आदेश पारीत व्दारा – सौ. मोहिनी जयंत भिलकर, सदस्या.
अर्जदार, श्री विजय माधवराव घुग्घुसकर यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,
... 2 ...
... 2 ...
1. अर्जदार हे गडचिरोली येथील स्थायी रहिवासी असून, आलापल्ली येथील, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कारकुन या पदावर कार्यरत आहे. अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्र. 1 यांचेमार्फत गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे आर.डी. चे बचत खाते काढलेले होते.
2. अर्जदार हे कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कंपनी, गडचिरोली येथे कार्यरत असतांना दिनांक 30/8/2003 रोजी कार्यालयातील अधिकृत आर.डी. चे गडचिरोली येथील पोष्ट खात्याचे पासबुक काढले. अर्जदार यांच्या मासिक वेतनातून नियमित कपात करुन रक्कम खात्यात जमा करण्यात येत असे.
3. दिनांक 23/4/2004 रोजी अर्जदार यांचे आलापल्ली येथे स्थानांतरण झाल्यामुळे, त्यांचे नावे असलेले पासबुक आलापल्ली येथील पोष्ट खात्याकडे पाठविण्यात आले. तेथे सुध्दा, अर्जदार यांचे खात्यात नियमित रक्कम जमा करण्यात येत होती.
4. मुदतीअंती अर्जदाराला अंदाजे रुपये 21,000/- मिळणे अपेक्षित होते. परंतु, दिनांक 18/9/2008 ला रुपये 18,595/- अर्जदार यांना देण्यात आले, तेंव्हा अर्जदार यांनी पोष्ट खात्यात चौकशी केली असता, सदर खात्यात रक्कम जमा करतांना खंड पडल्यामुळे पासबुक बंद करण्यात आले. त्यामुळे, खंडीत कालावधीचे व्याज अर्जदाराला देण्यात आलेले नाही, असे पोष्ट खात्यामार्फत सांगण्यात आले. गैरअर्जदार यांचेकडून मिळालेल्या कागदपञावरुन असे दिेसून येते की, मे-2004 ते ऑगष्ट-2004 पर्यंतची अर्जदार यांचे वेतनातून कपात झालेली रक्कम गैरअर्जदार क्र. 1 यांचेमार्फत खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नव्हती. परंतु, सदर कालावधीची संपूर्ण रक्कम विलंब शुल्कासह दिनांक 1/12/2004 रोजी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे भरण्यात आलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदाराला त्यांचे खात्यात रक्कम जमा करतांना खंड पडल्याची कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाही.
... 3 ...
... 3 ...
5. अर्जदारांना यामुळे, आर्थिक, मानसिक व शारीरीक ञास सहन करावा लागत आहे. अर्जदार यांनी दिनांक 29/9/2008 रोजी कायदेशिर नोटीस पाठवून गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना त्यांचेकडून झालेली चुक सुधारण्याची संधी दिलेली होती, परंतु गैअर्जदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही.
6. अर्जदार मागणी करतात की, अर्जदाराचे खात्यातील रक्कम व्याजासह अर्जदाराला मिळण्यात यावी. तसेच, अर्जदार यांना दाव्यापोटी झालेला खर्च गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडून वसुल करण्यात यावा.
7. गैरअर्जदार क्र. 1 ला नोटीस मिळून सुध्दा ते एकदाही न्यायमंचात हजर झालेले नाही. तसेच, आपले म्हणणे सादर केले नाही. सबब, गैरअर्जदार क्र. 1 चे विरुध्द प्रकरणात एकतर्फी आदेश पारीत करण्यात येत आहे, असा आदेश दिनांक 9/2/2009 रोजी निशाणी क्र. 1 वर पारीत करण्यात आला. तसेच, दिनांक 11/2/2009 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ची बाजू बंद करुन, उपलब्ध कागदपञावरुन तक्रार गुणदोषावर निकाली काढण्याकरीता ठेवण्यात येत आहे, असा आदेश निशाणी क्र. 1 वर करण्यात आला.
8. गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपले लेखी बयाण निशाणी क्र. 10 वर दाखल केले. त्यात गैरअर्जदार म्हणतात की, अर्जदाराची बदली आलापल्ली येथे झाली असतांना, त्यांचे खाते आलापल्ली पोष्ट ऑफीसला गैरअर्जदार क्र. 1 यांचे कार्यालयात स्थानांतरीत करण्यात आले. त्यामध्ये, दोन महिने निघून गेले. त्यामुळे, एप्रिल 2004 ते ऑगष्ट 2004 या 5 महिण्याची रककम खात्यात आलेली नाही. गैरअर्जदार यांनी आपल्या विशेष कथनात पासबुक स्थानांतरणात 5 महीने गेले असे सांगितले आहे. अर्जदार यांनी पैसे भरण्यासाठी सहा महिण्यापेक्षा जास्त कालावधी लावला त्यामुळे नियमानुसार हया रकमेवर व त्यापुढील रकमेवर व्याज आकारता येत नाही. त्यामुळे, अर्जदार यांना रकमेवर व्याज मिळालेला नाही.
... 4 ...
... 4 ...
9. अर्जदार हे स्वच्छ हाताने न्यायमंचात आलेले नाहीत, त्यामुळे अर्जदार यांची तक्रार ही खारीज होण्यास पाञ आहे.
// कारणे व निष्कर्ष //
10. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ, शपथपञ पुरावा व केलेल्या युक्तीवादावरुन असे निदर्शनास येते की,
11. अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दरमाह रुपये 300/- चे आर.डी. चे खाते काढले होते. अर्जदार व हप्त्याची रक्कम गैरअर्जदार क्र. 1 मार्फत गैरअर्जदार क्र. 2 यांचकडे अर्जदार यांच्या पगारातून नियमित कपात होत होती, याबद्दल वाद नाही.
12. दिनांक 23/4/04 ला अर्जदाराचे स्थानांतरण आलापल्ली येथे झाल्यामुळे पासबुक स्थानांतरणात 5 महिने वेळ लागला, त्यामुळे अर्जदाराचे 5 महिण्याचे पैसे भरण्यात आलेले नाहीत. पासबुक स्थानांतरणात 5 महिण्याचा वेळ लागतोच असे गैरअर्जदार क्र. 2 यांच्या विशेष कथनात त्यांनी सांगितलेले आहे.
13. अर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्ताऐवज क्र. 5 वर अर्जदार यांनी मार्च 2004 चे पैसे शेवटी भरलेले आहेत. त्यानंतर माहे मे-2004 ते ऑगष्ट 2004 या खंड पडलेल्या महिण्याचे हप्ते डिसेंबर 2004 मध्ये विलंब शुल्कासह भरलेले आहेत. यावरुन, अर्जदार यांनी पूर्ण 5 वर्षाचे 60 हप्ते भरल्याचे त्यांनी दाखल केलेल्या पासबुकावरुन दिसून येते.
14. अर्जदार यांनी 5 महिने रक्कम भरली नाही म्हणून त्यांचे खाते बंद पडले, तेंव्हा त्यावरील व त्यानंतरचे रकमेवरील व्याज अर्जदार यांना मिळाले नाही असे गैरअर्जदार म्हणतात. परंतु, गैरअर्जदार यांनी तशी कोणतीच सुचना, अर्जदार यांना दिलेली नाही. तसेच, न्यायमंचास त्याबद्दलचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. यावरुन, गैरअर्जदार यांना
... 5 ...
... 5 ...
अर्जदार यांना व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसते, ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील न्युनता आहे.
15. गैरअर्जदार यांनी युक्तीवाद करतांना सांगितले की, रुपये 300/- चे मुदती अंती रुपये 21,333/- मिळावयास पाहीजे. त्यानुसार, गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांना व्याजाची उर्वरीत रक्कम देणे भाग पडते, असे या न्यायमंचाचे मत आहे.
16. अर्जदार यांना मुदती अंती अंदाजे रुपये 21,000/- मिळावयास पाहिजे होते. परंतु, रुपये 18,595/- अदा करण्यात आले. पैसे भरण्यासाठी सहा पहिण्यापेक्षा जास्त कालावधी लावला असल्याने, नियमानुसार त्या रकमेवर व पुढील रकमेवर व्याज आकारता येत नसल्याचे गैरअर्जदार म्हणतात.
17. परंतु, अर्जदाराने विलंब शुल्कासह, ती रक्कम पूर्णपणे भरल्याचे दिसते. पाच महिण्याचा कालावधी खंडीत असलातरी अर्जदाराची रुपये 16,500/- पोष्ट ऑफीसमध्ये जमा होती, या बाबीकडे दूर्लक्ष करुन चालणार नाही, या निष्कर्षाप्रत, जिल्हा ग्राहक न्यायमंच आले आहे.
18. गैरअर्जदार क्र. 1 ला नोटीस मिळूनही, ते एकदाही न्यायमंचात हजर झालेले नाही, तसेच, आपले म्हणणे सादर केले नाही. सबब, गैरअर्जदार क्र. 1 चे विरुध्द प्रकरणात एकतर्फी आदेश पारित करण्यात येत आहे, असा आदेश निशाणी क्र. 1 वर दिनांक 9/2/2009 रोजी पारित करण्यात आला. तसेच, दिनांक 11/2/2009 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ची बाजू बंद करुन, उपलब्ध कागदपञावरुन तक्रार गुणदोषावर निकाली काढण्याकरीता ठेवण्यात येत आहे, असा आदेश निशाणी क्र. 1 वर करण्यात आला.
19. गैरअर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार यांची खंडीत झालेली 5 महिन्यांची रक्कम विलंब शुल्कासह पोष्टात भरली, त्यामुळे त्यांचे विरोधात कोणताही आदेश नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे.
... 6 ...
... 6 ...
20. असे तथ्य व परिस्थिती असतांना खालील आदेश पारित करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र. 2 यांनी अर्जदार यांना उर्वरीत व्याजाची
रक्कम रुपये 2,738/- आदेशाचे तारखेपासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र. 2 यांनी, शारीरीक व मानसिक ञासापोटी
रुपये 1,000/- द्यावे, तसेच ग्राहक तक्रारीचा खर्च रुपये 500/- अर्जदार यांना द्यावे.
(4) गैरअर्जदार यांनी, आदेशाचे पालन आदेशाची प्रत
मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांचे आंत करावे.
(5) उभयतांना आदेशाची प्रत देण्यांत यावी.
गडचिरोली.
दिनांक :–13/02/2009.