(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक– 05 ऑक्टोंबर, 2019)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 विरुध्द त्याला दोषपूर्ण बॅटरीpsचे ऐवजी नविन बॅटरी मिळावी या कारणा वरुन ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ता हा उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत असून त्याचे मौजा मासळ येथे नखाते मेडीकल स्टोअर्स या नावाने औषधी विक्रीचे दुकान आहे. यातील विरुध्दपक्ष क्रं 1 हा EXIDE INVA TUBULAR, BATCH NO.-1 PF, SERIAL NO.-73112 या बॅटरीचा विक्रेता आहे तर विरुध्दपक्ष क्रं 2 याने सदर बॅटरी विक्रीसाठी बाजारात आणलेली आहे. तक्रारकर्त्याने सदर बॅटरी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता याचे कडून इनव्हाईस क्रं 421 अन्वये दिनांक-25.06.2014 रोजी एकूण रुपये-16,490/- एव्ढया किमतीत त्याचे दुकानातील इनव्हर्टरसाठी खरेदी केली. (याठिकाणी ग्राहक मंचाव्दारे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारकर्त्याने त्याचे मूळ तक्रार अर्जात इन्व्हर्टरसाठीची बॅटरी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता याचे कडून दिनांक-25.06.2015 रोजी खरेदी केल्याचे नमुद केलेले आहे परंतु अभिलेखावरील दाखल इन्व्हाईस अन्वये सदरची तारीख 25.06.2014 अशी नमुद केलेली आहे) त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्याने बॅटरीचे माहितीचा दस्तऐवज तसेच बॅटरी इन्व्हाईस बिल प्रकरणात दाखल केले आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने बॅटरीची वॉरन्टी 48 महिन्याची दिली होती आणि बॅटरीचे माहितीचे दस्तऐवजात तसे नमुद सुध्दा आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, वॉरन्टीचे कालावधीतच त्याने खरेदी केलेली उपरोक्त वर्णनातीत बॅटरी नादुरुस्त झाल्याने ती दुरुस्त करण्यासाठी/बदलविण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याचे दुकानात दिनांक-19 जानेवारी, 2018 रोजी जमा केली व त्यासोबत विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने दिलेले बिल व गॅरन्टीकॉर्ड सुध्दा बॅटरी सोबत दिले होते परंतु त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने बॅटरीची गॅरन्टी 36 महिन्याची असून सदर बॅटरी बदलवून देण्यास तसेच दुरुस्त करुन देण्यास नकार दिला त्यामुळे उभय पक्षां मध्ये शाब्दीक वाद झाला व तुमच्याने जे होते ते करुन घ्यावे अशी धमकी विरुध्दपक्ष क्रं 1 ने दिली, त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर बॅटरी विरुध्दपक्ष क्रं 1 चे दुकानात बदलवून देण्यासाठी ठेवली व तो आपले गावी परत आला. सदर बॅटरी आजही विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याच्या दुकानात ठेवलेली आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने खोटया माहिती व दस्तऐवजाचे आधारे दोषपूर्ण बॅटरीची विक्री करुन तक्रारकर्त्याची आर्थिक फसवणूक केली. वस्तुतः गॅरन्टीचे कालावधीत नादुरुस्त असलेली बॅटरी दुरुस्त करुन अथवा बदलवून देण्याची नैतिक जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांची आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 ने बॅटरी दुरुस्त करुन देण्यास अथवा बदलवून देण्यास नकार दिला त्यामुळे तक्रारकर्त्याने वकीलांचे मार्फतीने दिनांक-05 मार्च, 2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना नोटीस पाठविली. सदरची नोटीस विरुध्दपक्ष क्रं 1 ला मिळूनही त्याने आज पर्यंत दोषपूर्ण बॅटरी बदलवून दिली नाही वा दुरुस्त करुन सुध्दा दिलेली नाही म्हणून शेवटी तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्याव्दारे खालील मागण्या विरुध्दपक्षां विरुध्द केल्यात-
(01) तक्रारकर्त्याने विकत घेतलेली उपरोक्त वर्णनातीत नादुरुस्त बॅटरी वॉरन्टी कालावधीत असल्याने बदलवून देण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे.
(02) दिनांक-19 जानेवारी, 2018 पासून सदर बॅटरी ही विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता याचे जवळ जमा असल्याने व सदर बॅटरी आज पर्यंत बदलवून न दिल्याने तक्रारकर्त्याला झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी रुपये-20,000/-तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-20,000/- अशा रकमा दिनांक-19.01.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्यास देण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे.
