- निकालपत्र -
( दि.02/06/2018)
द्वारा : मा. श्री. व्ही. ए. जाधव, अध्यक्ष.
1) प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 1 ते 3 यांचेविरुध्द मौजे रहाटघर रत्नागिरी मुन्सिपल हद्दीतील वॉर्ड क्र.33/80 सिटी सर्व्हे नं. 1493, 1494ए 1494/1 ते 1494/9 1496 ए, 1496 बी, 1496/1 ते 1496/5, 1497 मधील "जोशी आर्केड" या इमारतीमधील मंजूर आराखडयातील इमारत क्र.3 मधील स्टील्ट + पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. 105 त्याचे क्षेत्र 535 चौ.फू. ही सदनिका खरेदी करणेसाठी बुक केली. त्याप्रमाणे तक्रारदारांनी बुकींग रक्कम रु.2,00,000/- (अक्षरी रक्कम दोन लाख फक्त) सामनेवाला यांचेकडे भरली. सदर मिळकतीचे करारपत्र करण्यासाठी स्टॅम्प डयुटी, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स इतर अनुषंगिक खर्च सामनेवाला यांना दिला. त्याप्रमाणे सामनेवाला यांनी दि. 2-05-2016 रोजी रत्नागिरी येथील दुय्यम निबंधक वर्ग-2 यांचे कार्यालयात दस्त नं. 2040/2016 नोंदविला. सदर सदनिकेच्या खरेदी व्यवहारापोटी तक्रारदारांनी रक्कम रु. 16,00,000/-(अक्षरी रुपये सोळा लाख फक्त) बॅंकेकडून कर्जाऊ घेऊन ते सामनेवाला यांना अदा केले. तसेच तक्रारदार यांनी त्यांचे आईचे बॅंक खात्यामधून रक्कम रु. 1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख फक्त) व वडिलांचे बॅंक खात्यामधून रक्कम रु.1,15,000/-(अक्षरी रुपये एक लाख पंधरा हजार फक्त) सामनेवाला यांना अदा केले. सदर सदनिकेचे बांधकाम पुर्ण झालेनंतर तक्रारदार यांचे लक्षात आले की, सामनेवाला यांनी करारपत्रातील परिशिष्ट "क" मध्ये ठरलेप्रमाणे बांधकाम करुन ताबा देण्यास चालढकल केली आहे तसेच जास्तीचे रक्कम रु. 2,00,000/- ची मागणी केलेली आहे अशारितीने सामनेवाला यांना अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द दि. 2-05-2016 रोजीचे करारपत्रातील परिशिष्ट 3 मधील नमूद सोयी सुविधा सामनेवाला यांनी पुर्ण करुन दयाव्यात, तसेच तक्रारदारांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 1,00,000/- तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारांना वेळेत खरेदीपत्र करु न दिलेने तक्रारदारांना कर्ज रक्कमेवरील व्याज व बुडीत व्याज सोसावे लागल्याने हे व्याज तक्रारदारांना दयावे. तक्रार अर्जाचा खर्च रु.25,000/- दयावे अशी तक्रार मंचामध्ये दाखल केलेली आहे.
2) प्रस्तुतची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना नोटीसा पाठवण्यात आल्या. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष हे प्रकरणात हजर झाले.
3) नि. 30 वर तक्रारदार यांनी त्यांचेमध्ये व विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 मध्ये तडजोड झालेबाबत अर्ज दाखल केला.
4) नि. 30 वर तक्रारदार तसेच विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी त्यांचेमध्ये तडजोड झाली असल्याने प्रकरण निकाली काढणेबाबत संयुक्त पुरशिस दाखल करण्यात आली. सदर पुरशिसला अनुसरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आदेश -
1) उभय पक्षांच्या पुरशिसला अनुसरुन तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते.
2) तक्रारीचा खर्च ज्याने त्यांने सोसायचा आहे.
3) दि. 24-10-2017 रोजीची नि. 30 वरील तडजोड पुरसीस ही या आदेशाचा भाग
समजणेत यावा.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावी.