नि.40
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री.ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य – श्री.के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र.69/2010
तक्रार नोंद तारीख – 01/02/2010
तक्रार दाखल तारीख - 05/02/2010
निकाल तारीख - 20/05/2013
-------------------------------------------------------------------------------------------
श्रीमती रेखा रामचंद्र कदम
व.व.38, व्यवसाय – घरकाम,
आरग कॉलनी जवळ, कारखाना रोड,
आरग, ता.मिरज, जि.सांगली. ... तक्रारदार
विरुध्द
1.अन्नपूर्णा अर्बन को.ऑप.क्रे.सोसा.लि. मिरज
गाडवे कॉम्प्लेक्स, विजापूर वेस,
मिरज.
2. श्री.भिमराव गणपती गोसराडे
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी,
रा.पहिला स्टॉप, सुभाषनगर, मिरज.
3. श्री.परशुराम सिध्दू गोसराडे
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी,
रा.रेवणी गल्ली, मिरज.
4. श्री.रफिक इस्माईल धत्तूरे
व.व.सज्ञान, धंदा – नोकरी,
रा.मोमीन गल्ली, मिरज.
5. श्री.दत्तात्रय बळवंत यादव
व.व.सज्ञान, धंदा – व्यवसाय,
दत्त चौक, मिरज.
6.श्री.मुनिर अमिर शेख
व.व.सज्ञान, धंदा – व्यवसाय,
शनिवार पेठ, बालाजी मंदिराजवळ,
7.श्री.यल्लाप्पा दत्तात्र हारताळे
व.व.सज्ञान, धंदा – व्यवसाय,
गोळीबार, वड्डी, ता.मिरज
8. श्री.भूपाल मारुती कोळी,
व.व.सज्ञान, धंदा – व्यवसाय,
इनाम धामणी, ता.मिरज.
9. श्री.पोपट चंदर मंडले
व.व.सज्ञान, धंदा – व्यवसाय,
रा.जनहित कॉलनी, मालगांव रोड,
मिरज.
10. श्री.बाळासाहेब राजाराम मगदूम
व.व.सज्ञान, धंदा – व्यवसाय,
रा.टाकळी रोड, मिरज.
11. सौ.उषा कृष्णाजी व्होनमोरे
व.व.सज्ञान, धंदा – घरकाम,
रा.फाटक वृध्दाश्रमाजवळ,
मिरज. ... जाबदार
तक्रारदारतर्फे – ऍड.एस.एस.कठारे जाबदार क्र.6 तर्फे - ऍड.एम.एच.मुजावर
निकालपत्र
व्दारा – मा.अध्यक्ष श्री.ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार उपनिर्दिष्ट तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली दाखल करुन जाबदार क्र.1 ते 11 हयांनी त्यास दुषित सेवा दिली असल्याची तक्रार करुन जाबदार क्र.1 संस्थेकडे ठेवलेल्या दामदुप्पट ठेवपावतीची देय रक्कम रु.1,40,000/- व त्यावर ठेवपावतीची मुदत संपलेनंतर रक्कम हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 16 टक्के दाराने व्याज,
तसेच, तिला झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, जाबदार क्र.1 ही नोंदणीकृत सहकारी संस्था असून तक्रारदार त्याची सभासद आहे. जाबदार क्र.2 सदर संस्थेचे चेअरमन असून जाबदार क्र.3 हे तीचे व्हाईस चेअरमन आहेत. जाबदार क्र.4 ते 11 हे सदर संस्थेचे संचालक आहेत.
3. दि.10 नोव्हेंबर 2003 रोजी तक्रारदाराने जाबदार क्र.1 संस्थेच्या अन्नपूर्णा चंदेरी ठेव या योजनेअंतर्गत पाच वर्षे नऊ महिने या मुदतीने पावती क्र.52 ते 121 या पावतीने प्रत्येकी रु.1,000/- अशी एकूण रु.70,000/- दामदुप्पट ठेवीने ठेवलेली आहे. सदर ठेवपावत्यांची मुदत दि.10/08/09 रोजी संपलेली असून सदर ठेवपावत्यांची दामदुप्पटीने देय होणारी एकूण रक्कम रु.1,40,000/- तक्रारदारास मिळणेस ती पात्र आहे. मुदत संपल्यानंतर तक्रारदारांनी जाबदार संस्थेत वेळोवेळी जावून सदर रकमेची मागणी केली. तथापी, जाबदारांनी व त्यांचे अधिका-यांनी वेगवेगळी कारणे देवून रक्कम देण्याचे टाळले. सरतेशेवटी दि.23/09/09 रोजीचे वकिलांमार्फत पाठवलेल्या नोटीसीने सदर रकमांची मागणी तक्रारदारांनी केली. ती नोटीस मिळूनदेखील जाबदारांनी त्याची पूर्तता केली नाही. म्हणून तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे. अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद केलेली मागणी सदर तक्रार अर्जात केलेली आहे.
4. सदर तक्रारीचे पृष्ठयर्थ तक्रारदाराने आपले शपथपत्र नि.3 ला दाखल करुन नि.5 चे फेरिस्तसोबत ठेवपावती क्र.52 ते 121 च्या प्रती दि.23/09/09 च्या नोटीसीची स्थळप्रत, ती नोटीस जाबदारांना मिळालेची पोचपावती व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडून प्राप्त झालेली जाबदार क्र.1 संस्थेच्या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली आहे.
5. सदर प्रकरणी नोटीस लागून जाबदार हजर झाले. तथापी, जाबदार क्र.6 सोडून इतर जाबदारांनी स्वतःची कैफियत दाखल केली नाही अथवा ते पुढे हजरही राहिलेले नाहीत. म्हणून जाबदार क्र.1,3,56,7,9 ते 11 यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालवणेचा तर जाबदार क्र.2,4 आणि 8 हयांचे कैफियतीविना सदर प्रकरण चालवणेचा आदेश नि.1 वर करण्यात आला.
6. जाबदार क्र.6 यांनी नि.12 ला अर्ज देवून तो या संस्थेचा कधीही संचालक किंवा सभासददेखील नव्हता व नाही. संचालक मंडळांच्या दिलेल्या यादीमध्ये त्याचे नांव चुकीने दर्शवण्यात आलेले आहे. ही बाब सदर संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालयात नवीन संचालक मंडळाची यादी सादर करुन कळविलेली आहे. तक्रारदारांनी जी नोटीस जाबदारांना दिली होती, त्या नोटीसीस जाबदार क्र.6 याने उत्तरी नोटीस देवून वस्तुस्थिती कळविलेली आहे. त्यामुळे जाबदार क्र.6 हा पतसंस्थेचा सभासद किंवा संचालक नसलेने त्याविरुध्दचा अर्ज / दावा चालणेस पात्र नाही व तो खारीज करावा अशी विनंती केलेली आहे. जाबदार क्र.6 यांनी नि.39 ला पुरशीस दाखल करुन सदरचा अर्ज हीच त्याची लेखी कैफियत समजावी अशी विनंती केलेली आहे.
7. सदर अर्जाचे पृष्ठयर्थ जाबदार क्र.6 यांनी आपले स्वतःचे शपथपत्र नि.15 ला दाखल करुन नि.14 च्या फेरिस्तसोबत एकूण सहा कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यात जाबदार क्र.1 संस्थेने त्यास दिलेले दि.05/03/10 चे पत्र, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांना जाबदार संस्थेने पाठवलेले दि.17/03/10 चे पत्र, त्या पत्रासोबत पाठवलेली संचालकांची यादी तक्रारदारास त्यांच्या नोटीसीला पाठवलेले दि.16/10/10 चे उत्तर, तसेच, जाबदार क्र.2 या संस्थेच्या चेअरमनला पाठवलेली नोटीस आदींची प्रत दाखल केलेली आहे.
8. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.6 हयास त्याच्या नि.12 च्या अर्जाच्या पृष्ठयर्थ पुरावा सादर करण्यास सांगितले असता जाबदार क्र.6 ने आपले सरतपासाचे शपथपत्र नि.35 ला दाखल केलेले आहे. त्यास तक्रारदारातर्फे उलटतपास करण्यात आलेला आहे. त्यासोबत नि.37 अन्वये काही कागदपत्रे जाबदार क्र.6 ने दाखल केलेली आहेत. तक्रारदाराने आपल्या पुराव्याच्या सरतपासाचे शपथपत्र नि.32 ला दाखल करुन त्यात तक्रारीमधील आपले संपूर्ण कथन शपथेवर नमूद केलेले आहे. तक्रारदाराने नि.34 ला पुरशीस दाखल करुन आपणास अधिक पुरावा द्यायचा नाही असे नमूद केलेले आहे, तर, जाबदार क्र.6 याने नि.38 ला पुरशीस दाखल करुन आपला पुरावा संपला असे घोषीत केलेले आहे. इतर कोणीही जाबदार प्रस्तुत प्रकरणात हजर होवून पुढील कारवाईत त्यांनी सहभाग घेतलेला नाही.
