1. विरुध्द पक्ष यांनी, तक्रारकर्त्यास ग्राहक संरक्षण अधिनियम,1986 तील तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याचे आक्षेपांतर्गत तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे. 2. वि.प. क्र. 3 हे मोबाईल विक्रेता, वि.प. क्र. २ हे सॅमसंग कंपनीचे अधिकृत मोबाईल दुरुस्ती केंद्र तर वि.प. क्र. 1 हे विमा कंपनी आहेत. तक्रारकर्त्याने दि. 17/08/2015 रोजी सॅमसंग कंपनीचा एच.एस.गोल्ड, 920 या मॉडेलचा मोबाईल वि.प.क्र.3 कडून रु. 39,180/- ला विकत घेतला असून सदर मोबाईलचा आय. एम ई .आय क्र. 357215060739953 हा आहे. तक्रारकर्त्याने सदर मोबाईल वि.प.3 यांचेकडे स्क्रॅचकार्डद्वारे प्रिमियम जमा करून वि.प.क्र.1 यांचेकडे विमाकृत केला होता. तक्रारकर्त्याचा मोबाईल दिनांक 1/6/2016 रोजी खाली पडून त्यावरून गाडी गेल्याने पुर्णपणे खराब झाल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर मोबाईल त्याच दिवशी आवश्यक दस्तावेजांसह अॅप्स डेली सर्व्हीस सेंटर, चंद्रपूर येथे जमा केला. तेंव्हा वि.प. क्र.2 यांनी तक्रारकर्त्याला सांगितले की सदर मोबाईल खराब झाल्याने सर्व्हिस सेंटरमध्ये जमा केल्याबाबतची माहिती वि.प.क्र.1 यांना देण्यांत येईल. तक्रारकर्त्याने मोबाईल जमा केल्याची माहिती वि.प.क्र.3 यांनासुध्दा दिली. 3. यानंतर तक्रारकर्त्याने मोबाईल क्लेमची रक्कम रू.39,180/- मिळण्याबाबत वि.प.क्र.1 यांना भ्रमणध्वनीवरून तर वि.प.क्र.2 व 3 यांचेकडे वारंवार प्रत्यक्ष भेट देवून मोबाईलची विमा दावा रक्कम देण्याची विनंती केली. मात्र वि.प.क्र.1 ते 3 कडून तक्रारकर्त्याला दावा रक्कम मिळण्याबाबत कोणतेही प्रयत्न करण्यांत आले नाहीत. तक्रारकर्त्याला अद्याप विमादावा रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थीक नुकसान, शारिरीक व मानसीक त्रास झाला आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 27/01/2016, दिनांक 17/06/2016, दिनांक 22/07/2016 व दिनांक 27/01/2017 रोजी रजिस्टर्ड पत्रांद्वारे वी.प. क्र.१ कडे तसेच दिनांक 20/03/2017 रोजी अधिवक्त्यामार्फत नोटीस पाठवून विरुद्ध पक्ष क्र.1ते 3 कडे विमादावा रकमेची मागणी केली. परंतु विरुद्ध पक्षांनी पुर्तता केली नाही. वि.प. यांनी तक्रारकर्त्याप्रती सेवेत त्रृटी दिली. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्षां विरुध्द मंचासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे कि, तक्रारकर्त्याला वि.प.क्र. 1 यांनी मोबाईल विमादावा रक्कम रु. 39,180/- व त्यावर दिनांक 1/6/2016 पासून द.सा.द.शे.12 टक्के दराने व्याजासह तक्रारकर्त्याला द्यावे तसेच तक्रारकर्त्यास शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. 20,000/- व तक्रार खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- वि.प. क्र. 1 ते 3 यांनी तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा, अशी विनंती केली. 4. तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृत करून विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना मंचातर्फे नोटीस काढण्यात आली. परंतु वि.प. क्र. 1 व 2 यांना नोटीस पाठवूनदेखील प्रकरणात हजर न राहिल्याने त्यांचेविरुद्ध दि. 2/7/2018 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आले. 5. वि.प. क्र. 3 ने मंचासमक्ष हजर होवून आपले लेखी उत्तर दाखल केले. तक्रारकर्त्याने दि. 17/08/2015 रोजी सॅमसंग कंपनीचा एच.एस.गोल्ड, 920 या मॉडेलचा मोबाईल वि.प.क्र.3 कडून रु. 39,180/- ला विकत घेतला असून सदर मोबाईलचा आय एम ई आय क्र. 357215060739953 हा आहे ही बाब वि.प. क्र. 3 यांनी आपल्या लेखी उत्तरात मान्य केली असून तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेले उर्वरित कथन नाकबूल केले आहे. वि.प.क्र.3 ने विशेष कथनात, तक्रारकर्त्याने सदर मोबाईल वि.प.3 यांचेकडे स्क्रॅचकार्डद्वारे प्रिमियम जमा करून वि.प.क्र.1 यांचेकडे विमाकृत केला होता ही बाब नाकबूल करून पुढे नमूद केले कि, वि.प.क्र.3 हे केवळ विक्रेता असून नामांकीत कंपनीचे फोन विक्री करतात. वि.प.क्र.3 चा कोणत्याही विमाकंपनी किंवा फोन निर्मात्यांसोबत करार नाही तसेच वि.प.क्र.3 कडून खरेदी करण्यांत आलेल्या फोन्सचा विमा काढणे किंवा विमा मिळवून देण्याची सेवा पुरविण्याचीदेखील जबाबदारी त्यांनी घेतली नाही. त्यामुळे तशी जबाबदारी वि.प.क्र.3 वर लादता येत नाही. तक्रारकर्त्याने स्वतःच विमा कंपनीबाबत शहानिशा करून फोनचा विमा वि.प.क्र.1 कडे अटी व शर्तींनुसार उतरविला होता. याशिवाय वि.प.क्र.2 मोबाईल सर्व्हीस सेंटर यांचेशीदेखील वि.प.क्र.3 यांचा कोणताही संबंध नाही. 6. वि.प.क्र.3 ने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याने मोबाईल खरेदी करतेवेळीच वि.प.क्र.1 विमा कंपनीचे स्क्रॅचकार्डसुध्दा खरेदी केले होते व त्या स्क्रॅचकार्डचे पैसे वि.प.क्र.3 ला दिले होते. याव्यतिरीक्त सदर विम्याशी वि.प.क्र.3 यांचा काहीही संबंध नाही याची वि.प.क्र.3 ने त्याच वेळी तक्रारकर्त्यास माहिती दिली होती. तक्रारीवरून स्पष्ट होते की तक्रारकर्त्याने मोबाईल खराब झाल्यानंतर त्याची सुचना वि.प.क्र.3 ला दिली नव्हती, व मोबाईल खराब झाल्याबाबत त्याने वि. प. क्र. 1 ला कळवून परस्पर सदर मोबाईल वि.प.क्र.2 कडे स्वमर्जीने दुरुस्तीकरीता दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याला वि.प.क्र.1 व2 यांचेकडूनच न्युनतापूर्ण सेवा मिळाली. दाखल दस्तावेजांवरून स्पष्ट होते की तक्रारकर्त्याने विमादावा रक्कम रू.39,180/- मिळण्याबाबत वि.प.क्र.3 कडे कोणतीही विनंती केली नव्हती तर तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 यांचेसोबतच पत्रव्यवहार केला/ई मेल केले व सदर दस्तावेजांवरून वि.प.क्र.1 हे तक्रारकर्त्याला झालेल्या कथीत नुकसानाची भरपाई देण्यांस तयारसुध्दा होते हेदेखील स्पष्ट होते. त्यासाठी वि.प.क्र.1 ने मागीतलेल्या दस्तावेजांची पुर्तता करणे ही तक्रारकर्त्याची जबाबदारी होती. वि.प.क्र.3 यांचा सदर विम्याशी काहीही संबंध नाही त्यामुळे ते तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसान व त्रासाकरीता जबाबदार नाहीत. वि.प.यांनी तक्रारकर्त्यास कोणतीही त्रुटीपूर्ण सेवा दिली नाही. सबब, तक्रारकर्त्याची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 7. तक्रारकर्त्याची तक्रार दस्तावेज, तक्रारीतील मजकुरच पुरावा शपथपत्र समजण्यांत यावा अशी नि.क्र.11 वर पुरसीस दाखल व वि.प. क्र. 3 यांचे लेखी म्हणणे तसेच तक्रारकर्ता व वि. प क्र. 3 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्यात येत आहे. मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ता हा वि.प.1 ते 3 चा ग्राहक आहे काय ? होय 2. वि.प. क्र. 1 ते 3 यांनी विमा कराराप्रमाणे सेवा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ? मिमांसेतील निष्कर्षानुसार 3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारण मिमांसा मुद्दा क्र. 1 बाबत :- 8. तक्रारकर्त्याने दि. 17/08/2015 रोजी सॅमसंग कंपनीचा एच.एस.गोल्ड, 920 या मॉडेलचा मोबाईल वि.प.क्र.3 कडून रु. 39,180/- ला विकत घेतला असून सदर मोबाईलचा आय एम ई आय क्र. 357215060739953 हा आहे. तक्रारकर्त्याने दि. 17/08/2015 रोजीच सदर मोबाईल वि.प.3 यांचेकडे स्क्रॅचकार्डद्वारे रू.2499/- प्रिमियम जमा करून वि.प.क्र.1 यांचेकडे विमाकृत केला होता. याबाबत तक्रारकर्त्याने मोबाईलचे बिल तसेच प्रिमियम दिल्याची पावती दस्त क्र.अ-1 व अ-2 व क्षतीग्रस्त मोबाईल वि.प.क्र.2 कडे जमा केला या संदर्भात दस्त क्र. अ-3 वर जॉबशीट दाखल केली आहे. यावरून तक्रारकर्ता हा वि.प.क्र.1 ते 3 चा ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 2 बाबत :- 9. तक्रारकर्त्याने वि.प.क्र.3 कडून वि.प.क्र.1 यांचे स्क्रॅचकार्ड विकत घेवून त्याद्वारे प्रिमियम भरून वि.प.क्र.1 यांचेकडे उपरोक्त मोबाईल विमाकृत केला होता व सदर मोबाईल हा दिनांक 1/6/2016 रोजी क्षतीग्रस्त झाल्याने वि.प.क्र.2 कडे जमा केला या संदर्भात प्रिमियम भरल्याची पावती नि.क्र.5 वरील दस्त क्र.अ-2 दस्त क्र.अ-3 वर जॉबशीट दाखल केली आहे. यावरून सदर विमाकृत मोबाईल पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला व त्यानंतर तक्रारकर्त्याने सदर मोबाईलची वि.प.क्र 1 कडून नुकसान भरपाई विमादावा रक्कम मिळण्याकरीता तो वि.प.2 कडे जमा केला होता हे सिध्द होते. तक्रारकर्त्याला सदर विमादाव्याची रक्कम प्राप्त न झाल्याने तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 यांचेसोबत पत्रव्यवहार केला/ई मेल केले. वि.प.क्र.1 यांनी तक्रारकर्त्याला दि.22/6/2016 रोजी पाठविलेल्या मेलमध्ये सदर मोबाईलची विमा रक्कम रू.20,472/- झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यांस तयारसुध्दा होते हेदेखील स्पष्ट होते. त्यासंदर्भात त्यांनी तक्रारकर्त्याला, ‘’विमादावा पुर्णतः नुकसान तत्वावर मंजूर’’ परंतु क्षतीग्रस्त हॅंडसेट तसेच मुळ दस्तावेज जमा केल्यानंतर दावा रक्कम देय होईल असे कळविलेले आहे. मात्र तक्रारकर्त्याने नि.क्र.5 वरील दस्त क्र.अ-3 या वि.प.क्र.2 ने दिलेल्या जॉबशिटमध्ये ‘’क्षतीग्रस्त मोबाईल दिनांक 1 जून,2016 रोजी प्राप्त झाल्याचे नमूद आहे. तसेच वि.प.क्र.1 च्या दिनांक22/6/2016 च्या तक्रारकर्त्याला पाठविलेल्या मेलमध्ये, तक्रारकर्त्याने क्षतीग्रस्त मोबाईलसंबंधी स्कॅन करून दस्तावेज पाठविलेले होते असे नमूद आहे. सदर दस्तावेजांवरून वि.प.क्र.1 हे तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानाची भरपाई रू.20,472/- देण्यांस तयारसुध्दा होते हे मेल संदेशावरून सिध्द होते. मात्र त्यासाठी वि.प.क्र.1 ने दस्तावेजांची पुर्तता करण्याबाबत तक्रारकर्त्याला सुचीत केले होते. तक्रारकर्त्याने वि.प.क्र.1 यांना दिलेल्या दिनांक 27/1/2016 च्या पत्रात (दस्त क्र.अ-4) मध्ये, त्याने मोबाईलशी संबंधीत दस्तावेज वि.प.क्र.2 कडे जमा केल्याचे नमूद केलेले आहे. मात्र तक्रारकर्त्याचे सदर कथन वि.प.क्र.1 व 2 यांनी पत्रव्यवहाराद्वारे तसेच प्रस्तूत प्रकरणात उपस्थीत राहून नाकारलेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विमादावा रक्कम मिळण्याकरीता वि.प.क्र.2 कडे क्षतीग्रस्त मोबाईल व मोबाईलशी संबंधीत दस्तावेज सुपूर्द केले होते हे सिध्द होते. असे असले तरीही तक्रारकर्त्याने त्याच्या बॅंकेचे डिटेल्स, आय डी पृफ, वि.प. कडे जमा केल्याबाबत दस्तावेज दाखल केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर दस्तावेजांची पुर्तता करावी आणि त्यानंतर वि.प.क्र.1 यांनी तक्रारकर्त्याला मंजूर क्लेम देय करावा असे निर्देश संबंधीतांना देणे न्यायसंगत होईल असे मंचाचे मत आहे. प्राप्त परिस्थितीत तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसीक त्रासाबाबत नुकसान भरपाई मंजूर करणे मंचाच्या मते न्यायोचीत होणार नाही. सबब, मुद्दा क. 2 चे उत्तर त्याप्रमाणे नोंदविण्यात येते. मुद्दा क्र. 3 बाबत :- 10. मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. अंतीम आदेश 1. ग्राहक तक्रार क्र. 118/2017 अंशतः मान्य करण्यात येते. 2. तक्रारकर्त्याला निर्देश देण्यांत येतो की, तक्रारकर्त्याने त्याच्या ओळखपत्र तसेच बॅंके अकाऊंटसंबंधीत डिटेल्स, वि.प.क्र.2 मार्फत विरुद्ध पक्ष क्र. 1 यांचेकडे जमा करावे व सदर दस्तावेज प्राप्त झाल्यानंतर वि.प.क्र.1 यांनी, तक्रारकर्त्यास, विमादावा रक्कम रू.20,472/- अदा करावी. यासंदर्भात वि.प.क्र.2 व 3 यांनी तक्रारकर्त्यास सहकार्य करावे. 3. उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी. |