Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/11/803

Gangadharrao Dinkarrao Channe - Complainant(s)

Versus

Anjani Eye Hospital, Through Dr. Shweta S. Mokadam - Opp.Party(s)

Adv. G.N.Khanzode

29 Sep 2017

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/11/803
 
1. Gangadharrao Dinkarrao Channe
Ujwal Nagar,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Anjani Eye Hospital, Through Dr. Shweta S. Mokadam
20, Farm Land, Near Lokmat Chowk, New Ramdaspeth,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 29 Sep 2017
Final Order / Judgement

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्‍यक्ष.)

(पारीत दिनांक29 सप्‍टेंबर, 2017)

01.  तक्रारकर्त्‍याने ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे        कलम-12 खाली विरुध्‍दपक्षाने त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाच्‍या मोतीबिंदु शस्‍त्रक्रिये मध्‍ये निष्‍काळजीपणा केल्‍या संबधी नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी अतिरिक्‍त ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.

 

02.   तक्रारकर्त्‍याचे तक्रारी नुसार संक्षीप्‍त कथन पुढील प्रमाणे-

      तक्रारकर्ता हा 82 वर्षाचा वयोवृध्‍द इसम असून त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाची दृष्‍टी अंधुक झाली असल्‍याने तो दिनांक-15/01/2011 रोजी विरुध्‍दपक्ष अंजनी आय हॉस्पिटल, नागपूर (Anjani Eye Hospital, Nagpur) येथे वैद्दकीय तपासणी करीता गेला होता.

     या ठिकाणी एक बाब नमुद करणे आवश्‍यक आहे की, तक्रारी मध्‍ये विरुध्‍दपक्षाचे वर्णन अंजनी आय हॉस्पिटल तर्फे श्‍वेता एस. मोकादम असे केलेले आहे परंतु युक्‍तीवादाचे वेळी विरुध्‍दपक्षाचे वकीलानीं असे सांगितले की, या तक्रारीत दोन विरुध्‍दपक्ष असून त्‍यापैकी एक अंजनी आय हॉस्पिटल आहे आणि दुसरा पक्ष श्‍वेता मोकादम आहे, जी निष्‍णात नेत्रतज्ञ म्‍हणून त्‍या हॉस्पिटल मध्‍ये कार्यरत आहे.

    तक्रारकर्त्‍याची प्राथमिक वैद्दकीय तपासणी झाल्‍या नंतर त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाच्‍या मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया करावी लागेल असे वैद्दकीय निदान करण्‍यात आले, तत्‍पूर्वी त्‍याच्‍या प्राथमिक वैद्दकीय चाचण्‍या जसे मधुमेह, रक्‍तदाब इत्‍यादी करण्‍यास सांगण्‍यात आले तसेच शस्‍त्रक्रियेसाठी फीटनेस सर्टीफीकेट घेऊन येण्‍यास सांगण्‍यात आले, त्‍याप्रमाणे त्‍याच्‍या प्राथमिक वैद्दकीय चाचण्‍यांचे अहवाल सामान्‍य असल्‍याने शस्‍त्रक्रियेसाठी त्‍याची प्रकृती योग्‍य असल्‍याचा दाखला देण्‍यात आला होता. त्‍यानंतर त्‍याला दिनांक-03/02/2011 रोजी शस्‍त्रक्रियेसाठी हॉस्पिटल मध्‍ये भरती करण्‍यात आले. शस्‍त्रक्रियेसाठी शुल्‍क म्‍हणून त्‍याने रुपये-10,000/- हॉस्पिटल मध्‍ये जमा केले.

    तक्रारकर्त्‍याची मुख्‍य तक्रार अशी आहे की, त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील मोतीबिंदु काढण्‍यासाठी डॉ.श्‍वेता मोकदम हिने त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाला चिरा  दिला परंतु मोतीबिंदु न निघाल्‍याने पुन्‍हा दुस-यांदा चिरा देऊन मोतीबिंदु काढण्‍याचा प्रयत्‍न केल्‍या गेला, तरी पण मोतीबिंदु काढण्‍यात यश आले नाही असे बघून तिस-यांदा डोळयाला चिरा देण्‍यात आला, परंतु या वेळी डोळयाला रक्‍तप्रवाह करणारी रक्‍तवाहिनी कापल्‍या गेली आणि त्‍यामुळे रक्‍तप्रवाह जोराने सुरु झाला, त्‍यामुळे घाबरुन जाऊन डॉ. श्‍वेता हिने तिचे पती डॉ. शमीक यांना बोलाविले व ते आल्‍या नंतर त्‍यांनी त्‍वरीत टाके घालून डोळा बंद करण्‍याची सुचना दिली, त्‍याप्रमाणे डॉ.श्‍वेता हिने डोळयाला टाके घालून तो डोळा बंद केला, परंतु दोनदा डोळयाला चिरा देऊन मोतीबिंदु जबरीने काढण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यामुळे डाव्‍या डोळयाचा पडदा फाटल्‍या गेला तसेच रक्‍तप्रवाहामुळे लेन्‍स प्रत्‍यारोपण करणे शक्‍य झाले नाही.  अशाप्रकारे डॉ. श्‍वेता हिने योग्‍य ते नियोजन न करता आणि शस्‍त्रक्रिया अर्ध्‍यावर सोडून बेजबाबदारपणा केला. तक्रारकर्त्‍याला त्‍या नंतर दिनांक-05/02/2011 रोजी फेर वैद्दकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍यात, त्‍यानुसार तो विरुध्‍दपक्षाचे हॉस्पिटल मध्‍ये त्‍या दिवशी पुन्‍हा तपासणीसाठी हजर झाला परंतु कुठलीही  फेर वैद्दकीय तपासणी न करता आणि अर्धवट सोडलेल्‍या शस्‍त्रक्रिये बाबत कुठलाही निर्णय न घेता त्‍याला असे सांगण्‍यात आले की, जो पर्यंत रक्‍तप्रवाह थांबत नाही तो पर्यंत लेन्‍सचे प्रत्‍यारोपण करत येणार नाही.  डावा डोळा बंद करण्‍यात आल्‍यामुळे तो दृष्‍टीहिन झाला होता आणि तक्रारकर्त्‍याला नेमके कय घडले याचा खुलासा न दिल्‍यामुळे तो व्‍यथित झाला. विरुध्‍दपक्षाने पुन्‍हा त्‍याला दिनांक-14/02/2011 रोजी वैद्दकीय तपासणीसाठी बोलाविले, त्‍यानुसार तो जेंव्‍हा हॉस्पिटल मध्‍ये गेला त्‍यावेळी त्‍याला असे सुचित करण्‍यात आले की, डावा डोळा सुर्यप्रकाश किंवा दिव्‍या समोर उघडू नये आणि डोळयाला बांधलेली हिरवी पट्टी कायम ठेवावी.

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्षाने निश्‍चीत निदान न केल्‍यामुळे त्‍याने दुस-या निष्‍णात नेत्र तज्ञां कडे झालेल्‍या घटने बाबत विचारणा केली, त्‍यावेळी त्‍याला असे कळले की, बेजबाबदार आणि निष्‍काळजीपणाने शस्‍त्रक्रिया केल्‍यामुळे त्‍याचा डावा डोळा हा पूर्णपणे निकामी झाला असून ते ठिक होण्‍या पलीकडे आहे.