9. याकामी आम्ही दोन्ही पक्षांचे विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे.
10. दोन्ही पक्षकारांच्या कथनांवरुन, उपलब्ध पुराव्यावरुन व युक्तिवादावरुन खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरीता उपस्थित होतात.
मुद्दे निष्कर्ष
1.जाबदार क्र.1 ते 11 यांनी तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे
तिस दुषीत सेवा दिली हे कथन तक्रारदाराने सिध्द केले आहे काय ? - होय.
2. जाबदार क्र.6 हा सदर संस्थेचा संचालक आहे काय ? - होय.
3. तक्रारदारास मागितल्याप्रमाणे रक्कम मिळणेचा अधिकार
आहे काय आणि तो कोणाकोणापासून ? - होय.
जाबदार क्र.1 ते 11 यांचेकडून संयुक्तरित्या आणि वैयक्तिकरित्या.
4. काय आदेश ? अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
11. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
कारणे
12. मुद्दा क्र.1 - तक्रारदारांची संपूर्ण तक्रार आम्ही वर विस्तृतपणे विषद केलेली आहे. त्यामुळे विस्तार भयापोटी तिचा पुनर्रच्चार या ठिकाणी टाळण्यात आलेला आहे. जाबदार क्र.6 सोडता इतर सर्व जाबदार हया प्रकरणी हजर राहून तक्रारदाराच्या मागणीस त्यांनी हरकत घेतलेली नाही. तक्रारदाराने आपल्या सरतपासाच्या शपथपत्रात आपले तक्रारीतील संपूर्ण कथन शपथेवर नमूद केलेले आहे. तक्रारदाराच्या सदर पुराव्याला जाबदार क्र.6 किंवा इतर कोणीही कसलाही उजर घेतलेला नाही आणि तीची उलटतपासणी केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांचा संपूर्ण पुरावा हा पूर्णतः स्विकृत करण्यात येतो. तसेही पहाता तक्रारदारानी सदर दामदुप्पट योजनेतील ठेवपावत्या क्र.52 ते 121 या प्रकरणी दाखल केलेल्या असून त्या सदर संस्थेने दिलेल्या आहेत याबद्दल कोणाचाही उजर नाही. सदरच्या ठेवपावत्या हया दि.10 नोव्हेंबर 03 रोजीच्या असून त्या दामदुप्पट योजनेखालील प्रत्येकी रक्कम रु.1,000/- च्या ठेवपावत्या असून त्या ठेवपावत्यांची मुदत दि.10/08/09 रोजी संपत असून सदर पावत्यांची देय रक्कम रु.2,000/- प्रत्येकी, तक्रारदारास मिळणेस, ती पात्र आहे. तक्रारदाराचे म्हणणे की, सदर ठेवपावत्यांची मुदत संपल्यानंतर वेळोवेळी तीने संस्थेत जावून जाबदार आणि संस्थेचे अधिकारी यांचेकडे रकमांची मागणी केली. परंतु, त्यांनी ती रक्कम देण्यास टाळाटाळ केली आणि तिने वकिलांमार्फत दिलेल्या नोटीसीनंतरदेखील जाबदारांनी सदर ठेवपावत्यांच्या देय रकमा तिला दिलेल्या नाहीत. तक्रारदाराच्या सदर पुराव्याला जाबदारांपैकी कोणीही आक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे तो पुरावा जसाच्या तसा स्विकारला जावू शकतो व तो स्विकारला जात आहे. इथे हे नमूद करणे योग्य राहिल की जाबदार क्र.6 चे वकिल श्री.