::: नि का ल प ञ :::
(मंचाचे निर्णयान्वये,श्री. मिलींद बी. पवार(हिरुगडे), मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक: 21.09.2013)
1. अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे........
2 अर्जदार निव्वळ कास्तकार आहे. त्याने सन 2012 मध्ये त्याचे शेत नं. 18/2मध्ये सोयाबीन पिक घेतले. गैरअर्जदार कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट येथे नोंदणीकृत अडतिया असून कास्तकारांचा शेत माल लिलाव करणे व मालाची येणारी रक्कम आपले जवळ ठेवून त्यातील कमिशन कापून उरलेली रक्कम कास्तकाराचे हवाली करतो. अशा प्रकारे कमिशन घेवून गैरअर्जदार अडतिया म्हणून कामकाज पाहतो.
3 अर्जदाराने ता. 18.11.2011 ला 44.40 क्विटंल सोयाबीन व 45.00 क्विंटल सोयाबीन ता. 28.11.2011 ला गैरअर्जदाराकडे विक्री करिता अनामत ठेवले असे एकूण 89.40 क्विंटल अर्जदाराचा गैरअर्जदाराकडे शेत माल सोयाबीन होते. अर्जदाराला मुलीच्या लग्ना निमित्त व्यवस्था म्हणून ता. 5.4.2012 ला रक्कमेची आवश्यकता पडेल असे अर्जदाराने गैरअर्जदाराला सांगून ठेवले होते. गैरअर्जदाराने त्या दिवशी ता. 5.4.2012 ला रक्कम मिळून जाईल असे आश्वासन दिले परंतु गैरअर्जदाराने दि. 5.4.2012 ला हिशोबही केला नाही किंवा एकही पैसा अर्जदारास दिला नाही व आठ दिवसानंतर बोलाविले. दि. 13.04.2012 ला अर्जदार गेला असता गैरअर्जदाराने तात्पुरता प्रति क्विंटल रुपये 2800/- प्रमाणे हिशोब करुन थोडी बहुत रक्कम अर्जदारास देण्याचे कबूल केले व नंतर जी किंमत ठरेल त्या भावाप्रमाणे उरलेली संपूर्ण रक्कम प्रति क्विंटल प्रमाणे वरील सोयाबीन पिकाचे अर्जदारास गैरअर्जदाराने देण्याचे कबूल केले.
4 ता. 13.04.2012 व 14.04.2012 ला प्रति क्विंटल भाव रुपये 3250/- ते 3270/- विकल्या गेली. परंतु गैरअर्जदाराने अर्जदाराचे शोषण केले. त्याने अर्जदाराला ता.13.04.2012 ला रुपये 2,00,000/- दिले व रु.30,000/- अर्जदाराचे खात्यात जमा केले. दि. 8.5.2012 ला गै.अ. ने हिशोब न करता रुपये 8,000/- अर्जदारास तात्पुरते दिले. अशाप्रकारे दि. 8.5.2012 पर्यंत गै.अ.ने अर्जदाराला रु.2,38,000/- दिले. गै.अ. ने दि.19.11.2011 चे सोयाबीनवर रुपये 150/-चा फरक धरला व दि.28.01.2011 चे सोयाबीनवर रु.50/- चा फरक धरला. रु.2200/-चा भाव असतांना जाणूनबुजून रु.50/- चा फरक कापला. गै.अ. ने दि. 13.4.2012 चे मार्केट भाव प्रति क्विंटल रुपये 3250/- मधून रुपये 150/- चा फरक धरला. बेकायदेशीररित्या प्रति क्विंटल रु.3100/- प्रमाणे वरील 44.40 क्विंटलचे रुपये 1,37,640/- आणि वरील 45.00 क्विंटलचे रुपये 3250/- प्रमाणे रुपये 1,46,250/- प्रमाणे अर्जदाराला गै.अ.कडून एकूण वरील 89.40 क्विंटलचे रु.2,38,890/- घेणे असतांना गै.अ. ने फक्त रु.2,38,000/- दिले अशाप्रकारे गै.अ. ने अर्जदाराचे रु.45,890/- चे गबन केले हे स्पष्ट होते. अर्जदारास अत्यंत मानसिक यातना झाल्या व होत आहे. त्याचे अत्यंत नुकसान होत आहे. अर्जदाराने दि.9.5.2012 ला तक्रार केली. दि. 4.9.2012 ला नोटीस दिला परंतु गै.अ.ने खोटे उत्तर दिले. म्हणून अर्जदार हा गै.अ.चा ग्राहक असून त्याने गै.अ. विरुध्द सदर तक्रार केली.
