अर्जदार स्वतः गैर अर्जदारासाठी वकील श्री.मेंडन. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्ररदार हा सा.वाले सोसायटीचा सभासद आहे. सदनिका क्र.ब/08 ही त्याच्या मालकीची आहे. 20 वर्षापासुन तो तेथे राहातो. सोसायटीची इमारत 25 वर्षाची जूनी आहे. इमारत जुनी झाल्यामुळे तिची दुरुस्ती करण्यासाठी सोसायटीने रचनाकार अभियंता यांचेकडून बिल्डींगची पहाणी करुन घेऊन त्यांच्याकडून दुरुस्तीच्या खर्चाबाबत एस्टिमेट मागविले. त्यानंतर निविदा मागवून मे.जय भवानी या कंत्राटदाराला दुरुस्तीचे काम दिले. दुरुस्तीचे काम जून 2002 मध्ये सुरु झाले. तक्रारदाराची सदनिका तळ मजल्यावर असल्याने त्यात दुरुस्तीचे काम जास्त होते. सदनिकेमधील एका खांबाला सभोवती मटेरीयल लावून दुरुस्त केल्यामुळे सदनिकेचे चटई क्षेत्रफळ कमी झाले. तसेच त्या कामासाठी बेडरुमच्या दोन भिती काढाव्या लागल्या. तक्रारदाराचे म्हणणे की, दुरुस्तीच्या कामाला खूप वेळ लागला व कामही बरोबर केले नाही. खिडक्यांचे फडके काढून परत बसविले नाही, खिडक्याही भींतीत निट बसविल्या नाहीत. म्हणून त्यांनी ते खिडक्यांचे व वायरींगचे काम स्वतः करुन घेतले. मे.जय भवानी यांनी दुरुस्तीचे काम बरोबर न केल्याने व कमी दर्जाचे मटेरीयल वापरल्यामुळे सोसायटीने त्यांच्या बरोबरचा करार रद्द केला. मात्र त्यांचेविरुध्द काहीही कारवाई केली नाही. 2. तक्रारदाराचे म्हणणे की, त्यानंतर त्याच्या सदनिकेला खूप नुकसान झाले होते. व दिवसेदिवस ते वाढत होते. भिंती ओल्या होऊन त्यांचा घाण वास होता. त्यांनी रचनाकार अभियंता यांचेकडून त्यांच्या सदनिकेची पहाणी दिनांक 20/04/2005 रोजी करुन घेऊन खर्चाचे एस्टीमेट घेतले. ते रुपये 20,255/- चे होते. त्यांनी सोसायटीला पत्र पाठवून त्यांनी दिलेली रक्कम रुपये 76,900/- परत मागीतली. सामनेवाले सोसायटीने ती परत केली नाही म्हणून सदरची तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या खालील मागण्या आहेत. अ) सा.वाले यांनी त्यांच्या सदनिकेच्या दुरुस्त्या करुन द्याव्या. मंचाचा आदेश झाल्यानंतर एक महिन्याचे आंत दुरुस्त्या केल्या नाहीत तर तक्रारदाराला त्या करण्यास परवानगी द्यावी व त्या खर्चाची प्रतिपूर्ती सा.वाले यांनी करावी. ब) सा.वाले यांनी त्याने खर्च केलेली रक्कम रु.79,900/- परत करावी व त्यावर व्याज द्यावे. क) सा.वाले यांनी तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रु.50,000/- नुकसान भरपाई द्यावी. ड) मंचाने योग्य ते इतर हुकूम व्हावेत. 3. सामनेवाले सोसायटीने तक्रारीला कैफीयत दिली. त्यांचे म्हणणे की, तक्रारदाराने दुरुस्ती फंडाकडे काहीही वर्गणी दिलेली नाही. ऑगस्ट 2004 पर्यत त्यांचेकडे रु.52,514/- बाकी होते. सोसायटीने इमारतीची दुरुस्ती करण्याचे ठरविल्यामुळे सर्व थकबाकीदार सभासदांना मागणी नोटीस पाठविली. नोटीस व वारंवार स्मरणपत्रं पाठवूनही तक्रारदाराने त्याची बाकी रक्कम भरली नाही. तक्रारदार थकबाकीदार असल्याने सदरहू तक्रार दाखल करु शकत नाही. ती रद्द करण्यात यावी. 4. त्यानंतर असे दिसून येते की, तक्रार प्रलंबीत असताना तक्रारदाराने त्यांचेकडे बाकी असलेली रक्कम सोसायटीला दिली. सोसायटीने इमारत दुरुस्तीचे काम केले. मात्र तक्रारदाराचे म्हणणे की, सामनेवाले सोसायटीने त्यांच्या सदनिकेचे काम तात्पुरत्या स्वरुपाचे केलेले आहे. सा.वाले यांनी दाखल केलेल्या सदनिकेच्या दुरुस्ती बाबत कोटेशन रु.70,000/- व रु.62,550/- चे होते. क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर यांनी त्यांच्या सदनिकेच्या केलेल्या दुरुस्ती बाबत मोजमाप करुन प्रमाणपत्र दिले आहे. त्यावरुन व क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर यांनी दिलेल्या कोटेशन मधील दर लक्षात घेतला तर त्यांच्या सदनिकेसाठी केलेला दुरुस्ती खर्च फक्त रुपये 35,350/- चा होतो. तसेच त्यांची ही दुरुस्ती खूप उशिरा म्हणजे जानेवारी 2010 मध्ये केली. ही सोसायटीची सेवेत न्यूनता आहे या उलट सोसायटीचे म्हणणे की त्यांनी तक्रारदाराच्या सदनिकेच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन काम केले व ते काम समाधानकारक झाले आहे असे पत्र स्वतः तक्रारदाराने त्यांना दिलेले आहे. तसेच क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर यांचेही ते काम समाधानकारक झाले असल्याचे प्रमाणपत्र आहे. त्यांचे सेवेत न्यूनता नाही. 5. आम्ही तक्रारदाराचे म्हणणे ऐकले, व सामनेवालेतर्फे वकील श्री.मेंडॉन यांचे म्हणणे ऐकले व कागदपत्रं वाचली. 6. सामनेवाले यांनी दिनांक 24/06/2003 रोजी तक्रारदाराला त्यांचेकडून येणे असलेल्या रक्कमेबाबत नोटीस दिली होती. त्या नोटीसीवरुन असे दिसून येते की, दिनांक 01/06/2003 रोजी तक्रारदाराकडून रु.37,720/- येवढी रक्कम येणे होती. दिनांक 23/07/2004 रोजी सोसायटीने तक्रारदाराला नोटीस दिली. त्यात ऑगस्ट 2004 रोजी तक्रारदाराकडे रु.52,514/- बाकी येणे दाखविली होती. दिनांक 27/08/2008 रोजीच्या रोजनाम्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदाराने सोसायटीची थकबाकी रु.79,900/- दिनांक 15/09/2008 पर्यत भरावयाचे कबूल केले व सोसायटीने तक्रारदाराने ही बाकी रक्कम भरल्यानंतर सोसायटीची मिटींग बोलावून त्यांच्या सदनिकेच्या दुरुस्तीबाबत निर्णय घेतला जाईल असे कबूल केले होते, व दोघांनीही मंचाला तसे लिहून दिले होते. म्हणजेच तक्रार दाखल झाली त्यावेळी तक्रारदार हे थकबाकीदार होते. इतर सभासदांकडेही थकबाकी होती. इमारत दुरुस्त करावयाची झाली तर फंडाची आवश्यकता असते व सभासदांनी पैसे दिले नाही तर सोसायटी दुरुस्तीचे काम करु शकत नाही. तक्रारदाराने दिनांक 30/09/2008 रोजी त्यांच्याकडून देय असलेली ही रक्कम सोसायटीला दिली. त्यानंतर सोसायटीने दुरुस्तीचे टेंडर मागविले. नंतर क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर बाबत वाटाघाटी होऊन क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर चे टेंडर स्विकारण्यात आले. दिनांक 06/06/2009 रोजी सा.वाले यांनी दुरुस्तीचे एस्टिमेट मंचात दाखल केले. नंतर जानेवारी 2010 ते मे, 2010 पर्यत दुरुस्तीचे काम करण्यात आले. तक्रारदाराच्या सदनिकेच्या कामाला प्राधान्य देण्यात आले याबद्दल तक्रारदाराचे दुमत नाही. तक्रारदाराच्या सदनिकेची दुरुस्ती केलेली असल्याने त्यांनी तक्रारीच्या विनंती परिच्छेद ए मध्ये केलेली दुरुस्ती बाबतची मागणी मंजूर करण्याचा प्रश्न येत नाही. 