मुजावर यांनी या मंचासमोर तक्रारदाराची पूर्ण मागणी ही न्याय व योग्य आहे असे प्रतिपादन केले. तथापी, त्या मागणीस जाबदार क्र.6 हा जबाबदार नाही असे प्रतिपादन केले. वास्तविक, हया प्रकरणात जाबदार क्र.6 हा संस्थेचा संचालक आहे किंवा नाही आणि तो तक्रारदारास रकमा देणे लागतो किंवा नाही हा मुख्य मुद्दा आहे. इतर जाबदारांनी तक्रारदाराची मागणी अमान्य केलेली नाही. जाबदार क्र.2 ते 5 आणि 6 ते 11 हे सदर संस्थेचे सभासद आहेत आणि जाबदार क्र.2 संस्थेचे चेअरमन, जाबदार क्र.3 संस्थेचे व्हाईस चेअरमन, जाबदार क्र.4 व 5 संचालक व जाबदार क्र.7 ते 11 हे देखील संस्थेचे संचालक आहेत हया पदानुरुप जाबदार क्र.2 ते 5 आणि 6 ते 11 हे जाबदार क्र.1 संस्थेसह तक्रारदारास तिने मागितलेप्रमाणे रकमा देणेस जबाबदार आहेत. जाबदार क्र.6 जबाबदार होतो किंवा नाही हा मुद्दा, मुद्दा क्र.2 चे विश्लेषण करताना पुढे विचारात घेतला जाईल. तथापी मुद्दा क्र.1 याचे उत्तर होकारार्थी द्यावे लागेल असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे आम्ही वरील मुददा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
13. मुद्दा क्र.2 - जाबदार क्र.6 हा संस्थेचा संचालक आहे आणि त्याअनुसार इतर जाबदारांसमवेत तोदेखील तक्रारीत नमूद केलेल्या रकमा देण्यास जबाबदार आहे या म्हणण्याकरीता तक्रारदाराने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मिरज हयांनी दिलेल्या दि.05/01/10 च्या संचालकांच्या यादीवर भिस्त ठेवलेली आहे. त्या यादीचे अवलोकन करता जाबदार क्र.6 चे नांव श्री.मुनीर अमिर शेख असे अनुक्रमांक 5 ला नमूद आहे. जाबदाराने आपल्या उलटतपासामध्ये हे स्पष्टपणे कबूल केले आहे की त्याला मुनिर अमिर शेख या नावाने ओळखले जाते. सदर यादीमध्ये आपले नांव संचालक म्हणून दर्शविलेले आहे ही बाब जाबदार क्र.6 ने अमान्य केलेली नाही. तथापी, त्याचे म्हणणे असे की, सदरचे नांव चुकीने संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांचेकडे पाठवलेले आहे व नंतर ती चूक संस्थेने दुरुस्त केलेली आहे व तसे उपनिबंधक सहकारी संस्था हयांना पत्रदेखील दिलेले आहे. आजरोजी जाबदार क्र.6 हयाने आपल्या पुराव्याच्यावेळी नि.37 सोबत संस्थेचे दि.17/03/10 चे उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांना दिलेले पत्र व त्याच तारखेची उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांना पाठवलेली संचालकांची यादी हजर केलेली आहे. सदर दि.17/03/10 चे पत्राचे अवलोकन केले असता असे दिसते की जाबदार क्र.1 संस्थेने उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यांना पत्र देवून असे कळविले आहे की, जाबदार क्र.6 श्री.मुनिर अमिर शेख यांचे नाव संस्थेच्या दि.08/12/04 च्या मिटींगमध्ये ठराव क्र.9 प्रमाणे रिकाम्या जागेवर घेण्याचे ठरले होते. सदर इसम संस्थेचे सभासद नसल्याने व त्यांनी संचालक म्हणून काम करण्या असमर्थता दर्शवल्याने त्यांना संचालक म्हणून घेतलेले नाही. सदर मुनिर अमिर शेख यांचे नांव दि.21/05/09 रोजी चुकीने यादीत नाव दाखविलेले आहे करीता सदर मुनिर अमिर शेख हे संचालक नाहीत याची नोंद घ्यावी व त्यांचे नाव कमी करण्यात यावे. हया एका पत्रावरुन जाबदार क्र.6 हा स्वतःला जाबदार क्र.1 या संस्थेचा संचालक किंवा सभासद नाही असे म्हणू पहातो आणि शाबित करु इच्छितो.
