::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 08.11.2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. सदर फिर्याद ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली. सदर तक्रारीचा सारांश खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे आरोग्य धन वर्षा डेव्हलोपर्स अँड अलाइड लि. या स्किम मध्ये दि. 1/4/2013 रोजी रु.2,00,000/- प्लॅन-पी33 मध्ये गुंतविली ज्याची वैधता दि. 1/4/2019 पर्यंत होती. विरुध्दपक्षाने या बाबत तक्रारकर्त्यास प्रमाणपत्र क्र. ADVMHOR0006004 दिले. विरुध्दपक्षाने आश्वासनाप्रमाणे दि. 5/11/2014 पर्यंत म्हणजेच 14 महिन्यात प्रत्येक महिन्याला रु. 2800/- प्रमाणे व्याज तक्रारकर्त्याच्या खात्यात जमा केले. तक्रारकर्त्यास सदर रकमेची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाला सदर पैसे परत करण्यासंबंधी वारंवार तोंडी सुचना देऊन तसेच दि. 24/9/2013 रोजी ई-मेल द्वारे सुध्दा सुचना दिली. परंतु सदर सुचनेकडे विरुध्दपक्षाने लक्ष दिले नाही. विरुध्दपक्षाने आश्वासनाप्रमाणे कोणतीही रक्कम न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने वकीलामार्फत दि. 29/7/2015 रोजी नोटीस पाठविली. परंतु विरुध्दपक्षाने त्याची पुर्तता केली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने ही तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व तक्रारकर्त्याने गुंतवणुक केलेली रक्कम रु.2,00,000/- व त्यावर प्रतिमाह रु. 2800/- प्रमाणे दि. 5/11/2014 पासून 5/1/2016 पर्यंतचे व्याज, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु. 2,00,000/- व प्रकरणाचा खर्च रु. 3000/- तसेच नोटीस खर्च रु. 3000/- देण्याचा आदेश विरुध्दपक्षास व्हावा.
तक्रारकर्त्याने सदर तक्रारीसोबत एकूण 12 दस्तऐवज दाखल केलेले आहेत.
2. प्रस्तुत प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 यांची नोटीस परत आल्यानंतर वर्तमानपत्रात जाहीरात देऊन नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांना नोटीस मिळून सुध्दा ते मंचात हजर झाले नाहीत. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचे विरुध्द सदर प्रकरण “एकतर्फी” चालविण्यात आले.
3. त्यानंतर तक्रारकर्ते यांचेतर्फे लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्ते यांची तक्रार, तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्तऐवज यांचे आधारे सदर प्रकरण निकाली काढण्यात आले. कारण विरुध्दपक्ष क्र. 1 यांची नोटीस परत आल्यानंतर वर्तमानपत्रात जाहीरात देऊन नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांना नोटीस मिळून सुध्दा ते मंचात हजर झाले नाहीत. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचे विरुध्द सदर प्रकरण “एकतर्फी” चालविण्यात आले.
5. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्त क्र.12 वरुन तक्रारकर्त्याने आरोग्य धनवर्षा डेव्हलपर्स ॲड अलाइड लिमिटेड, उज्जैन या संस्थेमध्ये दि.1/4/2013 रोजी रु.2,00,000/- प्लॅन पी-33 योजनेमध्ये विरुध्दपक्षाकडे रक्कम गुंतविली ज्याची वैधता दि.1/4/2019 पर्यंत होती. तक्रारकर्त्याने पैशांची गुंतवणुक केल्यानंतर व सर्व बाबी पुर्ण केल्यानंतर विरुध्दपक्षाने पैसे भरल्याची पावती व प्रमाणपत्र दिले आहे. दस्त क्र.13 वरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्षाने दि.5/11/2014 पर्यंत प्रतिमाह रु.2800/- व्याजापोटी तक्रारकर्त्याच्या खात्यामध्ये विरुध्दपक्षाने जमा केले आहे. दाखल ई-मेल प्रतीवरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याला सदर रकमेची अत्यंत आवश्यकता असल्याने तक्रारकर्त्याने सदर रक्कम परत मागीतली आहे. दस्त क्र.22 नुसार असे दिसते की, तक्रारकर्त्याने दि.29/7/2015 रोजी विरुध्दपक्षाला वकीलामार्फत नोटीस सुध्दा पाठविली होती. दाखल दस्त असे दर्शवितात की, सदर रक्कम परत मागणारी नोटीस विरुध्दपक्षाला मिळून देखील विरुध्दपक्षाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. विरुध्दपक्ष हे गुंतवणुकदार व तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे ठेवीदार असल्याचे सिध्द होत असल्याने, तक्रारकर्ते हे विरुध्दपक्षाचे “ग्राहक” असल्याचे ग्राह्य धरण्यात येते.
3. तक्रारकर्त्याच्या तक्रारीवरुन, तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्षाकडे पैसे गुंतविले होते, परंतु सदर ठेवीची रक्कम तक्रारकर्ते यांनी मागणी केल्यावरही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला त्यांची रक्कम परत केली नाही. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या कुठल्याच मागणीची पुर्तता न केल्याने तक्रारकर्त्याला सदर तक्रार मंचात दाखल करावी लागली, असे दिसते.
4. तक्रारकर्त्याने गुंतवणुक केलेल्या दस्तांच्या छायांकित प्रती मंचासमक्ष दाखल केल्या आहेत. दाखल दस्तांवरुन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रु. 2,00,000/- ( रुपये दोन लाख ) गुंतविलेले दिसून येतात व सदर रकमेवर विरुध्दपक्षाने दि. 5/11/2014 पर्यंत व्याज दिल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता सदर रक्कम रु. 2,00,000/- व्याजासह, मिळण्यास पात्र असल्याचे मंचाच्या निदर्शनास आलेले आहे.
सदर प्रकरणामध्ये विरुध्दपक्षाला नोटीस मिळून व वर्तमान पत्रात नोटीस जाहीर करुन सुध्दा मंचात हजर झाले नाही व तक्रारकर्त्याचे मुद्दे खोडून काढले नाहीत. यावरुन मंचाने दाखल दस्तांचे अवलोकन करुन, सदर ठेव रक्कम परत न दिल्याने सेवा देण्यात त्रुटी केल्याच्या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
सबब अंतिम आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे……
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते
- विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीक वा संयुक्तपणे तक्रारकर्त्यास त्याची ठेव रक्कम रु. 2,00,000/- ( रुपये दोन लाख फक्त) परत करावी व या रकमेवर दि. 5/11/2014 पासून प्रत्यक्ष अदाई पर्यंत दरसाल दरशेकडा 8 टक्के व्याज दराने, व्याजाची रक्कम द्यावी. तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई रु. 5000/- (रुपये पाच हजार ) व प्रकरणाचा खर्च रु. 2000/- (रुपये दोन हजार ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावी.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना नि:शुल्क देण्यात याव्या.