Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक २७/०२/२०२३) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता हा वरील पत्त्यावर भाड्याच्या घरात राहतो. विरुध्द पक्ष यांचा भुखंड विक्री करण्याचा व्यवसाय आहे. तक्रारकर्ता भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे त्यांनी घर विकत घेण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मौजा खेडमक्ता तहसील ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर, खसरा क्रमांक ३६५ चे लेआऊट पाडणार असल्याची माहिती दिली. विरुध्द पक्षाने त्या लेआऊटमधील भुखंड क्रमांक ९, एकूण आराजी १६५ चौरस मीटर(१७७६.०५ चौरस फुट) हा १००/- रुपये प्रति चौरस फुट दराने एकूण रक्कम रुपये १,७७,६०५/- असल्याचे आणि उपरोक्त भुखंड अकृषक व इतर परवानगी मिळाल्यावर विक्रीपञ करुन देऊ असे सांगितले. तक्रारकर्त्याने भुखंड क्रमांक ९ खरेदी करण्याकरिता दिनांक १७/०४/२०१३ रोजी विरुध्द पक्षास मोबदला रक्कम रुपये १,००,०००/- दिले व उर्वरित रक्कम रुपये ७७,६०५/- विक्रीपञाच्या वेळेस द्यावयाचे होते. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास करारनाम्याचे दिवशी रुपये १,००,०००/- दिले होते. त्यानंतर विरुध्द पक्षास शासकीय परवानगी मिळाल्याचे कागदपञ दाखवून आणि उर्वरित रक्कम रुपये ७७,६०५/- स्वीकारुन विक्रीपञ करुन देण्याची मागणी केली असता ते टाळाटाळ करत होते. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दिनांक २/११/२०१९ रोजी अधिवक्ता मार्फत नोटीस पाठविली आणि उर्वरित रक्कम देऊन विक्रीपञ करुन देण्याची मागणी केली परंतु विरुध्द पक्षाने नोटीसला उत्तर दिले नाही आणि पुर्तता सुध्दा केली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे भुखंडापोटी रुपये १,००,०००/- जमा करुन उर्वरित रक्कम देण्याची तयारी असूनही विरुध्द पक्षाने विक्रीपञ करुन न दिल्याने तक्रारकर्त्याप्रती सेवेत ञुटी दिली. सबब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त भुखंड क्रमांक ९ चे विक्रीपञ करुन न दिल्याने आणि सदर भुखंड अद्यापही अकृषक नसल्याने भुखंडापोटी भरलेली रक्कम रुपये १,००,०००/- आणि त्यावर दिनांक १७/४/२०१३ पासून १८ टक्के व्याजाने परत द्यावे. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये २०,०००/- द्यावे, अशी प्रार्थना केली.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षाविरुध्द नोटीस काढण्यात आले. विरुध्दपक्षास नोटीस प्राप्त होऊन सुध्दा ते आयोगासमक्ष उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द दिनांक २१/०१/२०२० रोजी निशानी क्रमांक १ वर एकतर्फा आदेश पारित करण्यात आले.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज, तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज यांना तक्रारकर्त्याचे शपथपञ, लेखी युक्तिवाद आणि तोंडी युक्तिवाद समजण्यात यावे अशा दिनांक १८/१०/२०२१ रोजी दोन पुरसीस दाखल यावरुन कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
कारणमीमांसा - तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचेकडून त्याचे मालकी आणि ताब्यातील, ‘मौजा खेडमक्ता, तहसील ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर’ येथील भुमापन क्रमांक ३६५, ग्रामपंचायत प.ह.क्रमांक ४, नवरगाव तहसील ब्रम्हपुरी, जिल्हा चंद्रपूर चे प्रस्तावीत लेआऊट मधील भुखंड क्रमांक ९, एकूण क्षेञफळ १६५ चौरस मीटर (१७७६.०५ चौरस फुट) हा प्रति चौरस फुट रुपये १००/- रुपये दराने खरेदी करण्याकरिता मोबदला रक्कम रुपये १,००,०००/- दिनांक १७/०४/२०१३ रोजी विरुध्द पक्षास नगदी दिले व उर्वरित रक्कम रुपये ७७,६०५/- भुखंडाचे विक्रीपञ करतेवेळी द्यावयाची होती. यासंदर्भात तक्रारकर्ता आणि विरुध्द पक्ष यांचेमध्ये त्याच दिवशी दिनांक १७/४/२०१३ रोजी करारनामा झाला. सदर करारनाम्याची नक्कल प्रत तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केली आहे. त्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून रक्कम रुपये १,००,०००/- नगदी मिळाल्याचे तसेच उर्वरित रक्कम ही उपरोक्त लेआऊट अकृषक झाल्यानंतर एक महिण्याचे आंत तक्रारकर्त्याकडून स्वीकारुन तक्रारकर्त्याच्या खर्चाने नोंदणीकृत विक्रीपञ करुन देण्याचे नमूद आहे परंतु विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त भुखंड अकृषक केले नाही आणि तक्रारकर्त्यास करारनाम्यानुसार दिलेल्या एक महिण्याच्या आंत/ विहीत मुदतीत उर्वरित रक्कम घेऊन विक्रीपञ करुन दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दिनांक ६/११/२०१९ रोजी अधिवक्ता मार्फत नोटीस पाठवून त्यामध्ये उर्वरित मोबदला रक्कम स्वीकारुन वादातील भुखंडाचे संबंधीत विभागाकडून अकृषक व इतर परवानगी घेतल्याचे दस्तावेज दाखवून तक्रारकर्त्यास विक्रीपञ करुन द्यावे अथवा भुखंडाचे विक्रीपोटी घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याची मागणी केली होती परंतु विरुध्द पक्ष यांनी पुर्तता केली नाही. सदर नोटीस, पोस्टाची पावती प्रकरणात दाखल आहे. विरुध्द पक्षाने संबंधीत विभागाकडून अकृषक परवानगी मिळण्याआधीच आणि भुखंड विक्रीयोग्य नसतांना सुध्दा तक्रारकर्त्याकडून भुखंडाचे विक्रीपोटी मोबदला रक्कम घेतली आहे. तक्रारकर्ता हा उर्वरित रक्कम देऊन खरेदी करण्यास तयार असतांना सुध्दा विरुध्द पक्ष यांनी अकृषक परवानगी घेऊन विक्रीपञ करुन दिले नाही तसेच रक्कमही परत केली नाही. विरुध्द पक्ष यांची ही कृती तक्रारकर्त्याप्रती सेवेत न्युनता दर्शविते, या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. विरुध्द पक्ष यांनी वादातील भुखंड हा अकृषक केल्याचे दिसून येत नाही, अशा परिस्थितीत वस्तुस्थिती विचारात घेता तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष यांचेकडून भुखंड खरेदी करिता दिलेली मोबदला रक्कम रुपये १,००,०००/- व्याजासह मिळण्यास तसेच झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम आणि तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे.
सबब आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र.१५६/२०१९ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला त्याने मौजा खेडमक्ता, तहसील ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर येथील भुमापन क्रमांक ३६५ मधील भुखंड क्रमांक ९ चे किंमतीपोटी जमा केलेली रक्कम रुपये १,००,०००/- व त्यावर तक्रार दाखल दिनांक ७/१२/२०१९ पासून रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. ७ टक्के व्याज द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावेत.
| |