नि.16 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 262/2010 नोंदणी तारीख – 16/11/2010 निकाल तारीख – 15/2/2011 निकाल कालावधी – 90 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ मे.ए.ए. कॅफेटेरिया प्रोप्रा. श्री राहील इर्शाद शेख रा.सत्कारभाई पथ, पांचगणी जिल्हा सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री विजय शेट्टी) विरुध्द ऍपेल बेकरी मशिनरी प्रा.लि. तर्फे संचालक श्री जयदेव चौकवाला रा.14अ, निसार बिल्डींग, सेलेटर रोड, ग्रँट रोड, मुंबई नं.400007 ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे स्नॅक्स व ज्यूसबार स्वरुपाचा स्वयंरोजगार करीत असतात. जाबदार यांचा बेकरी व्यवसायाठी आवश्यक मशिनरी विक्रीचा व्यवसाय आहे. अर्जदार यांनी त्यांचे चालू व्यवसायासाठी पूरक म्हणून विविध बेकरी उत्पादने उपलब्ध करता यावीत म्हणून जाबदार यांचेकडून गॅस कन्व्हेशन ओव्हन खरेदी केला. त्याची किंमत रु.2,23,763/- अर्जदार यांनी जाबदार यांना अदा केली व त्यानंतर जाबदार यांचे प्रति नि धी यांनी अर्जदारचे व्यवसायाचे ठिकाणी येवून ओव्हन व मिक्सरची उभारणी करुन दिली. सदरचे गॅस कनव्हेक्शन ओव्हन हे पूर्णपणे स्वयंचलित असते. त्यासाठी केवळ कंट्रोल पॅनेलद्वारा तापमान निश्चिती केली असता पुढील सर्व क्रिया या स्वयंचलीत अशाच असतात. या पध्दतीमुळे वेळेची व इंधनाची बचत होते. परंतु परंतु अर्जदार यांनी जेव्हा सदरचे ओव्हनचा वापर सुरु केला तेव्हा तो सर्व निकषांवर खरा उतरला नाही. ओव्हनमधील तळाचा भाग चांगल्या प्रकारे भाजून तयार होई तथापि वरचा भाग त्याप्रमाणात भाजून तयार होत नव्हता. त्यामुळे अर्जदारांना ओव्हनचे दार उघडून माल हाताने पलटून ठेवल्याखेरीज माल तयार होत नव्हता. अशातच माहे सप्टेंबर 2009 मध्ये हा ओव्हन अचानकपणे बंद पडला. अर्जदार यांनी सदरची बाब जाबदार यांना कळविलेनंतर जाबदार यांनी त्याचे कंट्रोल पॅनेल बदलून दिले. यानंतर पुन्हा कंट्रोल पॅनेल खराब झाला. परंतु जाबदार त्याबाबत टाळाटाळ करु लागले. त्यानंतर जाबदार यांनी सेंसर पॅनेल बदलून दिले. परंतु अर्जदार यांचे तक्रारींचे निवारण करण्याबाबत जाबदार यांनी कोणतीही हालचाल केली नाही. अर्जदार यांनी प्रथम लेखी जाबदार यांना कळविले व त्यानंतर नोटीसही पाठविली परंतु जाबदार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. सबब सदोष ओव्हन बदली करुन नवीन ओव्हन मिळावा, अन्यथा जाबदार यांनी ओव्हनसाठी घेतलेली रक्कम रु.2,31,263/- परत मिळावी, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.15,000/- मिळावेत यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोचपावती नि.8 ला दाखल आहे. परंतु जाबदार हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा योग्य असा आदेश नि.1 वर पारीत केला आहे. 3. अर्जदारतर्फे अभियोक्ता श्री विजय शेट्टी यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र नि. 2 व इतर दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय. ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथन पाहता त्यांनी स्वतःचे स्वयंरोजगारासाठी म्हणजे बेकरी उत्पादनासाठी गॅस कन्व्हेशन ओव्हन याची खरेदी जाबदार यांचेकडून केली. सदरचे मशिनची जाबदार यांचे प्रतिनिधींनी अर्जदारांचे व्यवसायाचे ठिकाणी येवून दि. 10/9/2009 रोजी जुळणी व उभारणी करुन दिली. सदरचे उभारणी करतेवेळी सदरचे प्रतिनिधी यांनी अर्जदार यांचेकडून रु.7,500/- जमा करुन घेतले. सदरचे मशिनमध्ये कंट्रोल पॅनेलद्वारे तापमान निश्चिती केली असता पुढील सर्व क्रिया या स्वयंचलीत अशाच असतात. परंतु अर्जदार यांनी ओव्हनचा प्रत्यक्ष वापर सुरु केला तेव्हा त्याचे कार्य योग्यरित्या होत नसल्याचे त्यांचे लक्षात आले. तळाच्या भागामधील माल चांगल्या प्रकारे भाजून तयार होई परंतु वरचा भाग त्याप्रमाणात भाजून तयार होत नव्हता. त्यामुळे अर्जदार यांना ओव्हनचे दार उघडून माल हाताने पलटी ठेवावा लागत होता. त्यानंतर सप्टेंबर 2009 मध्ये सदरचा ओव्हन अचानकपणे बंद पडला. सदरची बाब जाबदार यांना कळविलेनंतर त्यांनी ओव्हनचा कंट्रोल पॅनेल दि.29/12/2009 रोजी बदलून दिला. परंतु दि.4/1/10 रोजी पुन्हा कंट्रोल पॅनेल नादुरुस्त झाला. त्यावर जाबदार यांनी कंट्रोल पॅनेलचा सेन्सर दि.15/1/10 रोजी बदलून दिला. परंतु अर्जदारच्या मूळ तक्रारी म्हणजे हाताने माल पलटून ठेवावा लागतो, वरचा भाग तुलनात्मक प्रमाणात भाजला जात नाही, तयार मालाला समसमान पध्दतीने ब्राऊन रंग चढत नाही या तक्रारी जाबदार यांनी दूर करुन दिल्या नाहीत. अर्जदार यांनी ई-मेलद्वारे जाबदार यांना वारंवार कळविले परंतु जाबदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नाही. सबब सदोष मशिन बदलून मिळावी अगर मशिनपोटी जाबदार यांना दिलेली रक्कम परत मिळावी अशी अर्जदार यांनी मागणी केली आहे. 6. अर्जदार यांनी नि.5/16 ला कन्व्हेक्शन ओव्हन व त्याचे कार्यपध्दतीचा सविस्तर तपशील असणारी इंटरनेटवरील माहिती दाखल केली आहे. सदरचे माहितीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, कन्व्हेक्शन ओव्हन हे एक अत्याधुनिक मशिन असून त्यामध्ये तापमान नियंत्रण, इंधन बचत व माल समप्रमाणात भाजला जाणे इ. अनेक वैशिष्टये असल्याचे दिसून येते. सदरची वैशिष्टये विचारात घेवून अर्जदार यांनी जाबदार यांचेकडून कन्व्हेक्शन ओव्हन खरेदी केले आहे. परंतु सदरचे ओव्हनचा वापर केल्यानंतर तो योग्यरित्या चालत नसल्याचे अर्जदार यांचे लक्षात आले. उदा. सदरच्या ओव्हनमध्ये तयार होणेसाठी ठेवलेल्या कच्च्या मालापैकी तळाचा भाग हा चांगल्या प्रकारे भाजून तयार होई परंतु वरचा भाग त्या प्रमाणात भाजून तयार होत नव्हता. त्यामुळे अर्जदार यांना ओव्हनचे दार उघडून माल हाताने पलटून ठेवल्याखेरिज माल तयार होत नव्हता. याचाच अर्थ सदरचा ओव्हन हा त्याच्या वैशिष्टयांनुसार काम करीत नसल्याचे अर्जदार यांना आढळून आले. सबब सदरची बाब त्यांनी जाबदार यांचे निदर्शनास आणून दिली. जाबदार यांनी सुमारे 2/3 वेळा दुरुस्ती करुन दिली. परंतु अर्जदार यांच्या ओव्हनबाबतच्या मूळ तक्रारी दूर झाल्या नाहीत. अर्जदार यांनी नि.5 सोबत ओव्हन दुरुस्तीबाबतचे सर्व्हिस रिपोर्ट दाखल केले आहेत. सदरचे रिपोर्टमध्ये कंट्रोल पॅनेल बदलून दिलेबाबत नमूद केले आहे. परंतु अर्जदार यांचे ओव्हनच्या कार्यपध्दतीविषयी ज्या मूलभूत तक्रारी होत्या त्या जाबदार यांचे प्रतिनिधींनी दूर करुन दिलेबाबत काहीही दिसून येत नाही. अर्जदार यांनी सदरचे तक्रारींबाबत जाबदार यांना ई-मेलद्वारे वारंवार कळविल्याचे अर्जदार यांनी मेलद्वारे जी पत्रे जाबदार यांना पाठविली आहेत त्यावरुन दिसून येते. सदरची ई-मेलद्वारे पाठविलेली पत्रे अर्जदार यांनी नि.5 सोबत दाखल केली आहेत. परंतु तरीही जाबदार यांनी त्यास कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे अर्जदार यांचे शपथपत्र व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. वरील सर्व कारणांचा विचार करता, जाबदार यांनी अर्जदार यांना सदोष मशिनचा पुरवठा करुन सेवा देण्यामध्ये त्रुटी केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब अर्जदार यांनी ओव्हनसाठी जाबदार यांना दिलेली रक्कम जाबदार यांचेकडून परत मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 7. जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाहीत. जाबदार यांनी अर्जदार यांचे तक्रारअर्जातील व शपथपत्रातील कोणताही मजकूर नाकारलेला नाही वा योग्य पुराव्यानिशी त्याचा प्रतिवाद केला नाही. सबब अर्जदार यांनी दाखल केलेले शपथपत्र पुराव्यात ग्राहय धरुन प्रस्तुतचा अर्ज अंशतः मान्य करणेत येत आहे. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार यांनी अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. कन्व्हेक्शन ओव्हनची खरेदी व उभारणीचे किंमतीपोटी रु.2,31,263/- द्यावेत व सदरचे रकमेवर अर्ज दाखल तारीख 16/11/10 पासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केप्रमाणे व्याज द्यावे. 2. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 15/2/2011 (श्री सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |