( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक :20 जुलै, 2011 ) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तक्रारदार हा शेतकरी असुन शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. तक्रारदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी गैरअर्जदार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी महिंन्दा अण्ड महिंन्द्रा कंपनीचा ट्रॅक्टर दाखविला. तक्रारदाराने सदर ट्रॅक्टर पसंत केला. सदर ट्रॅक्टरची किंमत 4,80,000/- असल्याचे गैरअर्जदार यांनी सांगीतले. तसेच तक्रारदाराने सुरुवातीला रुपये 50,000/- भरले व उर्वरित रक्कम गैरअर्जदार कं.4 यांचे कडुन अर्थसहाय्यापोटी घेऊन अदा करु शकाल असे गैरअर्जदार यांनी समजाविले. तक्रारदाराने रुपये 50,000/- प्रकाश जयस्वाल यांचे कडुन अर्थसहाय्य घेतले व उर्वरित रक्कम गैरअर्जदार क्रं.4 कडुन अर्थसहाय्य घेतले. गैरअर्जदाराने संबंधीत दस्तऐवजावर तक्रारदाराच्या स्वाक्ष-या घेऊन तक्रारदारास टॅक्टर हस्तांतरीत केला. कर्जाचे रक्कमेपोटी पहिला हप्ता रुपये 75,000/- दिनांक 10/1/2011 ला देणे होता. परंतु तक्रारदाराचे असे लक्षात आले की, गैरअर्जदाराने जो टॅक्टर त्याला दिला. त्यामध्ये इंजिनचे व ऑईलसीलचे काम निघाले व ट्रॅक्टरचा रंग निघु लागला व सदर ट्रॅक्टर जुना असल्याचे लक्षात आले. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं. 1 यांचेशी संपर्क साधला असता, गैरअर्जदार क्रं. 1 यांनी तक्रारदाराला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार न करण्याची विनंती करुन, नविन ट्रॅक्टर देण्याचे कबुल केले. गैरअर्जदाराने केलेल्या मागणी प्रमाणे रुपये 40,000/- आणखी गैरअर्जदार क्रं. 1 यांना अदा केले. त्यानंतर गैरअर्जदार क्रं.1 यांनी काही कर्ज कागदपत्रावर तक्रारदाराची सही घेवुन तक्रारदारास महिन्द्रा सरपंच 475 डीआय, इंजिन क्रमांक NCUW-349, हा ट्रॅक्टर दिला. सदर समझोत्याच्या वेळेस हेमेन्द्र जैस्वाल, सुरजजी जैस्वाल, राकेशजी गुप्ता, संजुजी गुप्ता हे प्रत्यक्ष हजर असुन गवाहदार म्हणुन उपस्थित होते. सदर ट्रॅक्टर मिळाल्यानंतर त्यात तक्रारदारास अनेक दोष आढळुन आले व एकामागुन एक काम निघु लागले. सदर ट्रॅक्टर मधला हायड्रोलिक खराब निघाला, डिझलच्या टंकीमधुन ऑईल लिक होत होते. नंबर प्लेट खराब होती. सदर दोष दिसुन आल्यामुळे तक्रारदाराने गैरअर्जंदार क्रं.1 यांचेशी संपर्क साधला व सदर ट्रॅक्टर दुरुस्त करुन देण्याची विनंती केली. परंतु गैरअर्जदाराने तक्रारदाराचा ट्रॅक्टर दुरुस्त केला नाही. तक्रारदाराचा ट्रॅक्टर जवळपास पावणे दोन महिन्यापासुन बंद आहे. दिनांक 3/10/2010 रोजी तक्रारदाराने सदर टॅक्टर कंमांडरच्या सहाय्याने ओढुन गैरअर्जदार यांचे वर्कशॉपला पाठविला. तक्रारदाराने ट्रॅक्टर दुरुस्त करण्याची विनंती केली असता. तक्रारदाराचा ट्रॅक्टर वॉरन्टीखाली असल्यामुळे नवीन व जुने भाग विनामुल्य बदलवुन ट्रॅक्टर दुरुस्त करुन देण्याचे गैरअर्जदार क्रं. 1 यांनी आश्वासन दिले. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी दिनांक 4/11/2010 रोजी तक्रारदारास ट्रॅक्टरची डीलेव्हरी घेण्यास बोलविले. तक्रारदार ट्रॅक्टर घेण्यास गेला असता गैरअर्जदार कं. 1 ने दुरुस्तीचे मोबदल्यात रक्कमेची मागणी केली. परंतु ट्रॅक्टर वॉरन्टी खाली असल्यामुळे संपुर्ण जबाबदारी कंपनीची आहे असे सांगीतले असता, गैरअर्जदार क्रं. 1 ने पैसै दिल्याशिवाय ट्रॅक्टर देण्यास नकार दिला. तक्रारदाराने सदर ट्रॅक्टरमधील बिघाड दुरुस्त होत नसेल तर नविन टॅक्टर बदलवुन देण्याची विनंती केली ती गैरअर्जदाराने मान्य केली परंतु त्यानंतर नवीन ट्रॅक्टर दिला नाही व दुरुस्त केलेला ट्रॅक्टरही दिला नाही. वास्तविक सदर टॅक्टरसाठी गैरअर्जंदाराने रुपये 90,000/-आणि दस्तऐवजांसाठी रुपये 10,000/- असे एकुण 1,00,000/- गैरअर्जदाराला दिले. व पेरणीकरिता रुपये 40,000/-, गव्हाचे बियाणाकरिता रुपये 20,000/-, चन्याचे बियाणे रुपये 15,000/- व सल्फेट करिता मार्केटमधुन उधार घ्यावे लागले. परंतु ट्रॅक्टर बंद असल्यामुळे तक्रारदार पेरणी करु शकला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे रुपये 4,00,000/- चे आर्थिक नुकसान झाले व रुपये 2,00,000/- कर्ज झाले होते. एवढेच नव्हे तर गैरअर्जदार क्रं. 1 व 4 यांनी ट्रॅक्टरवर कर्ज दिले असल्यामुळे ते वारंवार तक्रारकर्त्याला फोन करुन कर्जाचा हप्ता देण्यास दबाव आणत होते. तक्रारदाराने वारंवार विनंती करुनही गैरअर्जदाराने तक्रारदाराचा ट्रॅक्टर दुरुस्त करुन दिला नाही व बदलवुन दिला नाही ही तक्रारदारास दिलेल्या सेवेतील कमतरता आहे. त्यामुळे तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने ट्रॅक्टर करिता घेतलेले रुपये 1,00,000/- 10 टक्के व्याजासह परत करावे. तक्रारदार गैरअर्जदार क्रं.4 ला कर्जाची परतफेड करण्यास बाध्य नाही. तक्रारदारास झालेल्या मानसिक, आर्थिक, शारिरिक नुकसानीपोटी गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांना जबाबदार धरुन तक्रारकर्त्याला रुपये 4,00,000/- देण्याचे आदेशीत व्हावे अशी मागणी केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 8 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात डिलेव्हरी मेमोची प्रत, बॅटरी वॉरन्टी कार्ड, वॉरन्ट पोचपावतीची प्रत, ट्रॅक्टरबरोबर दिलेल्या पुस्तकातील सुचनांची प्रत, गैरअर्जदाराविरुध्द पोलीस दाखल केलेल्या तक्रारीची प्रत, इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत. यात गैरअर्जदार क्रं.1 व 4 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार क्रं 1 व 4 हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं.1 यांचे कथनानुसार तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांना वैयक्त्कि पक्षकार केलेले आहे. गैरअर्जदार क्रं.1 चे असे म्हणणे आहे की, त्यांचा सदरचे प्रोव्हेशिअल ट्रॅक्टर प्रा.लि.कंपनीशी कुठलाही संबंध नाही. सदर कंपनीने तक्रारदाराला कोणतीही दोष पुर्ण सेवा दिलेली नाही. तसेच सदर प्रकरण चालविण्याचे या मंचास कोणतेही अधिकार नाही. गैरअर्जदार क्रं.1 अरुण जैस्वाल हे महिन्द्रा अण्ड महिन्द्रा कंपनीचे अधिकृत वितरक नाही. तर महिन्द्रा अड महिन्द्रा कंपनीचे, प्रोव्हेशीअल ट्रॅक्टर प्रा.लि. हे एजंट आहे. तक्रारदाराने रुपये 50,000/- प्रोव्हेन्शीअल ट्रॅक्टर प्रा.लि. कंपनीकडे जमा केले होते. तक्रारदाराने कोणता ट्रॅक्टर घ्यायचा आहे हे नक्की न केल्यामुळे तक्रारदाराला डिलेव्हरी मेमो व पैसे दिल्याची पावती एवढेच कागदपत्रे देण्यात आले होते. सदर कंपनीने दिनांक 28/3/2010 रोजी DI टॅक्टर इंजिन नं. NCUW 117 या चेसीस आणि सिरीयल नंबरचा टॅक्टर खरेदी केला. त्याबद्दलचे महिन्द्रा अण्ड महिन्द्रा कंपनीचे टॅक्स इनव्हाईस जोडलेले आहे. दिनांक 30/6/2010 ला तक्रारदारास सदर ट्रॅक्टर प्रात्यक्षिकाकरिता दिला होता परंतु