द्वारा : मा.अध्यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.
1) तक्रारदाराची प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी कॉम्प्युटर खरेदी करताना दिलेल्या सदोष सेवेबाबत व सेवेतील त्रुटीबाबत दाखल करणेत आली आहे.
2) सदर तक्रारीचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणेः-सामनेवाला हे कॉम्प्युटर खरेदी-विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय करतात. तक्रारदारांना सामनेवाला यांचेकडून कॉम्प्युटर खरेदी करणेचे होते. त्याबाबत सामनेवाला यांचेशी बोलणे होऊन सामनेवाला यांनी Amd Athlon CPU Asus Nvida Graphics, 250 GB H.D.D. (500), 1 GB D.D.R.2 RAM, DVD, LED(19”) Monitor, Kay Board, Optical Mouse, Speakers अशा पध्दतीचा कॉम्प्युटर देणेचे ठरलेले. तक्रारदार व सामनेवाला यांचे ठरलेनुसार दि.14/07/11 रोजी रक्कम रु.20,700/- चा कोकण मर्कटाईल बँक, रत्नागिरीचा चेक क्र.206753 सामनेवाला यांना दिला. त्यानंतर सामनेवाला यांनी कॉम्प्युटर पार्सल स्वत: आणून दिले, कॉम्प्युटर जोडला. परंतु त्यांनी कबुल केलेप्रमाणे Amd Athlon CPU Asus Nvida Graphics, 250 GB H.D.D. (500), 1 GB D.D.R.2 RAM, DVD, LED(19”) Monitor, Kay Board, Optical Mouse, Speakers यापेक्षा कमी दर्जाचा कॉम्प्युटर दिला. तसेच LED मॉनिटर न देता LCD मॉनिटर दिला. त्यानंतर वेळेवर पाठपुरावा केलेनंतर सामनेवाला यांनी LED मॉनिटर दिला. तथापि, सदर कॉम्प्युटरमध्ये वारंवार बिघाड होत असून त्याबाबतची देखभालीची कोणतीही सर्व्हीस सामनेवाला यांनी दिलेली नाही. तसेच बिलाबाबत चौकशी करता बिल नंतर देतो असे सांगितले. तथापि, याबाबत बिल दिले नाही. दि.13/10/11 रोजी तक्रारदार सामनेवाला यांचे घरी बिलासंबंधी विचारणा करणेसाठी गेला असता त्यांना शिवीगाळ व जिवे मारणेची धमकी देऊन धक्काबुक्की करुन घरातून बाहेर काढले. याबाबत तक्रारदाराने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना हलक्या दर्जाची वस्तु देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे तक्रारदारांना मानसिक, आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तसेच कायदेशीर नोटीस देखील दिली. तथापि, सामनेवाला यांनी सदर नोटीसला कोणतेही उत्तर दिले नाही. सबब सदरचा कॉम्प्युटर परत घेऊन सामनेवाला यांनी तक्रारदारांनी त्यांना दिलेली रक्कम रु.20,700/- परत करावे, तसेच कॉम्प्युटर खरेदीसाठी काढलेले कर्जाचे व्याज असे झालेल्या त्रासाचा मोबदला म्हणून रु.15,000/- सामनेवालाकडून वसुल करुन दयावेत म्हणून प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.
3) सामनेवाला यांना वेळोवेळी नोटीसा काढल्या असता सामनेवाला यांचे घर बंद म्हणून नोटीसा परत आल्या. सबब तक्रारदाराचे विनंतीनुसार सामनेवाला यांना वर्तमानपत्र दै.तरुण भारत मध्ये दि.03/01/14 रोजी जाहीर नोटीस पाठविली. तथापि, सामनेवाला याकामी हजर झाले नाहीत. सबब सदर प्रकरणी सामनेवाला विरुध्द एकतर्फा चालवणेचा आदेश नि.1वर पारीत करण्यात आला. त्यानंतर तक्रारदार यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि.26 कडे दाखल केले आहे. तसेच तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.4 कडे एकूण 6 कागदपत्र दाखल केलेली आहेत. त्यानंतर तक्रारदाराचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला.
