(मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेंकडून तात्पुरते अपंगत्वासाठी रक्कम रु.2,50,000/- मिळावेत, दवाखान्याचा खर्च रक्कम रु.44,959/- मिळावा,
अपघातामुळे घरी राहावे लागले म्हणून पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार रु.49,050/-मिळावेत, मानसिक शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु.5,00,000/- मिळावेत, अर्जाचा खर्चापोटी रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला नं.1 ते 3 यांनी पान क्र.68 लगत इंग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे व पान क्र.69 लगत इंग्रजी भाषेमध्ये प्रतिज्ञापत्र, पान क्र.70 लगत मराठी भाषेमध्ये लेखी म्हणणे तसेच पान क्र.71 लगत मराठी भाषेमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी पान क्र.133 लगत सामनेवाला यांचे लेखी जबाबास खुलासा सादर केलेला आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दें विचारात घेतले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?-होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मेडीक्लेम विमापॉलिसीपोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाच खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अंतीम आदेश- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचनः
या कामी अर्जदार यांचेवतीने अँड. हेमंत गायकवाड व सामनेवाला यांचे वतीने अँड.शरद मोगल यांनी युक्तीवाद केलेला आहे.
अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून मेडीक्लेम विमापॉलिसी घेतलेली आहे ही बाब सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये मान्य केलेली आहे. सामनेवाला यांनी पान क्र.5 लगत मेडीक्लेम विमा पॉलिसीचे सर्व कागदपत्र दाखल केलेले आहेत. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, पान क्र.5 लगतची विमापॉलिसी यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अपघातामुळे तुटलेल्या हाडासाठी रुपये 1 लाखाच्या पंचवीस टक्के इतकी भरपाई मिळते तथापी रक्कम रुपये 10 लाखाच्या पंचवीस टक्के इतकी रक्कम मिळत नाही. अर्जदार यांनी दुखापतीबाबत कोणतेही सबळ पुरावे दाखल केलेले नाहीत. अर्जदार यांस कायम किंवा तात्पुरत्या स्वरुपाचे दौर्बल्य आलेले आहे व त्यास सदर अपघातच कारणीभूत आहे अशाप्रकारे कोणतेही कागदपत्र जोडलेले नाही तसेच तक्रारदारास भविष्यकाळात कधीही बरे वाटणार नाही व सुधारणा होणार नाही अशा स्वरुपाचेही पुरावे दिलेले नाहीत. विमीत व्यक्तीस एक टक्का इतक्या उतरविलेल्या विम्याच्या रकमेवर प्रत्येक हप्त्यासाठी विमा कंपनी देणे लागले परंतु सदरची रक्कम ही विमीत व्यक्ती जर तात्पुरती संपुर्णपणे शारिरीकदृष्टया दुर्बल झाली तरच दिली जाईल तथापी अशाप्रकारचे देणे हे 100 आठवडयापर्यंत मर्यादीत राहील. 100 आठवडयापेक्षा जास्त कालावधीकरीता रक्कम देणे लागु होणार नाही. दवाखान्यात आंतररुग्ण म्हणून राहील्यास व अँडमिट झाल्यास औषधोपचाराचा संपुर्ण खर्च दिला जातो परंतु याबाबत अर्जदार यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. सेवा देण्यात कमतरता केलेली नाही. अर्ज नांमंजूर करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे.
युक्तीवादाचे वेळी अर्जदार हे स्वतः मंचासमोर हजर होते व त्यावेळी मंचासमोर अर्जदार यांच्या दोन्ही पायांची हालचाल मंचाचे अध्यक्ष व सदस्यांनी स्वतः पाहीलेली आहे व त्यामध्ये अर्जदार यांचा डावा पाय कायमस्वरुपी काही अंशी दुर्बल झालेला आहे असे दिसून आलेले आहे. या कामी अर्जदार यांनी पान क्र.150 लगत सिव्हील हॉस्पीटल नाशिक यांचे मेडीकल ऑफीसर यांनी दिलेले दि.13/08/2011 रोजीचे सर्टिफिकेट दाखल केलेले आहे. या सर्टिफिकेटमध्ये अर्जदार याचा डावा पाय काही अंशी 15 टक्क्यापर्यंत पुर्णपणे दुर्बल झालेला आहे असा उल्लेख आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.76 लगत विमापॉलिसीच्या अटी व शर्ती दाखल केलेल्या आहेत. या अटी व शर्तीमधील बेनीफिट क्र.3 अ नुसार अर्जदार यांचा एखादा पाय काही अंशी कायमस्वरुपी दुर्बल झालेला असल्यास अर्जदार यांना विमीत रक्कमेच्या 45 टक्के इतकी रक्कम देता येते असा स्पष्ट उल्लेख आहे. वास्तविक पान क्र.150 चे डॉक्टरांचे सर्टिफिकेट व पान क्र.76 लगतच्या विमापॉलिसीच्या अटी व शर्ती यांचा विचार करुन सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्लेम मंजूर करणे गरजेचे होते. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.,
पान क्र.5 च्या विमापॉलिसीनुसार दौर्बल्याकरीता 5 लाख रुपये, अपघाती मृत्युकरीता 10 लाख रुपये व इनपेशंट हॉस्पीटलायझेशन करीता 1 लाख रुपये इतक्या रुपयांकरीता सामनेवाला यांनी अर्जदार यांची विमापॉलिसी घेतलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे.
पान क्र.76 चे विमापॉलिसीचे अटी व शर्ती नुसार अर्जदार हे पायाचे काही अशी कायमस्वरुपी दुर्बलतेकरीता रु.5 लाख या विमीत रकमेपैकी 45 टक्के इतकी रक्कम म्हणजे रक्कम रु.2,25,000/- इतकी रक्कम विमाक्लेमपोटी मिळण्यास पात्र आहेत.
अर्जदार यांनी पान क्र.14, पान क्र.15, पान क्र.17, पान क्र.19, पान क्र.35, पान क्र.36, पान क्र.38, पान क्र.39 व पान क्र.40 लगत हॉस्पीटल खर्चाची व मेडीकल स्टोअर्सची बिले दाखल केलेली आहेत. विमापॉलिसीचे अटी नुसार अर्जदार हे रक्कम रु.1,00,000/- पर्यंत इन हॉस्पीटलायझेशन करीता रक्कम मिळण्यास पात्र आहेत. वरील सर्व बिलांची एकत्रीत रक्कम रु.48,221/- होत आहे. विमा पॉलिसीचे अटी व शर्तीनुसार अर्जदार हे इन हॉस्पीटलायझेशन करीता रक्कम रु.48,221/- इतकी रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीकरित्या एकूण रु.2,73,221/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम वसूल होवून मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे यामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेकडून वैय्यक्तीक व संयुक्तीकरित्या मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे वकिलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्रे, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 ते 3 यांचेविरुध्द अंशतः मंजूर
करण्यात येत आहे.
2) सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैय्यक्तीक व संयुक्तीकरित्या आज पासून 30
दिवसांचे काळात पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात.
2अ) मेंडीक्लेम विमापॉलिसीपोटी रक्कम रु.2,73,221/- द्यावेत.
2ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- द्यावेत.
2क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.