::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 12/04/2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्ते हे अकोला येथील रहीवाशी असून, विरुध्दपक्ष क्र. 2 हे विरुध्दपक्ष क्र. 1 ने तयार केलेल्या कर्ण यंत्राचे अधिकृत विक्रेते आहेत. विरुध्दपक्ष क्र. 2 च्या चंद्रपुर, अकोला, वाशिम व धुळे या जिल्हयात शाखा आहेत. तक्रारकर्ते हे चंद्रपुरला वास्तव्यास असतांना त्यांनी कानाच्या त्रासाबद्दल डॉ. किशोर धांडे यांचेकडे उपचार केला. डॉ. किशोर धांडे यांनी तक्रारकर्त्यास कर्णयंत्र घेण्याकरिता विरुध्दपक्ष क्र. 2 चा चंद्रपुर येथील पत्ता सांगितला. त्यानंतर काही दिवासांनी म्हणजे दि. 17/1/2014 रोजी तक्रारकर्ते विरुध्दपक्ष् क्र. 2 च्या दुकानात कर्णयंत्र घेण्यास गेले व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सांगितल्याप्रमाणे व त्यांचेवर विश्वास ठेऊन तक्रारकर्ते यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 निर्मित डीजीटल बीटीई कर्णयंत्र विरुध्दपक्ष क्र. 2 कडे डिस्काउंट कापुन रु. 17,400/- चे कर्णयंत्र रु. 1000/- देऊन बुक केले. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सांगितल्यानुसार, अकोला येथे डॉ.खेरडे हॉस्पीटल येथे त्यांची शाखा असल्याने तेथून कर्णयंत्र खरेदी करावे. त्यानुसार तक्रारकर्ता अकोला येथे आल्यावर दि. 23/1/2014 रोजी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 च्या अकोला येथील शाखेतून सदर कर्णयंत्र रु. 16,400/- देऊन खरेदी केले. सदर मशीनची वारंटी ही दोन वर्षांची आहे. परंतु सदर मशिन फक्त आठ दिवस चांगली चालली व त्यानंतर मशिनव्दारे ऐकु येणे बंद झाले. त्यावेळी तक्रारकर्ते सदर मशिन घेऊन विरुध्दपक्ष क्र. 2 च्या अकोला कार्यालयात गेले व त्यांनी सदर मशिन त्यांनी त्यांचेकडे जवळपास एक महिना ठेऊन घेतली. त्यानंतर सदर मशिन तक्रारकर्त्याला परत केली. परंतु त्या नंतर सुध्दा फक्त दोन तिन दिवसच सदर मशिन व्यवस्थीत चालली व पुन्हा सदर मशिनव्दारे तक्रारकर्त्यास ऐकु येणे बंद झाले. त्यानंतर बऱ्याच वेळा सदर मशिनची तक्रार घेऊन तक्रारकर्ते विरुध्दपक्ष क्र. 2 कडे गेले परंतु विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी ऑक्टोबर 2014 मध्ये जेंव्हा तक्रारकर्ते सदर मशिन गैरअर्जदार क्र. 2 चे अकोला कार्यालयात घेऊन गेले त्यावेळी विरुदपक्ष क्र. 2 यांनी सांगितले की, या मशिनव्दारे तक्रारकर्त्यास ऐकु येणार नाही व चांगले ऐकु येण्याकरिता रु. 50,000/- ची मशिन विकत घ्यावी. अशा प्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्ते यांना उत्पादकिय दोष असलेली मशीन विकत दिली. तक्रारकर्ते यांनी दि. 3/11/2014 रोजी रजिस्टर पोच पावतीसह विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून कर्णयंत्र बदलून देण्याची अथवा मशिनची किंमत परत करण्याची सुचना दिली. सदर नोटीसची तामिल होऊन सुध्दा विरुध्दपक्षाने सदर नोटीसची पुर्तता केली नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे व कर्णयंत्रासंबंधीच्या दोषांचे कुठलेही निराकरण वारंटीच्या काळामध्ये केले नाही अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवेमध्ये त्रुटी दर्शवून अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करावी व विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर कर्णयंत्र परत घेऊन तक्रारकर्त्याला सदर कर्णयंत्राची किंमत रु. 17,400/- व्याजासह परत करावी. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. 10,000/- नोटीसचा खर्च रु.1000/- व तक्रार खर्च रु. 5000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास द्यावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 09 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र.1 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल केला असून त्यानुसार त्यांनी तक्रारीतील आरोप नाकबुल करुन, अधिकचे कथनात असे नमुद केले की, हे म्हणणे खरे आहे की, अर्जदाराने विरुध्दपक्ष क्र.1 चे अधिकृत विक्रेता विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दि. 