सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 96/2013.
तक्रार दाखल दि.02-08-2013.
तक्रार निकाली दि.23-10-2015.
धनंजय दादु जाधव,
रा.44, जुनी महाडा कॉलनी,
सदर बझार,सातारा. ... तक्रारदार.
विरुध्द
1. मे. अरिहंत बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स
तर्फे भागीदार/संचालक,
1. श्री. कांताभाई कालीदास शहा,
2. श्री. विनोदभाई कालीदास शहा,
3. श्री. बिपीन कांतीलाल शहा
4. श्री. हेमंत कांतीलाल शहा,
5. श्री. विपुल विनोदकुमार शहा
सर्व रा. हेम प्लाझा, शिवाजी सर्कल,
पोवई नाका, सातारा, ता.जि.सातारा.
6. ममता बिपीन शहा,
रा. हेम प्लाझा, शिवाजी सर्कल,
पोवई नाका, सातारा, ता.जि.सातारा.
7. निपा हेमंत शहा,
रा. हेम प्लाझा, शिवाजी सर्कल,
पोवई नाका, सातारा, ता.जि.सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.जे.बी.यादव.
जाबदार क्र.1,2,5,तर्फे – अँड.व्ही.डी.निकम.
जाबदार क्र.3,4 तर्फे – प्रतिनिधी
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे सदर बझार, सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. प्रस्तुत जाबदार क्र. 1 ते 5 हे बांधकाम व्यवसाय करणारी फर्म असून प्रस्तुत फर्मचे जाबदार क्र. 1 ते 5 हे संचालक आहेत. प्रस्तुत जाबदार यांचा जमीनी खरेदी करुन त्याचे प्लॉट पाडणे, ग्राहकांना विकणे असा व्यवसाय आहे. प्रस्तुत कामी तक्रारदार यांने जाबदार यांचेकडून “अरिहंत बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स” तर्फे दै. लोकमत दि.21/10/2007 च्या अंकामध्ये “ अरिहंत बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स” सादर करीत आहे. गुंतवणूकीचा पुरेपूर मोबदला देणारा जॅकपॉट” या शिर्षकाखाली जाबदाराने प्लॉट विक्रीची योजना प्रसिध्द केली व त्याबाबतची जाहीरात प्रस्तुत दैनिकात दि.21/10/2007 रोजी प्रसिध्द केली. जाहीरातीत नमूद केलेप्रमाणे जाबदाराचे नियोजीत हेमपार्कमध्ये 1200 चौ.फूटाचा प्लॉट रक्कम रु.1,851/- (रुपये एक हजार आठशे एक्कावन्न मात्र) च्या सुलभ 45 हप्त्यांमध्ये प्लॉट खरेदी करणा-यास देणार होते. तसेच जाहीरातीत नमूद केलेले प्लॉट खरेदी करण्यासाठी विविध बक्षीसांचे प्रलोभन गुंतवणूकदारांना दाखवणेत आले होते. परंतू जाहीरातीसोबत प्रस्तुत नियोजीत जागा कोणत्या गावात आहे? त्या जागेचा गट नंबर, सर्व्हे नंबर कोणता आहे ? या गोष्टी जाणूनबुजून नमूद केलेल्या नव्हत्या. प्रस्तुतचे दि. 21/10/2007 चे दैनिक लोकमत मधील जाहीरात वाचून तक्रारदाराने जाबदार यांचेशी संपर्क साधला व जाहीरातीबाबत माहीती विचारली असता जाबदाराने तक्रारदाराला जुजबी माहिती दिली व तक्रारदारच्या को-या कागदांवर सहया घेतल्या. प्रस्तुत वेळी तक्रारदाराने जाबदारांकडे नियोजीत हेमपार्क कोणत्या गावात, कोणत्या गट नंबरमध्ये अथवा सर्व्हे नंबरमध्ये होणार आहे याबाबत विचारणा केली त्यावेळी जाबदाराने सदर माहिती नंतर सांगतो असे सांगीतले. तक्रारदाराने जाबदाराचे सांगण्यावर विश्वास ठेवला व प्रस्तुत नियोजीत हेमपार्क मध्ये प्लॉट खरेदी करण्याची तयारी दर्शविली. तक्रारदाराची एकरकमी रक्कम अदा करुन प्लॉट खरेदी करणेची ऐपत नसलेने तक्रारदाराने सदर स्कीममध्ये हप्त्याने रक्कम अदा करावयाची असलेने प्लॉट खरेदी करण्याचे ठरवले व तक्रारदाराने दि. 22/10/2007 ते 22/1/2011 अखेर प्लॉट खरेदीसाठी जाबदार यांचेकडे एकूण 39 हप्ते प्रत्येकी रक्कम रु.1,851/- चे 39 हप्ते अशी एकूण रक्कम रु.72,189/- (रुपये बाहत्तर हजार एकशे एकोणनव्वद मात्र) जाबदाराकडे जमा केली. माहे जानेवारी 2011 नंतर तक्रारदार हे उर्वरीत 6 हप्त्यांची रक्कम जाबदारांकडे जमा करणेसाठी गेले असता, जाबदाराने प्रस्तुत 6 हप्त्यांची रक्कम जाणूनबुजून भरुन घेतली नाही व जाणूनबुजून हप्ते भरुन घेणेस टाळाटाळ केली आहे. प्रस्तुतचे 6 हप्ते तक्रारदार हे प्रथमपासूनच जाबदाराकडे जमा करणेस तयार होते. परंतू तक्रारदाराने यापूर्वी 39 हप्त्यापोटी जाबदारांकडे जमा केलेली रक्कम रु.72,189/- (रुपये बाहत्तर हजार एकशे एकोणनव्वद मात्र) हडप करण्याच्या उद्देशाने व तक्रारदाराची फसवणूक करण्याच्या उद्देशाने जाबदाराने तक्रारदाराकडून उर्वरीत 6 हप्त्यांची रक्कम जमा करुन घेतली नाही व दैनिक लोकमत मध्ये प्रसिध्द केलेली बक्षिसे तक्रारदाराला अदा केली नाहीत. जाबदाराने दैनिक लोकमतमध्ये खोटया मजकूराची जाहीरात देवून तक्रारदारकडून जाणूनबुजून 39 हप्त्यांची रक्कम वसूल करुनही उर्वरित 6 हप्त्यांची रक्कम तक्रारदार देणेस तयार असतानाही ती जमा करुन घेतली नाही व तक्रारदाराला ठरलेला प्लॉट अदा केला नाही व प्लॉटचे खरेदीपत्रही करुन दिलेले नाही. तसेच दैनिक लोकमतमध्ये प्रसिध्द केलेल्या जाहीरातीहनुसार कोणतीही बक्षिसे दिलेली नाहीत व जाबदाराने तक्रारदारकडून सदर हप्त्यांची रक्कम मिळालेली असतानाही व उर्वरीत हप्ते तक्रारदार जमा करणेस गेला असता ती रक्कम न स्विकारुन व प्लॉट देणेचे नाकारुन बेकायदेशीर व बेजबाबदारपणाचे कृत्य केले आहे व तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. सबब तक्रारदाराने जाबदार यांचेविरुध्द प्रस्तुत तक्रारअर्ज दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांनी तक्रारदाराकडून उर्वरीत 6 हप्त्यांची रक्कम जमा करुन घ्यावी व तक्रारदाराचे नावे नियोजीत ‘हेमपार्क’ मधील 1200 चौ.फूटाचा प्लॉटचे खरेदीपत्र करुन द्यावे असे जाबदारांना आदेश व्हावेत, जाबदाराने प्लॉट देण्यास जाणूनबुजून विलंब लावल्याने तक्रारदाराला झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- जाबदाराकडून मिळावेत, प्रस्तुत तक्रारअर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- जाबदारांकडून तक्रारदाराला मिळावा तसेच तक्रारदार यांना जाबदार कडून प्लॉटचा ताबा न मिळालेस तक्रारदाराने जाबदारांकडे प्लॉटचे खरेदीपोटी जमा केलेल्या 39 हप्त्यांची एकूण रक्कम रु रु.72,189/- दि.22/10/2007 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजदराने जाबदारकडून वसूल होऊन मिळावी अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 कडे जाबदाराने दैनिक लोकमतमध्ये प्लॉट विक्रीबाबत प्रसीध्द केलेली जाहीरात, नि. 5/2 ते 5/40 कडे तक्रारदाराने जाबदार यांचेकडे भरलेल्या 39 हप्त्यांच्या मूळ पावत्या, नि.5/41 कडे तक्रारदाराने जाबदार यांना वकीलांमार्फत पाठवलेली नोटीस, नि.5/42 कडे प्रस्तुत नोटीस जाबदार यांना पोहोचल्याच्या पोहोच पावती, नि.22 कडे दुरुस्ती अर्ज, नि. 23 कडे दुरुस्ती अर्जाचे अँफीडेव्हीट, नि. 25 कडे दुरुस्ती प्रत, नि. 24 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे शपथपत्र, नि. 