सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 82/2012
तक्रार दाखल दि.08-05-2012.
तक्रार निकाली दि.14-09-2015.
1. श्री. तानाजी हणमंत गंगावणे,
2. श्री. सयाजी हणमंत गंगावणे,
दोघे रा. स.नं.59 अ,प्लॉट नं.60,
सैदापूर, ता.जि. सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
मे. किर्दत डेव्हलपर्स अँन्ड बिल्डर्स तर्फे प्रोप्रा.
प्रोप्रा. अनंत रामचंद्र किर्दत,
रा. 54, माची पेठ, सातारा. .... जाबदार.
तक्रारदारांतर्फे –अँड.एम.एच.ओक.
जाबदार तर्फे – अँड.डी.व्ही.शिंदे.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार क्र. 1 व 2 हे एकमेकांचे भाऊ असून ते मुळचे परळी, ता. जि.सातारा येथील रहिवासी आहेत. दोघेही तक्रारदार इंडियन आर्मीमध्ये नोकरीस आहेत. जाबदार हे बांधकाम व्यावसायीक असून तक्रारदाराने त्याचे मालकीच्या मौजे सैदापूर येथील स.नं.59/1 अ, 58/2, 58/3, 58/8 यामधील प्लॉट नं. 60 एकूण क्षेत्र 185 चौ.मी. (1991.34 चौ.फूट) या मिळकतीमध्ये तक्रारदार यांनी घर बांधायचे ठरवून सदर बांधकामाचा ठेका प्रथम दिगंबर तांबोळी यांना दिला. तथापी, सदर तांबोळी यांनी बांधकाम करण्यास नकार दिलेने तक्रारदाराने दिगंबर तांबोळी यांचेबरोबरचा करारनामा रद्द केला. जाबदाराने तक्रारदाराचे घराचे बांधकाम करण्याचे मान्य व कबूल केलेनंतर त्याप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान दि.5/8/2010 रोजी तक्रारदार यांचे घर बांधणेचा करारनामा करणेत आला. सदर करारानुसार तक्रारदाराचे घर बांधणेसाठी एकूण रक्कम रु.11,00,000/- (रुपये अकरा लाख मात्र) जाबदार यांना देणेचे तक्रारदाराने मान्य केले होते. तथापी, जादा क्षेत्राचे बांधकाम केले आहे असे म्हणून जाबदाराने तक्रारदार यांचेकडून रक्कम रु.12,47,397/- एवढी रक्कम वेळोवेळी उचल केली आहे. तसेच इलेक्ट्रीकल वायरसाठी व फिटींगसाठी बालाजी इलेक्ट्रीकल्स यांना तक्रारदार यांनी रक्कम रु.20,000/- दिले आहेत व फिटींग करणेसाठी श्री. दळवी यांना रक्कम रु.12,000/- दिले आहेत. करारातील अटीपेक्षा रक्कम रु.1,79,397/- एवढी जादा रक्कम तक्रारदाराने जाबदार यांना दिलेली आहे. अशी परिस्थिती असताना जाबदाराने तक्रारदाराचे घराचे बांधकाम करारात ठरलेप्रमाणे केलेले नाही. सदर बांधकामात खालीलप्रमाणे कामे केलेली नाहीत.
अ. टेरेसवर वॉटर प्रुफींग ब्रीक बाईटमधील केलेले नाही.
ब. आर.सी.सी. कॉलम कॅप्स टेरेसवर उभारलेल्या नाहीत.
क. इमारतीतील दोन्ही किचनमध्ये ट्रॉलीज बसविल्या नाहीत.
ड. दोन्ही हॉलला लस्टर कलर लावलेला नाही.
इ. चार बेडरुम व दोन किचनला ओ.बी.डी. कलर लावलेला नाही.
ई. हॉलमधील शोसाठी ठेवलेल्या जागी मार्बल बसवलेला नाहीत.
फ. चार संडासमध्ये फक्त चार फूट टाईल्स बसविल्या आहेत. करारात सदरचे
टाईल्स 8 फूट आहेत.
ग. पूर्वेकडील वरील बाथरुममधील टाईल्सपूर्ण बसविल्या नाहीत.
ह. बेडरुममधील कडाप्पा कपाटाच्या मधील जागेत स्कर्टींग बसविलेले नाही.
ज. पूर्वेकडील संडासमधील एकखिडकी बसविलेली नाही.