17/01/2014 रोजी डिजीटल कर्णयंत्र विकत घेतले होते. सदर यंत्राची डिलीव्हरी चंद्रपुर येथूनच झाली असल्यामुळे सदरहू प्रकरण वि मंचाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील आहे. सदर यंत्र जवळपास 10 ते 11 महिने विनादोष व व्यवस्थीतपणे चालले व आज सुध्दा व्यवस्थीतपणे सुरु असेल कारण सदरहु यंत्र हे 3 ते 4 वेळेस विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सुधरविण्याठी आले होते, परंतु सदरहू यंत्रामध्ये कोणताही दोष नसल्या कारणाने 2/4 दिवसानंतर सदरहू यंत्र परत तक्रारकर्त्याला देण्यात आले. तक्रारकर्त्याचे समाधान झाल्यानंतरच सदर यंत्र परत नेले. तक्रारकर्त्याचे खुप वय झाल्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला डॉक्टरकडे कान चेक करण्याची विनंती केली. सदर यंत्रामध्ये कोणताही बिघाड नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 ची अकोला येथे कोणत्याही प्रकारची शाखा नसून ते फक्त कॅम्पसाठी व रुग्णांच्या सेवेसाठी अकोला येथे हजर राहतात. सदर डिजीटल यंत्र धुळ व इतर कारणामुळे बिघडू शकते. सदरहु यंत्र आज रोजी वारंटीमध्ये असल्यामुळे जर एखादे दोष असल्यास ते मंचासमोर दुरुस्त करुन देऊ शकतात. सदर यंत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, व असल्यास विरुध्दपक्ष दुरुस्त करुन देण्याची हमी देतो. सदर तक्रार विरुध्दपक्षाला त्रास देण्यासाठी दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
सदर लेखी जवाब विरुध्दपक्षाने प्रतिज्ञालेखावर दाखल केला
विरुध्दपक्ष क्र.2 यांचा लेखीजवाब :-
विरुध्दपक्ष क्र. 2 यांना सदर प्रकरणाची नोटीस बजावणी होऊनही ते गैरहजर असल्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 च्या विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने दि. 22/4/2015 रोजी पारीत केला.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार व सोबत दाखल केलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 ने दाखल केलेला लेखी जबाब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यांचा अहवाल व उभय पक्षांचा तोंडी युक्तीवाद, यांचा सखोल अभ्यास करुन मंचाने निष्कर्ष काढला तो येणे प्रमाणे.
तक्रारकर्त्याचा युक्तीवाद असा आहे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून विरुध्दपक्ष क्र. 1 ने तयार केलेले डिजीटल बीटीई कर्ण यंत्र रु. 17,400/- या किंमतीत अकोला येथे पुर्ण रक्कम अदा करुन विकत घेतले होते. सदर मशिनची वॉरंटी ही दोन वर्षाची होती. परंतु सदर मशिनने फक्त आठ दिवसच तक्रारकर्त्याला चांगले ऐकु आले. त्यानंतर या मशिनव्दारे तक्रारकर्त्यास ऐकु येणे बंद झाले. म्हणून विरुध्दपक्ष क्र. 2 कडे सदर मशिन जवळपास एक महिना ठेवण्यात आली होती. त्यानंतर विरध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर मशिन तक्रारकर्त्याला परत केली. परंतु तेंव्हा सुध्दा ही मशिन एक ते दोन दिवस चांगली चालली व या मशिनव्दारे तक्रारकर्त्यास ऐकु येणे बंद झाले होते. म्हणून पुन्हा सदर मशिन व्यवस्थित करण्यासाठी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे 15 ते 20 दिवस ठेवून घेण्यात आली होती. परंतु त्या नंतर मशिन निट चालली नाही. विरुध्दपक्ष क्र. 2 हे दर महिन्याच्या 7 व 23 तारखेला अकोला येथील श्री खेरडे यांच्या हॉस्पीटलमध्ये येत असतात, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर मशिन अकोला येथे तक्रारकर्त्याला देवून असे सांगितले की, त्यांना चांगले ऐकु येण्याकरिता रु. 50,000/- ची मशिन घ्यावी लागेल. अशा तऱ्हेने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी अनुचित व्यापार प्रथा अवलंबिली आहे व सदर कर्ण यंत्रासंबंधीच्या दोषाचे कुठलेही निराकरण वॉरंटी कालावधीत विरुध्दपक्षाने केलेले नाही.