    वरील परिस्थितीत त्‍याच्‍या उजव्‍या डोळयातील मोतीबिंदु देखील परिपक्‍व झाल्‍याने त्‍याने त्‍याची शस्‍त्रक्रिया मुंबई येथील जे.जे. रुग्‍णालयात दिनांक-19/04/2011 रोजी करुन घेतली आणि ती उजव्‍या डोळया वरील शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पडली.

    तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, त्‍याचा डावा डोळा निकामी होण्‍या मागे विरुध्‍दपक्षाचा निष्‍काळजीपणा आणि बेजबाबदारपणा कारणीभूत होता म्‍हणून त्‍याने दिनांक-27/05/2011 ला विरुध्‍दपक्ष तसेच डॉ. प्रफुल्‍ल मोकादम, नेत्रसल्‍लागार यांना वकीला मार्फत नोटीस पाठविली आणि डाव्‍या डोळया वरील मोतीबिंदु निष्‍काळजी व दोषपूर्ण शस्‍त्रक्रियेसाठी त्‍यांना जबाबदार ठरवून नुकसान भरपाई देण्‍यास सुचित केले.  परंतु विरुध्‍दपक्षाने त्‍यांची जबाबदारी किंवा शस्‍त्रक्रिये दरम्‍यान निष्‍काळजीपणा केल्‍याचा आरोप नामंजूर करुन नुकसान भरपाई देण्‍यास मनाई केली. म्‍हणून या तक्रारीव्‍दारे त्‍याने विरुध्‍दपक्षा कडून त्‍याच्‍या डावा डोळया वरील मोतीबिंदुचे निष्‍काळजी आणि बेजबाबदार शस्‍त्रक्रियेमुळे तो निकामी झाल्‍यामुळे रुपये-10,00,000/- नुकसान भरपाई मागितली असून, झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल   रुपये-2,50,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-50,000/- ची मागणी केली.

 

 

03.  डॉ. श्‍वेता शमीक मोकादम हिने या तक्रारीला विस्‍तृत लेखी उत्‍तर ग्राहक मंचा समक्ष सादर केले. तिचे उत्‍तरातील थोडक्‍यात मजकूर असा आहे की, तिने तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयावर केलेल्‍या मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रिये मध्‍ये निष्‍काळजीपणा केल्‍याचा आरोप पूर्णपणे नाकबुल केला आहे. तिने हे सुध्‍दा नाकबुल केले की, ती अंजनी आय हॉस्पिपटल येथे कार्यरत आहे. परंतु ही बाब मान्‍य केली की, तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयातील मोतीबिंदु काढण्‍यासाठी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली होती परंतु मोतीबिंदु काढण्‍यास तिला यश आले नाही ही बाब नाकबुल केली. तक्रारकर्त्‍याचे डोळयावर लेन्‍स प्रत्‍यारोपण करण्‍यासाठी सर्वोतोपरी प्रयत्‍न करण्‍यात आले. तिच्‍या निष्‍काळजीपणमुळे तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रिये दरम्‍यान डोळयातील रक्‍तवाहिनी फुटून रक्‍तस्‍त्राव सुरु झाला ही बाब नाकबुल केली. परंतु हे कबुल केले की, तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयात रक्‍तस्‍त्राव झाल्‍यामुळे लेन्‍स प्रत्‍यारोपण करता आले नाही. तिने हे सुध्‍दा कबुल केले की, रक्‍तस्‍त्राव झाल्‍या नंतर            डॉ. शमीक मोकादम यांना बोलाविण्‍यात आले होते कारण ते नेत्रपटल विशेषज्ञ असल्‍यामुळे त्‍यांचे मत जाणून घेणे आवश्‍यक होते. डॉ. शमीक यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाला टाके घालून तो बंद करण्‍याची सुचना केली आणि अशा परिस्थितीत डोळा ताबडतोब बंद करणे हा एकमेव उपाय वैद्दकीय शास्‍त्रात नमुद असल्‍याने त्‍यानुसार डोळयाला टाके घालून तो बंद करण्‍यात आला. मोतीबिंदु हा रक्‍तस्‍त्रावा बरोबर बाहेर आला होता, या संबधी तक्रारकर्त्‍याने केलेले सर्व आरोप नाकबुल केलेत. ज्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला वैद्दकीय फेर तपासणीसाठी बोलाविण्‍यात आले, त्‍यावेळी डिस-चार्ज कॉर्ड मध्‍ये वैद्दकीय तपासणी बाबत सर्व निरिक्षणे विस्‍तृतपणे नमुद करण्‍यात आलीत, तसेच डाव्‍या डोळयातील मोतीबिंदु शस्‍त्रक्रिये संबधीचा खुलासा त्‍याला करण्‍यात आला होता. शस्‍त्रक्रियेच्‍या दिवशी तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील रक्‍तस्‍त्रावाचे कारण देखील त्‍याला समजावून सांगण्‍यात आले होते. तक्रारकर्त्‍याची नोटीस मिळाल्‍याचे कबुल करुन डॉ. प्रफुल्‍ल मोकादम यांना कुठलेही कारण नसताना नोटीस दिल्‍याचे म्‍हटले आहे, कारण शस्‍त्रक्रियेच्‍या दिवशी डॉ. प्रफुल्‍ल मोकादम नागपूर मध्‍ये नव्‍हते, तक्रारकर्त्‍याचे नोटीसला त्‍यांनी योग्‍य उत्‍तर दिलेले आहे.

     डॉ. श्‍वेता मोकादम यांनी आपल्‍या विशेष कथना मध्‍ये असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील मोतीबिंदु खराब झाल्‍याचे आढळून आले होते आणि त्‍या डोळयाची दृष्‍टी जास्‍त अंधुक झाल्‍याने प्रथम डाव्‍या डोळयाची शस्‍त्रक्रिया करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. शस्‍त्रक्रिये दरम्‍यान अचानक त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातून रक्‍तस्‍त्राव सुरु झाला होता. कुठल्‍याही मोतीबिंदु शस्‍त्रक्रिये दरम्‍यान डोळा उघडल्‍या बरोबर डोळयाचे आतील दाब (Intra Ocular Pressure) (IOP) कमी होतो. तक्रारकर्त्‍याचे बाबतीत अशा प्रकारचा दाब कमी झाल्‍या बरोबर त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाच्‍या आतील रक्‍तवाहिनी फुटून (Expulsive Hemorrhage) रक्‍तस्‍त्राव सुरु झाला. अशाप्रकारची घटना फारच क्‍वचित प्रसंगी घडू शकते आणि त्‍याची पूर्वकल्‍पना नेत्रशल्‍य चिकित्‍सकाला कधीही येत नाही तसेच अशाप्रकारची घटना घडण्‍या मागे नेमके काय कारण आहे हे देखील वैद्दकीय शास्‍त्रात ज्ञात नाही, त्‍यामुळे शस्‍त्रक्रिये पूर्वी त्‍यावर उपाय योजना वैद्दकीय शास्‍त्रात ज्ञात नाही. डोळा उघडल्‍या नंतर अशी घटना घडल्‍यास रक्‍तस्‍त्राव बंद करण्‍या करीता डोळा ताबडतोब शिवून बंद करणे हाच एकमेव उपाय आणि पर्याय आहे आणि तसे वैद्दकीय शास्‍त्रात देखील नमुद केलेले आहे. शस्‍त्रक्रिये नंतर तक्रारकर्ता वैद्दकीय फेरतपासणीसाठी दिनांक-05/02/2011 रोजी आला त्‍यावेळी त्‍याची “Ultra Sound Sonography” (B-Scan) विनामुल्‍य करण्‍यात आली होती, त्‍यावेळी डोळयाचे आतील भागात रक्‍त जमा असल्‍याचे आढळून आले.  त्‍यानंतर पुन्‍हा वैद्दकीय तपासणी करीता दिनांक-14/02/2011 रोजी बोलावून त्‍याची वैद्दकीय तपासणी करण्‍यात आली. त्‍यानंतर दिनांक-04/03/2011 रोजी तक्रारकर्ता आला असताना त्‍याच्‍या डोळयाची तपासणी करुन आवश्‍यक ती औषधे घेण्‍याचा सल्‍ला त्‍याला देण्‍यात आला होता. त्‍याला परत एक महिन्‍या नंतर तपासणीसाठी येण्‍यास सुचित केले होते परंतु त्‍यानंतर तो आला नाही.  मुंबई येथील जे.जे. रुग्‍णालयाने देखील तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील रक्‍तस्‍त्रावाचे निदान हे “Expulsive Hemorrhage” दिलेले आहे.  अशा परिस्थितीत तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाची दृष्‍टी वाचविता येणे शक्‍य नसल्‍यास निदान डोळा वाचविण्‍याचा प्रयत्‍न करणे आवश्‍यक होते आणि तसा प्रयत्‍न करण्‍यात आलेला आहे. “Expulsive Hemorrhage”मुळे होणारा रक्‍तस्‍त्राव हा डोळयाला देण्‍यात येणा-या चि-यामुळे होत नसून डोळयाच्‍या आतील भागातील दाब कमी होऊन रक्‍तवाहिनी फुटण्‍यामुळे होतो.

     डॉ.श्‍वेता मोकादम हिने पुढे असे नमुद केले की, तिने एम.बी.बी.एस. केल्‍या नंतर “SANARA” नेत्रालय, चेन्‍नई येथून “DNB Ophthalmology” डिसेंबर-2006 मध्‍ये केले ज्‍यामध्‍ये तिला सुवर्णपदक प्राप्‍त झालेले आहे. तिने आजपर्यंत 5000 पेक्षा जास्‍त मोतीबिंदुच्‍या शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या केलेल्‍या आहेत आणि या शस्‍त्रक्रियां मुळे तिला भरपूर अनुभव आणि कुशलता प्राप्‍त झालेली आहे. तक्रारकर्त्‍या सोबत झालेला प्रसंग हा फारच दुर्मीळ असून त्‍यासाठी कुठल्‍याही नेत्रशल्‍य चिकित्‍सकाला जबाबदार धरता येणार नाही. ही तक्रार केवळ विरुध्‍दपक्षा कडून पैसे उकळण्‍यासाठी आणि त्‍याला त्रास देण्‍यासाठी दाखल केली असून ती खारीज करण्‍याची विनंती करण्‍यात आली.

 

 

04.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्षाचे लेखी उत्‍तर आणि प्रकरणातील दाखल दस्‍तऐवज यावरुन अतिरिक्‍त ग्राहक मंचा तर्फे पुढील प्रमाणे निष्‍कर्ष देण्‍यात येतो-

                    ::निष्‍कर्ष ::

 

05.   या तक्रारीतील वादा संबधी चर्चा करण्‍यापूर्वी काही प्राथमिक वस्‍तुस्थिती जी दोन्‍ही पक्षानां मान्‍य आहे ती येथे नमुद करीत आहोत-

     अंजनी आय हॉस्पिटल (Anjani Eye Hospital, Nagpur) हे चॅरिटेबल ट्रस्‍ट व्‍दारे चालविण्‍यात येते आणि ते सदरच्‍या क्षेत्रात नावाजलेले रुग्‍णालय आहे. डॉ.श्‍वेता मोकादम या नावाजलेल्‍या नेत्रतज्ञ असून सदरच्‍या क्षेत्रात त्‍यांचे कुशल नेत्रतज्ञ म्‍हणून नाव आहे.  तिने “Ophthalmology” मध्‍ये चेन्‍नई येथील नावाजलेल्‍या नेत्रालयातून पोस्‍ट ग्रॅज्‍युएट डिग्री प्राप्‍त केलेली आहे. तसेच तिने आज वर ब-याच मोतीबिंदु शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या केलेल्‍या आहेत, ही सर्व वस्‍तुस्थिती तक्रारकर्त्‍याला सुध्‍दा मान्‍य असून त्‍याने स्‍वतःच तक्रारी मध्‍ये या बाबतीत लिहिलेले आहे.  डॉ. श्‍वेता मोकादम हिने तिच्‍या शैक्षणिक पात्रते संबधीचे दस्‍तऐवज दाखल केले आहेत, ज्‍यावरुन असे म्‍हणता येईल की, “Ophthalmology”  या क्षेत्रात तिला भरपूर अनुभव असून तिला या विषयात सुवर्णपदक सुध्‍दा प्राप्‍त झालेले आहे.  मोतीबिंदु शस्‍त्रक्रिया करण्‍यास ती सक्षम आणि कुशल शल्‍यविशारद आहे. तक्रारकर्त्‍याचे सुध्‍दा असे म्‍हणणे नाही की, डॉ.श्‍वेता मोकदम ही उच्‍च शैक्षणिक अर्हताधारक डॉक्‍टर नाही आणि तिला या क्षेत्रात कुशलता प्राप्‍त नसून तक्रारकर्त्‍याची डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया ती पार पाडू शकत नव्‍हती.

 

 

06.   आणखी एक मुद्दा या ठिकाणी नमुद करावा लागेल की, ही तक्रार तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलांचे म्‍हणण्‍या नुसार 02 विरुध्‍दपक्षां विरुध्‍द दाखल केलेली आहे, ज्‍यापैकी एक अंजनी आय हॉस्पिटल असून दुसरा विरुध्‍दपक्ष डॉ.श्‍वेता मोकादम आहे, परंतु तक्रारीत विरुध्‍दपक्षाचे केलेले वर्णन तसे दर्शवित नाही, उलटपक्षी ते असे दर्शविते की, तक्रार केवळ अंजनी आय हॉस्पिटल विरुध्‍द डॉ.श्‍वेता मोकादम तर्फे केलेली आहे आणि विरुध्‍दपक्षाची संख्‍या केवळ एकच आहे परंतु तक्रारी मधील सर्व आरोप हे डॉ.श्‍वेता मोकादम हिचे विरुध्‍द करण्‍यात आलेले आहेत.

