::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 25/05/2017)
1. अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
2. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार यांची पतसंस्था असून गैरअर्जदार बल्लारपूर परिसरातील लोकांचे दैनीक खाते, बचत खाते, मुदतठेव खाते, आवर्ती ठेव इत्यादी खाते पतसंस्थेत उघडतात व त्यावर ग्राहकांना व्याज तसेच जमा झालेल्या रकमेतून ग्राहकांना कर्ज देते, गैरअर्जदार पतसंस्थेमध्ये अर्जदाराने दिनांक 11/8/2008 रोजी रू.20,000/- दामदुप्पटकरीता 5 वर्षे 6 महिन्याकरीता मुदतठेव खात्यात गुंतविले. त्यासंदर्भात गैरअर्जदार पतसंस्थेने अर्जदाराला अनुक्रमांक 58 चे प्रमाणपत्र दिले. सदर मुदतठेव दिनांक 11/2/2014 रोजी परिपक्व होवून त्याचे परिपक्वता मुल्य 40,018/- मिळणार होते. मात्र परिपक्वता तिथीला तसेच त्या तारखेनंतरही अर्जदाराने वारंवार मागणी करूनही गैरअर्जदाराने अर्जदाराला परिपक्वता रक्कम दिली नाही. अर्जदाराला मुदतीत रक्कम मिळाली असती तर अर्जदाराने पुनर्गूंतवणूक करून लाभ मिळविला असता परंतु वेळेवर रक्कम न मिळाल्यामुळे त्याला आर्थीक नुकसान सहन करावे लागले. गैरअर्जदार पतसंस्थेने मुदत ठेवीची रक्कम परिपक्वता तिथीनंतरही न देवून अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केलेला आहे तसेच सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब अर्जदाराने गैरअर्जदाराविरूध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करून तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराने अर्जदाराची मुदत ठेव रक्कम रू.40,018/- व त्यावरील व्याज तसेच दिनांक 11/2/2014 पासून रक्कम वसूल होईपर्यंत 18 टक्के व्याज अर्जदाराला देण्याबद्दल आदेश व्हावा तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रू.30,000/- व इतर योग्य आदेश अर्जदाराचे बाजूने व गैरअर्जदाराविरूध्द पारीत करण्यांत यावा अशी प्रार्थना केली आहे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्यांनी नि. क्रं. 8 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेख्खीउत्तरात अर्जदाराच्या तक्रारीतील कथन नाकबूल करून पुढे आपल्या विशेष कथनात नमूद केले आहे कि, अर्जदार हे गैरअर्जदार पतसंस्थेकडे कधीही आले नाहीत तसेच कोणतीही मागणी केली नाही. गैरअर्जदार हे अर्जदाराला कोणतेही देणे लागत नाही. अर्जदार यांना गैरअर्जदार पतसंस्थेविरूध्द विद्यमान ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्यापूर्वी असे वाद सोडविण्यासाठी कायद्याने प्राधिकृत असलेल्या सहाय्यक निबंधक,बल्लारपूर यांचेकडे दाद मागणे आवश्यक होते. परंतु अर्जदार यांनी पोलीस स्टेशन बल्लारपूर आणि पोलीस अधिक्षक, चंद्रपूर तसेच विद्यमान ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करून दिशाभूल केली. हा गैरअर्जदार पतसंस्थेचा प्राथमीक आक्षेप आहे. गैरअर्जदाराची विद्यमान मंचास मागणी आहे की सदर तक्रारअर्ज कायद्याने प्राधिकृत अधिकारी यांचेकडे आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश देवून सदर तक्रारअर्ज खारीज करावा.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, गैरअर्जदाराने शपथपत्र दाखल न केल्याने दिनांक 16/2/2017 रोजी मंचाने गैरअर्जदाराचे शपथपत्राशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा नि.क्र.1 वर आदेश पारीत केला. तसेच उभय पक्षांनी लेखी युक्तिवाद दाखल न केल्याने तसेच तोंडी युक्तिवादही न केल्याने अनुक्रमे दिनांक 16/5/2017 व 22/5/2017 रोजी नि.क्र.1 वर उभय पक्षांचे लेखी व तोंडी युक्तिवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यांत आला. अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
(2) प्रस्तूत तक्रार मंचाच्या अधिकार क्षेत्रात येते काय ? होय
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला होय
आहे काय ?
