न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील कथन थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांना नवीन घर बांधावयाचे होते. वि.प. हे बांधकाम व्यावसायिक असलेने तक्रारदारांनी वि.प. यांचेशी संपर्क साधला. उभयतांमध्ये घराचे बांधकाम करणेबाबत दि. 12/06/2020 रोजी रु.100/- च्या स्टँपवर करारपत्र झाले व याचदिवशी तक्रारदारांनी वि.प. यांना रक्कम रु. 1 लाख अॅडव्हान्स म्हणून दिले. एकूण बांधकामाचा खर्च मटेरियल व मजूरीसह रु.5 लाख इतका ठरला होता व सदर बांधकाम सहा महिन्यात पूर्ण करुन देण्याचे ठरले होते. तक्रारदारांनी वि.प. यांना वेळोवेळी चेकद्वारे रकमा अदा केल्या असून त्याचा सविस्तर तपशील तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केला आहे. तक्रारदारांनी वि.प. यांना एकूण रक्कम रु 4,47,000/- इतकी रक्कम अदा केली आहे. स्लॅबचे काम झाल्यानंतर तक्रारदार यांनी गिलाव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत वि.प. यांना विनंती केली असता वि.प. यांनी आज येतो, उद्या येतो असे सांगून 6 महिने काम लांबविले. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदारांकडून आणखी रकमेची मागणी केली म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना आणखी रक्कम रु. 70,000/- अदा केली. परंतु वि.प. यांनी घराच्या आतील व पाठीमागील बाजूस गिलावा केला व समोरचा गिलावा न करता अन्य लोकांच्या बांधकामाची कामे करु लागले. तदनंतर वि.प. यांनी तक्रारदारास धमकीची भाषा वापरणेस सुरुवात केली. म्हणून तक्रारदारांनी पोलिस स्टेशनला तक्रारीही केल्या आहेत. वि.प. यांनी खालील कामे पूर्ण केली नाहीत.
- सिमेंट कॉंक्रीट जिना – अट क्र.3
- पॅरापीट चारी बाजूचे नाही – अट क्र.2 व टॉवरचे काम नाही.
- संडासची टाकी बसवलेली नाही.
- प्लंबींगचे काम पूर्ण नाही. करारपत्र पान नं.2
- टचअप केलेले नाही. अट क्र.18
- किचन कपाट कडाप्पा नाही, हॉल-कपाट कडाप्पा नाही अट क्र.15
- चप्पल दिवळी-1, देवघर-1, वॉशबेसीन-1, बसविलेले नाही. अट क्र.16
- खिडक्यांचे ग्रील, स्पांडेल नाही.
- हॉलचे खिडकीचा बाहेरील बाजूस गिलावा नाही.
- स्लॅबची लेव्हल केलेली नाही.
तदनंतर तक्रारदारानी वि.प. यांचेविरुध्द रे.क्रि.के नं. 103/2022 ची फिर्याद प्रथमवर्ग दंडाधिकारी, जयसिंगपूर यांचे कोर्टात दाखल केली आहे. अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे. म्हणून, तक्रारदाराने प्रस्तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.
