तक्रारदार स्वत:
जाबदेणार एकतर्फा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
द्वारा- मा. श्री. श्रीकांत. एम. कुंभार, सदस्य
:- निकालपत्र :-
दिनांक 20/ऑगस्ट/2013
तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार जाबदेणार यांच्याविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील त्रुटी संदर्भात दाखल केलेली आहे. यातील कथने थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदारांनी जाबदेणार क्र 2–अधिकृत विक्रेते यांच्याकडून मोबाईल हॅन्डसेट ब्लॅकबेरी मॉडेल 9220 दिनांक 30/6/2012 रोजी रक्कम रुपये 10,500/- ला विकत घेतला. दिनांक 28/3/2013 रोजी अचानक हॅन्डसेट बंद पडल्यामुळे तक्रारदारांनी दिनांक 29/3/2013 रोजी जाबदेणार क्र 1 सर्व्हिस सेन्टर यांच्याकडे तक्रार केली. दिनांक 10/4/2013 रोजी सदरहू हॅन्डसेट दुरुस्तही होणार नाही आणि कंपनीच्या पॉलिसी नुसार तक्रारदारांना पर्यायी हॅन्डसेटही देता येणार नाही असे सांगण्यात आले. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून दुसरा नवीन हॅन्डसेट वॉरंटीसह मिळावा तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 10,000/- मिळावेत अशी मागणी करतात.
[2] जाबदेणार क्र 1 व 2 यांना नोटीस बजावूनही ते हजर झाले नाहीत व त्यांनी कोणत्याही प्रकारचे लेखी म्हणणे दाखल केलेले नाही. म्हणून सदरचे प्रकरण एकतर्फा चौकशीसाठी ठेवण्यात आले.
[3] तक्रारदार यांनी स्वत:चे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या चलन क्र 1241 दिनांक 30/06/2012 वरुन तक्रारदारांनी रक्कम रुपये 10,500/- ला सदरहू हॅन्डसेट खरेदी केला होता व त्यास वॉरंटी होती हे दाखल कागदपत्रांवरुन – वॉरंटीच्या अटी व शर्ती वरुन स्पष्ट होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन नाकारलेली नाहीत. वॉरंटी कालावधीत निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण न करणे हे सेवेतील त्रुटी ठरते. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून नवीन ब्लॅकबेरी मॉडेल 9220 हॅन्डसेट मिळण्यास पात्र ठरतात. मोबाईल अभावी तक्रारदारांना निश्चितच मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला असणार. सबब तक्रारदार हे जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 2000/-मिळण्यास पात्र ठरतात. सबब खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या
तक्रारदारांना ब्लॅकबेरी मॉडेल 9220 हॅन्डसेट वॉरंटीसह आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावा.
3. तक्रारदार यांनी त्यांचेकडील मूळ मोबाईल हॅन्डसेट जाबदेणार यांना परत करावा.
4. जाबदेणार क्र 1 व 2 यांनी वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावा.
5. तक्रारदारांनी मा. सदस्यांसाठी दिलेले संच आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात घेऊन जावेत अन्यथा ते नष्ट करण्यात येतील.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.
स्थळ- पुणे
दिनांक – 20 ऑगस्ट 2013
[एस. एम. कुंभार] [व्ही. पी. उत्पात]
सदस्य अध्यक्ष