7. सामनेवाले यांचे म्हणणे की, तक्रारदाराच्या सदनिकेचे दुरुस्तीचे काम समाधानकारक झाले असे तक्रारदाराने स्वतः म्हटले आहे. क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर यांचेही तसे प्रमाणपत्र आहे. आम्ही तक्रारदाराचे पत्र व क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर चे पत्र वाचले. क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रमाणपत्रामध्ये खालील प्रमाणे म्हटले आहे. "As per our observation the above mentioned work, which was required after opening the beam, column plaster & cover concrete has been Satisfied Satisfactory. " या प्रमाणपत्रातकेलेल्या कामाचे मोजमाप दिलेले आहे. तक्रारदाराने त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, " Work completed as said by structural engineer " तक्रारदाराच्या पत्रावरुन असाबोध होतो की, स्ट्रक्चरल इंजिनियरने त्याच्या प्रमाणपत्रात दुरुस्तीच्या कामा बद्दलचे जे मोजमाप दिलेले आहे, त्याप्रमाणे काम पूर्ण झालेले आहे. तक्रारदाराने काम समाधानकारक झालेले आहे असे त्यांच्या पत्रात म्हटलेले नाही. स्ट्रक्चरल इंजिनियरने दिलेला रिपोर्ट जर मान्य केला तर त्यांनी दिलेले दुरुस्तीच्या कामाचे कोटेशन पहाता व तक्रारदाराच्या सदनिकेच्या दुरुस्तीला आलेला खर्च पहाता ते काम टिकाऊ स्वरुपाचे केले आहे असे म्हणता येत नाही. Rex con cor कन्सल्टंट प्रा.लि. यांनी तक्रारदाराच्या सदनिकेचे दुरुस्तीचे एस्टिमेट रु.70,000/- दिले आहे व नॅशनल कन्स्ट्रक्शन यांनी रु.62,550/- दिले आहे. तक्रारदाराने क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेले प्रमाणपत्रातील कामाचे मोजमाप व त्यांनी कामाचा दिलेला दर लक्षात घेऊन त्यांच्या सदनिकेच्या केलेल्या दुरुस्तीच्या खर्चाचे मुल्याकन रुपये 35,350/- होते असे म्हटले आहे व तशी आकारणी करुन दिली आहे. दिनांक 20/01/2010 चे सोसायटीने सभासदांना दिलेल्या परीपत्रकावरुन असे दिसते की, तक्रारदाराच्या सदनिकेची स्थिती अतिशय वाईट होती. रु.62,550/- आणि 70,000/- चे इस्टीमेट असताना अंदाजे रु.35,350/- चे काम केले, या वरुन हे स्पष्ट आहे की, सोसायटीने हे काम तात्पुरते स्वरुपाचे केलेले दिसते. नॅशनल कन्स्ट्रक्शन यांनी दिलेल्या कोटेशनमध्ये किंवा Rex con cor कन्सल्टंट प्रा.लि. यांच्या कोटेशनमध्ये म्हटल्याप्रमाणे केलेले दिसत नाही. ही सामनेवाले यांच्या सेवेत न्यूनता आहे. 8. तक्रारदाराने सोसायटीकडून रु.76,900/- व त्यावर व्याजाची मागणी केलेली आहे. परतु आता सोसायटीने तक्रारदाराच्या सदनिकेचे काम केलले असल्यामुळे त्याला ही रक्कम परत मागता येणार नाही. मात्र सोसायटीने जी दुरुस्ती केली आहे ती तात्पुरत्या स्वरुपाची केलेली असल्यामुळे हया सेवेतील न्यूनतेपोटी सोसायटीने तक्रारदाराला रु.15,000/- देणे योग्य आहे. कोटेशन मध्ये दिलेल्या खर्चाचा अंदाज व तक्रारदाराच्या सदनिकेसाठी झालेला प्रत्यक्ष खर्च यातील फरक तक्रारदाराला देता येत नाही. कारण रु.62,550/- किंवा रु.70,000/- हा फक्त अंदाजीत खर्च होता. तसेच तक्रारदाराने रुपये 35,350/- हया बाबतीत तज्ञाचा अहवाल दिलेला नाही. तक्रारदार हे थकबाकीदार असल्यामुळे त्याने इतर मागीतलेली नुकसान भरपाई देणे मंचाला योग्य वाटत नाही. फक्त या तक्रारीचा खर्च मंजूर करता येईल. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 445/2005 ही अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले सोसायटीने तक्रारदार यांना रु.15,000/- नुकसान भरपाई व या तक्रारीचा खर्च रु.5000/- द्यावा व स्वतःचा खर्च सोसावा. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. JUSTICE S P Mahajan] PRESIDENT | |