तक्रारदारांतर्फे प्रतिनिधी श्री. गोविंद फडके
जाबदेणार एकतर्फा
द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, मा. अध्यक्ष
:- निकालपत्र :-
दिनांक 22 जानेवारी 2013
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांना त्यांच्या कोथरुड मधील सदनिकेचा ताबा मे 2009 मध्ये मिळणार होता म्हणून सदनिकेमधील किचन मध्ये मोडयुलर पध्दतीचे फर्निचर करुन घेण्यासाठी तक्रारदार ईशान्य मॉल जाबदेणार यांच्याकडे जाऊन मुख्य अधिकारी श्रीमती आरती सरीन [गुप्ता] यांच्याशी चर्चा करुन तक्रारदारांच्या अपेक्षांना अनुरुप फर्निचरचा संच सदनिकेत बसवून देण्याचे एस्टीमेट बाबत तक्रारदारांनी विनंती केली असता प्रत्यक्ष जागा पाहून मापे घेतल्याशिवाय डिझाईन व एस्टिमेट देता येणार नाही असे सांगितले व त्यापोटी रुपये 500/- फी कंपनीला दयावी लागेल असेही सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी रक्कम भरली व जाबदेणार यांनी रकमेची पावती दिली. तक्रारदारांनी 1/3/2009 रोजी कंपनीच्या शो रुम मध्ये जाबदेणार यांना भेटले व त्यांना हवी असलेली फिटींग्ज, प्लायवूडचा दर्जा, लॅमिनेटचे रंग यांची माहिती दिली. त्या माहितीचा व स्वत: घेतलेल्या मापांचा, स्केचेसचा विचार करुन जाबदेणार यांनी तक्रारदारांना कच्ची स्केचेस काढून तशा सिस्टीमची किंमत अंदाजे रुपये 88,250/- येईल असे सांगितले. तसेच अंदाजे किंमतीच्या 25 टक्के रक्कम आगाऊ मिळाल्यानंतरच कंपनी फायनल ड्रॉईंग्ज व ऑफिशिअल कोटेशन देते असे सांगून एकूण किंमतीच्या 50 टक्के अग्रिम रक्कम मिळाल्यानंतरच सिव्हील कामाबाबत बिल्डरला सूचना देते व ऑर्डरचे काम हातात घेते असे तक्रारदारांना सांगितले. जाबदेणार यांचे इंस्टॉलेशन्स पुण्यात नसून मुंबईत आहे असे तक्रारदारांना सांगण्यात आले. एस्टीमेटवर 15 मार्च तारीख नमूद करुन 15 मार्च पर्यन्त 25 टक्के रक्कम आगाऊ दयावी म्हणजे डिटेल कोटेशन व ड्रॉईंग्ज जाबदेणार तयार करुन देतील व आणखी 25 टक्के रक्कम आगाऊ घेऊन ऑर्डरवर काम सुरु करतील असेही जाबदेणार यांनी सांगितले. तक्रारदारांनी मुंबईला जाऊन जाबदेणार यांच्या कारखान्याला भेट दिल्यानंतर सिस्टीम घेण्याचे ठरविले व त्यानुसार 8/3/2009 रोजी कंपनीच्या शोरुम ला भेट देऊन आगाऊ रक्कम म्हणून रुपये 20,000/- चा चेक दिला. त्याचवेळी श्रीमती सरीन यांना ऑफिशिअल कोटेशन व ड्रॉईंग्ज लवकर देण्याची विनंती केली. तक्रारदार क्र.2 यांना वारंवार परदेशी जावे लागत असल्यामुळे तक्रारदार क्र.1 वेळोवेळी जाबदेणार यांच्याकडे दुरध्वनीवरुन चौकशी करीत होत्या, डिझाईन मिळणेबाबत विनंती करीत होत्या, तसेच सदनिकेचा ताबा मे/जून 2009 मध्ये मिळत नसल्याची शक्यताही त्यांनी जाबदेणार यांना कळविली होती. श्रीमती सरीन यांना वैयक्तिक कारणांमुळे वारंवार मुंबईला जाऊन रहावे लागत असल्यामुळे डिझाईनचे कामही रेंगाळले. मार्च 2009 ते सप्टेंबर 2009 या कालावधीत श्रीमती सरीन यांनी होत असलेल्या उशीराबद्यल कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तसेच कोटेशन व ड्रॉईंग्जही पाठविले नाहीत. बिल्डरने तक्रारदारांना ऑगस्ट 2009 मध्ये सदनिकेचा ताबा दिला. ताबा मिळण्याची शक्यता झाल्यावर ऑगस्ट 2009 पासून तक्रारदारांनी श्रीमती सरीन यांना किचनचे बांधकाम पूर्ण झाल्याचे सांगून फायनल कोटेशन व ड्रॉईंग्ज देणेबाबत विनंती केली व अनेक वेळा फोन करुन त्याबाबत स्मरणही करुन दिले. पण श्रीमती सरीन यांनी बांधकाम पूरे झालेले असल्याने व मुंबईच्या कारखान्याचा गवंडीही दुस-या कामांसाठी येणार असल्याने तो नव्याने मापे घेईल. गवंडयाच्या मापांचा उपयोग करुन एकदमच विचार विनिमय करुन फायनल कोटेशन जाबदेणार देतील असेही तक्रारदारांना सांगण्यात आले होते. परंतू अनेक कारणांमुळे गवंडयाचे पुण्याला येणे व तक्रारदारांना कोटेशन मिळणे लांबणीवर पडत गेले. दिनांक 20/11/2009 रोजी जाबदेणार यांनी तक्रारदारांना फोन करुन गवंडी 21/11/2009 रोजीच पुण्यास येत असल्याचे सांगितले त्यानुसार तक्रारदार 21 नोव्हेंबर 2009 रोजी जाबदेणार कंपनीच्या शोरुम मध्ये गेले परंतू काही कारणांमुळे श्रीमती सरीन शोरुमला येणार नव्हत्या, म्हणून घरी येऊन ऑर्डर नक्की करण्याबाबत सांगितले. त्यावेळी श्रीमती सरीन यांनी मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झालेली असल्यामुळे एकूण कामाची जास्त किंमत दयावी लागेल असे सांगितले. परंतू तक्रारदारांना घाई असल्यामुळे जाबदेणार यांचे म्हणणे तक्रारदारांना पटले व तक्रारदारांनी नव्या किंमतीबाबतही चर्चा करण्यास तयारी दर्शविली. त्याबाबत श्रीमती सरीन यांनी निर्णय व स्केचेस संगणकारवर नोंदविले. परंतू श्रीमती सरीन यांच्या घरी प्रिंटर अथवा स्कॅनर नसल्यामुळे झालेले काम छापनी स्वरुपात [हार्ड कॉपीवर] घेण्यासाठी तक्रारदार शोरुमवर जाऊन प्रिंटआऊट घेऊन आले. परंतू तोपर्यन्त ऑफिसची वेळही संपल्याने सगळया स्केचेसचे व किंमतीच्या तक्त्याचे स्कॅन व प्रिंटआऊट घेता आले नाही. श्रीमती सरीन यांनी सर्व स्केचेस व फायनल किंमतीचा तक्ता एकत्र करुन पाठविण्याची तक्रारदारांना हमी दिली अथवा शोरुमच्या पुढील भेटीत तक्रारदारांना देण्याचे आश्वासन दिले. त्यासर्व स्केचेसवर व फायनल किंमतीवर दोन्ही बाजूंना मान्यता असल्याची, त्यात बदल होऊ नये म्हणून श्रीमती सरीन व तक्रारदार क्र.2 यांनी प्रत्येक पानावर सही केली. त्याप्रमाणे सर्व सिस्टीमची एकूण किंमत रुपये 1,57,873/- निश्चित करण्यात आली. ती दोन्ही बाजूंना मान्य होती. फक्त लॅमिनेटचे रंग व हॅन्डल्सचे सिलेक्शन बाकी होते, त्याची किंमत एकूण किंमतीत समाविष्ट होती. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मागणी करुनही श्रीमती सरीन यांनी सहया केलेले कागद तक्रारदारांना दिले नाहीत. त्यानंतर श्रीमती सरीन यांनी आणखी 25 टक्के आगाऊ रक्कमेचा चेक तक्रारदारांकडून मागितला असता श्रीमती सरीन यांनी जर त्यांनी सर्व मान्य केलेल्या अटींसह ऑर्डर व ड्रॉईंग्ज पाठविले नाहीत तर तक्रारदार चेक देणार नसल्याचेही तक्रारदारांनी जाबदेणार यांना सांगितले. त्यासंदर्भात जाबदेणार यांना अनेक वेळा फोन करुन विचारणा केली परंतू जाबदेणार यांनी उत्तर दिले नाही. श्रीमती सरीन यांनी दिनांक 12/12/2009 रोजी तक्रारदारांना ई मेल वरुन ड्राईंग्ज व कोटेशन पाठविले. ई-मेल मध्ये 25 टक्के म्हणून जाबदेणार यांनी रुपये 40,000/- देण्यास सांगितले होते. कोटेशन मध्ये वेगळयाच किंमती दिल्या होत्या. तसेच 21 नोव्हेंबरच्या कोटेशन मध्ये रुपये 1,57,873/- नमूद करण्यात आले होते पण कोटेशनची बेरीज रुपये 1,59,036/- दाखविली होती. त्याशिवाय आता लागू असलेली किंमत रुपये 1,83,036/- असेल म्हणजेच रुपये 25,000/- पेक्षा जास्त रकमेने वाढलेली असेल असेही नमूद करण्यात आले होते. तसेच कोटेशन मध्ये अटी व शर्ती नव्हत्या व ते कंपनीच्या लेटरहेडवरही नसल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर मध्ये रुपये 25,000/- ने किंमत वाढण्यासारखी कोणतीही घटना घडली नव्हती. जाबदेणार यांनी एकतर्फा किंमतीत केलेली वाढ तक्रारदारांना मान्य नव्हती. म्हणून तक्रारदारांनी रुपये 1,57,873/- या किंमती मध्येच सिस्टीम बसवून मिळण्याची मागणी केली असता