न्या य नि र्ण य
(दि.14-05-2024)
व्दाराः- मा. श्रीम अमृता नि.भोसले, सदस्या
1. प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराचे दुचाकी वाहन सामनेवालाकडे दुरुस्तीसाठी दिल्यानंतर चोरीला गेले व वारंवार मागणी करुनही वाहन परत मिळाले नाही म्हणून नुकसान भरपाई मिळणेसठी दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथने थोडक्यात पुढील प्रमाणे-
तक्रारदार हे तक्रारीत नमुद पत्यावर वास्तव्यास आहेत. तक्रारदार यांना दैनंदिन कामकाजासाठी दुचाकी वाहनाची आवश्यकता असलेने तक्रारदार यांनी TVS कंपनीची ज्युपिटर मॉडेल नोंदणी क्र.MH-08-AK-3493 इंजिन नं.BG4KG1X88448चेसिस नं.MD626BG44G1K94205 असलेले दुचाकी वाहन खरेदी केले होते. सदरचे वाहन जुलै-2021 मध्ये चिपळूण शहरात आलेल्या महापुराच्या पाण्यात बुडून नादुरुस्त झालेले होते. त्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांच्या शोरुममध्ये दि.03/08/2021 रोजी सदर वाहन दुरुस्तीसाठी नेले होते. सामनेवाला क्र.1 यांच्याकडील तज्ञ व्यक्तींनी सदर वाहनाची प्रत्यक्ष पाहणी करुन वाहनाच्या अंदाजित खर्चाची रक्कम रु.28,717/- इतकी सांगितली. तसेच कोटेशनवर गाडी पाण्यात होती असा शेरा नमुद केला. तक्रारदाराने वाहनाच्या नुकसान भरपाई मिळणेसाठी विमा कंपनीकडे आवश्यक ती कागदपत्रे जमा करुन माहिती दिली होती. त्यानंतर दि.07/08/2021 रोजी तक्रारदार सामनेवाला क्र.1 यांचे शोरुमध्ये वाहनाच्या चौकशीसाठी गेले असता तक्रारदारास त्यांचे वाहन आढळून आले नाही. त्याबाबत सामनेवालाकडे चौकशी केली असता शोरुममधील CCTV फुटेज देखील पाहण्यात आले. परंतु वाहन सापडले नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि.08/08/21 रोजी सामनेवाला क्र.1 यांना अर्ज देऊन दुरुस्तीसाठी दिलेले वाहन ताब्यात मिळणेबाबतचे पत्र दिले. सामनेवाला यांना तक्रारदाराचे वाहन शोध घेऊनही मिळून न आलेने सामनेवाला यांनी दि.16/08/2021 रोजी चिपळूण पोलीस ठाणे यांचेकडे रजिस्टर नं.379/2021 भा.दं.वि.कलम 379 अन्वये फिर्याद दाखल केली. दरम्यान सामनेवाला क्र.2 विमा कंपनीचे लोक सामनेवाला क्र.1 च्या शोरुममध्ये येऊन तक्रारदाराचे वाहनाचा पंचनामा करुन गेल्याचे समजले. त्यानंतर सामनेवाला क्र.2 यांनी दि.28/09/2021 व 23/11/2021 रोजी तक्रारदारास पत्र पाठवून वाहन चोरीला गेल्या संदर्भातील कागदपत्रांची मागणी केली. त्याप्रमाणे तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता केली. तक्रारदाराने दैनंदिन व महत्वाच्या कामासाठी इतर कोणतेही वाहन नसलेने दि.27/10/2021 रोजी एकूण रक्कम रु.94,845/- भरुन नवीन वाहन खरेदी केले. सामनेवाला क्र.1 यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारास दुसरे वाहन खरेदी करावे लागले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना दि.04/01/2022 रोजी पत्र पाठवून चोरीला गेलेल्या वाहनाची नुकसान भरपाई मागणारे पत्र पाठविले. त्यानंतर दि.28/01/2022 रोजी स्मरणपत्रही पाठवले. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. दरम्यानच्या काळात सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने तक्रारदारास दि.27/04/2022 रोजी वाहनाच्या नुकसानी भरपाईपोटी रक्कम रु.36,392/- अदा केली. सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने तक्रारदाराचे वाहनाची बाजारभावापेक्षा कमी मुल्यांकन करुन नुकसान भरपाई तक्रारदारास दिली आहे. तक्रारदाराचे वाहन दुरुस्त करुन देण्याची हमी सामनेवाला क्र.1 यांनी घेतलेली होती. तक्रारदार वाहनाचा दुरुस्ती खर्च देण्यास तयार होते. परंतु सामनेवाला क्र.1 यांच्या निष्काळजीपणामुळे व बेजबाबदारपणामुळे तक्रारदाराचे वाहन चोरीला गेले. तसेच सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे पत्रांना उत्तरही दिलेले नाही. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन सदोष सेवा दिलेने सदरची तक्रार दाखल केली आहे. सबब तक्रारदारास नवीन वाहनापोटी रक्कम रु.94,845/- दयावे लागले. त्यातून विमा कंपनीने अदा केलेली रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रु.58,453/- सामनेवाला यांचेकडून वाहनाचे नुकसान भरपाईपोटी मिळणेबाबत आदेश व्हावेत. तसेच तक्रारदारास मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने आयोगास केली आहे.
2. तक्रारदाराने त्याचे तक्रारीच्या पुष्टयर्थ नि.6 कडे 10 कागदपत्रे दाखल केली असून त्यामध्ये सामनेवाला क्र.1 यांचे कोटेशन, तक्रारदार यांचा दि.08/08/21 रोजीचा अर्ज, तक्रारदार यांची वाहन चोरीसंदर्भातील फिर्याद, विमा कंपनीचे दि.28/09/21 व दि.23/11/21 रोजीचे पत्र, तक्रारदारयांचे दि.04/01/22 व दि.28/01/22 रोजीचे पत्र, चिपळूण पोलीस ठाणे यांचे दि.25/03/2022 रोजीचे पत्र, तक्रारदाराचे आर्थिक खर्च झाल्यासंदर्भातील बीले व पावत्या, सामनेवाला क्र.2 विमा कंपनीकडून रक्कम प्राप्त झालेबाबतचा बँकेचा खाते उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. नि.17 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.18 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. तसेच नि.28 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे व नि.29 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.39 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. नि.44कडे वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
3. प्रस्तुत कामी सामनेवाला क्र.1 यांनी वकीलांमार्फत हजर होऊन नि.16 कडे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदाराची तक्रार निखालस खोटी, खोडसाळ व वस्तुस्थितीशी विसंगत असून तक्रारदाराने पश्चात बुध्दीने केलेली असलेने ती सामनेवाला यांना मान्य व कबूल नसून सामनेवाला क्र.1 यांनी नाकारली आहे. सामनेवाला पुढे कथन करतात की, तक्रारदार यांची दुचाकी पाण्यात राहिल्यामुळे नादुरुस्त झाल्याने सामनेवाला यांच्या शोरुममध्ये दुरुस्तीसाठी आणण्यात आली. त्यासाठी सामनेवाला यांनी तक्रारदारास दुरुस्ती खर्चाचे रक्कम रु.28,717/-चे कोटेशन दिलेले होते. तक्रारदार यांचेसारख्या ब-याच दुचाकी गाडया सामनेवालांकडे महापुरामुळे दुरुस्तीसाठी आल्या होत्या. त्या सर्व गाडया सामनेवाला यांच्या शोरुम व बाहेरील जागेमध्ये उभ्या करुन ठेवण्यात आल्या होत्या. मात्र दुदैवाने दि.05/08/21 ते 07/08/21 दरम्यान तक्रारदाराचे वाहन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. ही गोष्ट सामनेवाला यांना कळल्यानंतर सत्वर चिपळूण पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली व तक्रारदारास याची कल्पना सत्वर दिली. परंतु दुर्देवाने संबंधीत चोर अथवा तक्रारदाराचे चोरीला गेलेले वाहन मिळून आले नाही. तसेच तक्रारदाराचे संबंधीत वाहन चोरीला गेल्याची माहिती विमा कंपनीला देण्यात आली होती. तक्रारदाराचा क्लेम वाहन दुरुस्तीसाठी न राहता वाहनाची चोरी झाली या कारणास्तव मंजूरीसाठी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानुसार संबंधीत विमा कंपनीने विमा पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार तक्रारदारास नुकसान भरपाईची रक्कम रुपये 36,092/- अदा केलेली आहे. त्यामुळे सदरसामनेवाला यांनी तक्रारदारास अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र.1 यांनी केली आहे.
4. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.32 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.33 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.41 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. तसेच नि.43 सोबत 5कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये सामनेवाला क्र.1 यांनी दि.16/08/21 रोजी चिपळूण पोलीस स्टेशनला तक्रारदाराच्या वाहन चोरीची दिलेली एफ.आय.आर, चिपळूण पोलीस स्टेशन यांनी सामनेवाला यांना दि.25/8/21 व दि.11/10/21 रोजी दिलेली पत्रे, त्यास सामनेवाला यांनी दि.27/08/21 रोजी दिलेले उत्तर, तक्रारदारांनी क्लेमची रक्कम मान्य असलेबाबत सामनेवाला क्र.2 यांना दि.26/04/22 रोजी दिलेल्या अर्जाची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. सामनेवाला क्र.2 हे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी नि.27 कडे लेखी म्हणणे दाखल केले आहे. सदर सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेत तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. सामनेवाला पुढे कथन करतात की, तक्रारदारास वाहनाची नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.36,392/- अदा केलेली आहे. तक्रारदार ज्यावेळी वाहनाचा इन्शुरन्स काढतो त्यावेळी गाडीची इन्शुअर्ड व्हॅल्यू ठरविली जाते. सदर वाहनाचे इन्शुअर्ड व्हॅल्यूवर पुढील काळाकरिता डिप्रिसिएशन काढून तक्रारदार यास सदर नुकसान भरपाई देण्यत आलेली आहे. तसेच तक्रारदार याने गाडी चोरीचा क्लेम उशिरा दाखल केल्यानंतर शक्य तेवढया लवकर तक्रारदार यांचा क्लेम नियमाप्रमाणे मंजूर केला आहे. या सामनेवाला क्र.2 यांनी कराराचे बाहेर जाऊन नियमबाहय पध्दतीने तक्रारदार यांचा क्लेम कमी रक्कमेचा मंजूर केला असे तक्रारदाराने कोठेही कथन केलेले नाही. सबब सामनेवाला क्र.2यांनी तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.2 विरुध्द फेटाळण्यात यावा अशी विनंती केली आहे.
6. सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.35 कडे श्री रविंद्र गावडे यांचे ॲथॉरिटी लेटर दाखल केले आहे. नि.36 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. नि.37 कडे पुरावा संपलेची पुरसिस दाखल केली आहे. नि.38 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे.
7. वर नमुद तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व दाखल कागदपत्रे व लेखी युक्तीवाद, सामनेवाला क्र.1 व 2 यांचे म्हणणे व उभयतांचा तोंडी युक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन करता सदर आयोगाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ खालील मुददे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दे | उत्तरे |
1 | तक्रारदार व सामनेवाला हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास चोरीला गेलेल्या वाहनाची नुकसान भरपाई नाकारुन तक्रारदारास सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. सामनेवाला क्र.1 यांनी |
3 | तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 यांचेकडून चोरीला गेलेल्या वाहनाची नुकसान भरपाई व मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. सामनेवाला क्र.1 यांचेकडून |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
-वि वे च न
–
मुद्दा क्रमांकः 1 ते 3 –
8. तक्रारदार यांनी त्यांचे TVS कंपनीचे ज्युपिटर मॉडेल नोंदणी क्र.MH-08-AK-3493 इंजिन नं.BG4KG1X88448चेसिस नं.MD626BG44G1K94205 असलेले दुचाकी वाहन जुलै-2021 मध्ये चिपळूण शहरात आलेल्या महापुराच्या पाण्यात बुडून नादुरुस्त झालेने ते सामनेवाला क्र.1 यांच्या शोरुममध्ये दि.03/08/2021 रोजी दुरुस्तीसाठी नेले होते. सामनेवाला क्र.1 यांनी सदर वाहनाच्या अंदाजित खर्चाची रक्कम रु.28,717/- इतकेचे कोटेशन तक्रारदारास दिले. तक्रारदाराने सदर कोटेशन नि.6/1 कडे दाखल केले आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दि.28/09/21 रोजी पाठविलेले पत्राची प्रत नि.6/4 कडे दाखल केली आहे. त्याचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वाहन दुरुस्तीसाठी सामनेवाला क्र.1 यांचेकडे दिले होते व सदर वाहनाचा विमा सामनेवाला क्र.2 यांचेकडे उतरविला होता ही बाब स्पष्ट होते. तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांनी सदरची बाब त्यांचे लेखी म्हणणेमध्ये मान्य केलेली असून उभयतांमध्ये त्याबाबत कोणताही वाद नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असलेचे व सामनेवाला क्र.1 व 2 हे सेवापुरवठादार असलेची बाब निर्विवादपणे सुस्पष्ट होते. सबब तक्रारदार व सामनेवाला क्र.1 व 2 हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुददा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
9. तक्रारदार यांनी TVS कंपनीची ज्युपिटर मॉडेल नोंदणी क्र.MH-08-AK-3493 असलेले दुचाकी वाहन जुलै-2021 मध्ये आलेल्या महापुराच्या पाण्यात बुडून नादुरुस्त झालेने सामनेवाला क्र.1 यांच्या शोरुममध्ये दि.03/08/2021 रोजी दुरुस्तीसाठी दिले होते. त्यानंतर दि.07/08/2021 रोजी तक्रारदार सामनेवाला क्र.1 यांचे शोरुमध्ये वाहनाच्या चौकशीसाठी गेले असता तक्रारदाराचे वाहन चोरीला गेलेचे समजून आले. सदर चोरीबाबत सामनेवाला यांनी दि.16/08/2021 रोजी चिपळूण पोलीस ठाणे यांचेकडे रजिस्टर नं.379/2021 भा.दं.वि.कलम 379 अन्वये फिर्याद दाखल केली. तक्रारदाराकडे दैनंदिन व महत्वाच्या कामासाठी इतर कोणतेही वाहन नसलेने दि.27/10/2021 रोजी रक्कम रु.94,845/- भरुन नवीन वाहन खरेदी केले. सामनेवाला क्र.1 यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदारास दुसरे वाहन खरेदी करावे लागले. दरम्यानच्या काळात सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने तक्रारदारास दि.27/04/2022 रोजी वाहनाच्या नुकसानी भरपाईपोटी रक्कम रु.36,392/- अदा केली. सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने तक्रारदाराचे वाहनाची बाजारभावापेक्षा कमी मुल्यांकन करुन नुकसान भरपाई तक्रारदारास दिली आहे. ती वळीत करुन उर्वरित रक्कम रु.58,453/- सामनेवाला यांचेकडून वाहनाचे नुकसान भरपाईपोटी मिळणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती तक्रारदाराने केली आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे नि.16 कडील म्हणणेमध्ये तक्रारदाराने त्यांचे वाहन दुरुस्तीसाठी सामनेवाला क्र.1 कडे दिले असलेचे मान्य केले आहे. तसेच सदरचे वाहन दि.05/07/21 ते 07/07/21 या कालावधीत चोरीला गेलेचे मान्य केले आहे. वास्तविक तक्रारदाराने जेव्हा सामनेवाला क्र.1 यांचे ताब्यात वाहन दुरुस्तीसाठी दिले होते.त्यानंतर सदर वाहनाची काळजी घेणेची जबाबदार सामनेवाला क्र.1 यांची होती. परंतु सामनेवाला क्र.1 यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारदाराचे वाहन चोरीला गेलेले आहे ही हे निर्विवाद स्पष्ट आहे. सामनेवाला क्र.1 यांचे म्हणणेनुसार त्यांचेकडे जुलै-2021 मध्ये आलेल्या महापुराच्या पाण्यात बुडून नादुरुस्त झालेनी बरीच वाहने आली असलेचे कथन केले. त्यामध्ये फक्त तक्रारदाराचेच वाहन चोरीला गेले आहे. इतर कोणतेही वाहन चोरीला गेलेले नाही. याचाच अर्थ सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराचे वाहनाची योग्य ती काळजी घेतली नसलेने ते चोरीला गेले. यामध्ये सामनेवाला क्र.1 यांचा निष्काळजीपणा सिध्द होतो. त्यामुळे तक्रारदाराला वाहन चोरीला गेलेमुळे झालेल्या नुकसानीस सामनेवाला क्र.1 हे जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
