(घोषित दि. 30.05.2013 व्दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराने विकत घेतलेले आर.ओ.मशिन वॉरंटी काळात नादुरुस्त झाल्यानंतर गैरअर्जदार यांनी दुरुस्तीची रक्कम आकारल्यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
1. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी दिनांक 18.06.2012 रोजी अक्वा रिच ग्रँड आर.ओ.मशिन 9,500/- रुपयात खरेदी केले असून सदरील मशिनची वॉरंटी एक वर्षाची आहे. मशिन घेतल्यानंतर दिनांक 01.11.2012 पासून त्यात पाणी फिल्टर होत नव्हते. त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदार यांना कळविले. परंतू त्यांचा मेकॉनिक दुरुस्तीसाठी आला नाही. त्यामुळे अर्जदार स्वत: सदरील मशिन गैरअर्जदार यांच्याकडे घेऊन गेले. गैरअर्जदार यांनी मशिन दुरुस्त करुन दिले. परंतू त्यानंतरही त्यात पाणी फिल्टर होत नव्हते म्हणून त्यांनी पुन्हा गैरअर्जदार यांना कळविले. गैरअर्जदार यांनी अमर दुबे या मेकॉनिकला आर.ओर.मशिन दुरुस्तीसाठी पाठविले. दुबे यांनी मशिनची पाहणी करुन सेडीमेट कॅन्डल व पोस्ट कार्बन खराब झाल्याचे सांगून ते बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. मेकॉनिकने सदरील पार्ट बदलून दिले. परंतू त्याबद्दल रक्कम आकारली. वॉरंटी काळात मशिन खराब झाल्यानंतर दुरुस्तीसाठी पैसे घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन दुरुस्तीसाठी आकारलेली रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
2. गैरअर्जदार यांना मंचाने नोटीस पाठविली असता घेण्यास नकार या पोस्टाच्या
शे-यासह परत आली ती डीम सर्व्हिस मानण्यात येऊन गैरअर्जदार यांच्या विरुध्द
एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला.
अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की,
3 अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून 18 जुलै,2012 रोजी सुस्वाणी एन्टरप्राईजेस यांच्याकडून अक्वा रिच ग्रॅंड हे आर.ओ.मशिन 9,500/- रुपयास विकत घेतले आहे. अर्जदाराने नि.08 पान 11 वर एस्टिमेट मेमो दाखल केला आहे.
4 अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार यांनी आर.ओ.मशिन दुरुस्त करुन दिले. परंतू वॉरंटी असतानाही दुरुस्त केलेल्या सुटया पार्टचे व दुरुस्तीचा खर्च द्यावा लागला. अर्जदाराने नि.03 (पान 12) वर पोस्ट कार्बन 300/- रुपये फ्री फील्टर 350/- रुपये व सर्व्हिस चार्जचे 150/- रुपये असे एकूण 850/- रुपयाचा दिनांक 25.11.2012 रोजीचा क्रेडीट मेमो दाखल केला आहे.
5 अर्जदाराने नि.क्र.4 वर अमर नंदकुमार दुबे या मेकॅनिकचे शपथपत्र दाखल केले आहे. अर्जदाराने तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांच्या तर्फे दुबे नावाच्या मॅकेनिकने येऊन मशिन दुरुस्त करुन दिल्याचे म्हटले आहे. अमर दुबे यांनी शपथपत्रामध्ये 650/- रुपयाचे दोन पार्टस व गैरअर्जदार यांनी दिलेला एक पार्ट अर्जदाराच्या आर.ओ मशिनमध्ये बदलून दिल्याचे म्हटले आहे व 150/- रुपये सर्व्हिस चार्ज लावल्याचे म्हटले आहे.
6 गैरअर्जदार यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला आहे व अर्जदाराने गैरअर्जदार यांचा मेकॅनिक अमर नंदकुमार दुबे यांचे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी वॉरंटीकाळात मशिन दुरुस्तीसाठी 850/- रुपये घेतल्याचे दिसून येते. नि.क्र. 3 वरील पान 11 वरील एस्टिमेट मेमोमध्ये अक्वा रिच ग्रँड इलेक्ट्रॉनिक्स पार्टवर वॉरंटी 1 वर्ष व फिल्टर आणि मेम्ब्रेंनसाठी 6 महिन्याची वॉरंटी असे नमूद केलेले दिसून येते. अर्जदाराचा फिल्टर व मेम्ब्रेन 6 महिन्यातच नादुरुस्त झाल्याचे दिसून येते.
वरील सर्व निरीक्षणावरुन अर्जदाराची तक्रार मान्य करण्यात येते.
आदेश
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास 850/- रुपये 30 दिवसात द्यावे.
- गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चा बद्दल रुपये 1,000/- 30 दिवसात द्यावे.