5 गै.अ. यांना तक्रार नोंदणी करुन नोटीस काढण्यात आली. सदरची नोटीस गै.अ. यांना बजावणी झाली आहे व नि.क्रं. 6/1 वर दाखल आहे. त्यानंतर गै.अ. हे वकिला मार्फत वि. मंचासमक्ष हजर झाले परंतु त्यांनी वेळ मागून ही म्हणणे दिले नाही. त्यामुळे प्रकरणात गैरअर्जदार यांचे विरुध्द विना कैफियत (नो.से.) चा असा आदेश नि.क्रं. 1 वर पारीत करण्यात आला.
6 अर्जदाराने तक्रार अर्जातील कथनाचे पृष्ठयर्थ नि.क्रं. 4 कडे 10 कागदपत्रे हजर केलेली आहेत. गै.अ. यांचे विरुध्द “ No Say ‘’ चा आदेश नि.क्रं. 1 वर पारीत केलेला असल्यामुळे उपलब्ध कागदपत्र, तसेच अर्जदाराची तक्रार, त्यांच्या वकिलाचा युक्तिवाद व प्रतिज्ञापत्र यावरुन सदर प्रकरण निकाली करणे करिता ठेवण्यात आले.
7 अर्जदाराची /तक्रारकर्त्याची तक्रार ,दाखल केलेले दस्ताऐवज व वकिलांचा युक्तिवाद याचे अवलोकन करता खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
8 अर्जदाराने नि.क्रं. 10 नुसार प्रतिज्ञापत्रावर पुरावा दाखल केलेला आहे. गैरअर्जदारा विरुध्द No Say चा आदेश असल्याने त्यांना अर्जदाराचे तक्रार विषयक मुद्दे मान्य असल्याचे समजण्यात येते
9 अर्जदार यांनी गै.अ.ज.यांच्याकडे 44.40 व 45.00 क्विंटल सोयाबीन विक्रीकरिता ठवेले होते व ते गैरअर्जदार यांनी स्विकारले होते हे नि.क्रं. 4/7 व 4/8 वरील हिशोब चिठ्ठी वरुन दिसून येते.यावरुन अर्जदार यांचेकडून गैरअर्जदार हे कमिशन स्वरुपात सेवा शुल्क घेणार होते यावरुन अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक ठरतात.
10 अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडे दि. 18.11.11 व 28.11.11. रोजी एकूण 89.40 क्विंटल सोयाबीनची विक्री करुन आलेल्या रक्कमेतून आपले कमिशन वजा करुन उर्वरित रक्कम देणार होते ही गोष्ट नि.क्रं. 4/7 व 4/8 वरील हिशोब पावतीवरुन दिसून येते.कारण नि.क्रं. 4/7 व 4/8 वरील पावतीवर अ.क्रं. 50 रु व 150/- रु. भाव फरक असलेला उल्लेख आढळतो. अर्जदार यांना मुलीच्या लग्नासाठी पैशाची आवश्यकता होती. म्हणून ते गैरअर्जदार यांच्याकडे सोयाबीन विक्रीची रक्कम आणण्यासाठी गेले असता गैरअर्जदार यांनी सदर रक्कम देण्याचे टाळाटाळ केली. त्यावेळी मार्केट मध्ये रु.3250/-असा भाव होता. परंतु गैरअर्जदार यांनी रु.2800/- प्रमाणे हिशोब केला व दोन लाख रुपये (2,00,000/-) अर्जदाराला दिले व 30,000/-रुपये अर्जदाराच्या बँकेत भरले व दि. 8.5.2012 रोजी रु.8,000/- (आठ हजार रुपये ) नगदी दिले. अशा प्रकारे एकूण रु.2,38,000/- एवढीच रक्कम अर्जदाराला दिली. मात्र गैरअर्जदार याने सदर रक्कम देतांना कोणत्या दराने त्याचा हिशोब केला याचे कोणतेही टिपन किंवा पावती अर्जदार यांना दिली नाही. अर्जदाराच्या मता नुसार गैरअर्जदार याने दि. 19.11.2011 रोजी सोयाबीन वर रु.100/- चा फरक धरला व दि. 8.11.2011 चे सोयाबीनवर रु.50/- फरक धरला व अशा प्रकारे 44.40 क्विंटल सोयाबीनचे रु.3100/- प्रमाणे रु.1,37,640/- व 45 क्विंटल सोयाबीनचे रु.3250/- प्रमाणे रु.1,46,250/- असे एकूण 2,83,890/- गैरअर्जदार याने अर्जदारास देणे गरजेचे होते. परंतु गैरअर्जदार यांनी फक्त रु.2,38,000/- एवढीच रक्कम अर्जदाराला दिली. त्यामुळे रु.45,890/- एवढी रक्कम गैरअर्जदार याने हडप केली. सदर रक्कम मिळविण्यासाठी अर्जदाराने जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी यांच्याकडे वारंवांर हेलपाटे मारले, लेखी पत्र दिले. परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही. म्हणून अर्जदाराने जिल्हा उपनिबंधक सह. संस्था यांच्याकडे तक्रार केली. ती नि.क्रं. 4/1 वरुन दिसून येते. तरीही त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून अर्जदाराने नि.क्रं. 4/2 प्रमाणे गै.अ. यांना वकिला मार्फत नोटीस पाठविली. ती गैरअर्जदार यांना पोहचली हे नि.क्रं. 4/5 वरुन दिसून येते. तरीही गैरअर्जदार यांनी अर्जदाराला उर्वरित रक्कम दिली नाही. उलट नि.क्रं. 4/10 प्रमाणे खोटया मजकूराचे उत्तर पाठवून आपली जबाबदारी टाळली असल्याचे दिसून येते.