तक्रारदाराने ट्रॅक्टरची पुर्ण किंमत चुकती केली नव्हती. गैरअर्जदार याचे कंपनीने सदर ट्रॅक्टरमध्ये दोष असल्याचे म्हणणे तसेच जुना ट्रॅक्टर दिल्याचे म्हणणे नाकारलेले आहे. तक्रारदाराने प्रात्याक्षीकाकरिता नेलेला ट्रॅक्टर काही दिवसांनी परत आणुन द्यावा किंवा ट्रॅक्टर पसंत आला असल्यास त्यांची कागदपत्रे पुर्ण करुन उर्वरित रक्कम भरावी असा निरोप दिला असता, तक्रारदाराने टाळाटाळ केली. तक्रारदाराने जुना ट्रॅक्टर मला नको ही बाब प्रामुख्याने मांडली याबद्दल कुठलाही वाद होऊ नये म्हणुन तक्रारदाराने उर्वरित रक्कम देणे कबुल केल्यामुळे तक्रारदारास महिन्द्रा सरपंच 475 डी.आय.चेसीस.क्रं. NCUW 349 हा ट्रॅक्टर दिला. तक्रारदाराने नमुद केलेले दोष पुर्वी पासुनचे दोष नसुन ट्रॅक्टर चालकाच्या अथवा ड्रायव्हरच्या चुकीमुळे निर्माण झालेले आहे. ट्रॅक्टर मन्युअलमधील सुचनांचे पालन न केल्यामुळे निर्माण झालेले आहे. गैरअर्जदार यांनी तक्रारदाराला कधीही ट्रॅक्टर वॉरन्टीखाली असल्यामुळे नविन भाग विनामुल्य बदलवुन देण्याचे आश्वासन व हमी दिली नव्हती. तक्रारदाराने दिनांक 14/7/2010 पासुन दिनांक 30/10/2010 म्हणजे अंदाजे 4 महिने 290 तास ट्रॅक्टर चालविला होता. तसेव क्लच प्लेट व प्रेशर प्लेट्स व इलेक्ट्रीकचे समान या गोष्टीं वॉरन्टी अथवा गॅरन्टीत येत नाही याची कल्पना तक्रारदारास देण्यात आली होती व तक्रारदाराने मान्यता दिल्यानंतर सदर भाग बदलविण्यात आले. जे वॉरन्टी मध्ये येत नाही तसे तक्रारदाराने दुरुस्तीचे पैसे न दिल्यामुळे ट्रॅक्टर देण्याचा प्रश्नच उद्भभवत नाही. वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदार क्रं. 1 यांनी दिलेल्या सेवेत कुठलीही कमतरता नसुन तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केल्यामुळे खर्चासह खारीज करावी अशी विनंती गैरअर्जदार क्रं. 1 यांनी केलेली आहे. गैरअर्जदार क्रं. 2 व 3 आपल्या कथनात नमुद करतात की, तक्रारदाराने सदर तक्रारीत त्यांचेविरुध्द कोणताही सबळ पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराने ही तक्रार हेतुपुरस्पर व व्देषबुध्दीने दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्रं.2 व 3 हे कंपनीचे उत्पादक आहे. तक्रारदाराने सदर तक्रार गैरअर्जदार क्रं. 2 व 3 विरुध्द पूर्वग्रहाने व कलुषित भावनेने केलेली आहे. सदर वाहनामध्ये दोष असल्याचा कुठलाही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. कंपनीचे नियमाप्रमाणे वाहन खरेदी केल्याच्या 24 महिने किंवा कामाच्या तासाच्या 2000 तासाच्या आत दोष आढळल्यास त्या दोषाकरिता बिघाड झालेल्या वाहनाच्या भागाला सुधारुन किंवा बदलवुन देण्याची जबाबदारी वितरक किंवा उत्पादकाची असते. तक्रारदाराने वाहनात दोष असल्याबद्दलची तक्रार गैरअर्जदार यांना दिलेली नव्हती. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.1 यांचेकडे वाहन दुरुस्तीकरिता दिले होते यांची माहिती गैरअर्जदार क्रं.2 व 3 यांना नव्हती. तक्रारदाराने ट्रॅक्टर वित्तीय सहाय्य घेवुन घेतलेला होता. कर्जाची परतफेड अवाक्याबाहेर जात असल्याने अर्थविहीन आरोप लावुन मंचाची दिशाभुल करीत आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीत गैरअर्जदार क्रं.2 व 3चा काहीही संबंधी नाही. वास्तविक गैरअर्जदार क्रं. 2 व 3 उत्कृष्ट ट्रॅक्टर निर्माण करणारी कंपनी आहे व ते करतांना वेळोवेळी सेवा उपलब्द करुन देतात व उत्पादनातील दोषासंबंधात त्वरीत सेवेच्या माध्यमाने निराकरण केल्या जाते. तक्रारदाराने सदर तक्रार कुठल्याही सबळ पुरावाअभावी दाखल केली असल्याने, गैरअर्जदार क्रं. 2 व 3 यांनी ती खारीज करावी अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रं.4 यांचे कथनाप्रमाणे तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं. 1,2 व 3 यांना व्यक्तीशः पक्षकार केलेले आहे. वास्तविक ट्रॅक्टर खरेदी व्यवहार गैरअर्जदार कं.1,2,व 3 यांच्या कंपनीशी झालेला आहे. त्यांना प्रत्यक्ष पक्षकार करणे आवश्यक होते. तक्रारदाराची तक्रार गैरअर्जदार क्रं.1ते 3 यांचेकडुन विकत घेतलेल्या ट्रॅक्टर संबंधी आहे. गैरअर्जदार क्रं.4 यांनी तक्रारदाराला दिलेल्या कर्जाचे संबंधी करारपत्र व इतर कागदपत्रे दिलेले आहे. तक्रारदारास दिलेल्या सेवेत कुठलीही दिरंगाई झालेली नाही. तक्रारदारास सदर ट्रॅक्टर खरेदी करिता रुपये 3,90,000/- वित्तीय सहाय्य म्हणुन दिलेले आहे. त्यांचे कथनानुसार दिनांक 16/1/2011 रोजी कर्जाचा पहीला हप्ता तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेकडे भरणा करावयाचा होता. परंतु तक्रारदाराने सदर कर्जाचा हप्ता आजपर्यत गैरअर्जदाराकडे भरणा केलेला नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं. 4 यांचे कडुन वित्त सहाय्य घेतल्याबाबत व तक्रारदार व गैरअर्जदार क्र.4 यांचेमध्ये वाहन खरेदीबाबत झालेल्या कराराच्या मुळ प्रतिवर तक्रारकर्त्याच्या स्वाक्ष-या सुध्दा आहेत. कर्ज घेवुन विकत घेतलेली कुठलीही वस्तु व वाहन यात दोष निर्माण झाले असेल तर कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास कुठलीही कुचराई करु शकणार नाही असे स्पष्टपणे नमुद आहे. तक्रारदार कर्जाचे परतफेडीकरिता बांधील आहे. तक्रारदाराची तक्रार लक्षात घेता गैरअर्जदार क्रं.4 यांचा कुठलाही संबंध येत नाही. तक्रारदाराची तक्रार अवाजवी व खोडसाळपणाची असल्याने ती खर्चासह खारीज करावी अशी विनंती गैरअर्जदार क्रं. 4 यांनी केलेली आहेत. -: कारणमिमांसा :- प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थितीवरुन असे दिसते की तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.1 कडुन महिन्द्रा अन्ड महिन्द्रा कंपनीचा सरपंच-475 DI हा टॅक्टर गैरअर्जदार क्रं.4 कडुन वित्त सहाय्य घेऊन दिनांक 30/6/2010 रोजी विकत घेतला होता. तक्रारदाराच्या प्रतिज्ञापत्रानुसार सदर टूक्टर मधे विवधि प्रकारचे दोष होते. त्यामुळे गैरअर्जदाराने सदरचा टॅक्टर बदलवुन दिला. गैरअर्जदाराच्या जवाबानुसार सदरचा ट्रॅक्टर हा प्रात्यकशिकाकरिता तक्रारदारास दिला होता. परंतु हा टॅक्टर प्रात्यक्षीकाकरिता दिला होता असा कुठलाही सुस्पष्ट पुरावा गैरअर्जदाराने सादर केला नाही. उलट गैरअर्जदाराने तक्रारदारास विक्रीचे बिल दिलेले आहे. यावरुन असे दिसते की गैरअर्जदाराने तक्रारदारास दिलेला ट्रॅक्टर दोषीत आढळल्यामुळे गैरअर्जदाराने तो बदलवुन दिला. तक्रारदाराच्या मते, तक्रारदारास बदलवुन दिलेला दुस-या ट्रॅक्टरमधे विविध दोष आढळले व तशी सुचना तक्रारदाराने गैरअर्जदार यांना दिली. कागदपत्र क्रं.19 वरील दस्तऐवजावरुन असे दिसुन येते की, सदर वाहनावर 24 महिने किंवा 2000 हजार तासांच्या आत जे आधी घडेल ते, इतकी वॉरन्टी होती म्हणजेच या अवधीमध्ये सदर ट्रॅक्टर मध्ये दोष असतील किंवा वॉरटीच्या अटीनुसार एखादा भाग खराब झाला असेल तर तो बदलवुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार कंपनीची असते. या हमी कालावधीमध्ये तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.1 कंपनीच्या वर्कशॉपमध्ये सदरचा ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी नेला असता गैरअर्जदार क्रं. 