 

07.   वरील प्राथमिक मुद्दांचा उल्‍लेख केल्‍या नंतर, आता तक्रारीतील मुख्‍य मुद्दा म्‍हणजे तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया करताना विरुध्‍दपक्षा कडून वैद्दकीय निष्‍काळजीपणा झाला किंवा कसे याकडे वळू या. तक्रारकर्त्‍याने असा आरोप केला आहे की, शस्‍त्रक्रियेच्‍या दिवशी त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील मोतीबिंदु काढण्‍यासाठी चिरा देण्‍यात आला, परंतु मोतीबिंदु निघत नसल्‍यामुळे आणखी 02 चिरे देण्‍यात आलेत, तिसरा चिरा देते वेळी डोळयाला रक्‍तप्रवाह करणारी रक्‍तवाहिनी चिरल्‍या गेली आणि त्‍यामुळे रक्‍तस्‍त्राव सुरु झाला. पुढे असेही म्‍हटले की, मोतीबिंदु जबरदस्‍तीने काढण्‍याचा प्रयत्‍न केल्‍या गेला, ज्‍यामध्‍ये डोळयाचा पडदा फाटून डोळा अक्षरशः फुटला, डोळयाला नंतर शिवून बंद करण्‍यात आले आणि शस्‍त्रक्रिया अर्धवट सोडण्‍यात आली, ज्‍यामुळे डाव्‍या डोळया मध्‍ये लेन्‍सचे प्रत्‍यारोपण होऊ शकले नाही, ही घटना शस्‍त्रक्रियेच्‍या दिवशी घडली.

 

08.  विरुध्‍दपक्षाने हे नाकबुल केलेले नाही की, शस्‍त्रक्रिये दरम्‍यान डोळयाच्‍या आतील दाब एकदम कमी झाल्‍याने एकाएकी रक्‍तवाहिनी फुटून रक्‍तस्‍त्राव सुरु झाला, याला वैद्दकीय शास्‍त्रात “Expulsive Hemorrhage” म्‍हणतात आणि असा प्रसंग फारच क्‍वचित वेळा घडते, अशा वेळी तो डोळा शिवून बंद करणे हाच एकमेव उपाय वैद्दकीय शास्‍त्रात नमुद केलेला आहे.

 

09.   तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलांनी युक्‍तीवादात असे सांगितले की, तक्रारकर्त्‍याला ज्‍यावेळी पहिल्‍या आणि दुस-या फेर वैद्दकीय तपासणीसाठी बोलविण्‍यात आले होते त्‍यावेळी सुध्‍दा त्‍याचे डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रिये दरम्‍यान काय घडले किंवा कुठल्‍या प्रकारे त्‍याचेवर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली या संबधी कुठलाही खुलासा विरुध्‍दपक्षाने केलेला नव्‍हता. अशापरिस्थितीत कोणत्‍या आधारावर तक्रारकर्ता म्‍हणतो की, त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील मोतीबिंदु  जबरदस्‍तीने काढण्‍यासाठी त्‍याच्‍या  डोळयाला 03 वेळा चिरा देण्‍यात आला, या प्रश्‍नावर तक्रारकर्त्‍या कडून योग्‍य ते समाधानकारक स्‍पष्‍टीकरण करण्‍यात आलेले नाही.

 

10.   वस्‍तुतः सुनावणीचे दरम्‍यान तक्रारकर्त्‍याचे वकीलांनी असा आरोप केला की, तक्रारकर्त्‍याचा डोळा चाकु  व्‍दारे अक्षरशः ओरबडण्‍यात आला, ज्‍यामुळे त्‍याच्‍या डोळयाला इजा होऊन रक्‍तस्‍त्राव सुरु झाला परंतु या आरोपाला आधार म्‍हणून कुठलाही पुरावा तक्रारकर्त्‍या तर्फे अभिलेखावर दाखल केल्‍या गेलेला नाही.

 

11.  तक्रारकर्त्‍या  तर्फे युक्‍तीवादाचे वेळी पुढे असे सांगण्‍यात आले की, दिनांक-14/02/2011 रोजी जेंव्‍हा ते दुस-या वैद्दकीय तपासणीसाठी गेला होता, त्‍यावेळी त्‍याला असे सांगण्‍यात आले की, त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील रक्‍तस्‍त्राव थांबलेला नसून त्‍याला डाव्‍या डोळयावर हिरवी पट्टी कायमची बांधावी लागेल, त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाला नेमके काय झाले हे जाणुन घेण्‍यासाठी दुस-या नेत्रशल्‍य चिकित्‍सकाचा अभिप्राय घेतला, इतकेच नव्‍हे तर त्‍याने दिलेल्‍या नोटीस मध्‍ये सुध्‍दा त्‍याने ही बाब नमुद केले की, त्‍याने दुस-या नेत्रशल्‍य तज्ञां कडून त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाला झालेल्‍या दुखापती विषयी लेखी अहवाल घेतला होता आणि तो वाचुन त्‍याला धक्‍का बसला की, त्‍याचा डावा डोळा कायमचा निकामी झाला आहे. तक्रारकर्त्‍याने हे पण नोटीस मध्‍ये कळविले की, त्‍याच्‍य डोळयावर डॉ.श्‍वेता मोकादमने केलेल्‍या शस्‍त्रक्रिये संबधी त्‍याचे जवळ दुस-या नेत्रशल्‍य तज्ञांचा अहवाल (Expert Opinion) आहे परंतु त्‍याने दुस-या  नेत्रशल्‍य विशेषज्ञांचा अहवाल या तक्रारी सोबत जोडलेला नाही, त्‍या नेत्रशल्‍य विशेषज्ञांचा अहवाल जर त्‍याने दाखल केला असता तर या तक्रारी मध्‍ये उपस्थित झालेला वाद सोडविण्‍या मध्‍ये निश्‍चीतच मदत झाली असती, त्‍यामुळे विरुध्‍दपक्षाचे वकीलांनी आपल्‍या युक्‍तीवादात हे अगदी बरोबर सांगितले की, अशा परिस्थितीत तक्रारकर्त्‍या विरुध्‍द “Adverse inference” काढावा की, तक्रारकर्त्‍या कडे, तो म्‍हणतो त्‍या प्रमाणे, दुस-या नेत्रशल्‍य  विशेषज्ञांचा तसा अहवाल (Expert Opinion) नाही किंवा जर तसा अहवाल तक्रारकर्त्‍या जवळ असेल तरी तो अहवाल त्‍याच्‍या बाजुने नसून तो अहवाल विरुध्‍दपक्षाचे बाजुने आहे आणि म्‍हणून त्‍याने दुस-या नेत्रशल्‍य विशेषज्ञांचा अहवाल जाणुनबुजून या तक्रारीत दाखल केलेला नाही.

 

12.   या ठिकाणी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला दिलेल्‍या कायदेशीर नोटीस मधील मजकूराचा उल्‍लेख करणे सुध्‍दा आवश्‍यक आहे कारण नोटीस मधील मजकूर हा तक्रारीतील मजकूरा पेक्षा एक वेगळीच वस्‍तुस्थिती/कहाणी दर्शवितो.

तक्रारकर्त्‍याचे नोटीस मध्‍ये असे लिहिलेले आहे की, तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाची प्राथमिक वैद्दकीय चाचणी ही डॉ. प्रफुल्‍ल मोकादम यांनी केली होती आणि त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला डाव्‍या डोळयाची शस्‍त्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला दिला होता आणि  असे सांगितले होते की, ते स्‍वतः डोळयाची शस्‍त्रक्रिया करतील. नोटीस मध्‍ये पुढे असे नमुद केले की, त्‍याचा डावा डोळा उघडल्‍या नंतर डोळयाचे आतुन रक्‍तस्‍त्राव सुरु झाल्‍यामुळे तो बंद करावा लागला आणि शल्‍यक्रिया दालनातून (Operation Theater) त्‍याला बाहेर नेण्‍यात आले,  त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याची अशी समजूत झाली होती की, त्‍याच्‍या डाव्‍या डोळयावरील शस्‍त्रक्रिया यशस्‍वीपणे पार पडलेली असून लेन्‍सचे प्रत्‍यारोपण पण झालेले आहे परंतु डिसचार्ज झाल्‍यावर ज्‍यावेळी त्‍याने डिसचार्ज कॉर्डची (Discharge Card) पाहणी केली त्‍यावेळी त्‍याला पहिल्‍यांदा माहिती पडले की, त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाची शस्‍त्रक्रिया ही डॉ. प्रफुल्‍ल मोकादम यांनी केलेली नसून, ती शस्‍त्रक्रिया डॉ.श्‍वेता मोकादम यांनी केली होती. नोटीस मधील हा मजकूर त्‍याच्‍या तक्रारीत नाही, त्‍याच्‍या तक्रारी मधील मजकूरा मध्‍ये               डॉ. प्रफुल्‍ल मोकादम यांचे नावाचा कुठेही उल्‍लेख करण्‍यात आलेला नाही तसेच या तक्रारीत डॉ. प्रफुल्‍ल मोकादम यांना विरुध्‍दपक्ष म्‍हणून प्रतिपक्ष सुध्‍दा केलेले नाही. दुसरे असे की, त्‍याच्‍या तक्रारीतील मजकूराच्‍या, विपरीत मजकूर नोटीस मध्‍ये असून तो असे म्‍हणतो की, त्‍याची डाव्‍या डोळयावरील शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पाडली होती आणि लेन्‍सचे प्रत्‍यारोपण झाले होते अशी त्‍याची समजूत झाली होती. अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या नोटीस मध्‍ये आणि तक्रारी मध्‍ये त्‍याच्‍या डाव्‍या डोळयावरील मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रिये संबधाने वेगवेगळी आणि “Self contradictory” वस्‍तुस्थिती नमुद केलेली आहे आणि अशाप्रकारचे “Contradictions” निष्‍काळजीपणाच्‍या आरोपाची सत्‍यता पडताळून पाहण्‍याचे वेळी महत्‍वाच्‍या असतात.

 

 

13.  आता या ठिकाणी “Expulsive Hemorrhage” म्‍हणजे काय हे थोडक्‍यात जाणून घेऊ- “Ophthalmology”   या विषया वरील वैद्दकीय साहित्‍या मध्‍ये (Medical Literature) मध्‍ये “Expulsive Hemorrhage”  चे वर्णन खालील  प्रमाणे करण्‍यात आलेले आहे-

 

                “A sudden occurrence of an expulsive subchoroidal hemorrhage  and considered to be one of the most frightening and serious complications of cataract surgery.   It is sudden and disastrous emergency arising from diseased choroidal and retinal vessels in hypertension, diabetes, advanced age, chronic glaucoma, and high myopia.”   

 

 

    ब-याच वेळा “Expulsive Hemorrhage हा मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया करताना होतो  आणि म्‍हणून “Expulsive Hemorrhage” मुळे शस्‍त्रक्रिये दरम्‍यान होणारी गुंतागुंत ही “Intra Operative Complications” मध्‍ये मोडल्‍या जाते परंतु अशा घटनेचे प्रमाण हे फारच कमी असून त्‍याची टक्‍केवारी ही 0.2% एवढी आहे. “Expulsive Hemorrhage” होण्‍याचे कारण डोळयाची शस्‍त्रक्रिया  करताना डोळयाचे पडद्दाला जो बारीक चिरा दिल्‍या जातो त्‍यामुळे डोळयाचे आतील दाब (Intra Ocular Pressure) (IOP) हा एकदम कमी झाल्‍यामुळे होऊ शकतो.  शस्‍त्रक्रिया करीत असताना जर डोळयाचे आत रक्‍तस्‍त्राव झाला तर टाके मारुन डोळा बंद करणे हा उपाय वैद्दकीय शास्‍त्रात दिलेला आहे. “Ophthalmology” या विषया वरील “Expulsive Hemorrhage” या विषयी थोडक्‍यात वरील प्रमाणे दिलेल्‍या माहिती वरुन तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केलेल्‍या आरोपातील तथ्‍यांची पडताळणी करता येईल.

 

14.   ही वस्‍तुस्थिती आहे की, तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयावरील मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रिये दरम्‍यान डोळयाचे आत रक्‍तस्‍त्राव सुरु झाला होता, त्‍यावेळी डॉ.श्‍वेता मोकादम हिने तिचे पती डॉ. शमीक यांना पाचारण केले होते, डॉ. शमीक हे “Vitrio  Retina Expert” असून त्‍यांनी डावा डोळा शिवून बंद करण्‍याचा सल्‍ला दिला होता. ही गोष्‍ट नमुद करावी लागेल की, तक्रारी मध्‍ये डॉ. शमीक मोकादम यांचे विरुध्‍द कुठलेही आरोप किंवा तक्रार केलेली नाही, ज्‍यांच्‍या सल्‍ल्‍या वरुन डॉ. श्‍वेता मोकादम हिने तक्रारकर्त्‍याचा डावा डोळा शिवून बंद केला होता. मोतीबिंदु शस्‍त्रक्रिया करताना जी एक ठरवून दिलेली विहित कार्यपध्‍दती (Prescribed Procedure) आहे त्‍यानुसार डॉ.श्‍वेता मोकादम हिने डोळयाला टाके मारुन तो बंद केला, त्‍यामुळे डोळयातील रक्‍तस्‍त्राव बंद होण्‍यासाठी ज्‍या पध्‍दतीचा अवलंब केला ती कार्यपध्‍दती निष्‍काळजीपणाची किंवा बेजबाबदारपणाची होती असे म्‍हणता येणार नाही.

 

 