26 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 27 कडे लेखी युक्तीवाद, नि. 30 कडे दुरुस्ती अर्ज, नि. 31 कडे दुरुस्ती अर्जाची प्रत, नि.33 चे कागदयादीसोबत जाबदारांविरुध्द बातमी प्रसिध्द झालेला दैनिक तरुण भारत चा अंक वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र.1,2,5 यांनी नि. 17 कडे म्हणणे, नि. 18 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 13 कडे जाबदार क्र. 3 व 4 चे म्हणणे, नि.14 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 19 चे कागदयादीसोबत करारनामा (मूळप्रत), तक्रारदाराचे वकीलांनी जाबदाराला पाठवलेले नोटीस उत्तर नि. 24 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 34 कडे जाबदार नं. 1,2 व 5 तर्फे दाखल केलेले म्हणणे/कैफीयत हेच जाबदार क्र. 6 व 7 चे म्हणणे समजणेत यावे म्हणून पुरसीस वगैरे कागदपत्रे जाबदारांनी याकामी दाखल केली आहेत. जाबदार यांनी प्रस्तुत तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत.
I तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही.
ji जाबदार क्र. 1 ही बांधकाम व्यवसाय करणारी फर्म आहे. सदर फर्मने दि. 21/10/2007 रोजी दैनिक लोकमतच्या वृत्तपत्रात प्लॉट विक्रीची योजना प्रसिध्द केली व त्या जाहीरातीमध्ये 1200 चौ.फूटाचा प्लॉट रक्कम रु.1,851/- च्या सुलभ 45 हप्त्यांमध्ये खरेदी देणार आहे. एवढाच मजकूर जाबदारांना मान्य व कबूल आहे. मात्र उर्वरीत मजकूर मान्य व कबूल नाही.
iii जाबदार क्र. 3 व 4 यांचा सदर “ अरिहंत बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स” यांचेशी कोणताही संबंध नव्हता व नाही. मात्र सदर जाबदार नं. 3 व 4 यांना तक्रारदाराने आवश्यक पक्षकार म्हणून सामील केले आहे. प्रस्तुत जाबदार क्र. 3 व 4 विरुध्द सदर तक्रार चालू शकत नाही तसेच ममता बिपीन शहा व निपा विपुल शहा या दोघी प्रस्तुत जाबदार संस्थेच्या भागीदार असून त्यांना याकामी पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. त्यामुळे अर्जास ‘नॉन जॉईंडर ऑफ पार्टी’ या तत्वाची बाधा येत असून तक्रार अर्ज फेटाळणेस पात्र आहे.
Iv जाबदाराने तक्रारदाराचे कोणत्याही को-या कागदावर सहया घेतल्या नाहीत. मात्र जाबदाराकडे तक्रारदाराने प्लॉट बुक करणेपूर्वी प्लॉट मिळण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती तक्रारदाराने असमजावून घेऊन त्या मान्य असल्यामुळे तक्रारदाराने दि. 2/11/2007 रोजी जाबदार यांना नोटराईज्ड करारनामा लिहून दिलेला आहे. अशी वस्तुस्थिती असताना तक्रारदाराने दि.2/5/2013 रोजी वकीलामार्फत पाठवलेले नोटीसला जाबदाराने दि. 13/5/2013 रोजी उत्तरी नोटीस पाठवली आहे. तक्रारदाराने खोटया मजकूराची नोटीस पाठवली आहे.
V तक्रारदाराने दि.22/10/2007 अखेर जाबदाराकडे 39 हत्प्यांची रक्कम रु.72,189/- जमा केलेचे मान्य आहे. तक्रारदाराने जाबदाराला दि.2/11/2007 रोजी करुन दिले करारनाम्याप्रमाणे तक्रारदाराने सलग 45 हप्त्यांची रक्कम जाबदारांकडे जमा करणे न्यायाचे व गरजेचे होते. मात्र दि. 22/1/2011 नंतर जाबदारांकडे तक्रारदाराने पुढील हप्त्यांची रक्कम भरणेस कधीही आले नाहीत व रक्कम जाबदारांकडे जमा केली नाही. तक्रारदार कधीही ऊर्वरीत 6 हप्ते भरण्यास तयार नव्हत्या व नाही.
Vi जाबदार हे रितसर व कायदेशीरपणे प्लॉटचे व्यवहार करत आहेत. जाबदाराने कधीही कोणतीही रक्कम हडप केली नाही. वास्तवीक दिनांक 2/11/2007 रोजीच्या करारान्वये जर सभासदाने सलग दोन हप्ते भरले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचे सभासदत्व रद्द झाले असलेने तक्रारदाराला सर्व हप्ते मागण्याचा कोणताही अधिकार राहीलेला नाही. तरीही जाबदाराने तक्रारदाराला दि. 10/6/2013 रोजीचे नोटीस/पत्राने चेक नं.595385 या चेकने रक्कम रु.72,189/- चा चेक पाठविला होता. यावरुन जाबदाराने कोणतीही रक्कम हडप करणेचा प्रयत्न केलेला नाही.
Vii प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने मुदतीत दाखल केलेला नाही त्यामुळे चालणेस पात्र नाही.
Viii प्रस्तुत प्रकरणातील सर्व बाबी या दिवाणी स्वरुपाच्या असलेने या मे. मंचास सदर तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही.
Ix तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदारांनी याकामी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने
ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना
सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. तक्रार अर्जास मुदतीची बाधा येते काय? नाही.
4. तक्रारदार जाबदारकडून तक्रार अर्जात नमूद
प्लॉट/भूखंड मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांचे नियोजीत ‘हेमपार्क’ या स्कीममध्ये 1200 चौ.फूट प्लॉट खरेदी करण्याचे ठरवून जाबदाराचे जाहीरातीत नमूद केलेप्रमाणे व करारात नमूद केलेप्रमाणे रक्कम रु.1,851/- च्या सुलभ 45 हप्त्यांमध्ये खरेदी करणेसाठी जाबदार यांना सलग 39 हप्ते प्रत्येकी रक्कम रु.1,851/- चे एकूण रक्कम रु.72,189/- अदा केले आहेत. त्याच्या सर्व मूळ पावत्या तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत दाखल केल्या आहेत. तसेच प्रस्तुत व्यवहार ठरलेचे, करारपत्र झालेचे व तक्रारदाराने प्रस्तुत 39 हप्ते जाबदाराला अदा केलेचे जाबदाराने मान्य व कबूल केले आहे. सबब तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असून जाबदार हे तक्रारदाराचे सेवा पुरवठादार आहेत हे निर्विवादपणे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेव्दारे जाहीर केले. ‘हेमपार्क’ या स्कीममध्ये 1200 चौ. फूटाचा प्लॉट रक्कम रु.1,851/- (रुपये एक हजार आठशे एक्कावन्न मात्र) चा सुलभ 45 हप्त्याने घ्यायचे ठरविले त्याबाबत उभयतांमध्ये करार झाला व तक्रारदाराने सदर प्लॉट खरेदीपोटी रक्कम रु.1,851/- चे दि. 22/10/2007 ते 22/1/2011 पर्यंत एकूण 39 हप्ते जाबदारांकडे जमा केले आहेत. त्याच्या मूळ पावत्या तक्रारदाराने याकामी नि. 5 चे कागदयादीसोबत दाखल केलेल्या आहेत. तसेच जानेवारी,2011 नंतर तक्रारदार हे जाबदार यांचेकडे हप्ते भरणेसाठी गेले असता जाबदाराने हप्ते स्विकारले नाहीत असे तक्रारदाराने तक्रारअर्जात नमूद केले आहे. परंतू ही गोष्ट शाबीतीसाठी तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. परंतू जाबदाराने घेतले आक्षेपांचा विचार करता जाबदाराने म्हटले आहे की, “तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान झाले नोटराईज्ड लेखातील अटी व शर्तीनुसार तक्रारदार ठरवून दिलेले सलग दोन हप्ते तक्रारदाराने भरले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचे सभासदत्व आपोआप रद्द झालेले आहे. त्यामुळे तक्रारदाराला सदरचा प्लॉट मागणेचा अधिकार नाही.” परंतू आम्ही प्रस्तुत जाबदाराने नि.19/1 कडे दाखल केलेले ‘नोटराईज्ड’ लेख काळजीपूर्वक अवलोकन करता असे स्पष्ट झाले की, प्रस्तुत नि. 19/1 कडे दाखल केलेला कागद हे करारपत्र नसून तो तक्रारदाराने जाबदार यांचेकडे ‘हेमपार्क’ या स्कीममध्ये प्लॉट मिळावा म्हणून केलेला अर्ज आहे. तसेच प्रस्तुत अर्जामध्ये नियम व अटी नं. 1 ते 34 नमूद केलेल्या आहेत. प्रस्तुत अर्जावर फक्त अर्जदार/तक्रारदाराची सही आहे. त्यामुळे सदर नि. 19/1 कडे दाखल केलेला प्लॉट मागणीसाठी/सदस्यत्वासाठी केलेला अर्ज आहे. तसेच प्रस्तुत अर्जामध्ये घालून दिलेल्या अटी व शर्ती वाचल्या असता, अट क्र. 15 मध्ये नमूद केले आहे की, “या प्लॉट विक्रीच्या योजनेमध्ये जो सभासद सलग 2 हप्ते भरणार नाही त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होईल. तसेच आगाऊ भरलेल्या हप्त्यांची रक्कम परत मिळणार नाही, सदर सभासदाचा प्लॉट फेरविक्री करणेत येईल, त्याचे सर्व अधिकार मे. अरिहंत बिल्डर्स अँन्ड डेव्हलपर्स यांचेकडे राहतील” अशी अट नमूद आहे. परंतू कोणत्याही बेकायदेशीर अटी प्लॉट मागणीच्या अर्जामध्ये नमूद करणे म्हणजे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारे आहे. प्रस्तुत तक्रारदाराने जाबदार यांचेकडे सलग 39 हप्त्यांची रक्कम रु.72,189/- (रुपये बाहत्तर हजार एकशे एकोणनव्वद मात्र) जाबदार यांचेकडे जमा केलेली आहे. त्यामुळे प्रस्तुतची अट ही या तक्रारदाराला लागू होत नाही असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच तक्रारदाराची ऐपत नसतानाही त्याने सलग 39 हप्ते न चुकता जाबदारांकडे जमा केले आहेत त्याच्या मूळ पावत्या त्याकामी तक्रारदाराने दाखल केल्या आहेत. तसेच जाबदारानेही प्रस्तुतचे 39 हप्ते तक्रारदाराने जमा केलेची बाब मान्य केली आहे. त्यामुळे सलग 39 हप्ते भरणारी व्यक्ती ऊर्वरीत 6 हप्ते भरणार नाही यावर विश्वास बसत नाही. तसेच जाबदाराने सभासद/तक्रारदारावर लादलेल्या अटी व शर्ती बेकायदेशीर असून ग्राहकांना फसवून त्यांचेकडून रक्कम उकळण्याचा प्रयत्न दिसून येतो त्यामुळे जाबदाराने अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब केलेचे स्पष्ट होत आहे. प्रस्तुतची अट बेकायदेशीर असलेने तक्रारदारावर बंधनकारक राहणार नाही किंवा कोणतीही बेकायदेशीर अट पुढे करुन जाबदार तक्रारदार यांचा प्लॉट मिळणेचा हक्क डावलू शकत नाहीत तर तक्रारदार यांचा प्रस्तुत जाबदार यांचेकडून प्लॉट मिळणेचा हक्क अबाधीत आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. याऊलट जाबदाराने बेकायदेशीरपणे तक्रारदाराचे सभासदत्व रद्द करुन व अनुचित व्यापारी व्यवस्थेचा अवलंब करुन तक्रारदार यास सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
8. वर नमूद मुद्दा क्र.3 चे उत्तर नकारार्थी दिले आहे. कारण- प्रस्तुत कामी तक्रारदाराने जाबदाराचे ‘हेमपार्क’ या स्कीममध्ये फ्लॅट बुकींगसाठी रक्कम रु.1,851/- प्रत्येकी प्रमाणे 39 हप्ते सलग जमा केले आहेत. तसेच ऊर्वरीत हप्ते भरणेस किंवा हप्त्यांची सर्व रक्कम भरणेस तक्रारदार तयार आहेत. परंतू जाबदाराने ऊर्वरित हप्ते भरुन घेतले नाहीत व तक्रारदाराचे सभासदत्व रद्द केले आहे. परंतू याकामी जाबदारांकडून तक्रारदार यांना वादातीत प्लॉटचा ताबा मिळाला नाही किंवा जाबदाराने प्लॉट खरेदीपत्र करुन दिलेले नसलेने प्रस्तुत कामी तक्रार अर्जास कारण कायम आहे. Continuous cause of action आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्जास मुदतीची बाधा येत नसून तक्रार अर्ज मुदतीत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 3 चे उत्तर आम्ही नकारार्थी दिलेले आहे.
9. वर नमूद मुद्दा क्र. 4 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने, जाबदाराने जाहीरातीत नमूद केले ‘हेमपार्क’ स्कीममधील 1200 चौ.फूट प्लॉटसाठी सलग 39 हप्ते रक्कम रु.1,851/- प्रत्येकी अशी एकूण रक्कम रु.72,189/- (रुपये बाहत्तर हजार एकशे एकोणनव्वद मात्र) जाबदार यांचेकडे जमा केली आहे. तसेच जाबदाराने घातलेली कोणत्याही बेकायदेशीर अटी व शर्ती तक्रारदारावर बंधनकारक राहणार नाहीत. जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा दिली असून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराकडून रक्कम उकळण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे असे आम्हास वाटते. त्यामुळे तक्रारदाराचे प्रस्तुत भूखंड मिळणेच्या हक्कास कोणतीही बाधा येत नसून तक्रारदार हे प्रस्तुत भूखंड जाबदारकडून मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे. तसेच ऊर्वरीत 16 हप्त्यांची रक्कम तक्रारदार यांचेकडून जाबदार यांना मिळणे न्यायोचीत होणार आहे असे आम्हास स्पष्टपणे वाटते. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 4 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
10. वर नमूद कारणमिमांसा, दाखल सर्व कागदपत्रे उभय बाजूंचे पुरावे, लेखी व तोंडी युक्तीवाद यांचा साकल्याने विचार करता, सदर तक्रारदार हे जाबदार यांचेकडून ‘हेमपार्क’ या जाबदाराने जाहीर केलेल्या स्कीममधील 1200 चौ.फूटाचा प्लॉट मिळणेस पात्र असून जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.1,851/- प्रत्येकी प्रमाणे ऊर्वरीत 6 हप्त्यांची रक्कम जमा करुन घेऊन सदर 1200 चौ.फूटाचा प्लॉट अदा करणे न्यायोचीत होणार आहे व प्रस्तुत प्लॉटचे खरेदीपत्र जाबदाराने तक्रारदार यांना करुन देणे न्यायोचीत होणार आहे. तसेच कांही तांत्रीक अडचणीमुळे जाबदार तक्रारदाराला सदर प्लॉट देऊ शकले नाहीत तर जाबदार यांचेकडून तक्रारदाराने जमा केलेले 39 हप्त्यांची एकूण रक्कम रु.72,189/- (रुपये बाहत्तर हजार एकशे एकोणनव्वद मात्र) व्याजासह तक्रारदार यांस मिळणे न्यायोचीत होणार आहे असे आम्हास वाटते.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह अंशतः मंजूर करणेत येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून ऊर्वरीत 6 हप्त्यांची रक्कम रु.1,851/-
प्रत्येकी प्रमाणे स्विकारुन तक्रारदार यांना वादातीत ‘हेमपार्क’ मधील 1200
चौ.फूटाचा प्लॉटचे खरेदीपत्र जाबदाराने तक्रारदाराला करुन द्यावे व प्रस्तुत
प्लॉटचा प्रत्यक्ष ताबा द्यावा.
3. जाबदाराला कांही तांत्रीक अडचणीमुळे वादातीत भूखंड/प्लॉटचे खरेदीपत्र व ताबा
देणे अशक्य झालेस जाबदार यांनी तक्रारदाराने 39 हप्त्याने भरलेली एकूण
रक्कम रु.72,189/- (रुपये बाहत्तर हजार एकशे एकोणनव्वद मात्र) तक्रारदार
यांना अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9
टक्के व्याजदराने अदा करावी.
4. जाबदाराने सदोष सेवेमुळे तक्रारदाराला झाले मानसिक व शारीरिक त्रासापोटी
जाबदाराने तक्रारदार यांना रक्कम रु.15,000/- (रुपये पंधरा हजार मात्र) अदा
करावेत.
5. अर्जाचा खर्च म्हणून जाबदाराने तक्रारदा यास रक्कम रु.5,000/- (रुपये पाच
हजार मात्र) अदा करावेत.
6. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदाराने आदेश पारीत ढाले तारखेपासून 45
दिवसात करावी.
7. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार
यांना जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई
करणेची मुभा राहील.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
9. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 23-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.