च. पूर्ण घरातील टाईल्स दुय्यम दर्जाच्या बसविल्या असून कोणत्याही
टाईल्सना अँसिड वॉश दिलेला नाही.
छ. जीन्यातील ग्रीलला दिलेला कलर हा दुय्यम दर्जाचा दिला आहे.
झ. दोन्ही बाजूचे वॉश बेसीन बसवलेले नाहीत.
न. हॉलच्या खिडक्या, तसेच इतर ठिकाणचे म्हणजेच किचन, संडास व
बाथरुममधील विंडो सिलच्या बाजूच्या जागा व्यवस्थीत भरल्या नाहीत.
ट. बाल्कनीमधील संपूर्ण पूर्व पश्चिम ग्रीलला दुय्यम अर्जाचा कलर लावला
आहे.
ठ. किचनमधील जागेमध्ये एक्झॉस पंखे बसवलेले नाहीत.
ड. बाहेरील दोन्ही पोर्चमध्ये पेव्हर ब्लॉक लावलेले नाहीत, तसेच कंपाऊंड
वॉलचे काम केलेले नाही.
प्रस्तुत ऊर्वरीत कामे करुन देतो तुम्ही इमारतीत रहायला या असे आश्वासन जाबदाराने दिलेने तक्रारदार व त्यांचे कुटूंबीय नवीन वास्तुमध्ये राहणेस आले. तक्रारदार रहायला आलेनंतर तक्रारदाराने जाबदारांकडे वर नमूद कामे करुन द्यावीत अशी मागणी केली असता, तक्रारदाराकडे जाबदाराने रक्कम रु.4,39,142/- एवढी जादा रकमेची मागणी केली. वास्तवीक जाबदाराने केले जादा बांधकामाची रक्कम रु.1,79,397/- एवढी करारापेक्षा जादा रक्कम तक्रारदाराकडून घेतलेली आहे. तथापी, आता वास्तुतील ऊर्वरीत कामे जाबदार यांना करणेची नाहीत असे तक्रारदाराला लेखी कळवून जाबदार यांनी सदरची कामे करणेस नकार दिला आहे व तक्रारदार यांचेकडे रक्कम रु.4,39,142/- ची जादा मागणी केली आहे व फारच जादा क्षेत्रफळाचे काम केल्याचे जाबदार म्हणत आहेत. सदर जाबदाराची कृती बेकायदेशीर आहे. तक्रारदाराकडे कामे अपूरी ठेवून जादा रकमेची मागणी करणे ही सेवेतील त्रुटी आहे. सदरची कामे पूर्ण करुन देणेची मागणी तक्रारदाराने केली असता जाबदाराने बेकायदेशीर रक्कम मागणेची नोटीस दिली. तसेच उर्वरीत कामांचे खोटे व कमी रकमेचे अंदाजपत्रक करुन जाबदाराने तक्रारदाराला पाठवले आहे. तक्रारदाराचे वास्तूत उर्वरीत कामे कोणती आहेत, त्यासाठी किती खर्च येणार आहे याबाबत वास्तू विशारद श्री. उमेश भोसले यांचा अहवाल याकामी तक्रारदाराने दाखल केला आहे. सदर इमारतीची पाहणी करण्यापूर्वी सदर उमेश भोसले यांनी जाबदाराला पूर्वसूचना दिली होती. कुरियरने पूर्वसूचना जाबदार यांना मिळूनदेखील जाबदार कोर्टकमिशनसाठी हजर राहीलेले नाहीत व त्यांनी कामे अपूरी ठेवून करारातील अटींचा भंग केला आहे. त्यामुळे अपु-या कामासाठी येणारा खर्च जाबदारांकडून वसूल करणेचा हक्क तक्रारदाराला प्राप्त झाला आहे. सदरची कामे करणार नाही असे जाबदाराने तक्रारदार यांना कळविले आहे. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे. सबब जाबदाराने तक्रारदाराकडून जादा घेतलेली रक्कम रु.1,79,397/- जादा घेवूनही तक्रारदाराकडून पुन्हा जादा रक्कम जाबदार मागत आहेत. त्यामुळे तक्रारदाराला मानसिकत्रास झाला असून जाबदार यांचेकडून त्यांनी अपू-या सोडलेल्या कामापोटी रक्कम रु,2,09,000/- (रुपये दोन लाख नऊ हजार मात्र) जाबदारकडून परत मिळावी, तक्रारदाराला झाले मानसीक व शारिरीकत्रासापोटी रक्कम रु.50,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.10,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी नि.2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/6 कडे अनुक्रमे तक्रारदार व दिगंबर तांबोळी यांचेत झालेला करारनामा, दिगंबर तांबोळी (माऊली कन्स्ट्रक्शन्स) बरोबर झालेला रद्द करारनामा, तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान झालेला बांधकाम करारनामा, जाबदाराने तक्रारदारांना पाठवलेली नोटीस, तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेली नोटीस, टेक्निकल रिपोर्ट, सोबत श्री. उमेश भोसले यांनी कमीशन अहवाल करणेपूर्वी जाबदाराला कुरियरने नोटीस पाठवलेची कुरियरची पावती,नि.10चे कागदयादीसोबत नि. 10/1 कडे तक्रारदारतर्फे मुखत्यारचे मुखत्यारपत्र, नि.10/2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.11 कडे प्रतिज्ञापत्र, नि. 12 कडे तक्रारदाराचे जाबदाराचे कैफीयतीस उत्तर व नि. 13 कडे अँफीडेव्हीट वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
3. जाबदार यांनी नि. 6 कडे त्यांचे म्हणणेसोबत परिशिष्ट अ कडे तक्रारदाराकडून बांधकामासाठी मिळाले रकमेचा तपशील, परिशिष्ट ब कडे जाबदाराने करुन दिले कराराव्यतिरिक्त जादा कामांचा तपशील व त्यासाठी झाले जादा खर्चाचा तपशील, नि. 14 कडे कोर्ट कमिशन नेमणूकीसाठीचा अर्ज, नि. 15 कडे सदर अर्जाचे अँफीडेव्हट, नि. 21 चे कागदयादीसोबत कोर्टकमिशनर सुहास कान्हेरे यांनी मे मंचाचे आदेशाप्रमाणे नि.21/1 कडे पोस्टाने तक्रारदार व जाबदार यांना कोर्टकमिशनबाबत कोर्टकमिशनरने पाठवले पत्राची पोस्टाची पावती व पत्रे व पोहोचपावत्या, कोर्टकशिनचे कामकाज झालेनंतर तक्रारदार व जाबदार यांचे संयुक्त पुरसिस (नि.19 कडे), नि. 22 कडे कोर्ट कमिशनर म्हणून सुहास कान्हेरे यांनी कामकाज करणेस हरकत नसलेबाबत पुरसीस, नि. 25 कडे कोर्ट कमिशनर श्री. सुहास कान्हेरे यांचा इमारत पाहणी अहवाल, नि. 22 कडे याकामी जाबदाराने दाखल केलेले म्हणणे हेच जाबदाराचे पुराव्याचे शपथपत्र समजणेबाबत पुरसीस, नि. 30 कडे जाबदाराने दाखल केलेले म्हणणे हाच लेखी युक्तीवाद समजणेत यावा अशी पुरसीस, वगैरे कागदपत्रे जाबदाराने याकामी दाखल केली आहेत. जाबदाराने प्रस्तुत तक्रार अर्जातील सर्व कथने त्यांचे म्हणण्यामध्ये फेटाळलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील कथने मान्य व कबूल नाहीत. तक्रारदाराला, जाबदाराने कधीही ‘प्रथम रहायला या, नंतर कामे करुन देतो’ असे सांगितलेले नाही तर तक्रारदार क्र. 1 व 2 यांची रजा संपत आलेने त्यांना घराची वास्तुशांती लवकर उरकून घ्यायची होती त्यामुळे ते तक्रारदार स्वतः घरात येवून राहीले. जाबदाराने करारापेक्षा जादा रकमेची मागणी केली नाही तर कराराव्यतिरिक्त केलेल्या जादा कामांची रक्कम मागणी केली आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केलेप्रमाणे वास्तूविशारद श्री. उमेश भोसले यांनी सादर केलेला अहवाल चूकीचा व एकतर्फा तयार केला असून त्याबाबतची पूर्वसूचना/नोटीस जाबदार यांना कधीच प्राप्त झाली नाही. तक्रारदाराने दाखल केलेला सदर इमारतीबाबत दिलेला इमारत पाहणी अहवाल हा लबाडीचा आहे. तक्रारदाराने करारातील कोणत्याही अटींचा भंग केलेला नाही. तसेच तक्रारदाराचे घराचे बांधकाम करतेवेळी स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन वेळोवेळी तक्रारदाराचे पसंतीचे साहीत्य वापरुन चांगल्या प्रतीचे बांधकाम केले आहे. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सेवात्रुटी दिली नाही. जाबदाराने दि. 21/4/2012 रोजी तक्रारदाराला पाठवले नोटीसचा चूकीचा अर्थ काढून स्वतःच्या चूकांवर पांघरुन घालणेसाठी जाबदाराला नाहक त्रास देणेसाठी तक्रारदाराने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच जाबदाराने केले जादा कामाचे पैसे घ्यायला लागू नयेत म्हणून या दुष्ट हेतूने प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल केला आहे.
