::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/09/2015 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारकर्ता हा नोकरदार असून, एस.एस.एस.के.आर. इन्नाणी कॉलेज, कारंजा येथे ग्रंथपाल म्हणून नोकरी करतो. तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष क्र. 3 मार्फत विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कंपनीचा वैद्यकीय विमा काढलेला आहे. तक्रारकर्त्याने त्याच्या कुटूंबाकरिता, भविष्यकालीन वैद्यकीय खर्च टाळण्याच्या दृष्टीने इझी हेल्थ इन्डीव्हीजुअल हेल्थ इन्शुरन्स प्लान करिता रुपये 17,350.19/- भरले. त्यानंतर पॉलिसी क्र. 160200/48/ 11051/1000192914 व दि. 31/03/2011 ते 30/03/2012 कालावधी करिता प्रदान केली. विमा कालावधीमध्ये तक्रारकर्त्याचा मुलगा दिर्घायु जोगे हा लिंगसंबंधी आजारापासून ग्रस्त झाला. त्यामुळे त्यास दिनांक 22/12/2011 रोजी विरुध्द पक्ष कंपनीने दिलेल्या हॉस्पीटलच्या यादीप्रमाणे हाय-टीच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर, अमरावती येथे तपासून दिनांक 23/12/2011 रोजी भरती करुन घेतले. डॉक्टरांनी डायग्नोसीस फीमोसीस ( Circumcision done ) असे निदान केले. पॉलिसी अॅग्रीमेंटमध्ये नमुद आधारावर डॉ. दिनेश एम. वाघाडे यांनी चि. दिर्घायु याच्यावर शस्त्रक्रिया करुन त्यास दिनांक 24/12/2011 रोजी डिस्चार्ज दिला. तक्रारकर्त्याने डॉक्टरांची फी व औषधोपचार असे एकूण 7,838/- रुपये खर्च केले. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे त्यांना झालेला खर्च मिळणेबाबत, क्लेम दिनांक 24/01/2012 रोजी सादर केला. परंतु विरुध्द पक्ष कंपनीने दिनांक 08/02/2012 रोजी पत्र पाठवून, तक्रारकर्त्याचा क्लेम खारीज केला व म्हटले की, “ सदरहू क्लेम हा तक्रारकर्त्याने घेतलेल्या पॉलिसी अंतर्गत येत नाही कारण Claim for Circumcision, Circumsion for any disorder स्पष्टपणे पॉलिसीमधून वगळण्यात आला आहे ” असे कळविले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा क्लेम हेतूपुरस्सर खारिज केला, म्हणून तक्रारकर्त्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी सदर तक्रार मंचामध्ये दाखल करुन, विरुध्द पक्षाकडून प्रिमीयम रक्कम रुपये 17,350/- परत मिळावी, मानसिक त्रासाकरिता रुपये 25,000/- नुकसान भरपाई, उपचाराकरिता खर्च केलेले रुपये 7,838/- तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- असे एकूण 53,188/- संयुक्तपणे मिळवून देण्यात यावे, व इतर योग्य ती दाद देण्यात यावी, अशी मागणी केली.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर दस्तऐवज सादर केली आहेत.
2) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा लेखी जबाब -
वरील प्राप्त तक्रारीची विरुध्द पक्ष यांना नोटीस काढल्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब इंग्रजी भाषेत ( निशाणी – 10 व 12 प्रमाणे ) मंचात दाखल केला असुन, त्यानुसार त्यांनी प्राथमिक आक्षेपानुसार, तक्रारकर्ता यांचे बहुतांश कथन फेटाळले. तक्रार मोघम स्वरुपाची आहे, तक्रार चालू शकत नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह फेटाळावी इ. विरुध्द पक्षाने अधिकचे कथनामध्ये पुढे नमुद केले की, तक्रारकर्ता, त्यांची पत्नी व त्यांचा मुलगा यांनी विरुध्द पक्षाकडून वैद्यकीय ऊपचाराकरिता पॉलिसी ही दिनांक 31/03/2011 ते 30/03/2012 या कालावधीसाठी घेतलेली होती. हयाच कालावधीत तक्रारकर्त्याच्या मुलाचा दावा दाखल झाला होता. त्या दाव्यापोटी तक्रारकर्त्याला विमा पॉलिसीच्या शर्तीला व अटीला अधीन राहून विरुध्द पक्ष यांनी दावा नाकारल्याचे कळविले होते. ती विमा पॉलिसी तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये दाखल केली आहे. तसेच सदरहू रक्कम ही पॉलिसीच्या नियमाप्रमाणे देय नाही. तक्रारकर्त्याचा क्लेम हा विमा पॉलिसीच्या क्लॉज 6 (e) (xiii) नुसार चालू शकत नसल्यामुळे, नाकारण्यात आलेला आहे. वरील अटीप्रमाणे तक्रारकर्त्याचा क्लेम कायदेशिररित्या नाकारण्यात आलेला आहे व तसे दिनांक 9/02/2012 रोजीच्या पत्राव्दारे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास कळविले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा क्लेम कायदेशीररित्या नाकारलेला आहे व त्यामध्ये अनुचीत प्रथेचा अवलंब झालेला नाही. त्यामुळे सदरहू तक्रार खर्चासहीत खारीज करण्यांत यावी.
सदर जबाब, विरुध्द पक्ष यांनी, शपथेवर, सादर केला.
3) या प्रकरणात दिनांक 25/09/2014 रोजी आदेश पारित करण्यात आला की, विरुध्द पक्ष क्र. 3 यांना नोटीस बजाविल्यानंतर देखील विरुध्द पक्ष गैरहजर. तरी प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फी चालविण्यात यावे.
4) कारणे व निष्कर्ष ::
या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचा संयुक्त लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ता यांची युक्तिवादाबद्दलची पुरसिस यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देऊन नमुद केला तो येणेप्रमाणे.
या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र. 3 यांना मंचाची नोटीस बजाविल्या- नंतर देखील ते गैरहजर राहिल्यामुळे, सदर प्रकरण विरुध्द पक्ष क्र. 3 विरुध्द एकतर्फी, तसा आदेश पारित करुन, चालविण्यात आले.
तक्रारकर्ते व विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांच्यामध्ये ह्या बाबतीत वाद नाही की, तक्रारकर्ते यांनी स्वत:करिता व त्यांची पत्नी तसेच दोन मुलांकरिता विरुध्द पक्षाकडून इझी हेल्थ फ्लोटर पॉलिसी काढली होती. तसेच पॉलिसी कालावधीबाबत उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्ते यांच्या मुलाचे लिंगसंबंधीच्या आजारावर उपचार झाले होते. त्यासंबंधीचा विमा दावा विरुध्द पक्षाने, सदरहू क्लेम हा पॉलिसी अंतर्गत येत नाही व तो उपचार सदर पॉलिसीमधून वगळण्यात आला आहे, असे कारण देवून नाकारला. विरुध्द पक्षाची ही कृती योग्य आहे की अयोग्य, हे पाहण्याकरिता, तक्रारकर्त्याने उपचारासंबंधीचे जे दस्त दाखल केले, त्यावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांच्या मुलावर लिंगसंबंधीच्या आजारावर उपचार झाले असून डॉक्टरांनी त्याचे निदान ‘‘ फीमोसीस ( Circumcision done )’’ असे केले होते व तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या सदरहू पॉलिसी प्रतीमध्ये हा आजार पॉलिसीच्या Section 6 Exclusions (xiii) नुसार येतो, म्हणजे ‘‘Circumcisions’’ हा उपचार सदर पॉलिसीमधून वगळण्यात आलेला आहे, हे स्पष्ट होते. म्हणून यात विरुध्द पक्षाची कोणतीही सेवेतील न्यूनता दिसून येत नाही. सबब तक्रारकर्ते यांची तक्रार मंचाला मंजूर करता येणार नाही. त्यामुळे, अंतिम आदेश पारित केला तो पुढीलप्रमाणे.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबद्दल कोणताही आदेश पारित नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री.ए.सी.उकळकर) (सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri