::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 06/02/2015 )
आदरणीय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, …
तक्रारकर्त्याने डिप्लोमा घेतल्यानंतर अकोट येथे हुंडीवाला पॅथॅालॉजी या नावाने लॅब सुरु केली व त्यावर तक्रारकर्ता व त्यांचे कुटूंबीयांची उपजिविका अवलंबून आहे. विरुध्दपक्षाचे सेल्स एक्झीकेटीव्ह यांनी पॅथॉलाजी करीता आवश्यक असणा-या हेमा 2062 या मशिन बाबत तक्रारकर्त्याला माहिती देऊन सदर मशिन चांगल्या गुणवत्तेची आहे व सदर मशिनची किंमत रु.2,60,000/- असल्याचे सांगितले. तसेच तक्रारकर्त्याकडील पी.ई.6000 ही मशिन बाय बॅक योजनेअंतर्गत रु. 1,20,000/- मध्ये घेण्याचे व नविन मशिनची किंमत फक्त रु. 1,40,000/- द्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले. विरुध्दपक्षाचे सेल्स एक्झीकेटीव्ह यांचे आश्वासनावर विश्वास ठेवून तक्रारकर्ता नविन मशिन घेण्यास तयार झाला व तक्रारकर्त्यास दि. 4/9/2013 रोजी हेमा 2062 हे मशिन कुरीअरमार्फत अकोट येथे मिळाले. मशिन मिळाल्यानंतर ब्ल्यु डार्ट कुरीअरचे प्रतिनिधी यांनी मशिनचे बिल रु. 1,40,000/- तक्रारकर्ता यांना दिले. बिल मिळाल्यानंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष कंपनीचे नावाने काढलेला डी.डी. रु. 1,40,000/- कुरीअरचे प्रतिनिधीस दिला. कुरीअरचे प्रतिनिधी यांनी तक्रारकर्त्याची जुनी मशिन विरुध्दपक्षाच्या सांगण्यावरुन नेली. त्यानंतर दि. 7/9/2013 रोजी विरुध्दपक्षाचे इंजिनिअर श्री संजय सिंह, श्री प्रतिक, श्री दिलीप आणि श्री त्रिदेव तक्रारकर्त्याकडे आले व मशिन सुरु करण्याचा प्रयत्न केला, परंतु मशिन मध्ये निर्मिती दोष असल्यामुळे सदरचे मशिन सुरु होऊ शकले नाही. या मशिनचे काही पार्ट बदलविणे आवश्यक असल्याचा अहवाल दि. 9/9/2013 रोजी तक्रारकर्त्याला देवून पुन्हा येवून मशिन सुरु करुन देवू, असे आश्वासन देवून ते निघून केले. त्यानंतर पुन्हा विरुध्दपक्षाचे टेक्निशियन तक्रारकर्त्याकडे आले व मशिन सुरु करण्याचा प्रयत्न केला, परंतु मशिन सुरु झाली नाही. पुन्हा मशिन मधील काही पार्ट बदलविणे आवश्यक आहे, अशा प्रकारचा अहवाल तक्रारकर्त्यास दि. 14/9/2013 रोजी दिला व पुन्हा येवून मशिन सुरु करुन देण्यात येईल, असे आश्वासन दिले. नविन मशिन तक्रारकर्त्याने घेतल्यापासून ते विनाकामी पडलेले आहे, कारण त्यामध्ये निर्मिती दोष आहे. तक्रारकर्त्याने सदर मशिन सुरु करुन देण्याकरिता विरुध्दपक्षाशी फोनवर संपर्क साधला, परंतु विरुध्दपक्षाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी दि. 24/9/2013 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून मशिन मधील दोष दुरु करण्याबाबत व नुकसान भरपाई देण्याबाबत विरुध्दपक्षाला कळविले. परंतु विरुध्दपक्षाने कोणतीही कार्यवाही केली नाही व दि. 12/10/2013 रोजी तक्रारकर्त्याच्या नोटीसला खोटे उत्तर दिले. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दोषपुर्ण मशिन विकलेली आहे व त्यामुळे तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान झालेले आहे म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार वि. मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला पुरविलेल्या दोषपुर्ण यंत्रासाठी व दोषपुर्ण सेवेसाठी व अवलंबलेल्या अनुचित व्यापार प्रथेसाठी नुकसान भरपाई रु. 3,60,000/- ( यामध्ये दोषपुर्ण यंत्राची किंमत रु. 2,60,000/- व मानसिक त्रासापोटी रु. 1,00,000/- ) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला द्यावे. तक्रारीच्या खर्चापोटी विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला रु. 25,000/- द्यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 11 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. सदर तक्रारीचे अनुषंगाने, विरुध्दपक्ष यांनी लेखीजवाब दाखल केला, त्यानुसार त्यांनी तक्रारकर्त्याचे सर्व आरोप फेटाळले व असे नमूद केले आहे की,…
सदर तक्रार वि. मंचाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरची आहे तसेच तक्रारकर्त्याने सदरची मशिन वाणिज्यीक प्रयोजनाकरिता खरेदी केली आहे व त्यामुळे तक्रारकर्ता याचा समावेश ग्राहक या व्याख्येमध्ये होत नाही. विरुध्दपक्ष कंपनी वडोदरा ( गुजरात ) येथील आहे व तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांच्यातील व्यवहार वडोदरा येथील कंपनीसोबत झाला आहे, त्यामुळे प्रकरण वि. मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही. तक्रारकर्त्याने दि. 28/9/2013 रोजी पाठविलेल्या नोटीसला जबाब देऊन कळविले होते की, कंपनीच्या वारंटीतील शर्ती व अटी प्रमाणे विज पुरवठा कमी-जास्त प्रमाणात झाल्याने मशिन मधील पीसीबी चे नुकसान झाले आहे, जे वारंटी मध्ये बसत नाही. टेक्नीशियन यांनी तक्रारकर्त्यास विनंती केली होती की, मशिन युपीएस किंवा स्टॅबीलायझर केल्याशिवाय वापरता येत नाही. परंतु तक्रारकर्त्याने युपीएस किंवा स्टॅबीलायझर वापरले नाही. सदर मशिन तक्रारकर्त्याने वडोदरा येथे दुरुस्तीकरिता पाठवावे व त्याकरिता येणारा खर्च तक्रारकर्त्याने करावा, असे तक्रारकर्त्याला कळविले होते. परंतु तक्रारकर्त्याने मशिन पाठविली नाही. या प्रकरणामध्ये क्लिष्ट कायद्याचा प्रश्न उद्भवलेला आहे, त्यामुळे या प्रकरणात सखोल पुरावे घेऊन चौकशी होणे आवश्यक आहे. वाद दिवाणी स्वरुपाचा असल्याने सदरचे प्रकरण वि. मंचाच्या न्याय कक्षेत येत नाही व त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार रु. 10,000/- दंड लावून खारीज करण्यात यावी.
सदर लेखी जबाब, विरुध्दपक्षानी शपथेवर दाखल केला आहे व त्यासोबत दस्तएवेज दाखल केलेले आहेत.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखाद्वारे पुरावा, प्रतिज्ञालेखाद्वारे अतिरिक्त पुरावा, लेखी युक्तीवाद दाखल केले, तसेच विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या पुराव्याला लेखी जवाब दाखल केला व उभय पक्षांनी तोंडी युक्तीवाद केला व न्याय निवाडे दाखल केले.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्दपक्ष यांचा लेखी जवाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचा पुरावा व लेखी युक्तीवाद, विरुध्दपक्षाचा तोंडी युक्तीवाद व उभय पक्षातर्फे दाखल केलेले न्यायनिवाडे यांचे काळजीपुर्वक अवलेाकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला.
या प्रकरणात तक्रारकर्ते यांचा असा युक्तीवाद आहे की, त्यांची अकोट येथे पॅथालॉजी ( लॅब ) आहे. त्यासाठी त्यांनी विरुध्दपक्षाकडून दि. 4/9/2013 रोजी हेमा 2062 ही मशिन, त्यांचेकडे आधी उपलब्ध असलेली पी.ई. 6000 ही मशिन बायबॅक योजनेअंतर्गत रु.1,20,000/- रकमेस विरुध्दपक्षाला देवून, रु. 1,40,000/- या रकमेत खरेदी केली होती. सदर मशिन ब्ल्यू डार्ट या कुरीअर मार्फत तक्रारकर्त्यास अकोट येथे मिळाली. त्यानंतर दि. 7/9/2013 ते दि. 14/9/2013 पर्यंत विरुध्दपक्षाचे इंजिनिअर / टेक्निशियन यांनी सदरहू मशिन सुरु करण्याचा प्रयत्न केला, परंतु मशिन मधील काही पार्ट बदलावे लागतील, असे त्यांनी सांगितले. सबब मशिन मध्ये निर्मिती दोष असल्यामुळे मशिन सुरु होवू शकली नाही व ती तशीच पडून आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचे आर्थीक नुकसान होत आहे, त्यामुळे विरुध्दपक्षाकडून सेवेतील न्युनतेबद्दल मशिनची पुर्ण रक्कम व्याजासहीत व ईतर नुकसान भरपाईसहीत द्यावी.
यावर विरुध्दपक्षातर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारकर्त्याने त्याच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल कुठलाही पुरावा दिला नाही. पॅथालॉजी लॅब चालवायची असल्यास MBBS अथवा तत्सम वैद्यकीय पात्रतेची आवश्यकता असते, ती तक्रारकर्त्याजवळ नसल्यामुळे ही मशिन उपजिवीकेचे साधन होवू शकत नाही. त्यांनी ही मशिन वाणिज्यिक प्रयोजनाकरिता घेतल्याचे सिध्द होते. विरुध्दपक्ष / कंपनी ही गुजरात मधील आहे व संपुर्ण व्यवहार वडोदरा येथील कंपनीसोबत झालेला आहे, तसेच मशिनपोटी दिलेल्या रकमेचा डी.डी. वडोदरा येथे वटविल्या गेला, त्यामुळे तक्रार या न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, तसे declaration देखील तक्रारकर्ते यांचे आहे. कंपनीच्या वारंटीतील शर्ती व अटी प्रमाणे विज पुरवठा कमी-जास्त प्रमाणात झाल्याने मशिन मधील पीसीबी चे नुकसान झाले ते वारंटीमध्ये बसत नाही. तक्रारकर्त्याला त्यांनी मशिन युपीएस किंवा स्टॅबीलायझरचा वापर केल्याशिवाय वापरु नये, असे सांगितले होते. तरी ते न वापरुन तक्रारकर्त्याने मशिनच्या पीसीबी ला हानी पोहचविलेली आहे, त्यामुळे यात विरुध्दपक्षाची सेवेतील न्युनता नाही.
उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, दाखल दस्तऐवजांवरुन असे दिसून येते की, उभय पक्षात पॅथालॉजी ( लॅब ) साठी दि. 4/9/2013 रोजी हेमा 2062 ही मशिन तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून त्याच्याकडील आधीची मशिन पी.ई. 6000 विरुध्दपक्षाला बाय बॅक योजनेअंतर्गत रु. 1,20,000/- मध्ये देवून, ही नविन मशिन रु. 1,40,000/- या रकमेत खरेदी केली होती, या बद्दलचा वाद नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांवरुन असे दिसते की, या मशिनची डिलेव्हरी अकोट येथे दिल्या गेली होती. त्यानंतर विरुध्दपक्षाचे टेक्निशियन यांनी अकोट येथे येऊन मशिन सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या न्याय निवाड्यानुसार तक्रारकर्त्यास प्रकरण दाखल करण्याचे कारण अकोट येथे देखील घडले होते, असे दिसून येते. त्यामुळे विरुध्दपक्षाचा कार्यक्षेत्राबाबतचा बचाव ग्राह्य धरता येणार नाही. दस्त क्र. 3 रिटेल इनव्हाईस यावरील declaration हे विरुध्दपक्षाचे एकतर्फी आहे, त्यामुळे ती अट उभय पक्षातील करार होवू शकत नाही. सबब याबद्दल तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या न्यायनिवाड्यावर मंचाने देखील भिस्त ठेवली आहे व त्यानुसार विरुध्दपक्षाचा आक्षेप की, उभय पक्षात वाद निर्माण झाल्यास सदरचा वाद बडोदा कार्यक्षेत्रात राहील, हा गृहीत धरता येणार नाही. विरुध्दपक्षाचा बचाव असा आहे की, तक्रारकर्त्याने मशिन वाणिज्यिक प्रयोजना करिता खरेदी केले आहे, परंतु तक्रारकर्त्याने शपथेवर कथन असे केले आहे की, मशीन स्वत:च्या वापराकरिता घेतलेली आहे व सदर लॅबवर तक्रारकर्ता व त्याचे कुटूंबीयांची उपजिविका अवलंबून आहे. तक्रारकर्त्याच्या ह्या कथनाला नकारार्थी पुरावा विरुध्दपक्षाने दाखल केलेला नाही, कारण विरुध्दपक्षाने एक पुरसिस दाखल करुन तक्रारकर्त्याच्या शैक्षणिक पात्रतेविषयी आक्षेप घेतला व पॅथालॉजी लॅब चालविण्याकरिता MBBS अथवा तत्सम वैद्यकीय पात्रतेची आवश्यकता असते, म्हणून सदर मशिन उपजिविकेचे साधन होऊ शकत नाही, असे म्हणत न्यायनिवाडे दाखल केले. परंतु तक्रारकर्त्याची शैक्षणिक पात्रतेबद्दलची तपासणी करण्याचे या मंचाला कार्यक्षेत्र नाही, त्यामुळे हा मुद्दा गृहीत धरता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. विरुध्दपक्षाने असा युक्तीवाद केला की, त्यांनी तसेच त्यांचे टेक्निशियन यांनी वारंवार तक्रारकर्त्याला मशिन युपीएस किंवा स्टॅबीलायझर चा वापर केल्याशिवाय वापरु नका, असे सांगितले होते. तरी तक्रारकर्त्याने युपीएस किंवा स्टॅबिलायझर न वापरुन मशिनच्या पीसीबी ला हानी पोहचविलेली आहे. कारण विज पुरवठा कमी जास्त प्रमाणात झाल्याने मशिन मधील पीसीबी चे नुकसान झाले आहे. परंतु तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्त “Installation / Service Report page No 19 व 20” वरील असे दर्शवितात की, दि. 4/9/2013 रोजी तक्रारकर्त्याने मशिन विरुध्दपक्षाकडुन खरेदी केल्यानंतर ती install करण्याकरिता विरुध्दपक्षाचे प्रतिनिधी / टेक्नीशियन यांनी दि.7:9:3023 ते 14/9/2013 पर्यंत प्रयत्न केले होते, तसेच त्यावर त्यांनी लिहलेल्या अहवालात असे नमुद आहे की :-
“ We checked the system and all accessories in good condition. Checked power supply and earthing it is O.K. (N-L-230, LE-234, E.NLV). Installed the system, but display and mechanism is not started and we change main PCB and CF cord. Till now system is not working”
“ Checked the system and changed the control board with CF cord them system is neutralized and display showing. Now the probe. Is not moving motor probe should be replace ”
ह्या अहवालात विरुध्दपक्षाच्या टेक्निशियनने कुठेही युपीएस, स्टॅबीलायझर वापराबद्दल लिहलेले नाही. मशिन सुरुच झाली नव्हती, असे वरील अहवालावरुन सुध्दा दिसते, त्यामुळे विरुध्दपक्षाच्या वरील बचावाच्या कथनाचा विचार करता येणार नाही. सबब तक्रारकर्त्याने कागदोपत्री हे सिध्द केले आहे की, विरुध्दपक्षाने पुरविलेली हेमा 2062 ही मशिन दोषपुर्ण आहे व तक्रारकर्त्याने मागणी करुनही विरुध्दपक्षाने सदर मशिन मधील दोष दुरुस्त करुन दिलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून मशिनची किंमत रु. 2,60,000/- सव्याज व इतर नुकसान भरपाई रु. 10,000/- व प्रकरणाचा खर्च रु. 5000/- विरुध्दपक्षाकडून मिळण्यास पात्र आले, या निष्कर्षाप्रत हे मंच आहे आहे
सबब अंतिम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे….
:::अं ति म आ दे श:::
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास दिलेली हेमा 2062 ही मशिन तक्रारकर्त्याकडून वापस घेवून त्या मशिनची किंमत रु. 2,60,000/- ( रुपये दोन लक्ष साठ हजार फक्त ) ही दि. 4/9/2013 ( मशिन विकत घेतल्याची तारीख ) पासून दरसाल दरशेकडा 9 टक्के व्याज दराने, प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत व्याजासहीत तक्रारकर्त्यास द्यावी,
- तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. 10,000/- ( रुपये दहा हजार ) व प्रकरणाचा न्यायिक खर्च रु. 5000/- ( रुपये पांच हजार ) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास द्यावा.
- या आदेशाची पुर्तता विरुध्दपक्षाने निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावी
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.
(श्रीमती भारती केतकर ) (सौ.एस.एम.उंटवाले )
सदस्या अध्यक्षा
AKA जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,अकोला