15.   तक्रारकर्त्‍याच्‍या वकीलानीं तक्रारीत तसेच युक्‍तीवादा मध्‍ये या गोष्‍टीवर भर दिला की, डॉ. श्‍वेता मोकादम ही एक कुशल नेत्रतज्ञ असल्‍याने अशा प्रकारची घटना तिच्‍या हातून घडायला नको होती.  जर शस्‍त्रक्रिये दरम्‍यान रक्‍तस्‍त्राव होण्‍याची शक्‍यता होती तर डॉ. श्‍वेता मोकादम हिने ती शस्‍त्रक्रिया काही दिवस पुढे लांबवावयास हवी होती तसेच असा पण आरोप करण्‍यात आला की, तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रिये दरम्‍यान नेमकी काय चुक झाली या संबधी डॉ. श्‍वेता मोकादम हिने निट खुलासा तक्रारकर्त्‍या जवळ केला नाही. पुढे या गोष्‍टीवर पण भर देण्‍यात अला की, त्‍या घटने नंतर काही महिन्‍याने तक्रारकर्त्‍याने मुंबई येथील जे.जे. रुग्‍णालयात त्‍याच्‍या दुस-या म्‍हणजे उजव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया करुन घेतली आणि ती शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या व कुठलीही गुंतागुंत न होता पार पडली. वैद्दकीय साहित्‍यात (Medical Literature) नमुद केल्‍या प्रमाणे आम्‍ही हे अगोदरच स्‍पष्‍ट केले आहे की, “Expulsive Hemorrhage” ही मोतीबिंदु शस्‍त्रक्रिये दरम्‍यान उदभवणारी अत्‍यंत दुर्मीळ आणि एकाएकी होणारी घटना आहे.  शस्‍त्रक्रिया करण्‍यापूर्वी कुठल्‍याही नेत्रशल्‍य चिकित्‍सकाला याची पूर्व  कल्‍पना येऊ शकत नाही की,  शस्‍त्रक्रियेच्‍या वेळी संबधित रुग्‍णाला “Expulsive Hemorrhage” होईल आणि म्‍हणून हे म्‍हणणे वाजवी ठरणार नाही की, डॉ.श्‍वेता मोकादम हिला तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया करताना त्‍याला “Expulsive Hemorrhage” होईल याची पूर्वकल्‍पना होती आणि म्‍हणून तिने शस्‍त्रक्रिया पुढे ढकलावयास हवी होती. केवळ तक्रारकर्त्‍याच्‍या दुस-या उजव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया ही मुंबई येथील जे.जे. रुग्‍णालयात यशस्‍वीरित्‍या पार पडली म्‍हणून त्‍याच्‍या पहिल्‍या म्‍हणजे डाव्‍या डोळयाच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या वेळी डॉ.श्‍वेता मोकादम हिने वैद्दकीय निष्‍काळजीपणा केला होता असा निष्‍कर्ष काढता येणार नाही किंवा त्‍यावरुन तसे सिध्‍द पण होत नाही.  तक्रारकर्त्‍या तर्फे जरी हे दर्शविण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला की, त्‍याच्‍या डाव्‍या डोळयात झालेल्‍या रक्‍तस्‍त्रावाचे कारण हे त्‍याच्‍या डोळयाला 03 चिरे, आणि डावा डोळा हा अक्षरशः ओरबडल्‍यामुळे हे होते, तरी या सबधी कुठलाही विशेषज्ञांचा पुरावा (Expert Opinion) आमचे समोर दाखल करण्‍यात आलेला नाही. मुंबई येथील जे.जे. रुग्‍णालयातील कागदपत्रे पाहिली असता हे स्‍पष्‍ट होते की, त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील रक्‍तस्‍त्रावाचे कारण “Expulsive Hemorrhage” म्‍हणूनच दिलेले आहे आणि ही बाब“Ultra Sound Sonography” (B-Scan) मध्‍ये सुध्‍दा दिसून आलेली आहे. शस्‍त्रक्रिये दरम्‍यान डोळयातून होणारा रक्‍तस्‍त्राव बंद होण्‍यासाठी इतर कुठली वेगळी वैद्दकीय उपचार पध्‍दती वैद्दकीय शास्‍त्रात उपलब्‍ध  होती या बद्दल तक्रारकर्त्‍याने काहीही म्‍हटलेले नाही. डॉ.श्‍वेता मोकादम हिने आपल्‍या लेखी उत्‍तरात जे मुद्दे नमुद केलेले आहेत, त्‍याच्‍या विपरीत कुठलाही नेत्रशल्‍य विशेषज्ञांचा पुरावा (Expert Opinion) तक्रारकर्त्‍या कडून देण्‍यात आलेला नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या डिस-चॉर्ज कॉर्ड मध्‍ये शस्‍त्रक्रिये दरम्‍यानच्‍या सर्व गोष्‍टी डॉ.श्‍वेता मोकादम हिने नमुद केलेल्‍या दिसून येतात. तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील मो‍तीबिंदुची शस्‍त्रक्रिया करताना तो अक्षरशः डॉ.श्‍वेता मोकादम हिने ओरबडला होता या तक्रारकर्त्‍याचे आरोपा संबधी मुंबई येथील जे.जे. रुग्‍णालयाचे दस्‍तऐवजा मध्‍ये कुठेही उल्‍लेख केलेला नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रिये दरम्‍यान तक्रारकर्त्‍याच्‍या आरोपा प्रमाणे असे काही घडले असते तर ती बाब      मुंबई येथील जे.जे. रुग्‍णालयातील डॉक्‍टरांच्‍या नक्‍कीच निदर्शनास आली असती कारण तक्रारकर्त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाचे शस्‍त्रक्रिये नंतर लगेच 02 महिन्‍या नंतर त्‍याच्‍या उजव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया मुंबई येथील जे.जे. रुग्‍णालयात करण्‍यात आली होती, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने केलेल्‍या या आरोपाशी सहमती दर्शविणे कठीण आहे.

 

 

16.  वैद्दकीय निष्‍काळजीपणा म्‍हणजे काय आणि कोणत्‍या परिस्थिती मध्‍ये निष्‍काळजीपणा होते या संबधी मा. सर्वोच्‍च न्‍यायालय आणि म.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने दिलेले बरेच न्‍यायनिवाडे उपलब्‍ध आहेत.

 

 

            “Bolam-Versus-Friern Hospital Management   Committee”-1957 (2) All England Law Reports-118 (Relied)

 

         या प्रकरणा मध्‍ये दिलेल्‍या प्रमुख तत्‍वाचा वैद्दकीय निष्‍काळजीपणा वर दिलेल्‍या ब-याच न्‍यायनिवाडयां मध्‍ये आधार घेतलेला आहे. या प्रकरणात असे म्‍हटले आहे की, जर एखादा डॉक्‍टर स्‍टॅन्‍डर्ड प्रॅक्‍टीस नुसार आपले काम करीत असेल तर केवळ दुस-या काही डॉक्‍टर्सचे वैद्दकीय उपचारा बद्दल दुसरा काही अभिप्राय असेल म्‍हणून तो डॉक्‍टर निष्‍काळजीपणाने वैद्दकीय उपचार करीत होता असे म्‍हणत येत नाही. हातातील प्रकरणा मध्‍ये तक्रारकर्त्‍याने डॉ.श्‍वेता मोकादम हिने केलेल्‍या शस्‍त्रक्रिये दरम्‍यान ज्‍या पध्‍दतीचा अवलंब केला, त्‍या पध्‍दतीचे विरुध्‍द वैद्दकीय शास्‍त्रात दुसरी काही कार्यपध्‍दती आहे या संबधी तक्रारकर्त्‍या कडून काहीही दाखल करण्‍यात आलेले नाही. तक्रारकर्त्‍याची अशी तक्रार नाही की, डॉ.श्‍वेता मोकादम  हिने  मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया  करण्‍यासाठी

 

वैद्दकीय शास्‍त्रात जी काही नियोजित कार्य पध्‍दती आहे, त्‍याचे विरुध्‍द जाऊन तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया केली.

 

          “Babu Lal Gupta-Versus-Navjyoti Eye Centre & others”-Revision Petition No.-107/2002, Decided On-1st Novermer, 2013 (NC)  या न्‍यायनिवाडया मध्‍ये “Bolam”  आणि

          Jacob Mathew-Versus-State of Punjab & Anr.”-III (2005) 6 (SCC)1 या न्‍यायनिवाडयांचा आधार घेण्‍यात आलेला आहे.

 

17.   डॉ.श्‍वेता मोकादम ही एक कुशल आणि उच्‍च शैक्षणिक अर्हताप्राप्‍त नेत्रशल्‍य चिकित्‍सक आहे आणि तिचे पती हे “ Vitreo Retinal Expert”   आहेत, ज्‍यांचा सल्‍ला तिने तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया करते वेळी घेतला होता.  डोळयातील रोगाचे निदान आणि शस्‍त्रक्रियेसाठी वैद्दकीय क्षेत्रात जी एक “Standard Practice” सर्वश्रुत आहे, त्‍याप्रमाणे डॉ. श्‍वेता मोकादम हिने तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया आणि त्‍यानंतरच्‍य वैद्दकीय तपासण्‍या केल्‍या असल्‍याचे दिसून येते.

 

18.  हातातील प्रकरणाशी मिळतेजुळते एक प्रकरण मा.राजस्‍थान ग्राहक आयोगा पुढे होते-

       “Mrs.Damyanti Devi Verma-Versus-Dr.Indu Arora”-Appeal No.-956/2006 (RAJ)

 

     सदर प्रकरणा मध्‍ये तक्रारकर्तीच्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरने केली होती. विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरवर असा आरोप होता की, डोळयातील मोतीबिंदु काढण्‍यासाठी डोळयाला चिरा देताना विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरच्‍या निष्‍काळजीपणामुळे डोळयातील रेटीनाला इजा झाली होती, ज्‍यामुळे “Expulsive Hemorrhage” झाले आणि त्‍यामुळे तक्रारकर्तीचे डोळयाची दृष्‍टी पूर्णपणे गेली होती आणि यासाठी विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांचा निष्‍काळजीपणा कारणीभूत होता अशा आरोपा खाली तिने ग्राहक तक्रार दाखल केली होती, त्‍या प्रकरणा मध्‍ये विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरांनी घेतलेला बचाव हा या प्रकरणातील डॉ.श्‍वेता मोकादम हिने घेतलेल्‍या बचावाशी मिळताजुळता आहे आणि त्‍यात विरुध्‍दपक्ष डॉक्‍टरने असे पण म्‍हटले होते की, तक्रारकर्तीला एकाएकी “Expulsive Hemorrhage” झाले होते आणि त्‍यावर वैद्दकीय शास्‍त्रात नमुद असल्‍या प्रमाणे योग्‍य ती वैद्दकीय उपचार पध्‍दती अवलंबिलेली होती. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करताना असे नमुद करण्‍यात आले होते की, वैद्दकीय क्षेत्रातील व्‍यक्‍ती विरुध्‍द व्‍यवसायिक निष्‍काळजीपणाचा (“Professional negligence”) आरोप हा वाहनाच्‍या चालका विरुध्‍द वाहन चालविण्‍यात निष्‍काळजीपणा केल्‍याचे आरोपा पेक्षा एकदम वेगळया पातळीवर/धर्तीवर असतो. वैद्दकीय क्षेत्राचे व्‍यक्‍ती विरुध्‍द वैद्दकीय निष्‍काळजीपणा संबधी केलेल्‍या आरोपां मुळे त्‍या व्‍यक्‍तीचे वैद्दकीय व्‍यवसायावर तर परिणाम होतोच परंतु त्‍याच बरोबर त्‍याचे खात्‍यीला पण धक्‍का पोहचतो, त्‍यामुळे वैद्दकीय क्षेत्रातील व्‍यक्‍तीवर वैद्दकीय निष्‍काळजीपणाचा (“Medical Negligence”) आरोप सिध्‍द करण्‍याची जबाबदारी ही जास्‍त मोठया प्रमाणावर आरोप करणा-यावर असते.                   या प्रकरणात हे सुध्‍दा नमुद करण्‍यात आले होते की, “Expulsive Hemorrhage” ही घटना डोळया वरील शस्‍त्रक्रिया करते वेळी एकाएकी घडणारी घटना आहे आणि अशावेळी डोळा वाचविण्‍यासाठी ताबडतोब टाके मारुन तो बंद करणे हा उपाय “Standard Procedure” प्रमाणे सुचविलेला आहे.

 

 

 

19.  अशाप्रकारे वर वर्णन केलेली वस्‍तुस्थिती आणि पुराव्‍याच्‍या आधारे तात्‍पर्य असे निघते की, वैद्दकीय शास्‍त्रात रुग्‍णाच्‍या मोतीबिंदु शस्‍त्रक्रिये दरम्‍यान क्‍वचित प्रसंगी “Expulsive Hemorrhage” होऊ शकते, ज्‍यामध्‍ये “Choroidal”  या रक्‍तवाहिनीतून मोठया प्रमाणावर रक्‍तस्‍त्राव होऊन रेटीनाला ईजा पोहचते. या प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्त्‍याचे बाबतीत नेमके हेच घडले ज्‍यामुळे त्‍याच्‍या डाव्‍या डोळयाची दृष्‍टी जवळ जवळ गेली.  कधी कधी वैद्दकीय उपचार करताना योग्‍य कुशलता आणि काळजी नुसार उपचार केल्‍या नंतरही र्दुदैवी घटना घडतात आणि मुख्‍यतः शस्‍त्रक्रिये दरम्‍यान अशा संभाव्‍य धोक्‍याची कल्‍पना कायद्दा मध्‍ये सुध्‍दा Recognize” केलेली आहे, परंतु केवळ त्‍या कारणास्‍तव कुठल्‍याही डॉक्‍टरल वैद्दकीय निष्‍काळजीपणाचे आरोपा खाली जबाबदार ठरविणे सर्वोतोपरी चुक आहे.

 

 

20. तक्रारकर्त्‍याचे वकीलानीं सुध्‍दा काही मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयांचा आधार घेतला आहे, त्‍याचा पण आम्‍ही विचार करतो.-

 

       “V. Kishan Rao-Versus-Nikhil Super Speciality Hospital”-III (2010) CPJ-1 (SC)

 

      या प्रकरणात‍ रुग्‍णावर चुकीचे वैद्दकीय उपचार केले म्‍हणून डॉक्‍टर विरुध्‍द वैद्दकीय उपचारात निष्‍काळजीपणा केल्‍या बद्दलचा आरोप केला होता, रुग्‍णाला मलेरीया झाला होता परंतु त्‍याचे वर टाईफाईडवर असलेले वैद्दकीय उपचार करण्‍यात आले, त्‍यामुळे वैद्दकीय  निष्‍काळजीपणा होता हे सिध्‍द करण्‍यासाठी तज्ञ पुराव्‍याची गरज नव्‍हती. ज्‍यावेळी वैद्दकीय उपचारातील निष्‍काळजीपणा हा अगदी उघड आणि स्‍पष्‍टपणे दिसून येतो, त्‍यावेळी                    “res ipsa loquitur” हे तत्‍व लागू होते आणि त्‍यावेळी तक्ररकर्त्‍याला जास्‍त काही सिध्‍द करण्‍याची गरज उरत नाही, कारण दिसत असलेली गोष्‍ट स्‍वतःहूनच ती गोष्‍ट सिध्‍द करते.

 

 

    अशा प्रकारे वस्‍तुस्थितीचा जर विचार केला तर हा  निवाडा हातातील प्रकरणाला लागू होत नाही कारण या प्रकरणा मध्‍ये तक्रारकर्त्‍यावर चुकीचा वैद्दकीय उपचार केला असा आरोप नाही किंवा तसे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे पण्‍ नाही आणि पुरावा पण नाही.