श्रीमती सरीन यांनी कोटेशन 10 डिसेंबर पर्यन्तच व्हॅलीड होते असे सांगितले, परंतू तसा उल्लेख कोठेही करण्यात आलेला नव्हता. श्रीमती सरीन यांनी तक्रारदारांना रुपये 1,83,036/- या किंमतीवर आधारित 50 टक्के आगाऊ रक्कम ताबडतोब पुर्ण करण्यास सांगितली तसेच 31 मार्च 2010 पर्यन्त ऑर्डर पूर्ण झाली नाही तर जाबदेणार कंपनीच्या नियमाप्रमाणे तेथपर्यन्त भरलेले सर्व पैसे कंपनीकडून कायमचे जप्त केले जातात व व्यवहार संपतो असेही तक्रारदारांना असेही तक्रारदारांना सांगण्यात आले. हे तक्रारदारांना मान्य नसल्यामुळे तक्रारदारांनी जाबदेणार यांच्याकडून काम न करुन घेण्याचा निर्णय घेतला आणि दिनांक 7/1/2010 रोजी जाबदेणार यांना पत्र पाठवून जाबदेणार यांनी एकतर्फा वाढविलेली नवी किंमत अंतर्भूत करुन दिलेले कोटेशन मान्य नसल्याचे व तक्रारदार देणार असलेली ऑर्डर रद्य करीत असल्याचे कळवून रुपये 40,000/- चा परतावा मागितला. जाबदेणार यांनी पत्राला दिलेले उत्तर तक्रारदारांना मान्य नाही. जाबदेणार रुपये 20,000/- देऊन कॉम्प्रमाईज करण्यास तयार होते. परंतू ते तक्रारदारांना मान्य नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून जाबदेणार यांच्याकडून रुपये 40,000/- दिनांक 1/12/2009 पासून व्याजासह परत मागतात. तसेच नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मागतात.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द मंचाने दिनांक 7/5/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी त्यांच्या सदनिकेमध्ये जाबदेणार यांच्याकडून किचन मध्ये मोडयुलर पध्दतीचे फर्निचर तयार करुन घेण्यासाठी मार्च 2009 मध्ये रक्कम रुपये 40,000/- दिल्याचे दाखल पावत्यांवरुन दिसून येते. रुपये 40,000/- देऊनही जाबदेणार यांनी निरनिराळया कारणांवरुन आणि स्वत:च्याच अटी व शर्तीनुसार वाढीव रक्कम सांगून वाढीव आगाऊ रकमेची मागणी केल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या पत्र व्यवहारावरुन, ई-मेल वरुन जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून रक्कम रुपये 40,000/- घेऊनही प्रत्यक्ष काम न करता, एस्टिमेट, ड्राईंगही दिले नसल्याचे स्पष्ट होते. जाबदेणार यांनी कालावधी वाढल्याचे सांगून केवळ रक्कम वाढवून मागितली, वाढीव रकमेनुसार वाढीव आगाऊ रक्कमेची मागणी करणे ही जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब आहे. तक्रारदारांनी भरलेल्या रकमेचा परतावा मागूनही जाबदेणार यांनी रक्कम परत केली नाही ही जाबदेणार यांनी अवलंबलेली अनुचित व्यापारी पध्दत आहे. म्हणून मंच जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्कम रुपये 40,000/- डिसेंबर 2009 पासून 9 टक्के द.सा.द.शे व्याजासह परत करावी असा आदेश देत आहे. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मुळे व अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्यामुळे तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असेल म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- दयावेत असाही मंच आदेश देत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना
रक्कम रुपये 40,000/- डिसेंबर 2009 पासून 9 टक्के द.सा.द.शे व्याजासह संपूर्ण रक्कम अदा होईपर्यन्त आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावी.
[3] जाबदेणार 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या नुकसान भरपाई पोटी रुपये 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/-
आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.