. 5 यांना मिळाल्यानंतरही या जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदारांना व बांधकाम चालू असतानाही टप्प्याप्रमाणे पैसे देण्याबाबत कळविलेबाबतचा कोणताही डॉक्युमेंटरी पुरावा मंचामध्ये सादर करुन जाबदार क्र. 5 यांनी त्यांचे आक्षेप शाबीत केलेले नाहीत की, या तक्रारदाराने जाबदारांना पैसेच दिले नाहीत, मागणी करुनही पैसे दिलेले नाहीत व प्रस्तुतची तक्रार 2005 सालाअखेरच दाखल करणे आवश्यक होते वरील वस्तुस्थितीवरुन त्यांचे हे कथन तद्दन खोटे व लबाडीचे असल्याचे शाबीत होते. यातील तक्रारदार यांनी यापूर्वी रजिस्टर साठेकरारावर म्हणजे सन 1998 साली रक्कम रु. 60,000/- दि. 25/8/1998 रोजी रोख दिलेले आहेत अधिक नि.5/9 कडे प्रकरणी दाखल असलेल्या जाबदार क्र. 5 चे मागणीप्रमाणे या तक्रारदाराने जाबदार क्र. 5 यांचे वॉचमन यांचेकडे रोख रक्कम रु.5,000/- व सांगली जिल्हा मध्य. बँक लि. चा चेक रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.10,000/- दिलेचे नि.5/8 चे पत्ररवरुन स्पष्ट होते. अशाप्रकारे या सदनिकेपोटी रक्कम रु.70,000/- (रुपये सत्तर हार मात्र) या जाबदार क्र. 5 यास या तक्रारदार यांनी दिलेचे स्पष्ट होते. व उर्वरीत पेमेंट साठेखतातील स्लॅबप्रमाणे देणेचे होते. परंतु त्याप्रमाणे जाबदार क्र. 5 हे मुळातच वागलेले नाहीत. कराराप्रमाणे त्यांनी विषयांकित बिल्डींग क्र. ‘ए’ चे बांधकाम करार झालेपासून तब्बल 12 वर्षांनी सुरु केले. म्हणजेच यातील जाबदार क्र. 5 यांनी स्वतःच तक्रारदाराला करुन दिलेल्या रजि. साठेखतातील तरतूदींचा उघड-उघड भंग केला आहे हे पूर्णतः शाबीत होते. त्यामुळे यावर आधारीत अशाप्रक्रारचे जाबदार क्र. 5 यांनी तक्रारदाराच्या तक्रारीस घेतलेले सर्व आक्षेप हे बिनबुडाचे व गैरलागू असलेचे पूर्णतः शाबीत होते. त्यामुळे जाबदार क्र. 5 यांनी त्यांच्या कैफियतीमध्ये घेतलेले सर्व आक्षेप हा मंच फेटाळत आहे व त्यामुळेच या तक्रारदारांनी सन 2011 सालानंतर विषयांकीत ‘सोमदत्त अपार्टमेंट’ ‘ए’ बिल्डींगच्या बांधकामाबाबतची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी सातारा नगरपरिषद शहर विकास विभागाकडे ज्यावेळी अर्ज केला त्यावेळी सातारा नगरपरिषदेने दिलेल्या व नि. 5/15 कडे दाखल असलेल्या भोगवटा प्रमाणपत्रावरुन प्रस्तुत तक्रारदारांना ए बिल्डिंगची वस्तुस्थिती लक्षात आली व त्यांनी ती माहिती मिळालेपासून लगेचच दि.30/4/2013 रोजी तातडीने त्यांनी मंचात तक्रार दाखल केली आहे त्यामुळे ती अत्यंत योग्य व बरोबर आहे त्यास बिलकूल उशीर झालेला नाही. ती पूर्णतः ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीप्रमाणे मुदतीत आहे हे पूर्णतः शाबीत होते त्यामुळे प्रस्तुत तक्रारदाराची तक्रार ही अंशतः मंजूरीस पात्र आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. प्रस्तुत तक्रारदार यांनी सन 1997 सालचा ट्रायपार्टी करार व सन 1998 चा रजिस्टर साठेखत करारनामा व त्यातील तरतूदींचा यातील जाबदार क्र. 5 यांनी स्वतःच भंग केला उल्लंघन केले त्यामुळे त्यामधील नमूद तरतूदीप्रमाणे प्रस्तुत जाबदार क्र. 5 हे या जाबदारांना ट्रायपार्टी करारनामा कलम 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे या जाबदार क्र. 5 यांनी “फलॅटचे बांधकाम वरील मुदतीत पूर्ण न झालेस पार्टी नं. 