श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 5 नोव्हेंबर 2011
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार क्र.1 यांनी त्यांच्या अज्ञान मुलाच्या नावे जाबदेणार क्र.1 यांच्याकडून यो स्पीड बाईक दिनांक 21/11/2007 रोजी खरेदी केली होती. तक्रारदार क्र.2 यांनी यो बाईक स्वत:च्याच नावे जाबदेणार क्र.1 यांच्याकडून दिनांक 7/11/2007 रोजी खरेदी केली होती. बाईक रिचार्जेबल बॅटरीवर चालणारी होती. एक वर्षाची वॉरंटी होती. खरेदी केल्यापासून 15 दिवसातच बाईकचा लाईट सुरु होत नव्हता, स्टॅन्ड बरोबर नव्हते, सेन्सर्स सदोष होते, कोटेशन मध्ये नमूद केल्याप्रमाणे माईलेज नव्हते, गाडी रस्त्यातच बंद पडायची, हॅन्डलमध्ये समस्या होती, ब्रेक बरोबर कार्यरत नव्हते, अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. बाईक रस्त्यातच बंद पडल्यामुळे 7 कि.मी पर्यन्त ओढत सर्व्हिस स्टेशन मध्ये न्यावी लागली. बाईक मधील समस्यासंदर्भात वारंवार जाबदेणार यांना लेखी व तोंडी कळविण्यात आले होते परंतू त्याची दखल घेतली गेली नाही. तक्रारदार क्र.2 यांना कंपनीकडून त्यांची मुळ कागदपत्रे – आर.टी.ओ बुक, आर.सी बुक व इतर कागदपत्रे परत मिळाली नाहीत. तक्रारदार क्र.2 यांनी रहिवासी दाखला, विजेचे बील जाबदेणार यांना दिले होते. जाबदेणार यांनी वारंवार आश्वासने देऊनही तक्रारदार क्र.2 यांना मुळ कागदपत्रे परत केली नाहीत. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार क्र.1 व 2 जाबदेणार यांच्याकडून बाईक ऐवजी बाईकची किंमत परत मागतात व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी संयुक्तरित्या लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदार क्र.1 यांनी बाईक खरेदी केल्यानंतर ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्यांचे निराकरण करण्यात आले होते, बाईक 50 कि.मी तक्रारदारांसमोर चालविण्यात आली होती तक्रारदारांनी समाधानी असल्याचे लिहून दिल्यानंतर गाडी परत करण्यात आली होती. जाबदेणारांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार क्र. 2 यांनी वॉरंटी कालावधीत सर्व्हिसींग करुन घेतलेले नव्हते तरीदेखील वॉरंटी कालावधीतील फायदे देण्यात आले होते. जॉब कार्ड क्र 2217 नुसार गाडीचे दिनांक 16/6/2008 रोजी रनिंग 2737 कि.मी होते तर तक्रारदारांनी मान्य केल्याप्रमाणे 24/9/2008 रोजी 2786 कि.मी रनिंग होते. 11/5/2009 रोजी गाडीचे रनिंग 5602 कि.मी होते. तक्रारदार क्र. 2 यांनी दिनांक 27/2/2008 रोजी विमा पॉलिसी, स्मार्ट कार्ड, आर.टी.ओ टॅक्स पावती स्वत: येऊन घेऊन गेले होते. स्मार्ट कार्डमधील दुरुस्तीसाठी तक्रारदार क्र.2 यांनी ते परत केले होते. दुरुस्तीनंतर स्मार्ट कार्ड व गाडी पहाणी करण्यासाठी कंपनी प्रतिनिधी तक्रारदारांच्या घरी तीन वेळा गेले परंतू घर बंद होते. वॉरंटी कालवधीत बाईकचे काही भाग नि:शुल्क बदलून देण्यात आलेले आहेत. सेवेत त्रुटी नाही. म्हणून तक्रार नामंजुर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार क्र.1 व 2 करतात. सोबत शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. जाबदेणार क्र.3 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. दोन्ही तक्रारदारांच्या तक्रारीस घटना घडण्याचे कारण वेगळे असल्याने तक्रार मेन्टेनेबल नाही. तक्रारदार क्र.1 यांनी बाईक खरेदी केल्यापासून 18 महिने वापरलेली आहे, वॉरंटी कालावधीत बाईकचे काही भाग नि:शुल्क बदलून देण्यात आलेले आहेत. बाईकमध्ये उत्पादकीय दोष नाहीत. तक्रारदार क्र.1 यांची बाईक दिनांक 30/11/2007 रोजी चार्जींग वायर एक्सटेन्शनसाठी दुरुस्त करण्यात आली होती. दिनांक 20/12/2007 मध्ये बाईकमध्ये काही लहान समस्या निर्माण झाल्या होत्या परंतू त्यांचे निराकरण करण्यात आले होते. नटबोल्ड लुज होणे, तसेच स्टॅन्ड मधील समस्या तक्रारदारांच्या चुकीच्या गाडी चालविण्याच्या पध्दतीमुळेही निर्माण होऊ शकतात. तक्रारदारांनी जाबदेणार यांनी दिलेल्या सुचनांचे पालन न केल्यामुळे माईलेज समस्या निर्माण झाली होती. तक्रारदार क्र.1 यांच्या बाईकची बॅटरी नि:शुल्क बदलून देण्यात आली होती. तक्रारदार क्र.1 यांच्या बाईकला अपघात झाल्यामुळे प्रतिनिधी पाठवून दिनांक 15/5/2008 रोजी बाईक दुरुस्त करण्यात आली होती. दिनांक 11/5/2009 रोजी सर्व्हिस स्टेशनला बाईक आणून 50 कि.मी चालवून तपासून पहाण्यात आली होती, तक्रारदारांनी समाधानी असल्याचे पत्र दिल्यानंतर गाडी परत करण्यात आली होती. तक्रारदार क्र.2 यांना सर्व्हिस स्टेशनला बाईक ठेवण्यास सांगूनही त्यांनी तसे केले नाही. तक्रारदार क्र.2 यांना आर.टी.ओ, विमा पॉलिसी, टॅक्स पावती ही कागदपत्रे देण्यात आली होती. तक्रारदार क्र.2 यांना नि:शुल्क आर.टी.ओ रजिस्ट्रेशन करुन देण्यात आले होते. परत कागदपत्रे दुरुस्त करुन व बाईक अटेन्ड करण्यासाठी तक्रारदारांच्या घरी प्रतिनिधी पाठविण्यात आला होता, परंतू तक्रारदारांचे घर बंद होते. तक्रारदारांनी परत संपर्क साधला नाही. तक्रारदारांच्या बाईकचे 2865 कि.मी. रनिंग झालेले आहे. जाबदेणार यांच्या सेवेत त्रुटी नाही. म्हणून तक्रारअर्ज नामंजुर करण्यात यावा अशी मागणी जाबदेणार क्र.3 करतात. जाबदेणार क्र.3 यांनी प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.
4. तक्रारदारांनी प्रतिउत्तर दाखल करुन लेखी जबाब नाकारला. लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार क्र. 1 व 2 हे जाबदेणार यांचे ग्राहक आहेत, दोघांनी एकत्रितपणे जरी तक्रार दाखल केलेली असली, तरी घटना घडण्याचे कारण वेगवेगळे आहे, बाईकमधील समस्या व कागदपत्रांसदर्भातील प्रस्तूतची तक्रार असल्याने ती मा. मंचापुढे चालू शकते असे मंचाचे मत आहे. जाबदेणार क्र.3 यांनी त्यांच्या लेखी जबाबात पान क्र.5 मध्ये 30/11/2007 रोजी, 20/12/2007 रोजी तक्रारदार क्र.1 यांच्या बाईकमध्ये काही समस्या वॉरंटी कालावधीतच निर्माण झाल्या होत्या हे मान्य केलेले आहे. त्या समस्यांचे निराकरण तसेच बॅटरी रिप्लेसमेंटदेखील वॉरंटी कालावधीतच करुन देण्यात आलेले असल्याचे दिसून येते. यावरुन बाईक खरेदी पासूनच त्यात वारंवार समस्या निर्माण होत होत्या हे निदर्शनास येते. जाबदेणार क्र.3 यांनी दिनांक 11/5/2009 चे पत्र दाखल केलेले आहे. सदरहू पत्र तक्रारदार क्र.1 यांना लिहीलेले असून गाडी दुरुस्त करण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आलेले आहे परंतू त्या पत्राखाली तक्रारदारांनी “गाडीचे काम समाधानकारक झालेले नाही. आहे तेच प्रॉब्लेम्स पुन्हा पुन्हा येत आहेत. तरी कृपया गाडीचे काम लक्षपुर्वक करुन देण्यात यावे .. ” असा रिमार्क लिहील्याचे निदर्शनास येते. तक्रारदारांनी दाखल केलेल्या दिनांक 11/5/2009 च्या पत्राचे अवलोकन केले असता तक्रारदार क्र.2 यांना दिनांक 11/5/2009 रोजी फक्त आर.टी.ओ दुरुस्त कागदपत्रे, स्मार्ट कार्ड, आर.सी.टी.सी कागदपत्रे मिळाल्याचे दिसून येते, विम्याचे कागदपत्रे त्यांना प्राप्त झालेली नव्हती. यावरुन तक्रारदार क्र.2 यांना कागदपत्रेदेखील गाडी खरेदीपासून दीड वर्षानी, प्रस्तूत तक्रार मा. मंचासमोर दाखल केल्यानंतर मिळाल्याचे दिसून येते. यावरुन जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते. तक्रारदारांनी बाईक खरेदी केल्यानंतर वॉरंटी कालावधीतच समस्या निर्माण झाल्याने तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. तसेच गाडीसंदर्भातील कागदपत्रे विलंबाने मिळाल्यामुळे देखील निश्चितच त्रास सहन करावा लागला असणार असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार क्र.1 व 2 नुकसान भरपाईपोटी अनुक्रमे रक्कम रुपये 15,000/- व रुपये 10,000/- जाबदेणार यांच्याकडून मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदार क्र.1 व 2 यांची यो बाईक रस्त्यावर चालण्याजोगी सुस्थितीत करुन दयावी.
3. जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदार क्र.1 यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 15,000/- व तक्रारदार क्र.2 यांना नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
4. जाबदेणार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदार क्र.1 व 2 यांना तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रुपये 1,000/- अदा करावी.
5. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.