(दि. 23/05/2014)
1. तक्रारदार हे वाशी वर नमूद पत्त्यावर रहात असून सामनेवाले ही विमा कंपनी आहे. तक्रारदारांची तक्रार खालीलप्रमाणे आहे -
तक्रारदारांनी नोव्हेंबर 2006 मध्ये होंडा कार नं. एमएच-43-आर 221- रजिस्ट्रेशन नंबर 102658 खरेदी केली. परंतु तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे मे. एल.ए. मोटर्स लि. यांनी तक्रारदारांकडून नवीन कारसाठी पूर्ण पैसे घेऊन सेकंड हँड व पुरामुळे खराब 17झालेली गाडी दिली. सदर गाडीचा विमा तक्रारदारांनी सामनेवाले यांच्या कंपनीद्वारे उतरविला, त्याचा कालावधी दि. 13/11/10 ते दि. 12/11/11 मध्यरात्रीपर्यंत असा होता. व विमा पॉलिसी क्र. 2311200032811600000 असा होता. तक्रारदार म्हणतात की डिसेंबर महिन्यात पहिल्या आठवडयात (तारीख दिलेली नाही) तक्रारदारांच्या गाडीला अपघात झाला (अपघाताचे स्थळ तक्रारीत दिलेले नाही.) त्यामुळे तक्रारदारांनी ताबडतोब सामनेवाले यांना कळविले व सामनेवाले तर्फे सर्व्हेअर म्हणून श्री.अमेय यांनी त्याच महिन्यात डिसेंबर 10 मध्ये तक्रारदारांच्या गाडीची पहाणी केली. परंतु क्लेमफॉर्म किंवा इतर कागदपत्रे तक्रारदारांना दिली नाहीत. तसेच दि. 28/12/10 रोजी तक्रारदारांनी सामनेवालेकडून सर्व्हेबाबत सर्व कागदपत्रे देण्यासाठी सामनेवाले यांना पत्र पाठविले. परंतु सामनेवाले यांनी गाडीला झालेले नुकसान (Damage) किंवा इतर बाबी या जुन्या असून अपघातामुळे झालेल्या नाहीत व त्यामुळे तक्रारदारांचा क्लेम नाकारल्याचे दि. 24/12/10 रोजीचे पत्र तक्रारदारांना पाठविले. त्यानंतर तक्रारदारांनी विमा कंपनीला दि. 04/03/11 व दि. 20/07/11 रोजी दोन कायदेशीर नोटीसेस पाठविल्या व सामनेवालेकडून कारच्या प्रिमियमसाठी डिपॉझिट केलेले सर्व पैसे परत करण्यास सांगितले किंवा कारच्या दरुस्तीसाठी सामनेवालेकडून रु. 45,000/- देण्यात यावे अशी मागणी केली.
2. तक्रारदारांनी सामनेवालेकडून कार दुरुस्तीसाठी येणारा खर्च 1. रु. 45,000/- सामनेवाले यांनी द्यावा, 2. न्यायिक खर्चासाठी व तक्रारीसाठी झालेल्या इतर खर्चासाठी रु. 20,000/- सामनेवालेंनी द्यावेत अशी मागणी केली आहे.
3. सामनेवाले यांना नोटीस मिळाल्यावर सामनेवाले यांच्या वकीलांनी सुनावणीस हजर होऊन सामनेवालेंतर्फे कैफियत, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद इत्यादी दाखल केले. सामनेवाले यांनी कैफियतीमध्ये व पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रात खालील मुद्दे मांडले आहेत.
अ.) तक्रारदाराने सदर अपघाताची घटना नक्की कधी झाली याचा उल्लेख तक्रारीत केलेला नाही
ब.) तसेच तक्रारदार ग्रा.सं.कायद्याचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दुरुपयोग करीत आहेत व जर क्लेमची रक्कम तक्रारदारांना विमा कंपनीतर्फे देण्यात येणार नसेल तर तक्रारदाराकडून घेतलेली प्रिमियमची रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांना परत करावी अशी मागणी तक्रारदारांनी करणे अयोग्य असून , (क.) तक्रारदारांच्या गाडीला अपघात झाला याबाबत तक्रारदारांनी कोणताही पुरावा किंवा अपघात किती तारखेला झाला हे दर्शविणारे कागदपत्र / पुरावा तक्रारीसोबत दाखल केलेला नाही. केवळ सन 2010 च्या डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात तक्रारदारांच्या गाडीला अपघात झाल्याचा उल्लेख आहे.
ड. व सामनेवाले यांनी IRDA चे सर्व्हेअर नेमून त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार गाडीला झालेले नुकसान हे जुने असून तक्रारदारांनी म्हटल्याप्रमाणे ते नुकसान अपघात झाल्याने झालेले नाही.
इ. तसेच सामनेवाले यांचे कार्यालय अंधेरी येथे असल्याने सदर तक्रारीचे निराकरण करण्याचा अधिकार या मंचास नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार ही खोटी व खोडसाळपणाची असून केवळ सामनेवालेंकडून प्रिमियमची रक्कम परत मिळण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालेकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा Relief मिळण्यास पात्र नाहीत. म्हणून तक्रारदारांची तक्रार कॉस्ट लावून खारीज करावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
4. तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार, सामनेवाले यांच्याशी झालेला पत्रव्यवहार, सामनेवाले यांना दिलेल्या कायदेशीर नोटीसेस व दि. 24/12/10 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदारांना पाठविलेले क्लेम नाकारल्याचे पत्र, पॉलिसीची कागदपत्रे, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद व सामनेवाले यांची कैफियत, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, लेखी युक्तीवाद व इतर आवश्यक कागदपत्रे इत्यादींचे अवलोकन करुन मंचाने तक्रारीच्या निराकरणार्थ खालील बाबींचा विचार केला.
मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदारांच्या गाडीचा अपघात झाला आहे हे तक्रारदारांनी
सिध्द केले आहे काय ?
उत्तर - नाही.
मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदार सामनेवाले कडून विम्याची रक्कम मिळण्यास किंवा
गाडी दुरुस्तीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत काय ?
उत्तर - नाही.
मुद्दा क्रमांक 3 - तक्रारदार सामनेवालेंकडून नुकसानभरपाईची रक्कम मिळण्यास
पात्र आहेत काय ?
उत्तर - नाही.
मुद्दा क्रमांक 4 - तक्रारीत अंतिम आदेश काय ?
उत्तर - (अंतिम आदेशाप्रमाणे)
विवेचन मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदारांनी सन 2006 मध्ये मे. एल.ए.मोटर्स यांचे कडून होंडा कार खरेदी केली. परंतु तक्रारदारांनी नवीन कारसाठी पूर्ण पैसे भरुनही सामनेवाले यांनी 2006 च्या पुरात खराब झालेली गाडी तक्रारदारांना देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. व याबाबत तक्रारदारांनी तक्रार क्र. 203/08 दाखल करुन मंचाने तक्रारदारांच्या पक्षात आदेश देऊन तक्रारदारांना रु. 1,00,000/- नुकसानभरपाई देण्याचे आदेश दि. 28/05/09 रोजी देण्यात आले होते. परंतु तक्रारदारांनी विमा कंपनीकडून सदर गाडी क्र. एम.एच.43 आर – 221 (रजिस्ट्रेशन नं. 102658) ला डिसेंबर 2010 मध्ये अपघात झाल्याचे नमूद करुन गाडीच्या विम्याची रक्कम मागितल्याचे दिसून येते. परंतु तक्रारीत गाडीचा अपघात कधी व कुठे झाला याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. तसेच सामनेवाले यांनी कैफियत व सर्व्हे रिपोर्ट दाखल केल्यावर तक्रारदारांनी दाखल केलेल्या प्रतिउत्तरात गाडीचा अपघात 05/12/10 रोजी वाशी येथे झाल्याचे विधान केले आहे परंतु त्याबाबत कोणताही ठोस पुरावा तक्रारीसोबत किंवा पुराव्याचे प्रतिज्ञापत्र सोबत दाखल केलेला नाही. व सदर गाडीचा अपघात वाशी येथे दि. 05/12/10 रोजी सकाळी 7.00 वाजता सकूलबसशी टक्कर होऊन झाल्याचे तक्रारदारांनी तक्रारीत न लिहिता सामनेवाले यांनी कैफियत दाखल करुन तक्रारदारांनी गाडीचा अपघात नक्की कधी झाला याबाबत शंका व्यक्त केल्यावर तक्रारदारांच्या प्रतिउत्तरात केलेला आहे. तसेच दि. 05/12/10 रोजी तक्रारदारांच्या गाडीला अपघात झाल्याबाबत तक्रारदारांनी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून पंचनामा केलेला नाही किंवा गाडीला अपघात झाला आहे हे दर्शवणिारा पुरावा किंवा साक्षीदाराने दिलेली साक्ष, किंवा पंचनाम्याची प्रत तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेली नाही. तसेच सर्व्हेअरने दि. 22/12/10 रोजी दिलेल्या रिपोर्टमध्ये गाडीला झालेले नुकसान हे अपघातामुळे नसून गाडी जुनी असल्याने फार पूर्वीपासून झालेले नुकसान (Damage) आहे असा नमूद केलेल्या Remark प्रमाणे उल्लेख दिसतो. (नि. I – W.S.)