खरी वस्तुस्थिती ही आहे की, दिगंबर तांबोळी यांना तक्रारदाराने सदर काम देणेबाबत करार केला होता. सदर करारावर तारीख नमूद नाही. तसेच दस्तात कोणताही कायदेशीरपणा दिसून येत नाही. तसेच तक्रारदाराचे आडमुठेपणामुळे प्रत्येकवेळी चालू कामामध्ये काहीतरी जादा काम काढण्याच्या वृत्तीमुळे दिगंबर तांबोळी यांना वैतागून तक्रारदाराचे बांधकाम करणेस नकार दिला. तक्रारदार व दिगंबर यांचेत झालेला करारनामा अस्तीत्वात असतानाच जाबदार कमी दराने काम करणेस तयार असलेचे लक्षात आलेवर जाबदारबरोबर दि.5/8/2010 रोजी करारनामा केला. प्रस्तुत दिवशी श्री. तांबोळी यांचे बरोबरचा तक्रारदाराचा करार अस्तित्वात आहे याची कोणतीही कल्पना तक्रारदाराने जाबदाराला दिली नव्हती व नाही. नंतर दि.7/8/2010 रोजी तक्रारदाराने दिगंबर तांबोळी यांचेबरोबर केलेला करारनामा जाबदाराचे माघारीच रद्द केलेचे दिसून येते. सदर रद्द करारनामेवरुनही ही गोष्ट लक्षात येते की, तक्रारदार व तांबोळी यांचे दरम्यान पेमेंटवरुन वाद होता व रद्द तारखेदिवशीही तक्रारदाराने तांबोळी यांचे पेमेंट अदा केले नव्हते.
जाबदाराने तक्रारदार यांना करारात ठरलेप्रमाणे एकूण 1782.84 चौ.फूट बांधकाम करण्याचे कबूल केले होते. त्याचा मोबदला एकूण रक्कम रु.11,00,000/- (रुपये अकरा लाख मात्र) ठरविणेत आला होता. तक्रारदाराने जाबदाराबरोबर प्रत्यक्षात प्रतिचौरस फूटाप्रमाणे दर ठरविला होता. तसेच कोणकोणत्या गोष्टी जाबदाराने करुन द्यायच्या हे करारपत्रात नमूद आहे. त्याव्यतिरिक्त झाले जादा कामाचे जादा पैसे तक्रारदाराने जाबदार यांना देणेचे मान्य व कबूल केले होते. तसेच करारात ठरलेप्रमाणे वेळचेवेळी पेमेंट करणे हा कराराचाच भाग आहे व महत्वाची अट आहे. तक्रारदाराने जाबदाराला करारात ठरलेप्रमाणे कधीही वेळच्यावेळी पेमेंट अदा केलेले नाही हे परिशिष्ट ‘अ’ म्हणण्यासोबत जोडले आहे त्यावरुन सिध्द होते. याबाबींवरुन तक्रारदाराने स्वतःच करारातील अटींचा भंग केलेचे शाबीत होते. तक्रारदाराने जाबदार यांचेकडून वेळोवेळी करारापेक्षा जादा कामे करुन घेतली आहेत. त्याचा उल्लेख म्हणण्यासोबत जोडले परिशिष्ट ‘ब’ मध्ये आहे. परंतु सदर जादा कामाचे पेमेंट तक्रारदाराने जाबदाराला केलेले नाही. तसेच तक्रारदाराने सादर केलेला उमेश भोसले यांचा अहवाल एकतर्फा असलेने पुराव्यात वाचता येणार नाही. तक्रारदाराचे घराचे एकूण बांधकाम 2570 चौ.फूट एवढे केले आहे म्हणजेच जाबदाराने 787 चौ.फूट क्षेत्राचे बांधकाम जादा केले आहे. परंतू सदर जादा कामाचे पैसे तक्रारदाराने जाबदाराला अदा केलेले नाहीत. सदरची जादा कामाची रक्कम रु.4,39,142/- असून ते तक्रारदारांने जाबदारांना देणे कायदेशीर होणार आहे. दि. 21/4/2012 रोजी तक्रारदाराने नोटीस पाठवून रक्कम रु.4,39,142/- या रकमेची मागणी केली. सदर नोटीस तक्रारदाराला मिळूनही तक्रारदाराने रक्कम जाबदाराला अदा केली नाही. नोटीस मिळालेनंतर या तक्रार अर्जातील कथनांची उभारणी तक्रादाराने केली आहे व जाबदाराला नाहक आर्थीक व मानसिकत्रासात पाडलेले आहे.