11 गैरअर्जदार हे प्रस्तुत कामी हजर राहून सुध्दा त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले नाही. किंवा अर्जदाराची तक्रार खोडून काढली नाही. गैरअर्जदार यांनी नि.क्रं. 4/10 प्रमाणे केवळ ढोबळ उत्तर दिले व उत्तरी नोटीसमध्ये सुध्दा गैरअर्जदार हे सोयाबीनचा दर किती होता ? सोयाबीन प्रत्यक्ष किती रुपयात विक्री केले हे अर्जदाराला हिशोबासहीत सांगू शकले असते. परंतु त्यांनी अशी कोणतीही कृती न करता आपली सर्व जबाबदारी झटकली असल्याचे दिसून येते. त्यामुळे अर्जदाराच्या तक्रारीप्रमाणे व नि.क्रं. 10 वरील शपथपत्राप्रमाणे सोयाबीन खरेदी नंतरची उर्वरित रक्कम रु.45,890/- न देता परस्पर सदर रक्कम हडप करुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दुषित व त्रृटीची सेवा देऊ केली आहे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे वि. मंचास वाटते. त्यामुळे गैरअर्जदार यांचे सोयाबीन खरेदीनंतर उर्वरित रक्कम रु.45,890/- मिळणेस अर्जदार पात्र असल्याच्या निर्णयाप्रत हे मंच आलेले आहे.
12 अर्जदार यांनी मोठया विश्वासाने गैरअर्जदार यांच्याकडे सोयाबीन विक्रीसाठी ठेवले होते.त्यातून आलेल्या पैशातून ते मुलीचे लग्न करणार होते. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे विश्वासाचा व अज्ञानाचा गैरफायदा घेतला व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करुन अपुरी रक्कम अर्जदाराला दिली. अशा त-हेने अर्जदार हे आपल्या न्याय हक्कासाठी व व्यवहारपोटी राहिलेली रक्कम मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे हे सर्व कागदपत्रांवरुन दिसून येते. मात्र तरीही गैरअर्जदार यांनी सदर देय रक्कम दिली नाही किंवा देण्याची कोणतीही कृती केली नाही. एवढेच नव्हेतर वि. मंचाची नोटीस मिळूनही या मंचासमक्ष हजर राहून आपले म्हणणे मांडण्याची तसदी गैरअर्जदार यांनी घेतली नाही. यावरुन गैरअर्जदार यांची नकारात्मक मानसिकता दिसून येते.
13 वरील सर्व विवेचनावरुन मंचाचे स्पष्ट मत आहे की, गैरअर्जदार यांनी व्यवहार पूर्ण न करता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दुषित व त्रृटीची सेवा दिली असल्याचे सिध्द होत आहे. त्यामुळे अर्जदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.2000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 1000/- मंजूर करावे असे मंचास न्यायोचित वाटते.
14 एकंदरीत वरील सर्व कारणे व निष्कर्ष यावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात न्यूनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे मंच आलेले असल्याने खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
// आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार यांनी अर्जदारांना त्यांचे सोयाबीन खरेदी पोटी राहिलेली रक्कम रु.45,890/- व त्यावर पूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत तक्रार दाखल दिनांक म्हणजेच दि.1.2.2013 पासून द.सा.द.शे.10% व्याज प्रस्तुत निकाल पारीत तारखेपासून 30 दिवसात अदा करावी.
(3) वरील आदेशाची पूर्तता निकाल पारीत तारखेपासून 30 दिवसात करावे अन्यथा उपरोक्त कलम 2 प्रमाणे देय रक्कमेवर तक्रार दाखल दिनांका पासून म्हणजेच दि. 01.02.2013 पासून द.सा.द.शे. 12% दराने व्याज द्यावे लागेल.
(4) गैरअर्जदार यांनी अर्जदारांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 2,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1000/- अदा करावे.
(5) मा. सदस्यांसाठीच्या ब व क फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
(6) निकालपत्राच्या प्रत संबंधितानां पाठविण्यात यावी.