14. सदर पत्रावर ज्या कोणा इसमाची चेअरमन म्हणून सही आहे त्या इसमास जाबदार क्र.6 याने साक्षीदार म्हणून तपासलेले नाही. त्या पत्रातील मजकूर कायद्याला अभिप्रेत असलेल्या पध्दतीने जाबदार क्र.6 ने शाबित केलेला नाही. जी संचालक मंडळांची यादी तक्रारदारास देण्यात आली, त्या यादीत जाबदार क्र.6 याचे नांव चुकीने दर्शविण्यात आले हे सांगण्याकरीता जाबदार क्र.6 याशिवाय इतर कोणाचाही पुरावा प्रस्तुत प्रकरणात दाखल नाही. तक्रारदारास देण्यात आलेली संचालकांची यादी ही दि.21/05/09 रोजी जाबदार क्र.1 संस्थेच्या सचिवाने उपनिबंधकास पाठवलेली दिसते. त्यानंतर दि.17/03/10 पर्यंत जाबदार क्र.6 याचे नांव चुकीने लागल्याबाबत सदर संस्थेने उपनिबंधकाशी काही पत्रव्यवहार केल्याचे दिसत नाही. एखादया इसमाचे नांव चुकीने संचालक म्हणून दर्शवणे ही एक गंभीर बाब आहे. अशी गंभीर चूक संस्थेच्या लक्षात इतके दिवस आली नाही हे आश्चर्यजनक वाटते. दरम्यानचे काळातील कित्येक व्यवहार हे जाबदार क्र.6 चे नांव संचालक म्हणून गृहित धरुन झाले असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल संस्थेने काय कारवाई केली हयाचा पुरावा या मंचासमोर आलेला नाही आणि मुख्य मुद्दा की खरोखर दि.21/05/09 च्या यादीमध्ये जाबदार क्र.6 चे नाव चुकीने लागले हे दाखवणारा कोणताही सबळ पुरावा याकामी दाखल झालेला नाही. केवळ जाबदार क्र.6 याचा पुरावा त्यास पुष्ठी नसल्याने ग्राहय धरता येत नाही. जाबदार क्र.6 चे वकिल श्री.मुजावर यांनी ही बाब हिरीरीने मांडली की, दि.21/05/09 ची संचालक मंडळाची यादी ही उपनिबंधकाच्या अभिलेखाप्रमाणे दिलेली नसून ती केवळ संस्थेच्या सचिवानी केलेली यादी आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवता येत नाही आणि ती ग्राहय धरता येत नाही. तसेच ती यादी उपनिबंधकाच्या कुठल्याही रेकॉर्डप्रमाणे असल्याचे दिसत नाही, त्यामुळे त्या यादीस महत्त्व देवू नये आणि त्या यादीवरुन जाबदार क्र.6 हा संस्थेचा संचालक आहे हे सिध्द होत नाही. तक्रारदाराच्या दृष्टीने उपनिबंधकाकडून जी काही संचालक मंडळाची यादी दिली जाते त्यात नमूद इसम हे सदर संस्थेचे संचालक आहेत / सभासद आहेत हयावर विश्वास ठेवण्यास प्रर्याप्त असते. सदर यादीमध्ये चुका आहेत किंवा ती यादी अयोग्य आहे इत्यादी कथने शाबित करणेची संपूर्ण जबाबदारी कायद्याने जाबदार क्र.6 वर येते. वर नमूद केलेल्या कारणांमुळे जाबदार क्र.6 चा एकूलता एक पुरावा सदर कथन शाबित करण्यास पात्र नाही. यदाकदाचित तक्रारदाराची तक्रार मंजूर झाली आणि त्यात नमूद रकमा देण्याची जबाबदारी जाबदार क्र.1 हयावर इतर जाबदारांसोबत आली तर त्यास आर्थिक नुकसान होणेची शक्यता आहे त्यामुळे त्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न जाबदार क्र.6 हा साहजिकच करेल. त्यामुळे त्याचा एकुलता एक पुरावा हा विश्वासार्ह वाटत नाही. संस्थेचे इतर पदाधिकारी किंवा इतर संचालक यांना साक्षीदार म्हणून तपासणेस जाबदार क्र.6 याला कोणतीही अडचण नव्हती. त्यामुळे जाबदार क्र.6 आपले कथन शाबित करु शकलेला नाही असे या मंचाचे मत झालेले आहे. ज्याअर्थी जाबदार क्र.6 याने दि.21/05/09 च्या संचालक मंडळाच्या यादीमध्ये त्याचे नाव होते हे कबूल केलेले आहे, त्याअर्थी त्यास त्या यादीविरुध्द जावून कुठलेही कथन करता येणार नाही. अर्थात तसे कथन शाबित करणेची जबाबदारी ही जाबदार क्र.6 ची होती व ती पार पाडणेस जाबदार क्र.6 हा अयशस्वी ठरलेला आहे. जाबदार क्र.6 हा जाबदार क्र.1 चा संचालक आहे हे शाबित झालेले आहे असे म्हणावे लागेल. करीता आम्ही वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
