ग्राहक तक्रार क्र.156/2015
अर्ज दाखल तारीख : 31/03/2015
अर्ज निकाल तारीख: 23/11/2015
कालावधी: 01 वर्षे 07 महिने 23 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. शहाजी बाबूराव कोकाटे,
वय - 59 वर्षे, धंदा – शेती रा. पांगरी,
ता.वाशी, जि. उस्मानाबाद. ...तक्रारदार
वि रु ध्द
1. अरिहंत ज्वेलर्स,
प्रो.प्रा. श्री. उभय विजयराज देवडा,
वय- मेजर, धंदा – सोने चांदीचे व्यापारी,
रा. साराफा लाईन कळंब, ता. कळंब,
जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एम.एस.भोसले.
विरुध्द पक्षकारा विरुध्द नो से आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा :
विरुध्द पक्षकार (विप) सराफ यांने दागिने घडवताना वाजवी पेक्षा जास्त करणावळ आकारली म्हणून भरपाई मिळण्यासाठी तक्रारकर्ता (तक) यांने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.
1. तक हे विज मंडळा मध्ये नौकरी करत होते व दि.31/05/2014 रोजी निवृत्त झाले तेव्हापासून मौजे पांगरी ता. वाशी येथे राहतात. दि.25.5.2013 रोजी मुलगा सुहास यांचे लग्न कळंब येथे. करण्याचे ठरवले होते. तक त्यावेळेस बिड येथे राहत होता. विप हे कळंब येथील सराफ आहेत. तक साठी सोन्याचे व चांदीचे दागिने तयार करुन देण्याचे विप यांनी दि.20.5.2013 रोजी कबूल केले. घडणावळ तालूका सुवर्णाकार असोसिऐशन यांनी ठरवून दिलेल्या दरा प्रमाणे आकारण्याचे विप ने कबूल केले. माहीतीसाठी दरपत्रक तक यांला देण्यात आले.
2. दि.24.5.2013 रोजी तक विप कडे दागिने घेण्यासाठी गेला. तक ने दागिने खरेदी केले. मात्र विप ने दि.20.5.2013 रोजीच्या दरापेक्षा जास्त दर लावले. तक ने पुर्वीचेच दर आकारण्यास सांगितले. पण विप यांनी संमती दिली नाही. नाइलाजाने तक ने नवीन दरा प्रमाणे पैसे दिले. विप कडून गंठन, राणी हार, तोडे जोड, बांगडी लॉकीट, ब्रेसलेट अंगठी झुबे, कानकॅफे मिनी गंठन व नेकलेस इत्यादी सोन्याचे व चांदीचे दागिने खरेदी केले. त्यासाठी एकूण रु.43181/- घडनावळ दिली. वास्तविक पाहता रु.23,122/- देय होते. विप ने रु.20,059/- तक कडून जास्तीचे घेतले. तक ने दि.25.5.2013 रोजी मुलाचा विवाह समारंभ पार पाडला.
3. विप ने जास्तीचे घेतलेले रु.20,059/- परत करावेत म्हणून तक ने दि.1.6.2013 रोजी देशमुख वकिलामार्फत विप ला नोटीस पाठविली. मात्र विप ने जास्तीची रक्कम दिली नाही. दि.24.5.2013 रोजी तक ने विप कडून महाराजा अंगठी, 5.980 ग्रॅम वजनाची खरेदी केली. विप ने अंगठीची मजूरी रु.2100/- लावली. अंगठीचे वजन खडयासहीत होते व तो स्वतंत्र व्यवहार होता. त्या अंगठीच्या व्यवहाराचा बाकीच्या व्यवहाराशी काहीही संबंध नाही. विप यांने दि.10.6.2013 रोजी खोटया मजकुराचे तक ला उत्तर दिलेले आहे. त्यामुळे विप कडून रु.26,472/- मिळावे म्हणून ही तक्रार तक ने दि.21.3.2015 रोजी दाखल केलेली आहे.
4. तक ने तक्रारीसोबत दि.24.5.2013 चे बिल, तालुका सुवर्णाकार असोसिएशन चे दरपत्रक, लग्नाची पत्रिका, दि.1.6.2013 ची नोटीस,दि.10.6.2013 चे उत्तर, रहिवासी प्रमाणपत्र, विज बोर्डाचे प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे हजर केले आहेत.
5. विप याकामी हजर झाले तथापि लेखी म्हणणे दाखल केले नाही. त्यानंतर हजर राहिले नाही.
6. तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे, यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
विप यांने तक यांचेकडून जादा घडनावळ वसूल केली काय? होय.
तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुद्दा क्र.1 व 2 :
7. ग्राहक सरंक्षण कायदा कलम 2 (1) सी प्रमाणे जादा मुल्य आकारणी ही ग्राहक तक्रार होते. कलम 14 (1)सी प्रमाणे किंमत परत देण्याचा आदेश करण्याचा अधिकार मंचाला आहे. विप ने प्रस्तुत कामी आपले म्हणणे दाखल केले नाही. अगर बचाव मांडलेला नाही. तक ने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ आपले प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सदरकामी तक चे नोटीशीला विप ने दि.10.6.2013 रोजी दिलेले उत्तर तक ने हजर केले आहे. विप ने म्हटले आहे की, तक ने दि.24.5.2013 रोजी विप कडून 5.980 ग्रॅमची महाराजा अंगठी घेतली. त्याकरिता रु.2100/- मजूरी आकारण्यात आली. तक ने ही बाब नोटीशीमध्ये लपवून ठेवलेली आहे. तसेच विप ने सराफ असोसिऐशनने ठरवलेले केडीएम डिझाईन साठी प्रतिग्रॅम अशी मजूरी लावलेली आहे. विप चा एवढाच बचाव रेकार्डवर उपलब्ध आहे. उत्तरात असेही म्हटलेले आहे की, दरपत्रक नोटीस उत्तरासोबत पाठवलेले आहे. कदाचित ते पाठवले असेल किंवा नसेलही. तक असे दरपत्रक स्वतःहून हजर न करण्याची शक्यता असल्याने विप ने स्वतःहून हे दरपत्रक हजर करायला पाहिजे होते. विप ने म्हणणेही दिले नाही व दरपत्रकही हजर केले नाही.
8. तक ने जे दरपत्रक हजर केले आहे त्याप्रमाणे केडीएम दागिन्याकरिता एक ग्रॅम ला रु.150/- मजूरी लावायची होती. पावतीप्रमाणे तक ने एकूण 240 ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. विप ची मजूरी रु.150/- प्रतिग्राम प्रमाणे केडीएम दागिने असल्यास रु.36,000/-होईल. त्यानंतर 10 ग्रॅम अंगठी त्यात वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मजूरी रु.37,500/- होईल. ही अंगठी महाराजा अंगठी होती का यांचा खुलासा होत नाही. कारण महाराजा अंगठीला रु.2100/- घेतल्याचे दोनही पक्षकारांना मान्य आहे व त्याबददल काही वादही दिसून येत नाही.
9. पावतीमध्ये अंगठीच्या भावाबददल उल्लेख नाही. त्यामुळे 240 ग्रॅम पैकी मिनी गंठन व इतर 13.200 ग्रॅम व लॉकेट 17.870 ग्रॅम वजा जाता इतर दागिने केडीएम मध्ये दिसतात. म्हणजेच 209 ग्रॅम दागिने केडीएम चे दिसतात. त्यामुळे रु.31,350/- मजूरी होईल लॉकेटची रु.1,787/- होईल. गंठनची मजूरी रु.910/- होईल कारण दरग्राम ला 70/- मजूरी आहे. एकूण रु.3404/- होईल म्हणजेच रु.9,000/- मजूरी जास्त घेतल्याचे दिसते. चांदीसाठी मजूरी किती द्यायची यांचा उलेख नाही. मात्र जोडवे साठी जोडास रु.40/- एवढी मजूरी द्यायची आहे. सुमारे रु.2700/- मजूरी पैजण पिचवे व जोडवे यासाठी घेतल्याचे दिसून येते. जोडव्यासाठी रु.500/- जास्त घेतल्याचे दिसून येते. पैजण व बिचवे याकरिता सुमारे रु.2,000/- मजूरी घेतल्याचे दिसून येते.
10. तक ने दिलेले केडीएम सोन्याच्या दागिन्याला दर ग्रॅमला मजूरी रु.100/- दाखवली आहे. मात्र अशी मजूरी ठरल्या बददल पुरावा दिलेला नाही. पैजण, बिचवे व जोडवे यांची एकत्र मजूरी रु.1000/- जास्त आकारली असे दिसते. एकूण रु.10,000/- तक कडून जास्तीचे घेतलेले आहेत असे म्हणता येईल. ते परत मिळण्याचा तक ला अधिकार आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उततर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विप यांनी तक ला जास्तीची घेतलेली रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त)
एक महिन्यात परत द्यावी, न दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून रक्कम फिटेपर्यत
त्यावर द सा द.शे. 9 दराने व्याज द्यावे
3. विप यांनी तक ला या तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/-(रुपये दोन हजार फक्त)
द्यावेत.
4. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज द्यावा.
5. उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद