नि. ४१
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ११६१/२००८
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १४/१०/२००८
तक्रार दाखल तारीख : २३/१०/२००८
निकाल तारीख : १३/१०/२०११
---------------------------------------------------------------
श्री बाबासाहेब दामोदर ढोले
व.व. ५५, धंदा – शेती,
रा.आष्टा, ता.वाळवा जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. मॅनेजर,
अनंत पी.व्ही.सी.पाईप प्रा.लि.
ऑफिस – प्लॉट नं.४५, पहिली लेन,
वसंत मार्केट यार्ड, सांगली – ४१६४१६
२. मॅनेजिंग डायरेक्टर,
अनंत पी.व्ही.सी.पाईप प्रा.लि.
सर्व्हे नं.२६, एन.एच.-७
बेंगलोर रोड, हम्मपापुरम (व्ही),
अनंतपूर (जिल्हा), पिन-५१५७२१
३. दिप इलेक्ट्रीकल्स, आष्टा,
एस.टी.स्टॅंडजवळ, आष्टा, ता.वाळवा
जि.सांगली तर्फे प्रोप्रायटर .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.व्ही.जी.शेटे
जाबदार क्र.१ व २ तर्फे : +ìb÷. श्री एन.एम.वाळवेकर
जाबदार क्र.३ : स्वत:
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्जआपल्या खरेदी केलेल्या पाईपबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांनी जाबदार क्र.१ व २ यांनी उत्पादित केलेल्या पी.व्ही.सी. पाईप जाबदार क्र.३ यांचेकडून दि.२२/६/२००६ रोजी खरेदी केल्या. सदर पाईप खरेदी करताना तक्रारदार यांना सदरच्या पाईप या आय.एस.आय.मार्कच्या आहेत असे सांगण्यात आले. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडून पाईप घेवून त्यांच्या शेतात पाईपलाईन केली. पाईपलाईन केल्यानंतर पाणीप्रवाह सुरुवातीचे चार महिने व्यवस्थित होता. त्यानंतर मात्र पाईप फुटणे, त्याची गळती होणे असे प्रकार वारंवार होवू लागले. अनेकवेळा पाईप्स गळतीमुळे तक्रारदार यांना पाईपलाईन बंद ठेवावी लागली. तक्रारदार यांनी याबाबत जाबदार यांचेकडे तक्रार केली असता जाबदार यांचे प्रतिनिधी दस्तगीर यांनी दि.१२/१/२००८ रोजी तक्रारदार यांचे शेतामध्ये समक्ष पाहणी केली व सदरच्या पाईप निकृष्ट दर्जाच्या असल्याने बदलून देण्याची हमी दिली. जाबदार यांचे प्रतिनिधींनी हमी दिल्याप्रमाणे त्यांनी पाईप बदलून दिल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार यांना लेखी पत्र पाठविले. परंतु जाबदार यांनी तोंडी आश्वासन देण्यापलिकडे काही केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.२०/६/२००८ रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीस पाठवूनही जाबदार यांनी दखल न घेतल्याने तक्रारदार यांनी पाईप्स बदलून मिळाव्यात अथवा वैकल्पिकरित्या सदर पाईपची रक्कम परत मिळावी या मागणीसाठी व इतर तदनुषंगिक मागण्यांसाठी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ९ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ व २ यांनी नि.१४ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी जाबदार क्र.३ हे त्यांचे वितरक नाहीत. तक्रारदार यांनी जाबदार क्र.३ कडून पाईप खरेदी केली असल्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नाहीत. तक्रारअर्ज मुदतीत नाही असे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेली पाईप ही योग्य त्या तज्ञ व्यक्तीकडून फिटींग करुन पाईपलाईन केलेली नाही. त्यामुळे पाईप फुटण्याचा प्रकार घडू शकतो असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेली पाईप ही मेन पाईपलाईनसाठीची नसून ब्रॅंचलाईनसाठीची आहे. तक्रारदार यांनी सदर पाईपचा उपयोग मेन लाईनसाठी केलेला दिसून येतो. जाबदार हे दोन प्रकारच्या पाईप उत्पादित करतात. शेताच्या भौगोलिक रचनेचा विचार करता आय.एस.आय. व नॉन आय.एस.आय या दोन्ही प्रकारच्या पाईपलाईनचे उत्पादन जाबदार करीत असतात. आय.एस.आय. मार्कमध्ये जाबदार यांचे मोनार्क ब्रॅंड व मोनार्क टर्बो अशी दोन उत्पादने आहेत तर नॉन आय.एस.आय. ब्रॅंडमध्ये कोहीनूर, वजारा, व कृष्णा अशी तिन उत्पादने आहेत. तक्रारदार यांनी कोहीनूर प्रकारची पाईप खरेदी केली आहे. सदरचे उत्पादन आय.एस.आय. मार्कचे नाही. सदर पाईपची किंमत आय.एस.आय. मार्कच्या पाईपपेक्षा कमी आहे. त्यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. या सर्व कारणांचा विचार करुन तक्रारदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयर्थ नि.१५ ला प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. तक्रारदार यांनी नि.१८ ला प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांच्या म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. तक्रारदार यांनी आपल्या प्रतिउत्तरामध्ये जाबदार यांनी सदर पाईप्स या आय.एस.आय. मार्कच्या असल्याबाबत हमी दिली आहे. जाबदार यांनी आय.एस.आय. क्वालिटीप्रमाणे पाईप्स न देता सामान्य दर्जाच्या पाईप्स देवून फसवणूक केली आहे असे आपल्या प्रतिउत्तरामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी नि.२१ च्या यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
५. तक्रारदार यांनी नि.२२ ला अर्ज देवून जाबदार क्र.३ यांना याकामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील करुन घेतले आहे. तक्रारदार यांनी नि.२८ ला दुरुस्त तक्रारअर्जाची प्रत दिली आहे व नि.२९ ला शपथपत्र दाखल केले आहे. जाबदार क्र.३ यांनी नि.३१ ला आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.३ यांनी ते जाबदार क्र. १ व २ यांचे आष्टा येथील वितरक आहेत असे नमूद केले आहे. जाबदार क्र.१ व २ यांनी दिलेल्या माहितीवरुन तक्रारदार यांना सदरचा माल आय.एस.आय. प्रमाणीत असल्याचे बिल दिले असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार हे जाबदार क्र.१ व २ यांचे वितरक असल्याने मालामध्ये असणारा दोष निवारण करण्याची जबाबदारी जाबदार यांचेवर येत नाही. जाबदार क्र.१ व २ यांचा प्रतिनिधी दस्तगिर यांनी स्वत: अर्जदाराच्या शेतामध्ये येवून पाईपलाईनची तपासणी केली आहे व पाईप निकृष्ट दर्जाची आहे अशी कबुलीही दिली आहे. जाबदार क्र.१ व २ स्वत:ची जबाबदारी टाळत आहेत. प्रस्तुत जाबदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा. जाबदार क्र.३ यांनी नि.३२ ला शपथपत्र दाखल केले आहे तसेच नि.३४ चे यादीने २ कागद दाखल केले आहेत.
६. तक्रारदारतर्फे नि.३५ ला साक्षीदार यांचे शपथपत्र दाखल केले आहे. तक्रारदारतर्फे नि.३८ ला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदारतर्फे नि.४० ला लेखी युक्तिवाद दाखल करण्यात आला आहे.
७. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज व प्रतिउत्तर, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे व दोन्ही बाजूंचा युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार जाबदार यांचा ग्राहक आहे का ? होय.
२. तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा
दिली आहे का ? होय.
३. तक्रारदार मागणीप्रमाणे अनुतोष मिळणेस पात्र आहेत का ? होय.
४. तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे का ? नाही.
५. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
विवेचन
८. मुद्दा क्र.१ –
जाबदार क्र.१ व २ यांनी जाबदार क्र.३ हे त्यांचे वितरक नाहीत असे नमूद केले आहे तर जाबदार क्र.३ यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये ते तक्रारदार यांचे वितरक आहेत असे नमूद केले आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेली पाईप ही जाबदार क्र.१ व २ यांनी उत्पादित केलेली आहे व सदरची पाईप ही तक्रारदार यांना जाबदार क्र.३ यांचेमार्फत विकण्यात आली. जाबदार क्र.३ यांनी सदरची पाईप जाबदार क्र.१ व २ यांचेकडून खरेदी केल्याबाबत नि.३४/२ वर कॅशमेमोची प्रत दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरची पाईप ही जाबदार क्र.३ यांचेकडून खरेदी केली असली तरी सदरची पाईप ही जाबदार क्र.१ व २ यांनी उत्पादित केलेली असल्याने तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
९. मुद्दा क्र.२ –
सदरच्या विक्री केलेल्या पाईपबाबत सदरची पाईप आय.एस.आय. मार्कची आहे अथवा नाही हा मुद्दा मंचासमोर उपस्थित झाला आहे. जाबदार क्र. १ व २ यांनी त्यांचे कोहिनूर हे उत्पादन आय.एस.आय. नाही असे आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेली पाईप ही कोहिनूर प्रकारातील आहे. त्यामुळे सदरची पाईप आय.एस.आय. नाही ही बाब स्पष्ट होते. तक्रारदारांना विक्री करण्यात आलेली पाईप ही आय.एस.आय. आहे असे भासवून विक्री करण्यात आली आहे काय ? हे याठिकाणी पाहणे गरजेचे आहे. तक्रारदार यांनी याकामी नि.५/४ वर जाबदार क्र.३ यांनी दिलेल्या बिलाची प्रत दाखल केली आहे. सदरचे बिल हे दि.२२/६/२००६ रोजीचे आहे. सदरच्या बिलानुसार तक्रारदार यांनी दि.२२/६/२००६ रोजी कोहिनुर मेकच्या २११ पाईप खरेदी केल्या आहेत. सदर बिलावरती आय.एस.आय. मार्क असे स्पष्टपणे नमूद केले आहे. सदरचे बिल हे जाबदार क्र. ३ यांनी दिले आहे. जाबदार क्र.३ यांनी सदरच्या पाईप या जाबदार क्र.१ व २ यांच्याकडून खरेदी केल्या आहेत व त्याबाबत जाबदार क्र.३ यांनी नि.३४ चे यादीने २ कागद दाखल केले आहेत. त्यामध्ये नि.३४/१ वर जाबदार क्र.३ यांनी रु.१,२५,०००/- रकमेचा डी.डी. दि.१७/६/२००६ रोजी जाबदार क्र.१ व २ यांना दिल्याबाबतची पावती दाखल आहे. नि.३४/२ वर जाबदार क्र.१ व २ यांनी जाबदार क्र.३ यांना दि.२२/६/२००६ रोजी २२० पाईप पाठविल्याचे नमूद आहे व सदरच्या पाईप या लॉरी नं.एपी २१/यू ९९६१ या लॉरीमधून पाठविण्यात आल्या असल्याचे नमूद आहे. सदर बिलावरती १४० एमएम/४ केजी. कोहिनूर (आय.एस.आय.) असे नमूद आहे. जाबदार क्र.१ व २ यांनी उत्पादित केलेली कोहिनूर दर्जाची पाईप जर आय.एस.आय. दर्जाची नसेल तर सदर बिलावरती जाबदार क्र.१ व २ यांनी आय.एस.आय. असे कसे नमूद केले ? याबाबत जाबदार यांनी स्पष्टपणे खुलासा केलेला नाही. जाबदार क्र.१ व २ यांनी ज्या लॉरीतून जाबदार क्र.३ यांचेकडे माल पाठविला त्याच लॉरीतून तक्रारदार यांना पाईप पुरविल्या असे तक्रारदार यांनी दाखल केलेल्या नि.५/४ वरील बिलावर नमूद आहे. जाबदार यांच्या कडून जाबदार क्र.३ यांच्याकडे दि.२२/६/२००६ रोजी पाईप आल्या आहेत व त्याच पाईप त्याच दिवशी त्याच लॉरीतून तक्रारदार यांना पोहोच करण्यात आल्या आहेत ही बाब स्पष्ट होते. जाबदार क्र.१ व २ यांनी उत्पादित केलेली पाईप ही कोहिनूर आहे व ती आय.एस.आय. दर्जाची नाही असे जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केलेले आहे असे असतानाही बिलावर आय.एस.आय. लिहून जाबदार यांनी तक्रारदार यांची फसवणूक केली आहे. जाबदार क्र.१ व २ यांचेकडून आलेल्या बिलाप्रमाणे आपण तक्रारदार यांना बिल दिले असे जाबदार क्र.३ यांनी नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार यांची फसवणूक मुळातच जाबदार क्र.१ व २ यांच्या चुकीच्या बिलामुळे झाली आहे. सदर नि.३४/२ वरील पावती जाबदार क्र.१ व २ यांनी नाकारलेली नाही व युक्तिवादाचे दरम्यानही जाबदार यांचे विधिज्ञ यांना त्याबाबत खुलासा मागितला असता जाबदार यांचे विधिज्ञ योग्य तो खुलासा करु शकले नाहीत. नि.३४/२ वर सदर बिलाची झेरॉक्सप्रत आहे. परंतु जाबदार क्र.१ व २ यांचे विधिज्ञांनी सदरची प्रत नाकारली नाही व सदरचे बिल चुकीचे आहे हे दर्शविण्यासाठी जाबदार क्र.१ व २ यांना मूळ प्रत दाखल करता आली असती. परंतु सदरची प्रत त्यांनी दाखल केलेली नाही. त्यामुळे सदरचे बिल विचारात घेणे गरजेचे आहे. जाबदार क्र.१ व २ यांनी आय.एस.आय. नसलेल्या पाईप्स तक्रारदार यांना जाबदार क्र.३ यांचेमार्फत विक्री करुन अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब करुन सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे.
१०. मुद्दा क्र.३
तक्रारदार यांनी प्रस्तुत प्रकरणी पाईप बदलून मिळाव्यात अशी मागणी केली आहे व वैकल्पिकरित्या पाईपची किंमत मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांना आय.एस.आय. मार्कच्या पाईप आहेत असे भासवून प्रत्यक्षात मात्र आय.एस.आय. मार्क नसलेल्या पाईपची विक्री केली आहे. सदरच्या पाईप या जाबदार क्र.१ व २ यांनी उत्पादित केलेल्या आहेत. सदरच्या पाईप या आय.एस.आय. मार्कच्या आहेत असे भासवण्यामध्ये जाबदार क्र. १ व २ यांचा महत्वाचा सहभाग असल्याचे दिसून येते. सबब, तक्रारदार यांना सदरच्या पाईप बदलून देण्याबाबत आदेश करणे संयुक्तिक होईल असे या मंचाचे मत आहे. जाबदार क्र. १ व २ यांनी कोहिनूर हे उत्पादन आय.एस.आय. मार्कचे नाही असे नमूद केले आहे. जाबदार यांनी आय.एस.आय. या ब्रॅंडचे मोनार्क ब्रॅंड व मोनार्क टर्बो अशी दोन उत्पादने आहेत. तक्रारदार यांनी १४० एमएम ४ केजी/सीएम२ ५ इंची आय.एस.आय. ब्रॅंडमधील मोनार्क टर्बो अथवा मोनार्क ब्रॅंड च्या पाईप बदलून द्याव्यात असा जाबदार क्र.१ व २ यांना आदेश करणे संयुक्तिक होईल असे या मंचाचे मत आहे. पाईप बदलून देताना तक्रारदार यांचेकडील जुन्या पाईप परत घेण्याची जाबदार यांना मुभा राहील.
११. तक्रारदार यांनी पाईप फुटणे, गळती काढणे व पिकाचे नुकसानीपोटी झालेला खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांनी त्याबाबत कोणताही तपशीलवार पुरावा मंचासमोर आणलेला नाही. पंचरत्न ट्रेडर्सच्या दोन पावत्या याकामी दाखल केल्या आहेत. सदरच्या पावत्या या अनुक्रमे दि.१८/२/०७ व १२/१/०८ रोजीच्या आहेत. सदर पावत्यांचा उल्लेख तक्रारअर्जामध्ये नाही अथवा जाबदार यांना पाठविलेल्या नोटीशीमध्येही नाही. केवळ रु.२५,०००/- खर्च आला असे नमूद केले आहे. सदरचा रु.२५,०००/- कसा आला याबाबत तपशील नमूद नाही. तसेच शेतीचे झालेले रक्कम रु.७५,०००/- नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सदर नुकसान भरपाईबाबतही कोणताही ठोस पुरावा दाखल नाही, त्यामुळे सदरची मागणी मान्य करण्यात येत नाही.
१२. मुद्दा क्र.४
तक्रारअर्ज मुदतबाहय झाला आहे असा आक्षेप जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये व युक्तिवादामध्ये घेतला आहे. तक्रारदार यांनी दि.२२/६/२००६ रोजी जाबदार यांच्याकडून पाईप खरेदी केल्या आहेत. सदरच्या पाईपद्वारे पाणीप्रवाह सुरुवातीचे चार महिने व्यवस्थित होत होता असे तक्रारदार यांनी तक्रारअर्जामध्ये नमूद केले आहे. म्हणजे पाईपबाबत सुरुवातीचे चार महिने कोणतीही तक्रार नव्हती. पाईपलाईनबाबत ऑक्टोबर २००६ मध्ये तक्रारी सुरु झाल्या असे तक्रारदार यांचे कथनावरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारअर्जास कारण हे ऑक्टोबर २००६ मध्ये सुरु झाले. तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दि.१४/१०/२००८ रोजी दाखल केला आहे. तक्रारीस कारण घडल्यापासून दोन वर्षाचे तक्रारदार यांनी तक्रारअर्ज दाखल केला असल्याने तक्रारअर्ज मुदतीत आहे असे या मंचाचे मत झाले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार याचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
२. तक्रारदार यांचेकडून कोहिनूर ब्रॅंडच्या पाईप परत घेवून जाबदार यांनी तक्रारदार यांना
आय.एस.आय. मार्क असलेल्या पाईप वर परिच्छेद १० मध्ये विवेचन केल्याप्रमाणे बदलून
द्याव्यात असा जाबदार क्र.१ व २ यांना आदेश करण्यात येतो.
३. तक्रारदार यांना तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.२,०००/-( अक्षरी रुपये दोन हजार फक्त)
अदा करावेत असा जाबदार क्र.१ व २ यांना आदेश करण्यात येतो.
४. वर नमूद आदेशाची पूर्तता जाबदार क्र.१ व २ यांनी दि.२८/११/२०११ पर्यंत करणेची आहे.
५. जाबदार क्र.१ व २ यांनी विहित मुदतीत आदेशाची पूर्तता न केल्यास तक्रारदार
त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दिनांकò: १३/१०/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११