2. प्रस्तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून उर्वरीत येणे बाकी रक्कम रु. 2,87,000/-, दुस-या कॉन्ट्रॅक्टरकडून करुन घेतलेल्या कामासाठी द्यावी लागलेली रक्कम रु. 2,10,000/-, मानसिक त्रासापोटी रु.2,00,000/-, नोटीस व कोर्ट खर्चापोटी रु. 25,000/-, भाडयाच्या घरात रहावे लागलेने त्याचा खर्च रु.54,000/-, नुकसान भरपाईपोटी रु.1 लाख वि.प. कडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्हीट, कागदयादी सोबत वाद मिळकतीचा सातबारा उतारा, तक्रारदार व वि.प. यांचेमधील करारपत्र, वि.प. यांनी दिलेले कोटेशन, बांधकाम परवाना, बांधकामाचे इस्टिमेट, तक्रारदारांनी पोलिस अधिका-यांना दिलेली पत्रे, एन.सी.आर.ची प्रत वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. प्रस्तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून शिल्लक देय रक्कम, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी झालेल्या खर्चाची रक्कम तसेच नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्तरे आम्ही होकारार्थी दिली आहेत कारण तक्रारदार यांना नवीन घर बांधावयाचे होते. वि.प. हे बांधकाम व्यावसायिक असलेने तक्रारदारांनी वि.प. यांचेशी संपर्क साधला. उभयतांमध्ये घराचे बांधकाम करणेबाबत दि. 12/06/2020 रोजी रु.100/- च्या स्टँपवर करारपत्र झाले व याचदिवशी तक्रारदारांनी वि.प. यांना रक्कम रु. 1 लाख अॅडव्हान्स म्हणून दिले. एकूण बांधकामाचा खर्च मटेरियल व मजूरीसह रु.5 लाख इतका ठरला होता व सदर बांधकाम सहा महिन्यात पूर्ण करुन देण्याचे ठरले होते. तक्रारदारांनी वि.प. यांना वेळोवेळी चेकद्वारे रकमा अदा केल्या असून त्याचा सविस्तर तपशील तक्रारदारांनी तक्रारअर्जात नमूद केला आहे. तक्रारदारांनी वि.प. यांना एकूण रक्कम रु 4,47,000/- इतकी रक्कम अदा केली आहे. तक्रारदाराने वि.प. यांना भरत अर्बन को-ऑप बँक जयसिंगपूर येथील तक्रारदाराचे बचत खातेतील एकूण रक्कम रु. 5,27,000/- चेकद्वारे अदा केलेचे बँक स्टेटमेंटवरुन स्पष्ट होते. वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. तक्रारदार यांनी कॉन्ट्रॅक्टर श्री अकबर पटेल यांचेकडून अपूर्ण राहिले बांधकामाची जागेवर पाहणी करुन दिलेल्या अहवालाबाबत अॅफिडेव्हीट दाखल केले आहे. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या साक्षीदारांची शपथपत्रे, तसेच करारपत्रे व अपूर्ण कामे पूर्ण करणेसाठी झाले खर्चाची बिले, पुरावा शपथपत्र, लेखी तोंडी युक्तिवाद यांचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून एकूण रक्कमरु. 5,37,000/- स्वीकारले आहेत. पैकी रक्कम रु.2,50,000/- चे काम वि.प. यांनी पूर्ण केले आहे. उर्वरीत रक्कम रु. 2,87,000/- वि.प. कडे शिल्लक आहेत. सदरची रक्कम रु. 2,87,000/- वि.प. कडून मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच अपूर्ण कामे पूर्ण करणेसाठी झालेला खर्च हा रु.2,10,000/- असलेचे तक्रारदाराने दाखल केलेले करारपत्रे व बिले तसेच शपथपत्रावरुन स्पष्ट होते.
तक्रारदार यांनी कामी खालील साक्षीदारांची शपथपत्रे दाखल केली आहेत.
- श्री शैलेंद्र लोखंडे
- अकबर पटेल
- शब्बीर मणेर
- स्वतः तक्रारदार महावीर पाटील
-
तसेच तक्रारदार यांनी दि. 29/11/2022 रोजी कागदयादीसोबत –
- तक्रारदाराने प्रसाद कारेकर यांचेसोबत प्लंबींग साठीचा केलेला करार
- तक्रारदाराने विजय पाटील सोबत गवंडी कामाचा केलेला करार
- तक्रारदाराने निहाल मुल्ला सोबत जीना बांधणेसाठी केलेला करार
- तक्रारदाराने सति श भोसले विजय पॅराफीट/पडदी बांधणेसाठी केलेला करार
- तक्रारदाराने माल खरेदी केलेल्या पावत्या व बिले
8. वि.प. यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी आयोगात हजर झालेले नाहीत. म्हणून, वि.प. यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे कथनाचे पुष्ठयर्थ पुराव्याचे शपथपत्र तसेच साक्षीदारांची शपथपत्रे दाखल केली आहेत. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे.
9. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून वि.प. ने कामे केलेली रक्कम वजा जाता उर्वरीत रक्कम रु. 2,87,000/- तसेच वि.प. ने वेळेत कामे पूर्ण न केलेने दुस-या कॉन्ट्रॅक्टरकडून काम करुन घेणेसाठी आलेला खर्च रु. 2,10,000/- असे एकूण रु. 4,97,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रकमेवर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-, भाडयाने घर घ्यावे लागले त्यासाठी रु. 50,000/- अशी रक्कम वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2) वि.प. यांनी तक्रारदार यांना रक्कम रु. 4,97,000/- अदा करावी तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/-, घरभाडयाचे खर्चापोटी रु. 50,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदींन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.