10. तक्रारदाराचे वाहन दुरुस्तीसाठी आले होते व त्याबाबत दुरुस्ती खर्चाचे कोटेशन दिले ही बाब सामनेवाला क्र.1 हे कोठेही नाकारत नाहीत. तसेच तक्रारदाराने दि.08/08/21 व 28/01/22 रोजी वाहन परत मिळण्यासाठी सामनेवाला क्र.1 कडे अर्ज केले आहेत. त्याचा खुलासा सामनेवाला क्र.1 यांनी केलेला नाही. सामनेवालाने वाहन ताब्यात घेऊन दुरुस्तीचे कोटेशन दिलेमुळे तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचेमध्ये सेवा पुरविणेबाबतचा करार झाला आहे असे आयोगाचे मत आहे. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी चोरीच्या वाहनाची विमा रक्कम तक्रारदारास दिली म्हणून सामनेवाला क्र.1 हे आपली जबाबदार झटकू शकत नाहीत. तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे म्हणणेमध्ये तक्रारदार ज्यावेळी वाहनाचा इन्शुरन्स काढतो त्यावेळी गाडीची इन्शुअर्ड व्हॅल्यू ठरविली जाते. सदर वाहनाचे इन्शुअर्ड व्हॅल्यूवर पुढील काळाकरिता डिप्रिसिएशन काढून तक्रारदारास वाहनाची नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.36,392/-अदा केलेली आहे असे कथन केले आहे. तक्रारदारने नि.6/10 कडे त्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्टेटमेंट दाखल केले आहे. त्यामध्ये तक्रारदारास सामनेवाला क्र.2 यांचेकडून रक्कम रु.36,392/-मिळालेचे स्पष्ट होते. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश करणे योग्य होणार नाही या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
11. तक्रारदाराचे पुराच्या पाण्यात बुडून नादुरुस्त झालेले तक्रारदाराचे वाहन दुरुस्त करुन देण्याची हमी सामनेवाला क्र.1 यांनी घेतलेली होती. वाहनाच्या अंदाजित खर्चाची रक्कमही सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास सांगितली होती व तक्रारदार वाहनाचा दुरुस्ती खर्च देण्यास तयार होते. परंतु सामनेवाला क्र.1 यांच्या निष्काळजीपणामुळे व बेजबाबदारपणामुळे तक्रारदाराचे वाहन चोरीला गेलेले असलेने सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास दयावयाच्या सेवेत त्रुटी ठेवलेचे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.1 यांचेकडून वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर या आयोगाने होकारार्थी दिले आहे.
12 सबब तक्रारदार हे सामनेवाला क्र.1 कडून वाहनाच्या चोरीमुळे तक्रारदारास झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रु.20,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच वाहन चोरीला गेल्याने तक्रारदारास झालेल्या मानसिक,आर्थिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब मुद्रदा क्र.3 चे उत्तर हे आयोग होकारार्थी देत आहे.
मुद्दा क्रमांकः 4 –
13. सबब, वरील सर्व विवेचनांचा विचार करता प्रस्तुतकामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदार यांना चोरीला गेलेल्या वाहनाच्या नुकसान भरपाईपोटी
रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर तक्रार
दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.9 % दराने व्याज अदा
करावे.
3) सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम
रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- (रुपये पाच
हजार फक्त) अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता सामनेवाला क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाले
तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
6) विहीत मुदतीत सामनेवाला क्र.1 यांनी आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण
कायदयातील तरतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.