1 कंपनीने त्यातील काही भाग बदलवुन दिले व त्याकरिता काही मुल्य रु. 6164/- आकारले. कागदपत्र क्रं. 19 गैरअर्जदार यांच्या मते हमी कालावधी मधे सुटे भाग कव्हर होत नाही. परंतु कागदपत्र क्रं.21 वरील वॉरन्टीच्या अटी व शर्तीच्या परिच्छेद 1 नुसार असे दिसते की, गैरअर्जदार कंपनीने वॉरन्टी पिरेडमध्ये दोषपुर्ण सुटे भाग दुरुस्त करुन अथवा बदलवुन दिले जातील असे म्हटल्र आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या ट्रॅक्टरमध्ये बदलवुन दिलेल्या सुटया भागाची किंमत आकारणे नियमबाहय आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या खर्चाची मागणी गैरअर्जदार क्रं.1 यांनी करणे मसेच सदरची रक्कम न दिल्यामुळे तक्रारदारास ट्रॅक्टर न देता अडवुन ठेवणे ही गैरअर्जदाराच्या सेवेतील कमतरता आहे. त्याचप्रमाणे बदलवुन दिलेल्या ट्रॅक्टरमध्ये उत्पादीत दोष आहे या म्हणण्यापोटी कुठलाही पुरावा सादर न केल्यामुळे सदर ट्रॅक्टरमध्ये उत्पादीत दोष होता हे तक्रारदाराचे म्हणणे या मंचाला मान्य करता येणार नाही. सदर प्रकरणात तक्रारदाराने आगाऊ रक्कमेपोटी (down payment ) घेतलेले रुपये रुपये 1,00,000/- 10टक्के व्याजासह परत करावे तसेच तक्रारदार गैरअर्जदाराकडुन घेतलेल्या कर्जाकरिता बाध्य नाही असा आदेश मंचाने करावा या मागण्या या मंचाला मान्य करता येणार नाही. तक्रारदारास गैरअर्जदाराचे कृतीमुळे किती व कसे नुकसान झाले व त्याकरिता झालेली नुकसान भरपाई देण्याचा अधिकार या मंचाला आहे. तसेच दुस-या ट्रॅक्टरमध्ये वॉरन्टी पिरेड मध्ये काही दोष असेल तर ते दोष काढण्याची अथवा दोषीत भाग बदलवुन देण्याची जबाबदारी वॉरन्टीच्या अटी व शर्तीला अधीन राहुन गैरअर्जदार क्रं 1 ते 3 ची आहे. ग्राहक सरंक्षण कायदा 1986 च्या कलम 2(1)(g) च्या ‘ ट्रेडर ’ च्या व्याख्येमध्ये उत्पादक हे देखील समाविष्ट आहे. त्यामुळे वितरकासोबत उत्पादक हे सुध्दा जबाबदार असतात. त्यामुळे तक्रारदाराच्या नुकसान भरपाईबद्दल गैरअर्जदार क्रं.1 ते 3 व्यक्तिगत वा संयुक्तिकरित्या जबाबदार राहतील. गैरअर्जदार क्रं.4 ही कर्ज देणारी संस्था आहे. कर्त दिल्यानंतर कर्ज रक्कमेच्या फेडीच्या रक्कमेची मागणी करण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यामुळे यात त्यानी तक्रारदारास सेवेतील कमतरता दिली असे म्हणता येणार नाही. वरील सर्व वस्तु व परिस्थिती पाहता हे न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश करित आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांनी तक्रारदाराचा दुरुस्त केलेला ट्रॅक्टर परत द्यावा. त्याकरिता तक्रारदाराकडुन दिनांक 4/11/2010 च्या बिलातील दुरुस्तीचा खर्च आकारु नये. 3. गैरअर्जदार क्रं.1 ते 3 ने तक्रारदारास नुकसान भरपाईपोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार) व दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार फक्त) असे एकुण रुपये 7,000/- अदा करावे. 4. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्रं.1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे. 5. गैरअर्जदार क्रं.4 यांचे विरुध्द कुठलाही आदेश नाही.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |