सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र.160/2015.
तक्रार निकाली ता.16-07-2015.
श्री. मोहन विश्वनाथ भालसिंग,
रा.वाळकी, ता.नगर, जि.अहमदनगर. ....तक्रारदार.
विरुध्द
1. अमर सिडस् प्रा.लि.,
शाखा साठे, तर्फे अधिकृत इसम,
मु.साठे,पो.निंबळक, आसू रोड,
ता.फलटण, जि.सातारा.
2. अमर सिडस् प्रा.लि.,
प्रधान कार्यालय तर्फे
शाखा व्यवस्थापक,
ऑफीस नं.103/104/105,
पहिला मजला, शितल प्लाझा,
मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे. ..... जाबदार.
तक्रारदारतर्फे – अँड.व्ही.आ.शेट्टी
आदेश
(सदर आदेश मा.श्री. श्रीकांत कुंभार, सदस्य यांनी पारित केला.)
1. प्रस्तुत तक्रारदार यांनी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे दाखल केली आहे.
प्रस्तुत तक्रारदार यांच्या तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे,-
प्रस्तुत अर्जदार हे मौजे वाळकी, ता. नगर, जि. अहमदनगर येथील रहिवाशी आहेत . त्यांनी यातील जाबदार क्र. 2 यांचेमार्फत काबुली हरभरा बियाणे खरेदी केले होते. त्यासाठी प्रस्तुत अर्जदार यांनी सरळ जाबदार क्र. 2 यांचेकडे संपर्क साधून त्यांना बियाणे देण्याची विनंती केली. प्रस्तुत जाबदार क्र. 2 यांनी त्याचे बियाणांचे अधिकृत विक्रेते मु.साठे, पो.निंबळक,ता.फलटण येथील जाबदार क्र. 2 च्या शाखेतून बियाणे मागवून घेवून व्ही.आर.एल.ट्रान्स्पोर्ट कंपनीव्दारे प्रस्तुत अर्जदार यांना पाठवून दिले व सदर बिलाचे पैसे प्रस्तुत अर्जदार यांनी जाबदार क्र. 2 यांना त्यावेळीच अदा केलेले आहेत. त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदार यांनी त्यांच्या शेतीमध्ये ते हरभरा बियाणे पेरले. पैकी एकूण आठ एकर क्षेत्रामध्ये विषयांकित हरभरा बियाणाची एकूण आठ एकर क्षेत्रात पेरणी केली असता एकूण 8 एकर पैकी 4 एकर क्षेत्रामध्येच बियाणे पूर्ण क्षमतेने उगवले परंतु उर्वरीत 4 एकर क्षेत्रामध्ये ते उगवलेच नाही. या बाबीची कल्पना प्रस्तुत अर्जदार यांनी जाबदार यांना दिलेली होती. परंतु याबाबतीत जाबदार क्र. 2 काहीही कारवाई आजपावेतो केलेली नाही. प्रस्तुत अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून दि. 6/12/12 रोजी तज्ञ समितीच्या माध्यमातून झालेला पंचनामा प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेला आहे. व 4 एकर क्षेत्रामधील सदोष बियाणांच्यामुळे उगवण न झाल्यामुळे झालेली नुकसानी रक्कम रु.2,70,000/- त्यांनी मंचाकडे मागितलेली आहे.
प्रस्तुत अर्जदार यांनी याकामी नि. 6 कडे पुराव्याचे कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये नि. 5/4 कडे यातील अर्जदार यांनी त्यांच्या बियाणांची मागणी नोंद केलेली व सदर विषयांकीत बियाणे यातील जाबदारांना अर्जदारांना डिलीव्हर केल्याचे चलन जोडलेले आहे. त्याचप्रमाणे नि. 5/11 कडे अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कडे यातील जाबदार क्र. 2 यांच्याविरुध्द प्रस्तुत अर्जदार यांनी प्रथम तक्रार क्र.202/13 दाखल केली होती. तिचा निकाल गुणदोषांवर अहमदनगर ग्राहक मंचाने दि.16/10/2014 रोजी दिलेला असून त्याची सहीशिक्याची नक्कल प्रस्तुत प्रकरणी नि. 5/12 कडे दाखल केली आहे व सदरची तक्रार अहमदनगर ग्राहक मंचाने खारीज केलेली आहे.
2. वरील स्वरुपाची तक्रार स्विकृतीसाठी मंचासमोर आली त्यावेळी वरील प्रकारचा युक्तीवाद अर्जदाराचे वकील अँड.शेट्टी यांनी केला व अर्जदारांचे वकील यांनी सदरची तक्रार या मे. मंचामध्ये चालण्यास पात्र असल्याने सदरची तक्रार दाखल करुन घ्यावी अशी विनंती मंचास केली.
3. वरील आदेश कलम 1 व 2 मधील वस्तुस्थिती व कलम 2 मधील अर्जदारांची विनंती व प्रकरण नि.5/4, नि.5/12 कडे दाखल केलेले पुरावे पाहता, प्रस्तुत तक्रार गुणदोषावर स्विकृत करणेसाठी योग्य की अयोग्य याबाबतचा निर्णय देणेसाठी आमचेसमोर खालील मुद्दे उपस्थित झाले.
अ.नं. मुद्दे निष्कर्ष
1. प्रस्तुत प्रकरण दाखल करुन घेवून ते चालविण्याचा
अधिकार या मंचास आहे काय ? नाही.
2. अंतिम निर्णय काय? अर्जदाराची तक्रार स्विकृत
करणेत येत नाही.
4. कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 व 2-
प्रस्तुत अर्जदार हा मुळचा मौजे वाळकी, ता. नगर. जि. अहमदनगर येथील रहिवाशी आहे. त्याने यातील जाबदार क्र. 2 यांचेविरुध्द अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये दि.22/4/2013 रोजी यातील जाबदार क्र. 2 च्या विरुध्द आदेश कलम 1 मधील कथनाच्यापृष्ठयर्थ तक्रार दाखल केली होती ही गोष्ट स्पष्ट होते. ही बाब अर्जदार यांना कबल आहे.
4(2) प्रस्तुत प्रकरणातील नि. 5/4 चा बियाणे ऑर्डर बुकींगचा दस्तऐवज पाहीला असता, त्यावरुन असे स्पष्ट होते की, प्रस्तुत अर्जदार यांनी त्यांची हरभरा बियाणे खरेदीचे ऑर्डर सरळपणे यातील जाबदार क्र. 2 यांचेकडे दिलेली होती. व जाबदार क्र.2 यांच्या माध्यमातून त्यांनी स्वतः त्यांच्या सातारा येथील मु.साठे, पो. निंबळक, ता. फलटण येथील अधिकृत विक्रेते अमर सिडस् यांचेकडून घेवून सदरचे बियाणे व्ही.आर.एल.ट्रान्स्पोर्ट कंपनीव्दारे जाबदार क्र. 2 यांनी स्वतः अर्जदार यांना पाठविलेले होते ही गोष्ट अर्जदार यांना मान्य व कबूल आहे. या अनुषंगाने विचार करता प्रस्तुत अर्जदार यांनी अहमदनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात जाबदार क्र. 2 यांच्याविरुध्द केलेली ग्राहक तक्रार क्र. 202/13 ही योग्य होती असे स्पष्ट दिसते. विषयांकित बियाणे प्रस्तुत अर्जदाराने पुणे येथून डायरेक्ट हरभरा बियाणे उत्पादन करणा-या कंपनीच्या माध्यमातून बियाणे खरेदीची ऑर्डर जाबदार क्र. 2 यांचेकडे नोंदलेली होती व त्यांच्या माध्यमातूनच जाबदार क्र. 2 यांनी स्वतः ते बियाणे ट्रान्स्पोर्टव्दारा अर्जदार यांना डायरेक्ट पुरविलेले होते. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार अर्जदाराच्या मुळ राहत्या जिल्हयामध्येच दाखल करणे आवश्यक होते व तशी ती त्यांनी दाखल केलेली आहे. तरी परंतु, अहमदनगर जिल्हा ग्राहक मंचाने ‘अमर सिडस् या बी-बियाणे उत्पादन करणा-या कंपनीचे कार्यालय अहमदनगर येथे नाही.’ बियाणे खरेदीचा व्यवहार मौजे साठे, ता.फलटण,जि.सातारा येथे झाला असल्याने सदर प्रकरण चालवण्याचा या मंचास अधिकार क्षेत्र येत नाही. त्यामुळे अहमदनगर येथील ग्राहकाचा याच विषयावरील मुळ तक्रार अर्ज खारीज केलेला आहे. एकूणच अहमदनगर जिल्हा मंचाने दिलेल्या याच मंचाच्या या प्रकरणाबाबतच्या निकालाचे अवलोकन केले असता, प्रस्तुत निकालपत्र हे पूर्णांवशाने गुणदोषावर दिले असल्याचे आम्हास आढळून आले त्यामुळे प्रस्तुत अर्जदार यांना अहमदनगरच्या जिल्हा मंचाने दिलेल्या याच विषयावरील निकालावरती अपीलात जाणे हाच पर्याय योग्य होता असे आमचे स्पष्ट मत आहे. एकाच विषयावरती मंचाकडे निर्णय झाला असल्याने त्याच विषयावरती पुन्हा या मंचामध्ये तक्रार दाखल करुन घेवून त्यावर पुर्ननिर्णय करणे योग्य होणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. वरील कारणमिमांसामुळे प्रस्तुतची तक्रार या मंचामध्ये दाखल करुन घेण्यास पात्र नाही त्यामुळे प्रस्तुतची तक्रार अस्विकृत करण्यात येते या निष्कर्षाप्रत हा मंच आले आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 1 व 2 यांचे उत्तर नकारार्थी देत आहोत.
4(3) या तक्रारीच्या स्विकृतीच्यापृथ्यर्थ प्रस्तुत अर्जदार यांनी मा राष्ट्रीय आयोगाकडील CPJ (2008) III page No. 12 (NC) National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi यांचेकडील Goa Urban Co-Operative Ltd., and Anr. V/s. Franklin Noronha and Anr. यांचे First Appeal No 198/1999 decided on 21/2/2008 या न्यायनिर्णयाचा आधार घेतला आहे. या निर्णयाचा व प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थितीचा विचार करता याच प्रकरणाच्या विषया संबंधाने अहमदनगर जिल्हा मंचाने प्रकरणी गुणदोषांवर अंतीम न्यायनिर्णय केला असल्याने या प्रकरणास Res-Judicata चा बाध येतो. त्यामुळे प्रस्तुतचा न्याय नि र्णय याप्रकरणी लागू पडत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे.
4(4) वरील कारणमिमांसा व विवेचन यास अधिन राहून खालीलप्रमाणे आदे
श पारीत करण्यात येतात.
आदेश
1. अर्जदार यांची प्रस्तुतची तक्रार अस्विकृत करण्यात येते.
2. सदरचा आदेश खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
3. सदर आदेशाच्या सत्यप्रती अर्जदार यांना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 16-7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.