यावर विरुध्दपक्ष क्र. 1 चा युक्तीवाद असा आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 च्या अधिकृत विक्रेत्याकडून डिजीटल कर्ण यंत्र विकत घेतले होते. परंतु सदर यंत्राची डिलेव्हरी चंद्रपुर येथून झाल्यामुळे अकोला ग्राहक मंचाला प्रकरण चालविण्याचे अधिकारक्षेत्र नाही. या कर्ण यंत्रात कोणताही दोष नाही, कारण हे यंत्र तिन ते चार वेळेस विरुध्दपक्ष क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी आले होते. परंतु त्यात दोष आढळला नसल्यामुळे ते तक्रारकर्त्याला परत केले. तक्रारकर्त्याला पुन्हा कान चेक करणे भाग आहे. वेळोवेळी तक्राकरर्त्याने हे कर्ण यंत्र विरुध्दपक्षाने तपासलेले आहे. सदरहू कर्ण यंत्र हे डिजीटल असल्यामुळे त्यामध्ये दोष असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सदरहू यंत्र हे आज रोजी वारंटी कालावधीत असल्यामुळे, जर एखादा दोष असल्यास तो दुरुस्त करण्यास विरुध्दपक्ष क्र. 1 तयार आहे. परंतु त्यासाठी सदर कर्ण यंत्र हे एक्सपर्ट कडून तपासणे भाग आहे.
सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी मंचाची नोटीस घेण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे सदर प्रकरण विरुध्दपक्ष क्र. 2 विरुध्द एकतर्फी चालवण्यात येईल, असे आदेश मंचाने पारीत केलेले आहे.
उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व दाखल सर्व दस्त तपासल्यानंतर मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने डॉ. किशोर धांडे, कान, नाक व घसा तज्ञ चंद्रपुर यांच्याकडे सप्टेबर 2013 मध्ये कानावर उपचार करुन घेतले होते व त्या उपचारासंबंधीचे कागदपत्र विरुध्दपक्ष क्र. 2 यांना दाखवून त्यानुसारचे विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सुचविलेले डीजीटल बीटीई कर्ण यंत्र, ज्याची किंमत रु. 20,490/- असून त्यावर विरुध्दपक्ष क्र. 2 ने डिस्काऊंट देवून सदर यंत्रापोटी किंमत रु. 17,400/- आकारली होते, ते खरेदी केले होते. दाखल दस्त असे दर्शवितात की, तक्रारकर्त्याने सदर कर्ण यंत्र रु. 1000/- आगावू रक्कम भरुन चंद्रपुर येथे बुक केले होते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 2 हे दरमहिन्याच्या 7 व 23 तारखेला खेरडे हॉस्पीटल अकोला येथे येतात ( त्याबद्दलचे दस्त तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर दाखल केलेले आहेत ) त्यामुळे दाखल पावतीवरुन असे सिध्द होते की, सदर यंत्राच्या खरेदीची उर्वरित रक्कम विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी अकोला येथे स्विकारुन त्यानंतर तक्रारकर्त्याला अकोला येथे सदर कर्णयंत्र दिले होते. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी ही बाब कबुल केली आहे की, विरुध्दपक्ष क्र. 2 हे त्यांचे अधिकृत विक्रेते आहेत. म्हणून तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा “ग्राहक” होतो, असा निष्कर्ष मंचाने काढला आहे. तसेच सदर कर्ण यंत्र विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी रक्कम अकोला येथे स्विकारुन अकोला येथेच त्याची डिलेव्हरी दिल्यामुळे, अकोला ग्राहक मंचाला या तक्रारीचा वाद निराकरण करण्याचे कार्यक्षेत्र आहे.
तक्रारकर्त्याचा युक्तीवाद असा आहे की, सदर कर्ण यंत्रात उत्पादकीय दोष आहे. उभय पक्षाला ह मान्य आहे की, सदर कर्ण यंत्र हे वॉरंटी कालावधीत आहे. या कर्ण यंत्रात उत्पादकीय दोष आहे का ? हे पाहण्याकरिता मंचाने सदर कर्ण यंत्र तपासण्याकरिता कान, नाक व घसा शास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला यांच्याकडे तपासणी करिता पाठविले होते. त्यांचा अहवाल खालील प्रमाणे मंचाला प्राप्त झाला आहे.
“ सदरील कर्णयंत्र ( Digital audio service Riva 2 HP-BTE) हे सध्या योग्य प्रकारे कार्य करत आहे. परंतु रुग्णाचे श्रवण कर्णदोषाचे समाधान होत नसून या बाबत पुरवठाधारक कंपनीतर्फे कर्णयंत्राचे सेटींग्ज ची योग्य प्रमाणे करुन रुग्णाचे श्रवणदोषाचे निराकरण होऊ शकते.”
त्यामुळे सदर कर्णयंत्रात उत्पादकीय दोष जरी नसला तरी उभय पक्षाला हे मान्य आहे की, सदर कर्ण यंत्र तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडे दोष निवारण करण्याकरिता 3 ते 4 वेळेस नेलेले आहे व तक्रारकर्त्याचे असे कथन आहे की, प्रत्येक वेळेस विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदरहू यंत्र त्यांच्या जवळ दुरुस्तीसाठी कधी एक महिना तर कधी 15 ते 20 दिवस ठेवून घेतले होते. तक्रारकर्त्याच्या या कथनाला नकारार्थी कथन विरुध्दपक्ष क्र. 2 कडून मंचात आलेले नाही. मात्र विरुध्दपक्ष क्र. 1 च्या लेखी जबाबातील कथनावरुन तक्रारकर्त्याच्या या म्हणण्याला पुष्ठी मिळते, म्हणून मंचाच्या मते असे आहे की, सदरहू कर्ण यंत्र विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी इतके कालावधीकरिता स्वत:जवळ ठेवून देखील त्याचे योग्य प्रकारे सेटीग्ज करुन दिले नाही. तसेच दाखल दस्तावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने पुन्हा ENT खेरडे हॉस्पीटल यांच्याकडे माहे जुलै 2014 मध्ये कानाची तपासणी करुन घेतली होती. त्याप्रमाणे उपचाराच्या Arphi Audiometer ISO Standard Frequency नुसार विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी सदर कर्ण यंत्राचे सेटीग्ज योग्य प्रमाणे करुन देवून तक्रारकर्त्याच्या श्रवण दोषाचे निराकरण करणे भाग होते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तसे केलेले दिसत नाही. त्यामुळे पुन: सदर कर्णयंत्र सेटींग्ज करिता विरुध्दपक्ष क्र. 2 कडे पाठविणे योग्य राहणार नाही, शिवाय विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे कसे निराकरण केले, हे मंचात येवून सांगण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे ही कृती ग्राहक संरक्षण कायद्यामधील सेवा न्युनता या संज्ञेत मोडते. म्हणून तक्रारकर्ते, विरुध्दपक्ष क्र. 2 कडून सदर कर्ण यंत्राची रक्कम रु. 17,400/- वापस मिळण्यास पात्र आहेत. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्याकडून नुकसान भरपाईसह प्रकरण खर्च मिळण्यास देखील पात्र आहे, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. म्हणून अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्त्याने त्यांच्याकडून खरेदी केलेले डिजीटल बीटीई कर्ण यंत्र परत घेऊन तक्रारकर्त्याला सदरच्या कर्ण यंत्राची किंमत रु. 17,400/- ( रुपये सतरा हजार चारशे ) परत करावी.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीरित्या वा संयुक्तपणे तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी, सदर प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह रु. 5000/- (रुपये पाच हजार ) इतकी रक्कम द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.