1 व 2 यांनी पार्टी नं.3 यांना दरमहा रक्कम रु.1,000/- भाडयापोटी फ्लॅटचा ताबा देईपर्यंतच्या कालावधीपर्यंत द्यावयाचे आहे. ” याचा विचार करता यातील जाबदार क्र. 1 व 5 यांनी या तक्रारदाराला सदनिकेचा दिले मुदतीत ताबा न दिलेमुळे दि.24/10/1999 पासून विषयांकित सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा देईपर्यंत प्रतिमहा रक्कम रु.1,000/- घरभाडे मिळणेस ते पात्र आहेत व करारादरम्यान सदनिका मिळेपर्यंतच्या दिलेल्या मुदतीपर्यंत होणारी घरभाडयाची एकूण रक्कम म्हणजे दि.9/5/2000 ते दि.9/5/2013 अखेर येणे असलेली घरभाडेची एकूण रक्कम रु.1,55,000/- मात्र जाबदारांकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहे व त्यापुढील दि.1/6/2013 पासून सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंतच्या होणा-या कालावधीचे पुढील प्रतिमहा रु.1,000/- प्रमाणे एकूण होणारे घरभाडे मिळणेस प्रस्तुत तक्रारदार पात्र आहे. त्याचप्रमाणे निःसंशयरित्या हे स्पष्ट होते की यातील जाबदार क्र. 5 यांच्या बेकायदेशीर दुर्लक्षामुळे बांधकामातील निष्काळजीपणामुळे या तक्रारदारांना वेळेत सदनिका त्यांनी वारंवार मागणी करुनही जाबदारांनी दिलेली नाही. त्यामुळे विषयांकित कराराची पूर्तता करणेची 100 टक्के जबाबदारी जाबदार क्र.5 ची होती व जाबदार क्र. 1 ची अत्यल्प होती. त्यामुळे होणारी संपूर्ण घरभाडयाची रक्कम तक्रारदाराला देण्यास जाबदार क्र. 5 हेच जबाबदार आहेत हे स्पष्ट होते. प्रस्तुत तक्रारदारांना या बाबत पैसे खर्च करुन तक्रार दाखल करावी लागली व कोर्टात/मंचात जाबदारांविरुध्द दाद मागावी लागली त्यामुळे निःसंशयरित्या त्या सर्वाना अत्यंत टोकाच्या शारिरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले विषयांकित सदनिका मिळणेस 19 वर्षे वाट पहावी लागली व आजही पहावी लागते हे स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार हे या जाबदार क्र. 5 कडून शारिरिक मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्ज खर्चापोटी रक्कम रु.10,000/- मिळणेस प्रस्तुत तक्रारदार पात्र आहे; हे निःसंशयरित्या शाबीत होते. त्याचप्रमाणे यातील तक्रारदार यांनी जाबदार क्र. 5 यांना विषयांकित सदनिकेबाबत ठरलेली किंत रु.1,70,000/- पैकी साठेखत अँडव्हान्स रक्कम रु.60,000/- अधिक नि.5/8 कडील पत्राप्रमाणे चेक क्र 16460 (सांगली जिल्हा मध्येवर्ती बँक) ने रु.5,000/- त्याचे बॉचमन महेबूब मकानदार यांचेकडे रोख रु.5,000/- असे एकूण रक्कम रु.10,000/- कडे जाबदार क्र.5 यांनी जाबदार क्र.5/9 कडे प्रकरणी दाखल असलेल्या पत्त्यातील मागणीप्रमाणे या जाबदार क्र. 5 यांना उसने दिले असे एकूण रक्कम रु.70,000/- वजा जाता रक्कम रु. 1,00,000/- जाबदार क्र. 5 यांना देवून त्यांचेकडून विषयांकित सदनिकेचे रजिस्टर खरेदी पत्र करुन घेणेस व त्याचा ताबा मिळणेस हे तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 4 व 5 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
7. प्रस्तुत कामातील जाबदार क्र. 2 ते 4 हे मंचात हजर झाले नाहीत वा त्यांनी वकिल नेमून म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द नि. 1 वर मे. मंचाने एकतर्फा आदेश पारीत केले आहेत. परंतु यातील जाबदार क्र. 1 यांनी नि.8 कडे त्यांची म्हणणे/कैफियत प्रकरणी दाखल केली असून त्यामध्ये त्यांनी तक्रारदारांची तक्रार व त्यातील जाबदार क्र. 5 विरुध्द घेतलेले सर्व आक्षेप मान्य केलेले आहेत. या व्यतिरिक्त या जाबदारांनी कोणताही पुरावा या प्रकरणी मंचात दाखल केलेला नाही.
8. वरील सर्व कारणमिमांसा व विवेचन यास अधिन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येतात.
आ दे श
1. तक्रारदारांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 यातील जाबदार क्र. 5 यांनी त्यांचे व्यवसायात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन या तक्रारदारांना त्यांच्या कराराप्रमाणे देय असलेली विषयांकित सदनिकाठरले किंमतीमध्ये न देवून त्या सदनिकेची परस्पर दुस-यास विक्री करुन या जाबदारांनी या तक्रारदारांना सदेाष सेवा दिली आहे असे घोषीत करण्यात येते.
3. यातील जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदाराला सदनिकेचा दिले मुदतीत ताबा न दिलेमुळे दि.09/05/2000 ते दि.9/05/2013 अखेर विषयांकित सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा देईपर्यंत प्रतिमहा रक्कम रु.1,000/- प्रमाणे घरभाडे अदा करावे व करारादरम्यान सदनिका मिळेपर्यंतच्या दिलेल्या मुदतीपर्यंत होणारी घरभाडयाची एकूण रक्कम रु.1,55,000/- (रुपये एक लाख पंचावन्न हजार मात्र) जाबदारांनी तक्रारदार यांना सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांच्या आत अदा करावी व दि.1/06/2013 पासून विषयांकित सदनिकेचा ताबा या तक्रारदारांना देईपर्यंतचे तारखेपर्यंत प्रतिमहा रु.1,000/- प्रमाणे होणारे घरभाडे या तक्रारदारांना अदा करावेत.
4. यातील तक्रारदार यांनी जाबदार क्र. 5 यांना विषयांकित ‘सोमदत्त अपार्टमेंट’ बिल्डींग ए मधील तळमजल्यावरील क्षेत्र 47.39 चौ.मिटरची सदनिका द्यावी व विषयांकित सदनिकेबाबत ठरलेली किंमत रु.1,70,000/- पैकी जाबदार क्र.5 यांना अदा केलेली साठेखत अँडव्हान्स रक्कम रु.60,000/- अधिक उसनवार स्वरुपातील रक्कम रु.5,000/- चेकने व रक्कम रु.5,000/- रोखीने अशी एकूण रक्कम रु.70,000/- वजा जाता रक्कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) द्यावेत व जाबदार क्र. 5 यांनी रक्कम मिळालेनंतर या तक्रारदार यांना विषयांकित सदनिकेचे रजिस्टर खरेदी पत्र करुन देवून व त्याचा ताबा सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांच्या आत तक्रारदार यांना द्यावा.
5. यातील जाबदार क्र. 5 यांनी या तक्रारदाराला झालेल्या मानसिक,शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) व अर्ज खर्चापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र) सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांच्या आत अदा करावेत.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार यांनी यातील जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 30/12/2016
सौ.सुरेखा हजारे श्री. श्रीकांत कुंभार श्री.मिलींद पवार-हिरुगडे
सदस्य सदस्य अध्यक्ष
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.