 

 

21.   Spring Meadows Hospital-Versus-Harjol    Ahluwalia”-I (1998) CPJ-1 (SC)

 

       या प्रकरणात असे म्‍हटले आहे की, प्रत्‍येक वैद्दकीय निष्‍काळजीपणाचे प्रकरणा मध्‍ये बोनाफाईड चुक झाल्‍याचा बचाव विरुध्‍दपक्षा कडून घेतल्‍या जातो परंतु प्रत्‍येक वेळी केवळ झालेली चुक हेतुपुरस्‍पर नाही म्‍हणून त्‍याला माफी मिळू शकत नाही.

      वैद्दकीय उपचार करताना संबधित डॉक्‍टर कडून निष्‍काळजीपणा झाला होता किंवा नाही हे प्रत्‍येक प्रकरणातील वस्‍तुस्थितीवर अवलंबून असते. त्‍या प्रकरणातील वस्‍तुस्थिती अशी होती की, एका लहान मुलाला विरुध्‍दपक्षाचे दवाखान्‍यात टाईफाईडचे उपचारासाठी भरती करण्‍यात आले होते, डॉक्‍टरनी काही औषधी लिहून दिली होती, त्‍यावेळी कामावर असलेल्‍या नर्सने मुलाच्‍या वडिलांना “lariago injection” हे इंजेक्‍शन आणण्‍यास सांगितले, जे त्‍या मुलाच्‍या “Intra venously” द्दावयाचे होते असे सांगण्‍यात आले, त्‍या प्रमाणे इंजेक्‍शन आणण्‍यात आले व ते लहान मुलाला टोचण्‍यात आले आणि त्‍यानंतर तो एकदम कोसळला. मुलाची वैद्दकीय तपासणी केल्‍यावर त्‍याच्‍या आई-वडीलांना असे सांगण्‍यात आले की, त्‍याच्‍या मेंदूला Intra Venous Injection” दिल्‍यामुळे दुरुस्‍ती होण्‍या पलीकडे ईजा झालेली आहे आणि त्‍याच्‍या ब-या होण्‍याच्‍या आशा फार कमी आहे, त्‍यामुळे विरुध्‍दपक्षा विरुध्‍द वैद्दकीय निष्‍काळजीपणा केल्‍याचे आरोपा खाली तक्रार दाखल करण्‍यात               आली होती. रुग्‍णालयाने नर्सवर ठपका ठेवला की, तिने डॉक्‍टरने लिहून दिलेले इंजेक्‍शन कसे द्दायचे हे निट वाचले नाही. नर्सने असा बचाव घेतला की, डॉक्‍टरच्‍या अधिपत्‍याखाली आणि दिलेल्‍या सुचने नुसार ती आपले कर्तव्‍य बजावत होती. रुग्‍णाला “lariago syrup” देण्‍यात येत होते आणि म्‍हणून जेंव्‍हा डॉक्‍टरने इंजेक्‍शन देण्‍यास सांगितले, त्‍यावेळी तिचा असा समज झाला की, तेच“lariago injection” रुग्‍णाला द्दावयाचे आहे. अशा परिस्थितीवरुन मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने रुग्‍णालय, डॉक्‍टर आणि नर्स यांचा वैद्दकीय उपचारात निष्‍काळजीपणा असल्‍याचा आरोप सिध्‍द झाल्‍याचे म्‍हटले. अशाप्रकारे वस्‍तुस्थितीच्‍या आधारे उपरोक्‍त निवाडा सुध्‍दा हातातील प्रकरणाला लागू होणार नाही.

 

 

22.  विरुध्‍दपक्षाचे वकीलांनी काही तांत्रिक बाबींच्‍या आधारे सुध्‍दा तक्रार खारीज करावी असे प्रतिपादन केले, त्‍यांनी असे सांगितले की, तक्रारी मध्‍ये आवश्‍यक ते प्रतिपक्ष केलेले नाहीत म्‍हणून तक्रार “Non-joinder of necessary parties” या तत्‍वावर खारीज होण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्षाचे वकीलांचे युक्‍तीवादा नुसार अंजनी नेत्र रुग्‍णालय हे चॅरिटेबल ट्रस्‍टव्‍दारे चालविल्‍या जाते परंतु त्‍या ट्रस्‍टचे सर्व कार्यकारी मंडळ यांना या प्रकरणात सामील केल्‍या गेलेले नाही, या युक्‍तीवादाला आधार म्‍हणून त्‍यांनी खालील निवाडयाचा आधार घेतला-

 

 

               “Venkatesh Iyer-Versus-Bombay Hospital Trust & others”-1998 (3) Bom.C.R.-503

 

      त्‍या प्रकरणात सुध्‍दा वैद्दकीय निष्‍काळजीपणाचे आरोपा वरुन नुकसान भरपाईचा दावा केला होता आणि त्‍यामध्‍ये बॉम्‍बे  हॉस्पिटल  ट्रस्‍टच्‍या सर्व विश्‍वस्‍तानां दाव्‍यात सामील न केल्‍यामुळे दावा “Non-joinder of necessary parties” मुळे कायद्दा नुसार योग्‍य नाही असे ठरविण्‍यात अले होते परंतु या प्रकरणात “Non-joinder of necessary parties”  या तत्‍वाची बाधा येणार नाही कारण हे प्रकरण   ग्राहक संरक्षण कायद्दा अंतर्गत दाखल केले असून दिवाणी प्रक्रिया संहितेच्‍या तरतुदी ग्राहक तक्रारीस काही अपवाद वगळता जशाच्‍या तशा लागू होत नाही. ज्‍या निवाडयाचा आधार घेण्‍यात आला ते प्रकरण दिवाणी दाव्‍याचे स्‍वरुपात दाखल केल्‍या गेले होते.

 

 

23.  विरुध्‍दपक्षाचे वकीलानीं असे पण सांगितले की, डॉ.श्‍वेता मोकादम यांना वैयक्तिक क्षमतेत प्रतिपक्ष बनविलेले नाही, जरी तक्रारीत मागणी तिचे विरुध्‍द केलेली आहे. या सर्व मुद्दावर चर्चा करण्‍याची गरज नाही कारण या तक्रारीत डॉक्‍टर श्‍वेता मोकादम हिने तक्रारकर्त्‍याचे डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुची शस्‍त्रक्रिया करताना  वैद्दकीय उपचारात निष्‍काळजीपणा केल्‍याचा तक्रारकर्त्‍याचा आरोप हा परिस्थितीजन्‍य पुराव्‍यां वरुन सिध्‍द होत नसल्‍याने ही तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

 

 

24.   अशाप्रकारे दोन्‍ही पक्षाचे वकीलांचा युक्‍तीवाद आणि दाखल दस्‍तऐवजी पुराव्‍यां वरुन आम्‍ही या निर्णयाप्रत आलो आहोत की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष डॉ.श्‍वेता मोकादम हिचे विरुध्‍द त्‍याचे डाव्‍या डोळयातील मोतीबिंदुचे शस्‍त्रक्रियेच्‍या  वेळी वैद्दकीय उपचारात  निष्‍काळजीपणाचा   केलेला  आरोप

 

निश्‍चीतपणे सिध्‍द होत नसल्‍याने ही तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे, त्‍यावरुन आम्‍ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                       ::आदेश::

 

1)   तक्रारकर्ता श्री गंगाधरराव दिनकरराव चन्‍ने यांची, विरुध्‍दपक्ष  अंजनी आय हॉस्पिटल, तर्फे श्‍वेता एस.मोकादम यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

2)    खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

3)     निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन  देण्‍यात  याव्‍यात.

             

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.