4) एकंदरीत तक्रारीचा आशय, पुरावा, युक्तीवाद ऐकला असता तक्रारीच्या न्याय निर्णयासाठी या मंचाचे विचारार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे सामनेवालांचे ग्राहक आहेत काय ? | होय |
2 | सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा किंवा सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? | होय. |
3 | आदेश काय ? | अंतिम आदेशानुसार अर्ज अंशतः मंजुर. |
5)मुद्दा क्र.1 ते 3 ः- तक्रारदाराने त्यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये तक्रारीतील मजकुराचा ऊहापोह केलेला आहे. सदर तक्रारीतील तसेच प्रतिज्ञापत्रातील मजकूर सामनेवाला यांनी या मंचासमोर हजर होऊन नाकारलेला नाही. सबब तक्रारदाराचा सदर पुरावा ग्राहय मानावा लागेल. तक्रारदाराने नि.4/1 कडे सामनेवाला यांनी दिलेल्या कॉम्प्युटर कॉन्फीगरेशनची प्रत दाखल केलेली आहे. त्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदाराने सामनेवालाकडून कॉम्प्युटर खरेदी केला. नि.4/2 कडे कोकण मर्कंटाईल बँकेच्या बचत खात्याच्या पासबुकाचा उतारा दि.1 ते 31 जुलै-11 चा दाखल करणेत आला आहे. सदर उता-यावरुन असे दिसून येते की, दि.15/07/11 रोजी चेक क्र.206753 अन्वये रक्कम रु.20,700/- सामनेवाला यांचे नांवे दिलेले आहेत. सदरची रक्कम सामनेवाला यांना मिळालेली आहे. कारण सदरची रक्कम या उता-यावर खर्ची टाकलेची दिसून येते. तसेच नि.4/3कडे दि.28/02/12 रोजी पाठविलेल्या नोटीसची नक्कल तसेच नोटीस मिळालेची परतपावती नि.4/4 कडे दाखल केलेली आहे.तसेच नि.4/5 कडे व नि.4/6कडे तक्रारदाराने पोलीस स्टेशनला दिलेल्या सामनेवाला विरुध्दच्या तक्रारीची नक्कल दाखल केलेली आहे. एकंदरीत पुराव्यावरुन असे शाबीत होते की, तक्रारदाराने सामनेवालाकडून रक्कम रु.20,700/- चा चेक देऊन कॉम्प्युटर खरेदी केलेला आहे. तथापि, सदरचा कॉम्प्युटर हा ठरल्याप्रमाणे चांगल्या दर्जाचा न देता कमी दर्जाचा दिला आहे. तसेच सदर कॉम्प्युटरचे बिल देखील दिलेले नाही. तसेच पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन तक्रारदाराने ज्याज्या वेळी कॉम्प्युटरबाबत सेवा देणेची विनंती करणेस गेला. तसेच पावती मागणीसाठी गेला त्यात्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदारास शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन हाकलून दिलेचे दिसून येते. सबब सामनेवाला यांनी तक्रारदार यांना हजर केलेला कोणताही पुरावा या तक्रारीच्या कामी हजर होऊन नाकारलेला नाही. सबब सदरचा पुरावा तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत हे सिध्द करणेसाठी पुरेसा आहे. तसेच सदर पुरावा हा सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदोष सेवा दिली व सेवेत त्रुटी केली म्हणून अनुचित व्यापारी प्रतेचा अवलंब केला हे शाबीत करणेस पुरेसा आहे. सबब मुद्दा क्र. 1 ते 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहे.
6) सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत यावा या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेला कॉम्प्युटर परत घेऊन कॉम्प्युटरची घेतलेली रक्कम रु.20,700/- दि.04/05/2012 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. आणि पुढील आदेश पारित करण्यात येतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेला कॉम्प्युटर परत घेऊन कॉम्प्युटरची घेतलेली रक्कम रु.20,700/-(रु.वीस हजार सातशे फक्त) अदा करावे तसेच सदर रक्कमेवर दि.04/05/2012 पासून रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याज देणेचे आदेश पारीत करणेत येतात.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त), तसेच तक्रार अर्जाच्या खर्चाची रक्कम रु.3000/- (रुपये तीन हजार फक्त) अदा करावेत.
4) सदरचे आदेशाची पूर्तता सामनेवाला यांनी 60 दिवसांत करावी. तशी पूर्तता न केल्यास तक्रारदार हे सामनेवालाविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 व 27 मधील तरतुदीनुसार दाद मागू शकेल.
5) या निकालाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षांना विनामुल्य देण्यात / पाठविण्यात याव्यात.