“ Remarks of Surveyor :- The damages visible on the vehicle are very old & not relevant to the cause of accident mentioned in the claim form by insured. Hence insurer may repudiate claim as ‘No claim as per policy & condition’. ”
सदर गाडीचे नुकसान अपघातामुळेच झाले हे तक्रारदारांनी पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही व तक्रारदारांची गाडीच्या अपघाताबाबत केलेली विधाने विमा कंपनी कडून प्रिमियमची रक्कम काढून घेण्यासाठी जाणूनबुजून विचाराअंती (after thought) केल्याचे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदारांच्या गाडीला अपघात झाला आहे ही बाब मंच अमान्य करीत आहे.
विेवेचन मुद्दा क्रमांक 2 व 3 - तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत सर्व्हेअरने नक्की किती तारखेला गाडीची तपासणी करण्यासाठी भेट दिली याचा स्पष्ट उल्लेख तक्रारीत केलेला नाही. तसेच विमा कंपनीने क्लेम देण्याचे दि. 24/12/10 रोजी नाकारल्यानंतर तक्रारदारांनी विमा कंपनीकडून क्लेमची रक्कम तक्रारदारांना द्यावयाची नसल्यास तक्रारदारांनी सामनेवालेकडे भरलेली प्रिमियमची रक्कम रु. 32,902/- तक्रारदारांना परत करावी असे विधान तक्रारीत केलेले आहे व तक्रारीच्या प्रार्थना कलमात गाडीच्या दुरुस्तीसाठी खर्च केलेली रक्कम रु. 45,000/- तक्रारदारांना सामनेवालेंनी तसेच तक्रारीचा खर्च रु. 10,000/- व न्यायिक खर्च रु. 10,000/- द्यावेत अशी मागणी केली आहे. तसेच सदर रक्कम रु. 45,000/- तक्रारदारांनी कशी काढली किंवा त्याबाबत दुरुस्तीसाठी खर्च केलेल्या रकमेबाबतचा तपशिल किंवा पावत्या, बिले इत्यादी तक्रारदारांनी तक्रारीसोबत जोडलेले नाहीत. किंवा गाडीच्या दुरुस्तीसाठी खर्च केलेल्या रकमेबाबत प्रतिज्ञापत्र तक्रारदारांनी तक्रारीसोबत जोडलेले नाही. तक्रारीत विमा पॉलिसी रद्द करण्याबाबत सामनेवाले यांना दिलेली नोटीस ही तक्रारदारांनी त्यापूर्वी घेतलेल्या दुस-या विमा पॉलिसी बद्दल असल्याचे दिसून येते. (तक्रार पान नं. 9) तसेच प्रस्तुत तक्रारीतील पॉलिसीचा कालावधी दि. 13/11/10 ते दि. 12/11/11 असा पॉलिसीच्या कागदपत्रांवर नमूद केला आहे. (पान नं. 54 complaint) तसेच तक्रारदारांनी सदर तक्रार दाखल करण्यापूर्वी घेतलेल्या पॉलिसी क्र. VP00262066000102 या पॉलिसीबाबत व पूर्वी झालेल्या Santro xing XL गाडीच्या दि. 20/12/08 रोजी झालेल्या अपघाताबाबत क्लेम केला होता व तो मंचाने अंशतः मंजूर करुन तक्रारदारांना त्याची नुकसानभरपाईची रक्कम सामनेवाले यांनी देण्याचे आदेश दिले आहेत व त्या क्लेमसाठी दाखल केलेले फोटो, रिपेअर बिल्स व इतर पॉलिसीची कागदपत्रे पुन्हा दाखल करुन तक्रारदार मंचाकडून पुन्हा विम्याच्या पॉलिसीची रक्कम मागत आहेत किंवा तक्रारदारांनी भरलेल्या एकूण प्रिमियमची रक्कम तक्रारदारांना परत करावी अशी मागणी सामनेवालेकडून करीत आहेत असे दिसून येते. तसेच तक्रारदारांच्या म्हणण्याप्रमाणे सदर गाडी होंडा कारला अपघात झाला हे तक्रारदार पुराव्यानिशी सिध्द करु न शकल्याने तक्रारदारांची सदर तक्रार पुराव्याअभावी खारीज करण्यात येते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालेकडून त्यांनी तक्रारीत केलेल्या कोणत्याही मागण्या मान्य करुन मिळण्यास पात्र नाहीत असे मंचाचे मत आहे.
सबब, अंतिम आदेश पारीत करण्यात येतो
अंतिम आदेश
1. तक्रारदारांची तक्रार तक्रारदारांच्या गाडीला दि. 05/12/10 रोजी वाशी येथे अपघात झाला हे सिध्द करण्याबाबत आवश्यक असलेला कोणताही पुरावा तक्रारदारांनी तक्रारीत दाखल केलेला नसल्याने पुराव्याअभावी तक्रारदारांच्या सर्व मागण्या अमान्य करुन खारीज करण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई.
दिनांक – 23/05/2014
(एस.एस.पाटील ) (स्नेहा एस.म्हात्रे )
सदस्य अध्यक्षा
अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.