15. मुद्दा क्र.3 व 4- वरील सर्व विवेचनावरुन व निष्कर्षावरुन तक्रारदाराने ही बाब निर्विवादपणे शाबित केलेली आहे की, मुदतीनंतर देय असणा-या मुदत ठेवींच्या दामदुप्पट रकमा तिला परत करण्यास टाळाटाळ करुन जाबदार संस्थेने तिला दुषीत सेवा दिलेली आहे. तक्रारदार ही जाबदार क्र.1 संस्थेची ग्राहक आहे याबद्दल कोणताही वाद नाही. त्यामुळे जाबदार क्र.1 आणि पर्यायाने सदर संस्थेचे पदाधिकारी म्हणून जाबदार क्र.2 ते 11 हे वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या सदर ठेवपावत्यांच्या रकमा तक्रारदार हिला देणेस जबाबदार आहेत. या संपूर्ण प्रकरणात तक्रारदार हिला मानसिक त्रास होणे साहजीक आहे आणि त्याकरीता तिने मागणी केलेली रु.5,000/- मागणी योग्य व वाजवी वाटते व तशी ती तक्रारदाराला मिळणेस ती पात्र आहे. तक्रारदाराने ठेवपावतींची मुदत संपलेनंतर ठेवपावत्यांच्या रकमा प्रत्यक्ष हातात पडेपर्यंत त्यावर 16 टक्के द.सा.द.शे. दराने व्याज मागितलेले आहे. ही मागणी अवास्तव वाटते. तक्रारदार आणि जाबदार क्र.1 संस्थेमध्ये मुदत ठेवीच्या मुदतीनंतर त्या दराने व्याज देण्याचा कोणताही करार नाही किंवा मुदतीनंतर रक्कम प्रत्यक्षपणे तक्रारदारास देईपर्यंत सदरच्या रकमा तशाच स्वरुपाच्या ठेवपावतीमध्ये आपोआप पूनर्गुंतवणूक करण्याचा कोणताही करार तक्रारदार व जाबदार क्र.1 हयामध्ये झालेला दिसत नाही. त्यामुळे तक्रारदाराची सदरची मागणी मान्य करता येत नाही. तथापी, ही बाब निर्विवादपणे शाबित झालेली आहे की, तक्रारदारास देय असणा-या रकमा जाबदारांनी विनाकारण व बेकायदेशीररित्या अडकवून ठेवलेल्या आहेत त्यामुळे तक्रारदारास त्या रकमांवर काही व्याज मिळणे हे क्रमपाप्त आहे. हया प्रकरणातील एकूणचा बाबींचा विचार करता तक्रारदारास ठेवपावतीच्या देय रकमांवर म्हणजे रु.1,40,000/- वर तक्रार दाखल केल्यापासून रक्क्म प्रत्यक्ष हातात मिळेपर्यंत द.सा.द.शे. 8.5 टक्के दराने वयाज मिळणे योग्य राहिल असे या मंचाचे मत आहे. करीता आम्ही मुद्दा क्र.3 हयाचे वर नमूद केलेप्रमाणे उत्तर देवून खालील आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करण्यात येत आहे.
2. जाबदार क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या ठेवपावत्यांची देय रक्कम
रु.1,40,000/- तक्रारदारास द्यावी.
3. तसेच, मानसिक त्रासापोटी भरपाई म्हणून रक्कम रु.5,000/- तक्रारदारास जाबदार
क्र.1 ते 11 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिरित्या द्यावेत. तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.500/- तक्रारदारास जाबदारांनी द्यावेत.
4. ठेवपावत्यांची रक्कम रु.1,40,000/- यावर जाबदार क्र.1 ते 11 यांनी संयुक्त आणि
वैयक्तिकरित्या द.सा.द.शे.8.5 टक्के दराने तक्रार दाखल केलेपासून रक्कम प्रत्यक्ष
हातात येईपर्यंत व्याज द्यावे. सदरच्या रकमा या आदेशाच्या तारखेपासून 45 दिवसांत
तक्रारदारास देण्यात याव्यात अन्यथा तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम
25 किंवा 27 कारवाई करण्याची मुभा राहिल.
दि.20/05/13.
ठिकाण – सांगली.
(के.डी.कुबल) (ए.व्ही.देशपांडे)
सदस्य अध्यक्ष