(03) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 श्री अर्पीत दिनेश गुप्ता, प्रोप्रायटर अनुराग होम अप्लायन्स, लाखनी, जिल्हा- भंडारा बॅटरी विक्रेता याला ग्राहक मंचा तर्फे पाठविलेली रजिस्टर नोटीस दिनांक-22 सप्टेंबर, 2018 रोजी तामील झाल्याची पोच पान क्रं 20 वर अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी रजि.नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष क्रं 1 हा ग्राहक मंचा समोर उपस्थित झाला नाही म्हणून त्याचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाव्दारे दिनांक-28.02.2019 रोजी पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 व्यवस्थापक, एक्साईड हाऊस, नागपूर याला ग्राहक मंचा तर्फे पाठविलेली रजिस्टर नोटीस दिनांक-22 मार्च, 2019 रोजी तामील झाल्याची पोच पान क्रं 27 वर अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी रजि.नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष क्रं 2 हा ग्राहक मंचा समोर उपस्थित झाला नाही म्हणून त्याचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश ग्राहक मंचाव्दारे दिनांक-04.07.2019 रोजी पारीत केला.
05. तक्रारकर्त्याने पान क्रं 09 वरील दस्तऐवज यादी नुसार अक्रं 01 ते 05 प्रमाणे दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने बॅटरीचे दिलेले वॉरन्टी कॉर्ड व बॅटरीचे दिलेले इन्व्हाईस, विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याला तक्रारकर्त्याने पाठविलेली नोटीस प्रत, वि.प.क्रं 1 ला नोटीस तामील झाल्या बाबत रजिस्टर पोस्टाची पोच, विरुध्दपक्ष क्रं 2 ला रजिस्टर पोस्टाने पाठविलेले नोटीसचे परत आलेले पॉकीट अशा दस्तऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं-28 व 29 वर शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 30 व 31 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच पान क्रं 35 व 36 वर साक्षीदार श्री आसाराम पंढरी कुकसे यांचा शपथेवरील प्रतिज्ञालेख दाखल केला.
06 तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री एन.जी.पांडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. वि.प.क्रं 1 व 2 यांचे विरुध्द तक्रारीत यापूर्वीच तक्रारीमध्ये एकतर्फी आदेश पारीत झालेला आहे.
07. तक्रारकर्ता व त्यांचे वकील श्री एन.जी.पांडे यांनी तक्रार अंतिम निकालासाठी राखीव असताना दिनांक-04.10.2019 रोजी तक्रारीतील मागणीचे परिच्छेदा मध्ये दुरुस्ती करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज पान क्रं-33 व 34 वर दाखल केला परंतु तक्रार निकालपत्रासाठी राखीव असल्याने सदरचा अर्ज ग्राहकमंचाव्दारे नामंजूर करण्यात आला.
08. तक्रारकर्त्याची तक्रार, शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच त्याने दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन ग्राहक मंचाव्दारे करण्यात आले, त्यावरुन ग्राहक मंचा समोर न्यायनिवारणार्थ खालील मुद्ये उपस्थित होतात-
अक्रं | मुद्या | उत्तर |
1 | तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 चा ग्राहक होतो काय? | -होय- |
2 | विरुध्दपक्ष क्रं 1 ने बॅटरी गॅरन्टीमध्ये असतानाही बॅटरी तक्रारकर्त्याला दुरुस्त करुन दिली नाही वा बदलवून दिली नसल्याने दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय ? | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशानुसार |
:: कारण मिमांसा ::
मुद्दा क्रं 1 व 2 -
09. तक्रारकर्त्याने EXIDE INVA TUBULAR, BATCH NO.-1 PF, SERIAL NO.-73112 ही बॅटरी त्याचे औषधी दुकानातील इनव्हर्टरसाठी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता याचे कडून इनव्हाईस क्रं 421 अन्वये दिनांक-25.06.2014 रोजी एकूण रुपये-16,490/- एवढया किमतीत खरेदी केली होती ही बाब पान क्रं 13 वरील टॅक्स इन्व्हाईसचे प्रतीवरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 याने सदर बॅटरी विक्रीसाठी बाजारात आणलेली आहे परंतु या संबधात कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर आलेला नाही त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्रं 1 बॅटरी विक्रेत्याचा ग्राहक होतो, त्यामुळे आम्ही मुद्या क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
10. तक्रारकर्त्याने पान क्रं-12 वर सदर एक्साईड बॅटरीचे वॉरन्टीचा दस्तऐवज दाखल केलेला आहे. त्यानुसार सदर एक्साईड बॅटरी BATCH NO.-1 PF, SERIAL NO.-73112 वर वॉरन्टी 48 महिन्याची नमुद केलेली आहे.
11. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने सदरची एक्साईड बॅटरी ही विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता यांचे कडून दिनांक-25.06.2015 रोजी खरेदी केली होती तसेच पान क्रं 10 व 11 वरील तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना पाठविलेल्या नोटीस मध्ये सुध्दा त्याने सदरची बॅटरी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता याचे कडून दिनांक-25.06.2015 रोजी खरेदी केल्याचे नमुद केले आहे. ईतकेच नव्हे तर तक्रारकर्त्याचे शपथपत्रात तसेच तक्रारकर्त्या तर्फे श्री आसाराम पंढरी कुकसे साक्षीदार याने जे शपथपत्र ग्राहक मंचा समोर दाखल केले त्यामध्ये सुध्दा बॅटरी ही दिनांक-25.06.2015 रोजी खरेदी केल्याचे नमुद केलेले आहे.
12. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे वॉरन्टीचे कालावधीतच त्याने खरेदी केलेली उपरोक्त वर्णनातीत बॅटरी नादुरुस्त झाल्याने ती दुरुस्त करण्यासाठी/बदलविण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याचे दुकानात दिनांक-19 जानेवारी, 2018 रोजी जमा केली व त्यासोबत विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने दिलेले बिल व गॅरन्टीकॉर्ड सुध्दा बॅटरी सोबत दिले होते परंतु त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने बॅटरीची गॅरन्टी 36 महिन्याची असून सदर बॅटरी बदलवून देण्यास तसेच दुरुस्त करुन देण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याने नादुरुस्त बॅटरी दुरुस्त करण्यासाठी/बदलविण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याचे दुकानात दिनांक-19 जानेवारी, 2018 रोजी जमा केली होती याबद्यल स्वतःचा शपथेवरील पुरावा आणि साक्षीदार श्री आसाराम पंढरी कुकसे यांचे शपथपत्र ग्राहक मंचा समोर दाखल केले. तक्रारकर्त्या तर्फे साक्षीदार श्री आसाराम पंढरी कुकसे यांचे प्रतिज्ञालेखा प्रमाणे तो तक्रारकर्त्याचे औषधीचे दुकानात ड्रायव्हरचे काम करतो आणि त्याचे सोबत जाऊन तक्रारकर्त्याने सदर नादुरुस्त बॅटरी ही विरुध्दपक्ष क्रं 1 चे दुकानात दिनांक-19 जानेवारी, 2018 रोजी जमा केली होती परंतु वॉरन्टी 36 महिन्याची आहे ती दुरुस्त होत नाही असे वि.प.क्रं 1 विक्रेत्याने सांगितल्याने शाब्दीक चकामक झाली होती आणि आजही बॅटरी वि.प.क्रं 1 चे दुकानात जमा आहे असे नमुद केलेले आहे.
13. दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, तक्रारकर्त्याने बॅटरी खरेदीचे मूळ बिल दाखल केलेले नाही, त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने नादुरुस्त बॅटरी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याला देताना सोबत मूळ बिल सुध्दा दिले. तक्रारकर्त्याने पान क्रं 13 वर एक्साईड बॅटरी संबधात टॅक्स इन्व्हाईसची प्रत दाखल केलेली असून त्यानुसार टॅक्स इन्वहाईस क्रं 421 असून दिनांक-25.06.2014 असून बॅटरीची किम्मत रुपये-16,490/- नमुद असून टॅक्स ईन्व्हाईसवर “Net Balance Rupees Rs.16,490/- असे नमुद आहे. त्यामुळे येथे प्रश्न असा निर्माण होतो की, तक्रारकर्त्याने दिनांक-25.06.2014 रोजीचे टॅक्स इन्व्हाईस प्रमाणे सदरची बॅटरी खरेदी केली होती कि त्याचे तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे त्याने सदरची एक्साईड बॅटरी दिनांक-25.06.2015 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याचे दुकानातून नगदीने खरेदी केली होती. टॅक्स इन्वाईस वरील दिनांक-25.06.2014 जर हिशोबात धरला तर तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने दिनांक-19 जानेवारी, 2018 रोजी नादुरुस्त बॅटरी विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याचे दुकानात जमा केली होती. वॉरन्टीचे दस्तऐवज नुसार खरेदी दिनांका पासून 48 महिन्याची वॉरन्टी असल्याचे नमुद आहे म्हणजेच दिनांक-25.06.2014 पासून चार वर्ष म्हणजे दिनांक-25.06.2018 रोजी वॉरन्टी संपुष्टात येते. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याचे दुकानात दिनांक-19 जानेवारी, 2018 रोजी सदरची बॅटरी दुरुस्त करुन देण्यासाठी/बदलवून देण्यासाठी जमा केली होती. यावरुन असे दिसून येते की, टॅक्स इन्व्हाईसवरील दिनांका प्रमाणे सुध्दा सदर एक्साईड बॅटरीची वॉरन्टी संपलेली नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 ने बॅटरी दुरुस्त करुन देण्यास अथवा बदलवून देण्यास नकार दिला त्यामुळे तक्रारकर्त्याने वकीलांचे मार्फतीने दिनांक-05 मार्च, 2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना नोटीस पाठविली. सदरची नोटीस विरुध्दपक्ष क्रं 1 बॅटरी विक्रेत्याला मिळूनही त्याने आज पर्यंत दोषपूर्ण बॅटरी बदलवून दिली नाही वा दुरुस्त करुन सुध्दा दिलेली नाही या बाबत पुरावा म्हणून तक्रारकर्त्याने पान क्रं 10 व 11 वर रजिस्टर नोटीसची प्रत तसेच पान क्रं 14 वर विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याला रजिस्टर नोटीस मिळाल्याची पोच सादर केलेली आहे. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 बॅटरी विक्रेत्याने तक्रारकर्त्याचे नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही वा कोणताही प्रतिसाद दिलेला नाही असे दिसून येते.
14. तक्रारकर्त्याने तक्रारीत विरुध्दपक्ष क्रं 2 ज्याने एक्साईड बॅटरी विक्री करण्यासाठी बाजारात आणली त्यांना प्रतिपक्ष केलेले आहे परंतु एक्साईड बॅटरीचे निर्मात्याला प्रतिपक्ष केलेले नाही. विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ज्याने एक्साईड बॅटरी बाजारात विक्रीसाठी आणली यांना ग्राहक मंचा तर्फे पाठविलेली रजि.नोटीस मिळूनही ते ग्राहक मंचा समोर उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी तक्रारकर्त्याने त्यांचे विरुध्द केलेली विपरीत विधाने खोडून काढलेली नाहीत म्हणून विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विरुध्द प्रस्तुत तक्रारीत एकतर्फी आदेश ग्राहक मंचाने पारीत केलेला आहे. अशा परिस्थितीत विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने एक्साईड बॅटरी जी तक्रारकर्त्याला विक्री केली होती ती विरुध्दपक्ष क्रं 2 यांचे कडून विकत आणली होती या बद्यल कोणताही सक्षम पुरावा ग्राहक मंचा समोर आलेला नाही.
15. उपरोक्त नमुद केलेली वस्तुस्थिती पाहता तक्रारकर्त्याची तक्रार त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजाचे व दाखल पुराव्याचे आधारे गुणवत्तेवर (On Merit) निकाली काढण्यास ग्राहक मंचास काहीही हरकत नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याला रजिस्टर पोस्टाव्दारे पाठविलेली नोटीस मिळूनही त्याने तक्रारकर्त्याचे नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही वा प्रतिसाद दिलेला नाही. त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचात दाखल केल्या नंतर ग्राहक मंचाची रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस मिळून सुध्दा तो ग्राहक मंचा समोर उपस्थित झालेला नाही व त्याने त्याचे विरुध्द तक्रारकर्त्याने तक्रारीतून केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत. अशापरिस्थिीत तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजी पुराव्यां वरुन तसेच त्याने दाखल केलेल्या शपथपत्रांवरुन तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 बॅटरी विक्रेत्याचे विरुध्द मंजूर होण्यास पात्र आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 कडूनच विरुध्दपक्ष क्रं 1 बॅटरी विक्रेत्याने बॅटरी विक्रीसाठी आणली होती यासंबधी कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर न आल्याने विरुध्दपक्ष क्रं 2 विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 अर्पीत दिनेश गुप्ता प्रोप्रायटर अनुराग होम अप्लायंस लाखनी, जिल्हा भंडारा या एक्साईड बॅटरी विक्रेता याचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 अर्पीत दिनेश गुप्ता प्रोप्रायटर अनुराग होम अप्लायंस लाखनी, जिल्हा भंडारा याला आदेशित करण्यात येते की, तक्रारकर्त्याची नादुरुस्त एक्साईड बॅटरी ही विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याचे दुकानात जमा असल्याने त्याऐवजी त्याच मॉडलेची नविन एक्साईड बॅटरी तक्रारकर्त्या कडून कोणतेही शुल्क न आकारता तक्रारकर्त्याला द्यावी आणि त्यावर नविन बॅटरी दिल्याचे दिनांका पासून नव्याने वॉरन्टी द्यावी व तसे वॉरन्टीकॉर्ड व बिल तक्रारकर्त्याला द्यावे.
- तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-2000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 अर्पीत दिनेश गुप्ता प्रोप्रायटर अनुराग होम अप्लायंस लाखनी, जिल्हा भंडारा बॅटरी विक्रेता याने तक्रारकर्त्याला द्याव्यात.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 अर्पीत दिनेश गुप्ता प्रोप्रायटर अनुराग होम अप्लायंस लाखनी, जिल्हा भंडारा या बॅटरी विक्रेत्याने प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- विरुध्दपक्ष क्रं 2 व्यवस्थापक, एक्साईड हाऊस, नागपूर याचे विरुध्द कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर न आल्याने त्याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रमाणित सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारकर्त्याला “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.