(4) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय
(5) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंतीम आदेशानुसार
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने गैरअर्जदार पतसंस्थेमध्ये दिनांक 11/8/2008 रोजी रू.20,000/- दामदुप्पटकरीता 5 वर्षे 6 महिन्याकरीता मुदतठेव खात्यात गुंतविले. त्यासंदर्भात गैरअर्जदार पतसंस्थेने अर्जदाराला अनुक्रमांक 58 चे मुदत ठेव प्रमाणपत्र दिले. अर्जदाराने सदर प्रमाणपत्राची प्रत नि.क्र.5 वरील दस्त क्र.अ-1 वर दाखल केलेली आहे. यावरून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदार यांना गैरअर्जदार पतसंस्थेविरूध्द विद्यमान ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करण्यापूर्वी असे वाद सोडविण्यासाठी कायद्याने प्राधिकृत असलेल्या सहाय्यक निबंधक,बल्लारपूर यांचेकडे दाद मागणे आवश्यक होते असा प्राथमीक आक्षेप गैरअर्जदाराने आपल्या लेखी उत्तरामध्ये घेतलेला आहे. परंतु ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 3 अनुसार सदर कायदा अन्य कायद्याला विरोधी नसून पुरक आहे. त्यामुळे अर्जदाराला ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहक मंचामध्ये दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यांत आलेला आहे. त्यामुळे गैरअर्जदाराने अधिकारक्षेत्राबाबत घेतलेला आक्षेप ग्राहय धरण्यासारखा नाही. सबब प्रस्तूत तक्रार मंचाच्या अधिकार क्षेत्रात येते असे मंचाचे मत असल्याने मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे. सेक्रेटरी, थिरूमुरूगन को.ऑप. अॅग्रीकल्चरल क्रेडीट सोसायटी विरूध्द एम. ललिता(मयत) मार्फत वारस व इतर सिव्हील अपील नं.92 /1998 या प्रकरणात दिनांक 11/12/2003 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर मंचाचे मत आधारीत आहे
मुद्दा क्रं. 3 व 4 बाबत ः-
7. अर्जदाराने गैरअर्जदार पतसंस्थेमध्ये दिनांक 11/8/2008 रोजी रू.20,000/- दामदुप्पटकरीता 5 वर्षे 6 महिन्याकरीता मुदतठेव खात्यात गुंतविले. त्यासंदर्भात गैरअर्जदार पतसंस्थेने अर्जदाराला अनुक्रमांक 58 चे मुदत ठेव प्रमाणपत्र दिले. अर्जदाराने नि.क्र.5 वरील दस्त क्र.अ-1 वर सदर प्रमाणपत्राची प्रत दाखल केलेली आहे. या प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की सदर मुदतठेवीची परिपक्वता दिनांक 11/2/2014 असून परिपक्वता मुल्य रू.40,018/- एवढे आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराला सदर मुदतठेवीची रक्कम परिपक्वता दिनांक 11/2/2014 ला व त्यानंतरही दिलेली नसल्याने अर्जदाराला मंचात तक्रार दाखल करावी लागलेली आहे. गैरअर्जदाराने प्रस्तूत प्रकरणी मंचाचा नोटीस प्राप्त झाल्यानंतर तक्रारीला उत्तर दाखल केले आहे. परंतु गैरअर्जदारांने अर्जदाराला सदर परिपक्वता रक्कम रू. 40,018/- दिल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही तसेच अर्जदाराचे तक्रारीतील कथन शपथपत्र अथवा दस्तावेज दाखल करून खोडून काढलेले नाही. यावरुन गैरअर्जदार अर्जदाराला सदर परिपक्वता रक्कम रू. 40,018/- देणे लागतो हे सिध्द होते. मंचाच्या मते सदर रक्कम परिपक्वता तिथीला व त्यानंतरही गैरअर्जदाराने अर्जदाराला न देवून अर्जदारांप्रती अनुचीत व्यापार पद्ध्तीचा अवलंब केलेला असून सेवेत त्रुटी दिली असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 3 व 4 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 5 बाबत ः-
8. मुद्दा क्रं. 1 ते 4 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदारांस मुदतठेवीची परिपक्वता रक्कम रूपये 40,018/- व त्यावर परिपक्वता दिनांक 11/2/2014 पासून रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याजासह आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(3) अर्जदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई रु.3000/- व तक्रारखर्च रू.2000/- गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत अर्जदारांस दयावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 25/05/2017