निकालपत्र
(पारित दिनांक12-03-2009)
द्वारा. श्रीमती प्रतिभा पोटदुखे, अध्यक्षा ः
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, ..........
1. तक्रारकर्ता यांचे पती श्री. ओमप्रकाश भेंडारकर यांनी कॅपीटल युनीट गेन साइज वन या अंतर्गत वि.प. यांच्याकडून जीवन विमा पॉलीसी क्र. 0033672172 रु. 100000/- करिता काढली होती. सदर पॉलीसीची प्रारंभ तीथी ही दि. 23/12/06 अशी असून पॉलीसीचा हप्ता हा वर्षातून एकदा भरावयाचा होता. तक्रारकर्ता या पॉलीसीच्या नॉमीनी होत्या.
2. तक्रारकर्ता यांच्या पतीचा दि. 04/05/07 रोजी मुत्यू झाला.
3. माहे एप्रिल 2008 मध्ये वि.प. यांनी पत्राद्वारे विमा दावा नामंजूर करत असल्याचे तक्रारकर्ता यांना कळविले. दि. 18/08/08 रोजी या निर्णयाच्या अपिलावर विचार करण्यात आला व विमा दावा नामंजूर करण्यात आल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
4. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, पॉलीसीची रक्कम रु. 100000/- ही वि.प. यांच्यकडून ऑक्टोंबर 07 पासून ती रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होईपर्यंत 18 टक्के व्याजासह मिळावी. तसेच शारिरिक व मानसीक त्रासाकरिता रु. 10000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रु. 5000/- वि.प. यांच्याकडून प्राप्त व्हावेत.
5. वि.प. यांनी आपला लेखी जबाब नि.क्र. 09 वर दाखल केलेला आहे. वि.प. म्हणतात की, तक्रारकर्ता यांनी त्यांना मागण्यात आलेली खरी कागदपत्रे ही वि.प.यांना पुरविलेली नाही. मृतक यांनी महत्वाची माहिती लपवून ठेवून त्यांच्याकडून पॉलीसी घेतली. त्यांची तब्येत बरी नव्हती व ते सतत ऑफिसमध्ये गैरहजर असायचे. तक्रारकर्ता यांचा विमा दावा हा योग्य त्या कारणासाठीच नाकारण्यात आलेला असल्यामुळे सदर ग्राहक तक्रार ही नुकसान भरपाई खर्चासह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
6. तक्रारकर्ता व वि.प. यांनी दाखल केलेली शपथपत्रे, दस्ताएवज, इतर पुरावा व वि.प.यांनी केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांचा विमा दावा हा वि.प.यांनी प्रपोजल फॉम मध्ये महत्वाची माहिती लपवून पॉलिसी घेतल्याचे कारण दाखवून नाकारला आहे. मृतक श्री. ओमप्रकाश भेंडारकर यांना डायबिटीस होता व ही बाब त्यांनी प्रपोजल फॉर्म भरतांना लपवून ठेवली असे वि.प.लेखी जवाबात म्हणतात.
7. वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या डॉ.नितीन कोतवाल यांच्या दि. 13.03.04 च्या मेडीकल सर्टिफिकेट मध्ये मृतक श्री. ओमप्रकाश भेंडारकर यांचे रोगनिदान करतांना 'D.M.Anxety Neurosis' असे नमूद केले आहे, ही बाब तक्रारकर्ता यांनी प्रतिउत्तर न दिल्यामुळे तसेच युक्तिवाद न केल्यामुळे नाकारल्या गेलेली नाही.
8. मृतक श्री. ओमप्रकाश भेंडारकर यांचा मृत्यु हा कार्डिओ रेस्पीरेटरी अरेस्ट मुळे झाला याबद्दल वाद नाही. वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या एल.आय.सी. ऑफ इंडिया व इतर वि. श्रीमती शशी बाला या IV(2003) सीपीजे 91 (एनसी) मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय राष्ट्रीय आयोगाने मृतकाने डायबिटीज हा आजार असतांना ती बाब लपवून पॉलिसी घेतली व डायबिटीज व हार्ट अर्टेक चा आपसात संबंध आहे हे सिध्द झाल्यामुळे विमा मंडळाने विमा दावा नाकारणे हे संयुक्तिक आहे असे म्हटले आहे.
9. सदर प्रकरणात सुध्दा मृतक श्री. ओमप्रकाश भेंडारकर यांना सन 2004 मध्ये डायबिटीज होता व त्यांनी प्रपोजल फार्म भरतांना ही बाब लपवून ठेवल्याचे दिसून येते. शिवाय मृतकाचा मृत्यु हा कार्डियो रेस्पीरेटरी अरेस्ट मुळे झाल्यामुळे वि.प.यांनी दाखल केलेला केस लॉ या प्रकरणास तंतोतंत लागू होतो.
10. वि.प.यांनी तक्रारकर्ता यांचा विमा दावा नाकारल्यामुळे त्यांच्या सेवेत न्युनता आहे असे म्हणता येत नाही.
असे तथ्य व परिस्थिती असताना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.