तसेच तक्रारदाराने रक्कम रु.20,000/- बालाजी इलेक्ट्रीकल्सला दिले नसून, प्रस्तुत रक्कम ही जाबदाराने बालाजी इलेक्ट्रीकल्सला चेकने व रोखीने अदा केली आहे. टेरेस वॉटर प्रुफींग हे करारामध्ये ब्रीक बाईटचे ठरलेले नव्हते ते ग्रीट मिक्समध्ये करायचे होते. तक्रारदाराकडून रक्कम उपलब्ध न झालेने केले नाही. ऊलट तक्रारदाराने जाबदाराचे कोणतीही पूर्वकल्पना व पूर्वपरवानगी न घेता साईटवर जाबदाराची शिल्लक असलेली वाळू वॉटरप्रुफींगसाठी वापरली आहे. टेरेसवर वॉटर प्रुफींग करायचे असलेने वेगळे कॉलम कॅप्स टेरेसवर उभारण्याची गरज नाही. तक्रारदाराने पेमेंट न केलेने किचन ट्रॉलीज बसविणे शक्य नाही. लस्टर व ऑईल बॉन्ड देऊ नका, दोन वर्षांनी तुमच्याकडूनच सदरचे काम करुन घेवू म्हणून तक्रारदाराने स्वतःच सांगितले आहे व डिस्टेंपर देणेस सांगितले, ओटयावर टाईल्स बसविणे करारात नमूद नाही, बाथरुममध्ये कमी पडणा-या टाईल्स आणणेसाठी तक्रारदाराकडे रकमेची मागणी केली असता, तक्रारदाराने साफ नकार दिला. त्यामुळे 4 ते 5 टाईल्स बसविणे राहून गेल्या आहेत. बेडरुममधील कडप्पा कपाटामधील जागेत कधीही स्कर्टिंग बसवत नाहीत, पूर्वेकडील संडासची खिडकी लावून ठेवली आहे. परंतू तक्रारदाराने दिले वाईट वागणूकीने खिडकी बसविलेचे राहीले आहे. संपूर्ण घरातील टाईल्स या दर्जेदार आहेत. जीन्याच्या ग्रीलला उत्तम दर्जाचा काळा ऑईलपेंट दिला आहे. दोन्ही वॉशबेसीन हे क्रीसलॉन सिरॅमिक्स मधून खरेदी केले आहेत मात्र प्लंबरची मजूरी न दिल्याने फिटींग राहीले आहे, विन्डोसील व्यवस्थीत भरल्या आहेत. ग्रीलला उत्तम दर्जाचा ऑईलपेंन्ट दिला आहे. इतर मुद्दे करारनाम्यात नमूद नाहीत. वरील परिस्थिती असतानाही तक्रारदाराने ओढूनताणून खोटा इमारत पाहणी अहवाल टेक्नीकल रिपोर्ट दाखल करुन सदर तक्रार अर्ज विनाकारण या जाबदार यांचेविरुध्द दाखल केला आहे. सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे.
4. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व
सेवापुरवठादार आहेत काय ? होय
2. जाबदाराने तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय ? नाही
3. तक्रारदार जाबदारांकडून अर्धवट व अपु-या राहीले कामासाठी
रक्कम मिळणेस पात्र आहेत काय? नाही
4. अंतिम आदेश काय ? खालील नमूद
आदेशाप्रमाणे
विवेचन-
5. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांनी त्यांचे मौजे सैदापूर येथील स.नं.51/1 अ, 58/2, 58/3, 58/8 यामधील प्लॉट नं.60 एकूण क्षेत्र 185 चौ.मी. या मिळकतीत घर बांधणेचे ठरवून जाबदार यांचेबरोबर घर/इमारत बांधकामाचा करारनामा दि.5/8/2010 रोजी केलेचे दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट होते. तसेच जाबदारानेही ही बाब मान्य केली आहे व तक्रारदाराकडून सदर घर बांधकामासाठी जाबदारांना वेळोवेळी रक्कम रु.12,47,397/- अदा केली आहे. सबब तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवा पुरवठादार आहेत हे निर्विवादपणे सिध्द होते म्हणून मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
6. वर मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. कारण तक्रारदाराचा अर्ज तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केली सर्व कागदपत्रे यांचा अभ्यास करता कामी तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/6 कडे दाखल केलेला उमेश भोसले यांचा टेक्नीकल रिपोर्ट तक्रारदाराने तक्रार अर्जात केलेली कथने शाबीतीसाठी दाखल केला आहे. परंतू प्रस्तुत टेक्नीकल रिपोर्ट सोबत पान नं. 58 वर दाखल केले कुरियरचे पावती वर (उमेश भोसले) यांनी जाबदाराला कोर्टकमिशनसाठी पाठविले नोटीसची कुरीयर पावतीचे अवलोकन केले असता, प्रस्तुत कुरियरचे पावतीवर जाबदाराची सही नाही त्यामुळे सदर कुरियरची पावती ही पुराव्यात वाचता येणार नाही. म्हणजेच उमेश भोसले यांनी कोर्ट कमिशन करण्यापूर्वी जाबदाराला नोटीस पाठवली होती व प्रस्तुत नोटीस जाबदाराला मिळाली होती हे सिध्द होत नाही. सबब तक्रारदाराने दाखल केलेला उमेश भोसले यांचा टेक्नीकल रिपोर्ट हा एकतर्फा आहे असे स्पष्ट होते. त्यामुळे तो याकामी वाचता येत नाही. परंतू प्रस्तुत कामी जाबदाराने मे. मंचाकडे इमारत पाहणीसाठी कोर्ट कमिशनची नेमणूक करणेबाबत अर्ज दाखल केला. नि. 14 कडे प्रस्तुत अर्जावर तक्रारदाराचे म्हणणे घेतले तसेच उभय विधिज्ञांचा युक्तीवाद ऐकून सदरचा अर्ज मे मंचाने मंजूर केला व जाबदाराने मे. मंचाचे परवानगीने श्री. सुहास कान्हेरे इंजिनिअर व मान्यता प्राप्त व्हॅल्यूएटर यांचेमार्फत उभय पक्षकारांच्या उपस्थितीत कमिशन करुन घेतले व प्रस्तुत सुहास कान्हेरे यांनी केलेला इमारत पाहणी अहवाल मूळप्रत याकामी नि. 25 कडे दाखल आहे. प्रस्तुत अहवालामध्ये जाबदार यांनी कराराव्यतिरिक्त जादा केले कामांचा तपशील दिला असून त्याची एकूण खर्च रक्कम रु.49,500/- (रुपये एकोणपन्नास हजार पाचशे मात्र) दिला आहे. तसेच करारपत्रात नमूद केले कामांपैकी अपु-या कामांचा तपशील दिला आहे. त्यासाठी रक्कम रु.74,000/- (रुपये चौ-याहत्तर मात्र) एवढा खर्च अपेक्षीत असलेचे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे बांधकाम करारनाम्यानुसार पाहिला मजला 82.82 चौ.मी. तर दुसरा मजला 82.82 चौ.मी. एकूण 185.64 चौ.मी. म्हणजेच 1782.94 चौ. फूट एवढे बांधकाम करारपत्रानुसार जाबदाराने तक्रारदाराचे घराचे बांधकाम करुन देणेचे होते. तर प्रस्तुत अहवालानुसार बांधकाम करारनाम्याव्यतिरिक्त जादा बांधकाम क्षेत्रफळ पुढीलप्रमाणे पहिला मजला 189.00 चौ. फूट, दुसरा मजला कॅन्टीसिस्टर 240.00 चौ.फूट असे एकूण 429.00 चौफूट असे कराराव्यतिरिक्त जादा क्षेत्रफळाचे बांधकाम जाबदाराने केलेचे या कमिशन रिपोर्ट वरुन सिध्द होत आहे. म्हणजे या सर्व गोष्टींचा उहापोह केला असता मे. मंचास खालील गोष्टी लक्षात आल्या. कमिशन रिपोर्ट नि. 14 नुसार 429 चौ. फू. जादा क्षेत्रफळाचे बांधकाम जाबदाराने तक्रारदाराला करुन दिले आहे. बांधकामाचा दर तक्रारदाराचे म्हण्यानुसार रक्कम रु.621/- प्रति चौ.फू. ठरला होता. म्हणजे 429 चौ. फू. जादा क्षेत्रफळाचे बांधकाम x रु.621/- = रु.2,66,409/- यामध्ये जाबदाराने इमारतीमध्ये केले जादा कामाची या कमीशन रिपोर्टप्रमाणे होणारी रक्कम रु.49,500/- मिळवली असता रक्कम रु.3,15,909/- होते. प्रस्तुत रकमेत प्रस्तुत कमीशन रिपोर्टप्रमाणे जाबदाराने केले अपु-या कामाची रक्कम रु.74,000/- वजा केली असता रक्कम रु.2,41,909/-(रुपये दोन लाख एकेचाळीस हजार नऊशे मात्र) अशी होते.
तक्रारदाराने जाबदार यांना करारापेक्षा म्हणजेच रु.11,00,000/- (रुपये अकरा लाख मात्र) ऐवजी रक्कम रु.12,47,397/- (रुपये बारा लाख सत्तेचाळीस हजार तीनशे सत्यानऊ मात्र) एवढी रक्कम अदा केली आहे. म्हणजेच करारापेक्षा रक्कम रु.1,47,397/- (रुपये एक लाख सत्तेचाळीस हजार तीनशे सत्यानऊ मात्र) जास्त दिली असे मानले तरीही जाबदाराने वर नमूद केलेप्रमाणे रु.2,41,909/- (रुपये दोन लाख एकेचाळीस हजार नऊशे मात्र) तक्रारदाराने देणे असले रकमेतून सदर रक्कम रु.1,47,397/- वजा केली असता (रु.2,41,909/- - रु.1,47,397/- = रु.94,512/-) म्हणजे (रुपये चौ-यानऊ हजार पाचशे बारा मात्र) तक्रारदाराने जाबदार यांना देणे आहे हे सदर कमीशन रिपोर्टचा उहापोह केला असता स्पष्ट होते. त्यामुळे याकामी तक्रारदाराने केलेल्या तक्रार अर्जातील जाबदार विरुध्द केलेल्या कोणत्याही कथनास पुष्टी मिळत नाही. तक्रारदाराने जाबदार यांचेविरुध्द विनाकारणच सदरचे आरोप केले आहेत असे स्पष्ट होते. तक्रारदाराने जाबदार यांना देणे असलेली रक्कम रु.94,512/- (रुपये चौ-यानऊ हजार पाचशे बारा मात्र) अदा केलेली नाही. त्यामुळेच नि. 14 कडे दाखल कमिशन रिपोर्टमध्ये नमूद केलेली अपूरी कामे जाबदाराने अपूरी ठेवली आहेत. याचा अर्थ जाबदार यांनी सेवात्रुटी केली किंवा तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली असा मुळीच होत नाही. म्हणजेच तक्रारदाराला जाबदाराची उर्वरीत रक्कम अदा करावी लागू नये म्हणून तक्रारदाराने जाबदारविरुध्द सदरचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे हे निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द झाले आहे. त्यामुळे जाबदाराने तक्रारदार यांना कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर नकारार्थी दिले आहे. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार यांचेकडून अपु-या, अर्धवट राहीले कामासाठी कोणतीही रक्कम मिळणेस पात्र नाहीत असे आमचे स्पष्ट मत आहे. याऊलट तक्रारदाराने जाबदार यांचेविरुध्द विनाकारण जाबदाराला नाहक त्रास देणेच्या उद्देशाने सदरचा तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला असलेने तक्रारदार यांनीच जाबदार यांना रक्कम रु.15,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणे न्यायोचीत होणार आहे असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत येतो.
2. तक्रारदार यांनी जाबदार यांना कॉम्पेनसेटरी कॉस्ट म्हणून रक्कम
रु.15,000/- (रुपये पंधरा हजार मात्र) आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसात
अदा करावेत.
3. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
4. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 14-09-2015.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.